आम्ही विसरू नये म्हणून

हिंदू व ज्यू समाजात एक महत्त्वाचे साम्य आहे व ते म्हणजे त्यांच्या कालदर्शिकेत एक अधिक महिना असतो. परिणामी ख्रिश्‍चनांच्या कालदर्शिकेत जसे सणवार ठरलेल्या दिवशीच येतात तसे हिंदू व ज्यू समाजाचे नसते. आपल्याकडे दरवर्षी दिवाळी दसरासारख्या सणांच्या तारखा बदलत असतात. हे सर्व आता आठवण्याचे कारण म्हणजे गुरुवारी 12 एप्रिलला जगभर पसरलेला ज्यू समाज ‘वंशविच्छेद दिवस’ (होलोकॉस्ट दिवस) पाळतो. या दिवशी पोलंडमध्ये हिटलरच्या कैदेत असलेल्या व तेथे  मारण्यासाठीच एकत्र ठेवलेल्या ज्यू लोकांनी 1943 साली बंड केले होते. या बंडाची स्मृती म्हणून जगभरचा ज्यू समाज या दुःखद दिवसाची स्मृती जागवतो.

माणसाच्या इतिहासांत अनेक कारणांसाठी विसावे शतक फार महत्त्वाचे समजले जाते. यात काही गौरवास्पद कारणे आहेत तशीच काही अतिशय लज्जास्पद कारणेही आहेत. गौरवास्पद कारणांत तंत्रवैज्ञानिक प्रगती दाखवता येते. माणूस चंद्रावर गेला, माणसाचे जगणे सुसय्य करणारी निरनिराळी औषधे निघाली वगैरे वगैरे. त्याचप्रमाणे लज्जास्पद कारणांत पहिले महायुद्ध व त्यातील कल्पनातीत हिंसाचार; त्याचप्रमाणे दुसरे महायुद्ध वगैरे नमूद करावे लागते.

पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यात अनेक महत्त्वाचे फरक आहेत. त्यातील दोन फरक लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पहिला फरक म्हणजे दुसरे महायुद्ध संपतासंपता जगाला अणुशक्तीचे भयानक दर्शन झाले. दुसरा फरक दुसरे महायुद्ध हिटलरने केलेला निरपराध ज्यूंचे हत्याकांड. यातही अणुशक्तीचा शोध व उपयोग आज ना उद्या लागणारच होता. मात्र हिटलरने जर्मनीत व नंतर युरोपात ज्यू समाजावर जे अनन्वित अत्याचार केले त्याला मानवी इतिहासात दुसरे समांतर जाणारे उदाहरण नाही. यातील ताणेबाणे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडेसे प्राचीन इतिहासात तर थोडेसे आधुनिक इतिहासात डोकवावे लागेल.

खिस्तपूर्व काळात यहुदी समाजाचा उल्लेख ग्रीकांच्या साहित्यात (म्हणजे ख्रिस्तपूर्व तिसरे शतक ते ख्रिस्तपूर्व पहिले शतक) आढळतो. रोमन सम्राटाने इ.स. 70 मध्ये हा भूभाग जिंकला व ज्यूंना  इस्रायलमधून हाकलून दिले. एवढेच नव्हे तर ज्यूंचा अपमान करण्यासाठी इस्रायलचे नाव बदलून ‘पॅलेस्टाईन’ करण्यात आले. रोमन सम्राटाने हाकलून दिल्यामुळे ज्यूंना त्यांची पवित्र भूमी सोडून जगभर आश्रय घ्यावा लागला. यालाच ‘ज्यूईश डायस्पोरा’ म्हणतात. मात्र जेथे जेथे ज्यू गेले तेथे तेथे त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. यातही ख्रिश्‍चनधर्मीय युरोप आघाडीवर होता. ज्यूंना गावाच्या मध्यवस्तीत राहता येत नसे. त्यांना केवळ ज्यू आहेत म्हणून वेगळा कर भरावा लागत असे. याला अपवाद म्हणजे भारत. भारतात ज्यूंवर कधीही अत्याचार झाले नाहीत.

माणसाच्या ज्ञात इतिहासात स्वतःच्या मायभूमीला हजारो वर्षें पारखा झालेला समाज म्हणून ज्यू समाजाचा उल्लेेख केला जातो. ज्यू समाजाची जरी पॅलेस्टाईनमधून हकालपट्टी झाली तरी जगभर पसरलेल्या ज्यू समाजाने पॅलेस्टाईनला परत जाण्याचे स्वप्न कधीही सोडले नाही. ज्यू समाजात दरवर्षी ‘पास ओवर मिल’ नावाचा सण असतो. या दिवशी बाप मुलाला, मुलगा त्याच्या मुलाला सांगतो की ‘नेक्स्ट इयर इन जेरूसलेम’ म्हणजे पुढच्या वर्षी आपण हे जेवण जेरूसलेममध्ये घेऊ. या सणाद्वारे या समाजाने जेरूसलेेमला परत जाण्याची स्वप्ने पिढ्यान्पिढ्या जिवंत ठेवले. सरतेशेवटी हे स्वप्न 1 मे 1948 रोजी प्रत्यक्षात आले.

मात्र हे स्वप्न साकार होण्याअगोदर ज्यू  समाजाला हिटलरच्या अमानुष अत्याचारांना तोंड द्यावे लागले. हिटलर या आधुनिक नराधमाने सुमारे साठ लाख ज्यूंना गॅसचेंबर्समध्ये कोंडून मारले होते. एका अंदाजानुसार 1933 साली युरोपात ज्यूंची लोकसंख्या सुमारे 95 लाख होती. होलोकॉस्टमुळे युरोपातील ज्यूंची लोकसंख्या 2/3 कमी झाली. या पाशवी कृत्याने जगाचा थरकाप उडाला व सर्वत्र ज्यू समाजाबद्दल सहानुभूती निर्माण झाली. असे असले तरी एकदा हिटलर येऊन गेला म्हणजे पुन्हा येणार नाही असे सांगता येत नाही़  म्हणून ‘होलोकॉस्ट दिवस’ रोजी या दुःखद घटनेचे स्मरण करतात व पुन्हा असे होणार नाही अशी प्रतिज्ञा करतात. हा मुद्दा फक्त ज्यू समाजावर झालेल्या अनन्वित अत्याचारांपुरता सीमित नाही. या घटनेमुळे जे प्रश्‍न उपस्थित होतात त्यांची सतत चर्चा केली पाहिजे. केवळ प्रचाराचे जबरदस्त तंत्र वापरून हिटलरने त्याचा प्रचारप्रमुख गोबेल्सच्या मदतीने जर्मन समाजासमोर ‘ज्यू म्हणजे देशद्रोही’ असे चित्र यशस्वीपणे रंगवले. परिणामी 5 मार्च 1933 रोजी जर्मनीत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत हिटलरचा नाझी पक्ष 33 टक्के मते मिळवून सत्तारूढ झाला. निवडणुकांच्या सहा दिवस अगोदर जर्मनीतील संसदेच्या इमारतीला आग लावण्यात आली होती. ही आग ज्यू समाजाने लावली असा हिटलरने प्रचार केला. सत्तेवर आल्यावर हिटलरने हुकूमशाही आणली. इतर पक्षांवर, कामगार संघटनांवर बंदी घातली. 1933 सालानंतर जर्मनीत 1990 सालीच बहुपक्षीय निवडणुका झाल्या!

हिटलरच्या अस्तानंतर जगभर विचारवंतांत मंथन सुरू झाले की आधुनिक काळात, त्यातही जर्मनीसारख्या युरोपातील अतिशय सुसंस्कृत देशात हिटलरसारखा नराधम उदयाला येऊच का शकतो? या प्रश्‍नाचे उत्तर शोधायला लागले की मग समोर येते ते भयानक वास्तव; मनांत हजारो वर्षांपासून असलेल्या व अलिकडच्या काळात जरा दबून राहिलेेल्या प्रेरणा. यामुळेच शेजारी अनेक वर्षे राहत असलेल्या ज्यू कुटुंंबांना जर्मनसैनिक किंवा हिटलरच्या पक्षातील गुंड त्रास देत होते, तेव्हा काही तुरळक अपवाद वगळता, इतर जर्मनांनी निषेध केला नव्हता. शिवाय हिटलरच्या पक्षाला 33 टक्के मते मिळाली होती. हिटलरच्या मते जर्मन वंशच जगावर राज्य करणासाठी आहे व इतरांनी एकतर मरून जावे किंवा जर्मनीचे गुलाम व्हावे. हिटलरला मिळालेली 33 टक्के मते ही दुर्लक्ष करण्यासारखी आकडेवारी नाही. याचा साधा अर्थ असा की दर तिसर्‍या जर्मन मतदाराला हिटलरच्या पक्षाचा कार्यक्रम माहिती होता व मान्यसुद्धा होता. ही खरी धक्कादायक बाब आहे ज्याचे समाधानकारक उत्तर आजही मिळत नाही.

दुसरे महायुद्ध संपल्यानंतर सर्व जर्मनीत नाझी पक्ष बदनाम झाला होता. त्या पक्षाचे नेते व कार्यकर्तेे एकतर मारले गेले होते किंवा भूमिगत झाले होते. नंतर तर जर्मनीची फाळणी झाली व कम्युनिस्टांच्या ताब्यात असलेला ‘पूर्व जर्मनी’ व पाश्‍चात्त्यांचा वरचष्मा असलेला ‘पश्‍चिम जर्मनी’ अशी विभागणी 1990 पर्यंत होती. 1990 साली लोकांनी पुढाकार घेऊन ‘बर्लिन भिंत’ तोडली व जर्मन एकीकरण पूर्ण झाले. जर्मन एकीकरणाची काळी बाजू म्हणजे ‘नवनाझीवादाचा’ हळुहळू होत गेलेला उदय व नंतरची प्रगती. आज केवळ जर्मनीच नव्हे तर युरोपातील अनेक देशांत नवनाझीवाद जोरात आहे व उजळ माथ्याने वावरत आहे. ही चिंतेची बाब आहे.

मे 1947 मध्ये इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर इस्रायलच्या संसदेने 1951 साली एका ठरावाद्वारे दरवर्षी एप्रिलमध्ये ‘वंशविच्छेद दिन’ पाळण्याचे ठरवले. ‘वंशविच्छेद’ या मुद्द्याचा सतत विचार व्हावा व असे पुन्हा होऊ नये यासाठी सतत जागरूक राहणे कसे गरजेचे आहे हे जगावर ठसावे हा उद्देश होता. पुढे संयुक्त राष्ट्रसंघाला या मुद्द्याचे महत्त्व जाणवले व 2006 सालापासून दरवर्षी 27 जानेवारी हा दिवस ‘इंटरनॅशनल होलोकॉस्ट रिमेंब्रन्स डे’ म्हणून पाळला जात आहे. या दिवशी रशियन फौजांनी दुसर्‍या महायुद्धात पोलंडमधील ऑसविच या गावी जेथे दररोज वीस हजार ज्यू मारले जायचे, ती छावणी मुक्त केली. तो दिवस म्हणजे 27 जानेवारी 1945.

बारा एप्रिलच्या ‘वंशविच्छेद दिनाची’ स्मृती जागवताना त्या हजारो/लाखो ज्यूंच्या बलिदानाचे स्मरण केले पाहिजे. आजच्या जगातही हिटलर आहेत व त्यांच्यापासून आधुनिक संस्कृती वाचवली पाहिजे. अन्यथा दर पाचपन्नास वर्षांनी नवा हिटलर येईल, जगातल्या सत्ताहीन वर्गावर अन्याय करेल जगाला युद्धाच्या खाईत ढकलेल. हा प्रकार जर पुन्हा पुन्हा होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला प्रेमी लेव्ही (1919-1947) या इटालियन ज्यूचा शब्द कायम लक्षात ठेवले पाहिजे. तो म्हणतो it happned, so it can happen again…

लेखक : श्री. अविनाश कोल्हे
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *