इतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत

इंग्लंड व फ्रान्स यांच्यात फ्रान्समधील राजसत्ता कोणाकडे राहावी ह्या विषयावरून वाद उद्भवला व त्यामुळे 1337 ते 1453 पर्यंत म्हणजे 116 वर्ष हे युद्ध चालले. या युद्धाला इतिहासात 100 वर्ष चाललेले युद्ध असे म्हणतात.

फ्रान्सचे ऑर्लिन्स हे शहर ब्रिटिश सैन्याने ऑक्टोबर 1428 मध्ये ताब्यात घेतले. ऑर्लिन्सच्या किल्ल्याचाही ताबा इंग्रज सैन्याने मिळवला व कडक बंदोबस्त केला. ह्याच काळात फ्रान्समध्ये एक सोळा वर्षाची मुलगी दावा करत होती की, तिला ईश्‍वराने संदेश दिला आहे. मानवतेसाठी तिने फ्रान्सच्या बाजूने लढून विजय मिळवावा, असा ईश्‍वराचा आदेश आहे, हे तिने मांडले. ह्या मुलीचे नाव जोन ऑफ आर्क. फ्रान्सचा राजा चार्ल्स याने तिच्या जोडीला काही सैन्य दिले. तिने 29 एप्रिल 1429 ला ऑर्लिन्सवर स्वारी केली. ऑर्लिन्सच्या किल्ल्याच्या भिंती उंच आणि मजबूत होत्या. त्या भेदता येणे अशक्य होते. म्हणून ऑलीन्सच्या पश्‍चिम भागात सैन्य व नागरिकांनी काही हालचाली सुरू केल्या.

त्यामुळे इंग्रजांचे लक्ष तिकडे वळले. ह्या संधीचा फायदा घेऊन जोन सैन्यासह पूर्व बाजूने किल्ल्यात घुसली. किल्ल्याच्या बुरुजांवरचे छत लाकडी असल्याचे तिला समजले. छताला आग लावून धुर होईल व त्याच्या मुळे शत्रुसैन्य दुसर्‍या बाजूला पळत सुटेल. तिथेच त्यांना गाठून पकडावे, अशी योजना तिने आखली. फ्रान्सच्या सैन्याने 29 एप्रिलला हल्ला चढवला. या हल्ल्यादरम्यान स्वतः जोनला खांद्यावर तिर लागला. पण तो तिर तिने तोडला व पुन्हा युद्धात उतरली. यामुळे फ्रान्सच्या सैन्यात वीज संचारली व 8 मे 1929 ला त्यांनी ऑर्लिन्स किल्ल्यासहित जिंकून घेतले. ह्या आठवड्यात घडलेली अतिमहत्त्वाची ऐतिहासिक घटना म्हणजे हिटलरची आत्महत्या. 30 एप्रिल 1945 ला हिटलरने सायनाईटच्या गोळ्या खाल्या व स्वतःवर सर्व्हिस पिस्तुलीने गोळी झाडून घेतली. आत्महत्येच्या दोन दिवसअगोदरच हिटलरने त्याची प्रेयसी इव्हा ब्राऊन हिच्याशी लग्नही केले होते.

जर्मनी महायुद्ध हरणार हे 1943 च्या फेब्रुवारीमध्ये कळून चुकले होते. 1941 मध्ये जर्मनीने सोव्हियत रशियावर हल्ला चढवला. ही जर्मनीची एक मोठी चूक मानली जाते. यामुळे सोव्हियत रशिया,अमेरिका व इंग्लंड हे तीन बलाढ्य देश एकत्र झाले. 1943 च्या फेब्रुवारीत स्टालिनग्राडच्या (सध्याचे नाव व्हॉल्गोग्राड) लढाईत जर्मनीची 6वी भूदल तुकडी (जर्मनीच्या लष्कराचा कणा) हारली. बरेच जर्मन सैन्य थंडीमुळेच मारले गेले. सोव्हियत सैन्य नाझी सैन्याच्या जास्तीत जास्त जवळ राहूनच लढत होतं. त्यामुळे जर्मनीचे विमानदळ ‘लुफ्तवाफा’ विस्फोटकांचा मारा करू शकत नव्हते. त्यानंतर जून 1944 मध्ये मित्र राष्ट्रांच्या फौजांनी जर्मनीच्या पश्‍चिमेकडून आक्रमणाला सुरुवात केली.

युद्धाचे बदललेले वारे पाहून काही जर्मन सैन्यातील अधिकार्‍यांनी हिटलरला मारण्याचा कटही रचला होता. पण हा कट अयशस्वी झाला. चिडलेल्या हिटलरने यामुळे स्वतःच्याच चार हजार लोकांची कत्तल केली. जानेवारी 1945 मध्ये बर्लिन भोवती फास पडला.

पूर्वेकडून सोव्हियत रशिया व पश्‍चिमेकडून अमेरिका आणि इंग्लंडचे सैन्य बर्लिनच्या दिशेने निघाले होते. यामुळे हिटलरने त्याच्या कार्यालयाच्या 55 फूट खाली असलेल्या गुप्त बंकरमध्ये आश्रय घेतला. बंकरमध्ये असतांना हिटलर हर्मन गोअरिंग, हेनरीक हिमलर, जोसेफ गोबेल्स या सहकार्‍यांच्या संपर्कात राहत असे. बंकरमध्ये असतांनाच कार्ल डोनीट्झ याला हिटलरने राज्यप्रमुख म्हणून नेले व गोबेल्सला चॅन्सेलर म्हणून नियुक्त केले. यानंतर 30 एप्रिलला हिटलर व इव्हा यांनी त्यांच्या कुत्र्यांनाही मारून टाकले व स्वतःही आत्महत्या केली.

हिटलरच्या मृत्यूनंतर आठ दिवसांनी म्हणजेच 8 मे 1945 ला जर्मनीने मित्रराष्ट्रांसमोर विनाशर्त शरणागती पत्करली. ह्या दोन्ही ऐतिहासिक घटनांचा निर्णायक अंत 8 मे लाच झाला हा एक अजब ऐतिहासिक योगायोगच म्हणता येईल!!!

लेखक : श्री. सौरभ तोरवणे
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *