आनंदी क्षणाकडील जीवन प्रवासाची वाटचाल

चौदा वर्षांपासून चाणक्य मंडल परिवारच्या कार्यकर्ता असणार्‍या वैशाली पानसरे ग्रंथपाल पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. स्पर्धापरीक्षांसाठी असलेल्या ग्रंथालयातील वाचन साहित्याचा आढावा व वाचकांच्या गरजांचा अभ्यास या विषयात विद्यानिष्णा (एम्. फिल.) पदवी संपादित केली. त्यांच्या अध्ययनाचा प्रवास त्यांच्या शब्दांत.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून विद्यानिष्णात (एम्. फिल.) पदवी घेताना अतिशय आनंद होत आहे, त्यापेक्षा जास्त आनंद माझ्या आई-वडीलांना झाला आहे. कारण ते नेहमी म्हणतात की, ‘तुला त्रास होईल इतकं करू नकोस; पण तुला समाधान मिळेल इतके मात्र तू नक्की कर.’’ चाणक्य मंडल परिवारमध्ये ग्रंथपाल म्हणून मी 2004 पासून कार्यरत आहे. तेव्हा मला स्पर्धापरीक्षांबाबत माहिती नव्हती. परंतु मी जसजशी येथे अधिकाधिक काळ घालवू गले तसतशी माझ्या माहितीत भर पडू लागली. त्यातूनच मी राज्यसेवा पूर्वपरीक्षा सुद्धा दिली. ज्यामुळे मला त्यातील सखोलपणा समजून घेता आला. त्याच दरम्यान सेट/नेट पण दिली. परंतु मला माझ्या कामामुळे अधिक वेळ न देता आल्याने तो टप्पा पार पाडता आला नाही. धर्माधिकारी सरांच्या सततच्या शिक्षणबाबतचे विचार मनात रुजू लागले व त्यांच्या सांगण्यातून ‘स्व’ ची ओळख करून निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता करणे यासाठी मी प्रयत्न सुरू केला. 2014 मध्ये मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठमधील विद्या निष्णात (एम्. फिल.) या पदवीसाठीची प्रवेश परीक्षा दिली आणि मी त्यात यशस्वी झाले. हे मी धर्माधिकारी सरांना सांगितले. तर त्यांनी लगेच प्रवेश घेण्यास सांगितल्यामुळे माझ्यात अभ्यासाचे बळ व उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाचा प्रवास मी सुरू केला. सोमवार ते शनिवार कार्यालयीन 8 तास काम करून उर्वरित वेळेत व रविवारचा पूर्ण वेळेत हे शिक्षण घेत असताना मला अनेक अडचणी आल्या. कारण माझ्या शिक्षणात बराच खंड पडला होता. त्यामुळे सर्व गोष्टी समजून घेणे अवघड जात होते, परंतु माझ्या वर्गातील माझ्या मित्रमैत्रिणी (सौ. राखी दरेकर, सौ आरती नाईक- येलंगे, अश्‍विनी चव्हाण, सौ. धनश्री जाधव, सचिन शितोळे, रामसिंग बिरवा) यांच्यामध्ये सर्वात वयाने मी मोठी. बराच खंड पडल्याने अभ्यासात सर्वात मागे असल्याने सर्वांनी मला खूप छान समजावून सांगत बरोबरीने नेण्याचा प्रयत्न केला व तो मी यशस्वी करूनही दाखविला. प्रत्येकजण नोकरी करणारेच होते. शिवाय राखी व अश्‍विनी तर मुंबईहून दर रविवारी (सकाळी 5 वा. निघून रात्री 11. ला घरी जात) फक्त लेक्चरसाठीच येत असत. त्यांची जिद्द पाहून मला आणखी बळ मिळत असे. त्या काळात तर घरातील सर्व कामे उरकून रात्री 11 नंतर अभ्यासाला बसायचे ते झोप येईपर्यंत. (साधारण पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत) त्यानंतर थोडी झोप काढून दुसर्‍या दिवशी सकाळी घरातील कामे उरकून कामावर हजर असे. आईला पॅरालिसिस झाल्यावर तर मी रात्रभर हॉस्पिटल, सकाळी ऑफिस, मग घर व पुन्हा रात्री हॉस्पिटल असा प्रवास करतच अभ्यास केला.

संशोधनाचा विषय : पुणे शहरातील स्पर्धापरीक्षा संस्था, ग्रंथालयातील ग्रंथ संग्रह विकास व वाचकांच्या गरजा अभ्यासण्यासाठी ज्या संस्था एकाच ठिकाणी अध्यापन वर्ग, अभ्यासिका व ग्रंथालय या तीन ही सुविधा उपलब्ध करून देतात त्या वेळी येणार्‍या अडचणी व गरजा यांच्यामधील योग्य तो मार्ग शोधण्यासाठी चाणक्य मंडल परिवार- पुणे, यशदा-पुणे, स्पर्धापरीक्षा केंद्र-पुणे विद्यापीठ आणि ज्ञान प्रबोधिनी-पुणे या चार संस्थांचा संदर्भ घेतला आहे.

संशोधन विषय निवडीचा हेतू : स्पर्धापरीक्षा ग्रंथालयांची सद्यस्थिती विचाराधीन आहे. कारण स्पर्धापरीक्षा म्हणजे फक्त मार्गदर्शनपर वर्ग व स्वअध्ययन असाच अर्थ सर्वत्र प्रचलित आहे, म्हणूनच ‘स्पर्धापरीक्षा ग्रंथालय’ क्वचितच आहे; त्यामुळे यांचा वापरही ठराविक विशिष्ट वाचक करतात. वास्तविक स्पर्धापरीक्षांची तयारीसुद्धा पदवीची तयारी करतानाच सुरू व्हायला हवी जेणे करून स्पर्धापरीक्षा ग्रंथालयाची मागणी व वापर वेगाने वाढेल. शिवाय आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकामध्ये संशोधन वृत्ती तयार होईल. निवडक संस्थांच्या ग्रंथालयांचा अभ्यास व वाचकांच्या गरजा यांचा आढावा घेणे.

संशोधनाची उद्दिष्टे : ग्रंथालयातील वाचन साहित्याचा आढावा व वाचकांच्या गरजांचा अभ्यास दर्शवण्यासाठी पुढील उद्दिष्टे मांडली आहेत.

  1. स्पर्धापरीक्षा ग्रंथालयातील वाचकांच्या माहितीविषयक गरजांचा अभ्यास करणे. 2. स्पर्धापरीक्षा ग्रंथालयातील ग्रंथ संग्रहाचा अभ्यास करणे. 3. वाचकाला वाचन साहित्याची उपयुक्तता स्पष्ट करणे. 4. पुणे शहरातील स्पर्धापरीक्षा ग्रंथालयातील सेवा सुविधांचा अभ्यास करणे. 5. वाचकाचा माहिती मिळविण्याचा प्रवाह जाणून घेणे. 6. ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या विशेष वाचन साहित्याचा अभ्यास करणे. मला इंटरनेट व सोशल मीडियाबाबतचे ज्ञान अजिबातच नव्हते. परंतु त्या सर्वांनी फोन करून, काही वेळा माझ्या घरी येऊन मला ई-मेल कशी पहायची/पाठवायची तसेच मराठी टायपिंग कसे करायचे अशा काही बेसिक गोष्टी शिकवल्या, माहिती कशी शोधायची हे सर्व मला माझ्या मित्र मैत्रिणींकडून असे मौलिक ज्ञान मिळाले. लेखी परीक्षेत मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर मला खूपच आनंद झाला, जेव्हा प्रबंध लिहिण्याची वेळ आली त्यावेळी धर्माधिकारी सरांशी बोलून दोनतीन विषय निवडले त्यापैकी एका विषयाची निवड तज्ज्ञांनी केली आणि त्यांच्या दृष्टीने माझा विषय हा Antic होता म्हणून सर्वांचेच त्या विषयाकडे पाहण्याचे कुतूहल वाढले व माझी जबाबदारी वाढली. प्रबंधासाठी मला मार्गदर्शन मिळाले ते यशदामधील वरिष्ठ ग्रंथपाल श्री. मनोज कुलकर्णी यांचे. माझी कुलकर्णी सरांची या अगोदरची ओळख होती. माझे बी. लिब्. पूर्ण झाल्यावर विद्यापीठाकडून ट्रेनी म्हणून गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिक्स येथे सहा महिने केल्यावर दोनमहिन्यांसाठी बारकोड लेबल लावणे व पुस्तके मांडणे यासाठी यशदामध्ये उत्तम काम केले होते. कुलकर्णी सरांनी सुद्धा त्याच आपुलकीने मला मार्गदर्शन केले. प्रत्यक्षात प्रबंधाची सुरुवात करताना ध्येय, उद्दिष्ट, गृहितके विषयाला अनुसरून कशी असावीत व त्यावर आधारित प्रश्‍नावली तयार करून विषयावर आधारित निष्कर्ष कसे काढावेत हे समजून सांगितले आणि त्याबाबतचा आराखडा तयार करून घेतला. या सर्व प्रवासात मला विषयाशी संलग्न केंद्रातील सर्व केंद्रप्रमुख व त्यांचे सहकारी या सर्वांनीच मोलाची मदत केली. मला रुपालीताईंनी सुद्धा वेळोवेळी कोर्सच्या आवश्यकतेनुसार अर्धी अथवा पूर्ण रजा देऊन मदत केली आहे तसेच शीतलाताईंनी तर प्रूफ रीडिंग करून दिल्यामुळे माझ्या प्रबंधात तज्ज्ञांना चूकच काढता आली नाही. ते म्हणाले की चूक काढायचीच म्हणून मी सांगतो की, एक-दोन ठिकाणी ‘प्रिंटिंग मिस्टेक’ आहेत. उलट आम्हालाच तुच्याकडून बरीच माहिती मिळाली.

कोर्सच्या कालावधीत सौ. धनिष्ठा खंदारे (Librarian, Tilak Maharashtra Vidyapeeth) यांनी आम्हांला संशोधन तर सौ. सुनीता बर्वे (Senior Technical Officer at National Chemical Laboratory) यांनी माहिती-तंत्रज्ञान आणि सौ. अपर्णा राजेंद्र (Director, University of Pune) यांनी व्यवस्थापन हे विषय शिकविले. तसेच शिकविण्यापलिकडे अधिक समजावले. त्याशिवाय प्रबंधासाठी विषय निवडीनुसार गाईड सुचविणे यासाठी श्री. पानगे (Assistant Librarian, Technical Processing University of Pune) आणि श्री. दहिभाते सरांनी मदत केली. आई कोर्टात क्लार्क व वडील आर्टीओध्ये अकौंटंट होते. मोठा भाऊ एम्. ए. (इतिहास) व लहान भाऊ फक्त दहावी शिकला. मी मोठ्या भावाच्या कॉलेजमध्ये बी. ए. (मानसशास्त्र) करत होते. परंतु लहान भावानेच मी ग्रंथपालचा कोर्स करावा म्हणून स्वतः र्फॉम भरला व मी प्रवेशपरीक्षा देऊन कोर्सला प्रवेश घेतला.

बी. लिब्. ही पदवी प्राप्त केल्यावर वर्षभरात तापाने आजारी पडून ताप मेंदूत जाऊन मी कोमात गेले होते. घरच्यांच्या आशीर्वादाने व डॉ. अनिल गोडबोले (केईएम् हॉस्पिटल) यांच्या प्रयत्नाने पाच दिवसांनी शुद्धीवर आले. त्यानंतर दोन वर्ष मी पूर्णतः आराम केला व ग्रंथालयाच्या कोर्सनुसार गोखले इन्स्टिट्यूट इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पॉलिटिक्स येथे ट्रेनी म्हणून सहा महिने काम केले. नंतर यशदा, पुणे विद्यापीठ (बायोटेक्नॉलॉजी विभाग) येथे पण काम केले. नंतर बहिःस्थ एम्. ए. (समाजशास्त्र) केले. गोखले इन्स्टिट्यूट इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पॉलिटिक्स येथे पुन्हा तीन वर्षांसाठी बोलावले तेव्हा तेथील चौधरी सरांनी मला ‘एम्. लिब्.’ कर असे सुचवले. त्याप्रमाणे प्रवेश घेऊन प्रथम श्रेणी मिळविली. त्यावेळी चाणक्य मंडल परिवारची ‘ग्रंथपाल’ पदाची जाहिरात आली. मी मुलाखत देऊन रुजू झाले ते आजपर्यंत. मला प्रत्येक वळणावर मनापासून काही मौलिक विचार देणारे भेटले व मी सुद्धा त्यांच्या विचारांचा आदर करत गेले आणि धर्माधिकारी सरांचे प्रत्येक व्याख्यान, साप्ताहिक बैठक यातून एक नवी उमेद व नवा विचार घेण्याचा माझा प्रयत्न चालूच ठेवला. भविष्यात डॉक्टरेट पदवी मिळविण्याचा माझा मानस आहे. घरातील प्रत्येकानेच माझ्या मानसिकतेची कदर केल्याने मी सर्वांची ऋणी आहे, हे शब्दांत मांडू शकत नाही  आणि हो एकदा ऑफिसच्या ट्रिपला गेलो असता ताईंनी प्रत्येकाला एका कागदावर स्वतःचे नाव लिहायला सांगितले व तोच कागद सर्वांकडे फिरविला आणि त्यावर प्रत्येकाने त्या व्यक्तीबद्दलचे आपले मत एका ओळीत मांडायला सांगितले. शेवटी सर आणि ताईंनी मत मांडले. अजूनही तो कागद मी जपून ठेवला आहे कारण त्यावर त्यांनी लिहिले आहे की, परिवाराला पुरून उरणारे सद्भाव व हिला कितीही रागावले तरी ती योग्य स्पिरिटमध्ये घेते. त्या ओळी ते अक्षर पाहिले तरी एक नवी उमेद मिळते. प्रत्येक वेळी नकारात्मक किंवा टेन्शनच्या क्षणी धर्माधिकारी सरांची जिद्द, अभ्यास व काम वेळेत व्हावे यासाठी पूर्णाताईंचे ओरडणे हे सर्व डोळ्यासमोर उभे राहायचे आणि त्यातूनच नवी उभारी येत असे. माझ्या आजपर्यंतच्या जीवन प्रवासात प्रत्येकाची मोलाची साथ मिळाली. मी सर्वांची शतशः आभारी व ऋणी राहीन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *