‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती

पूर्वी कधी एखाद्या कलाकृतीने तुमच्या मनाला चटका लावून आयुष्याबद्दल विचार करण्यास तुम्हाला प्रवृत्त केले? ऑक्टोबर नावाची ही एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती तुम्हाला या प्रश्‍नाच्या भोवर्‍यात नक्‍्‍कीच ओढते. ऑक्टोबर ही एक प्रेमाची, त्यागाची, जाणिवेची, जागरूकतेची तसेच वास्तवाची कहाणी आहे. जुही चतुर्वेदींची कथा ही हृदयवेधक आणि तितकीच नाजूक आहे. तरल दिग्दर्शन आणि कार्यक्षम अभिनयामुळे ही कथा उदात्त ठरते.

दानिश डॅन वालिया (वरुण धवन) आणि शिऊली (बनिता संधू) हे दोघे त्यांच्या इतर मित्रांबरोबर दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हॉटेल मॅनेजमेण्ट ट्रेनी म्हणून काम करत असतात. अचानक घडणाऱ्या दुर्दैवी घटनेमुळे दोघे एकमेकांच्या आयुष्याला बांधले जातात. ह्यातून कथा पुढे सरकते. अपघातामुळे शिऊली आणि तिच्या कुटुंबियांना मदत करताना डॅन स्वतः कसा प्रगल्भ होत जातो आणि त्याचे शिऊलीबरोबर त्याला कधीही न उमगलेले नाते उमलते, हे प्रतीकात्मक पद्धतीने दाखविलेले आहे. उत्कट प्रेमाच्या बांधिलकीचा हा वेगळाच कोन आपल्याला इथे बघायला मिळतो.

सूचकतेने कथानक पुढे नेण्यात सरकार यशस्वी झाले आहेत, हे अनेकदा दिसून येते. ऋतू आणि महिने यांत होत जाणारे बदल खूप सूक्ष्म प्रकारे वेशभूषा, संवाद आणि दृश्यांमधून दाखवलं गेलंय. पारिजातकाचे फूल आणि शिऊली ह्यांच्यातील साधर्म्य अगदी सुरुवातीपासूनच बघताना दर्शविले जाते.

अति नाट्यमय दृश्ये टाळणारा आणि नैसर्गिक संवाद असलेला ऑक्टोबर हा हल्लीच्या व्यावसायिक हिंदी चित्रपटांम धील एक धाडसी प्रयत्न आहे. अगदी दैनंदिन दृश्ये कौशल्याने हाताळल्यामुळे स्थिर कथानकाला अनुसरून चपखल बसतात. हॉटेल आणि हॉस्पिटलमधील बारीकसारीक दृश्ये अतिशय सुंदर. याशिवाय भिंतीबाहेरील निसर्गाची दृश्ये देखील फार सुंदर झाली आहेत. मुख्य कलाकारांबरोबर सहकलाकारांनी उत्कृष्ट अभिनय करून चित्रपटात एक सहजता निर्माण केली आहे. मुलांबद्दल असलेल्या शंकाकुशंका आणि त्यातून निर्माण होणारी पालकांच्या मनातील हतबलतेची भावना पडद्यावर बघताना हृदयात कालवाकालव होते. शिऊली ज्यावेळी अपघातात सापडते, त्या वेळच्या दृश्यातील नैसर्गिकता बघण्यासारखी आहे. गाणी आणि नृत्ये एखाद्या कथेत किती दुय्यम ठरतात तसेच पार्श्वसंगीत त्यांचा अभाव किती उत्तमरीत्या भरुन काढू शकतो ह्याची अनुभूती आपल्याला शंतनु मोईत्रा ह्यांच्या संगीतातून जाणवते.

वरुण धवनने अगदी कसून आणि ताकदीने आपली भूमिका साकारलीय. डॅनच्या पात्रात असलेली मानसिक गुंतागुंत, हेकेखोरपणा आणि संवेदनशीलता त्याने व्यवस्थितरीत्या पेलल्या आहेत. त्याचे हॉस्पिटल नर्स, सुरक्षारक्षक यांच्यासोबतचे संवाद फार नैसर्गिक आणि अकृत्रिम वाटतात. जर आपल्याला योग्य भूमिका मिळाल्या तर आपण त्याचे सोने करू शकतो हे तो सिद्ध करून जातो. बनिता संधूने धिटाईने पदार्पण केले आहे. तिचे निरागस टपोरे डोळे बरेच काही बोलून जातात. भूमिकेत आणखी भाव खाऊन जाते ती म्हणजे शिऊलीच्या आईच्या भूमिकेत असलेली गीतांजली राव! मोठ्या पडद्यावर पहिलेच पदार्पण असूनही तिचा चेहरा दुःखी आईचे सगळे भाव बोलून जातो.

काही सीन थोडे खेचलेले आहेत असे वाटते, तसेच कुठेतरी विनोदी छटा थोडी जास्त झालीय असे देखील वाटते. कथानकाचा प्रवाह हा थोडा धीमा असूनही तो कंटाळवाणा होत नाही. उलट  तो त्या क्षणाचे गांभीर्य दर्शवतो. काही दोषपूर्ण पात्रे (मित्र व परिवार) आपण ज्या समाजात राहतो त्याचा आरसा बनून पुढे उभी राहतात.

ऑक्टोबर प्रेम आणि त्याचे परिणाम ह्यांचे एक वेगळेच दर्शन घडवतो. जुही चतुर्वेदींचे कथानक हृदयवेधक आहे, आणि ह्या संहितेला एका सुंदर सिनेमॅटिक जाळ्यात विणून प्रेक्षकांसमोर एक सुंदर कलाकृती ठेवलेली आहे. बॉक्स ऑफिसवर काहीतरी वेगळे अपेक्षित असणाऱ्या प्रेक्षकांच्‍या मनात हा चित्रपट नक्‍कीच जागा मिळवतो.

लेखक : श्री. अक्षय जामोदकर
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *