स्ट्रँड – शेवटची भेट

आज मी स्ट्रँड बुक डेपोध्ये शेवटचा जाऊन आलो. यापूर्वी अनेकदा गेलो होतो. बरीच पुस्तकं खरेदी केली होती. पण यावेळच्या इतकी निराशा आली नव्हती. दुकान बंद होत आहे याचं दु:ख आहेच पण आणखी एक वाईट गोष्ट म्हणजे विकत घेण्याजोगं दुकानात काहीच उरलं नव्हतं. एका विभागात बुद्धीबळाची पुस्तकं असत आणि ती खूप महाग असत. त्यातली जी काही मी विकत घेतली, ती खूपच स्वस्त होती. चित्रकलेवरची महत्त्वाची पुस्तकं नाहीशी झाली होती. आर्किटेक्चरवरची काही पुस्तकं होती पण त्यात मला इतका रस नव्हता.

15 दिवसांपूर्वीच बंगळूरूमधील ब्लॉसम बुक डेपोला भेट दिली होती. हे पुस्तकांचं दुकान तीन मजली आहे. पूर्वी जेव्हा जेव्हा बंगळूरूमध्ये जायचो तेव्हा सपनामध्ये जायचो, नंतर ब्लॉसममध्ये जाऊ लागलो. वीस वर्षांपूर्वी वर्षातून बंगळूरूच्या 3-4 फेर्‍या व्हायच्याच कारण माझी मैत्रीण तिथे होती. ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये शिकत होती. तिच्याकडेही फार पैसे नसत. मग आम्ही दोघे बंगळूरूमधील पुस्तकांच्या दुकानांमध्ये विंडो शॉपिंग करत फिरायचो. बराच वेळ सपनामध्ये घालवायचो. एका छोट्या दुकानातून पाणिनीचं भाषाशास्त्रावरच्या खंडाचा एक भाग 100 रुपयांना घेतल्याचं माझ्या आठवणीत आहे. अशा प्रकारे काही ना काही खरेदी करायचो. तेव्हा इतके पैसे नसायचे.

आत्ता गेलो तेव्हा मी स्वतःसाठी साधारण तीन हजारांचं बजेट ठरवलं होतं. तत्त्वज्ञानावरची दोन उत्कृष्ट पुस्तकं मिळाली. त्यात ग्रेट फिलॉसॉफर्सचा एक खंड होता. त्यात सॉक्रेटीसपासून ते आयडीगर, ट्युरिंग अशा अनेक तत्त्वज्ञानावर लेख आहेत. दुसरं पुस्तक एका मित्राकडून घेतलं- कन्फेशन ऑफ फिलोसॉफर्स! मीच विकलेलं हे पुस्तक आकार पटेलच्या फडताळात होतं. मला हे पुस्तक खूप आवडतं आणि मी ते अनेकदा वाचलं आहे. ब्रायन मॅगी या लेखकाने लिहिलेलं हे पुस्तक ऑक्सफर्ड, केंब्रिजमध्ये चाललेल्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाचा परिचय करून देतंच आणि त्याचबरोबर अमेरिकन विद्यापीठात तत्त्वज्ञानात काय शिकवलं जातं हे ही सांगतं. भाषिक तत्त्वज्ञानातील त्रुटी देखील दाखवून देतं. ब्रायन मॅगी यांनी तत्त्वज्ञानावर सुंदर पुस्तकं लिहिलीच पण रेडिओ आणि टीव्हीवर त्यांनी काही चांगल्या मुलाखतीदेखील घेतल्या. बीबीसीवर त्यांची तत्त्वज्ञ मंडळींच्या मुलाखतींची मालिका गाजली. ती पुस्तक रूपांत प्रसिद्ध झाली आहे. ब्रायन मॅगी हा तत्त्वज्ञानावर सोप्या भाषेत लिहिणारा माणूस मानता येईल. फोंटाना मॉडेल्स या मालिकेत त्याने कार्ल वॉपरचं चरित्रही लिहिलं आहे. इंग्लंड, अमेरिकेत अनेक वर्षे तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे त्याच्या लेखनाला धार आहे. तरीही सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत तो लिहितो.

काही पुस्तकांचे सगळे भाग तुम्हाला कधीच मिळत नाहीत. युरोपच्या इतिहासाचं फिशरचं पुस्तकाने नेहमीच ही गंमत केली आहे. यावेळी ब्लॉसममध्ये मला त्याचा फक्त पहिला भाग मिळाला. दुसरा भाग माझ्याकडे अनेक वर्षे होता. तो मी माझे मित्र रवींद्र साठे यांना दिला. इथेच मला गॅशेचं भारतावरचं संपादित पुस्तक मिळालं. गॅशेचं ‘‘दॅट वॉज इंडिया’’ हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे. या पुस्तकात अनेक लेख आहेत. उदा. भारतीय संगीतावर एक लेख आहे, जैनिझमवर एक लेख आहे. हे पुस्तक मी बराच वेळ चाळलं – घ्यावं की घेऊ नये या विचारात अभिजित ताम्हाणेला फोन केला. तो म्हणाला की हे अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. मग मी ते घ्यायचा विचार सोडून दिला. पेलिकन मालिकेतील अनेक पुस्तकं इथे होती. ही मालिका नेहमीच अभ्यासपूर्ण लेखकांच्या अभ्यासपूर्ण लेखांनी आणि साहित्याने सजलेली असायची. यातील ग्लोबलायझेशनवरचं एक आणि समकालीन इतिहासावरचं एक अशी दोन पुस्तकं मी घेतली. आता ही दोन्ही पुस्तकं उपलब्ध नाहीत. अशा ‘‘आउट ऑफ प्रिंट’’ पुस्तकांसाठी ब्लॉसम प्रसिद्ध आहे. ब्लॉसमचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवी- कोरी दिसणारी पण ‘‘सेकंड हँड’’ म्हणून टाकून दिलेली पुस्तकं तिथे स्वस्तात मिळतात. समकालीन इतिहासाचं एक भलं मोठं हार्ड-बाउंड पुस्तक तिथे उपलब्ध होतं पण ओझं जास्त झाल्यामुळे मी ते वगळलं. 150 वर्षांपूर्वीचं जगाच्या इतिहासाच्या अनेक खंडांपैकी एक खंड मला तिथे मिळाला. केवळ जुनं आणि दुर्मिळ पुस्तक म्हणून मी ते घेतलं. दोन-तीनशे रुपयांत त्यांनी ते मला दिलं. इयन स्टेवर्ड हा गणितावर सुंदर आणि सोप्पं लिहिणारा माणूस! त्याची अनेक पुस्तकं तिथे होती. त्यातील ‘‘मॅथेटिक्स इन एव्हरी डे लाईफ’’ हे अडीचशे-तीनशे रुपयांचं पुस्तक मी विकत घेतलं. अगदी जनुकांच्या रचनेपासून ते सूर्यफुलाच्या रचनेपर्यंत गणिताचा वापर, गोल्डन रेशिओचा वापर कसा केला आहे हे त्याने अनेक पुस्तकातून दाखवून दिलं आहे. या पुस्तकांध्ये पुनरावृत्ती आहे पण गंमतही आहे.

स्टीफन जे गोल्डचं एक वैज्ञानिक लेखांचं पुस्तक तिथे मिळालं. स्टीफन हा डार्विनवादी संशोधक आहे. पण त्यांनी डार्विनमधल्या लेखांच्या काही त्रुटी दाखवल्या. डार्विनने असं म्हटलं होतं की, हजारो वर्षांनंतर प्राण्यांमध्ये हळुहळू बदल होतात. गोल्ड हा अश्म शास्त्रज्ञ म्हणजेच पॅलिआँटोलॉजी असल्यामुळे त्याच्या असे लक्षात आले की अनेक जीवाश्‍मांमध्ये काही वर्षातच बदल झालेले आढळतात. जरी ते माणसाच्या आयुष्याच्या तुलनेत खूपच संथ असले तरी देखील उत्क्रांतीमध्ये हे बदल वेगवान म्हणावे लागतील. त्यामुळे त्याने याला ‘‘पंक्चर्ड इक्विलिब्रीएम’’ हे नाव दिले. स्पेशिएटिंग या नावाने हा गुणधर्म ओळखला जातो. दुर्दैवाने क्रिएशनिस्ट म्हणजे जगाची निर्मिती काही हजार वर्षांपूर्वी झाली असं मानणार्‍या मंडळींना गोल्ड हा आपल्यातला वाटू लागला. स्वतः गोल्डला हे मान्य नसल्याने त्याने असे म्हटले की क्रिएशनिस्ट लोक माझ्या लेखनाचा वापर करतात हे दुर्दैवच नव्हे तर ते दुर्दैवी आहे याचं मला दु:ख होतं. स्टीफन जे गोल्डने नॅचरल हिस्ट्री या नियतकालिकात जवळपास 38 वर्षे स्तंभ लेखन केले. ‘‘आय एम अर्युड’’ नावाचा त्याचा एक लेख संग्रह आहे. माझ्याकडे स्टीफनच्या सर्वोत्कृष्ट लेखांचा संग्रह आहे. तो मी स्ट्रँडच्या जत्रेत विकत घेतला होता. आता ब्लॉसममधून मी गोल्डचं दुसरं पुस्तक घेतलं. याप्रकारे मला वाटतं ब्लॉसम ते स्ट्रँड असं पुस्तकांचं एक वर्तुळ पूर्ण झालं.

इतरही अनेक छोटी-मोठी पुस्तकं घेतली. सपनामध्ये मला तिबेटयन धर्मगुरू आणि जे. कृष्णमूर्तीं यांच्यातील चर्चेसंबंधातील एक पुस्तक मिळालं. ‘‘कॅन ह्युमिनिटी सर्व्हाइव्ह’’ हे या पुस्तकाचं नाव आहे. पुस्तकाची किंमत कमी होतीच. पण सुरुवातीला तिबेटियन, बुद्धिस्ट धर्मगुरू जे. कृष्णमूर्तींना म्हणतात की तुच्या आणि बुद्धांच्या लेखनात मला विलक्षण साम्य आढळतं. माझ्याकडील तुच्या पुस्तकांध्ये मी मला आढळलेली साम्यस्थळे समासामध्ये लिहून ठेवली आहेत.

बंगळुरूमध्ये अशा प्रकारची अनेक पुस्तकं घेतली. सादेत हाजी या कथा लेखकांचं पुस्तक कोल्हापूरला घेतलं आणि बंगळुरूपर्यंतच्या प्रवासात ते वाचलं. मधेच एका ठिकाणी उतरलो आणि इडली-चहाचा आस्वाद घेत घेत त्यातील एक कथा वाचली. मग दुसरी बस पकडली. कोल्हापूर-बंगळूरू हा ए.सी. गाडीचा प्रवास साधारण 8 तासांचा आहे. हुबळी, बेळगावला थांबतथांबत या प्रवासाला जवळपास 13-14 तास लागले. पण वाचन सुरू होतं. खूप मजा आली. प्रवासातल्या वाचनाची हीच तर गंमत आहे.

लेखक : श्री. शशिकांत सावंत
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *