विज्ञानगुरु : डॉ. एकनाथ चिटणीस

डॉ. एकनाथ वसंत चिटणीस हे केवळ एका शास्त्रज्ञाचंच नाव आहे असं नव्हे तर ही व्यक्ती म्हणजे भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्राचा चालता बोलता इतिहासच आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या बाळाजी आवजी चिटणीस आणि पुढं त्यांचे चिरंजीव खंडो बल्लाळ यांनी स्वराज्यासाठी निष्ठापूर्वक कामगिरी बजावली, त्याच ऐतिहासिक चिटणीस घराण्यातले हे दहावे वंशज. त्यांच्याकडे आपल्या घराण्याची वंशावळही आहे. त्याचं घराणं सातारचं. छत्रपतींच्या वाड्याजवळचाच वाडा. जमीन जुला सारं काही होतं. पण आता काही नाही. डॉ. एकनाथ यांचा जन्म कोल्हापूरचा. 25 जुलै 1925 चा. त्यांच्या आईचं माहेर म्हणजे कोल्हापुरातील कारखानीस घराणं. पण ते लहान असतानाच आईचं निधन झालं. आज वयाच्या 93 व्या वर्षीही त्यांच्या या सर्व आठवणी आणि त्यातले तपशील अगदी ताजे आहेत. त्यांचे आजोबा मल्हार खंडेराव चिटणीस हे संस्कृतमधली ख्यातनाम जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवलेले. म. गांधीजींचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांचे ते जवळचे मित्र आणि अमरावतीच्या हायकोर्टातील नावाजलेले वकील. वडील वसंतराव चिटणीस हे ख्यातनाम डॉक्टर. तर भारताचं अर्थमंत्रीपद भूषवलेले ख्यातनाम विद्वान सी. डी. देशमुख हे वडिलांचे मावसभाऊ. प्रख्यात कवी अनिल यांच्या पत्नी कुसुमावती देशपांडे म्हणजे डॉ. एकनाथ यांची आतेबहीण तर डॉ. चिटणीस यांचे चिरंजीव डॉ. चेतन म्हणजे ज्यांचं मलेरियासंबंधीचं संशोधन जगप्रसिद्ध आहे, असे भटनागर पुरस्कारप्राप्त संशोधक. त्यांच्या या संशोधन कार्याचा ‘इन्फोसिस’नं देखील 50 लाखांचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. विद्वत्तेची परंपरा जोपासणारी अशी ही चिटणीस मंडळी.

अमेरिकेतील प्रख्यात अशा एम्. आय्. टी. नं संशोधनासाठी निमंत्रित केलेल्या डॉ. एकनाथ चिटणीसांनी काही वर्षं तिथं संशोधकाचं काम केलं. पण विक्रम साराभाई यांनी त्यांना ‘भारताला अवकाश संशोधनाच्या कार्यक्रमासाठी तुझी गरज आहे. तू भारतात परत ये,’  असं सांगितल्यावर लगेच डॉ. चिटणीस भारतात परतले, नवी नोकरी होती. महिना फक्त शंभर रुपये पगाराची, तोही पहिले तीन महिने मिळालाच नाही. म्हणून डॉ. चिटणीसांनी इथं शिकवण्या घेतल्या.

थुंबा आणि श्रीहरिकोटा ही अवकाश संशोधन प्रयोगशाळेसाठीची ठिकाणं शोधून काढण्याच्या कामात विक्रम साराभाई यांच्यासमवेत डॉ. चिटणीस यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. त्यावेळी बैलगाडीतून उपग्रहांचे सुटे भाग इकडून तिकडे न्यावे लागत. अगदी छोटे छोटे भाग तर स्वतः साराभाई आणि डॉ. चिटणीसांनी सायकलवरून नेले आहेत. अमेरिकेतील केप केनेडी इथं अवकाश प्रक्षेपण केंद्र सुारे एक लाख एकरमध्ये आहे. भारतात त्या तुलनेने केंद्र स्थापन व्हावं म्हणून चिटणीसांनी परिश्रम घेऊन श्रीहरिकोटा येथील 40 हजार एकर क्षेत्र अत्यंत उपयुक्त असल्याचं अभ्यासाअंती शोधून काढलं. आज तिथं हे केंद्र उत्तमपणे कार्यान्वित आहे.

डॉ. चिटणीस यांची आणखी एक अभिमानास्पद ओळख म्हणजे, 1961-62 च्या दरम्यान ‘‘इस्रो’’साठी त्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची निवड केली. तेव्हापासून डॉ. कलाम यांच्या निधनापर्यंत त्यांचा प्रगाढ स्नेह होता. डॉ. कलाम त्यांना मनापासून आपले गुरु मानत असत. भारत सरकारनं 1985 मध्ये पद्मभूषण सन्मानानं त्यांचा गौरव केला.

शतकी प्रवासाकडे वाटचाल करणारे डॉ. चिटणीस आजही विविध विषयांवरील विशेषतः विज्ञान तंत्रज्ञानावरील ग्रंथ, नियतकालिकं नियमित वाचत असतात. भारतातील युवाशक्ती, इथले विद्यार्थी आणि भारताचा भविष्यकाळ हा अत्यंत वैभवशाली असेल असा आशावाद त्यांच्या बोलण्यातून सतत व्यक्त होत असतो. म्हणूनच त्यांच्याशी झालेल्या गप्पा, चर्चा, त्याचं व्याख्यान – एकूणच त्यांना भेटणं हा केवळ स्मरणरंजनाचा भाग रहात नाही. आपापल्या कामांसाठीचा तो एक ऊर्जास्रोतच ठरतो.

एखादा मनुष्य शास्त्रज्ञ कसा होतो? या प्रश्‍नावरून आमच्या गप्पा सुरू झाल्या अन् पुढचे दोन तास कसे आणि कधी गेले कळलंच नाही. प्रश्‍नाच्या उत्तरादाखल ते सांगू लागले, ‘

‘‘‘त्याला त्याची गोडी लागते म्हणून! आपल्याला असा एखादा प्रसंग केव्हातरी नक्की पहायला मिळत असेल. वाचनाची गोडी लागलेला एखादा मुलगा हातातील पुस्तकाच्या वाचनामध्ये इतका गुंगलेला आणि गुंतलेला असतो की, त्याला आईनं जेवायला बोलावलं तरी जावंसं वाटत नाही. म्हणून मुलांना अशी वाचनाची गोडी लावणं फार फार महत्त्वाचं आहे. एखाद्या प्रेरणादायी वक्त्याचं भाषण ऐकल्यानं जितका परिणाम होतो, तसाच परिणाम उत्तम पुस्तकामुळे होत असतो असा माझा अनुभव आहे.’’’’

पुण्यातील मॉडर्न हायस्कूलमध्ये चिटणीस यांचं शिक्षण झालं. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील पदवी मिळाल्यानंतर रेडिओ संपर्क क्षेत्रातील पदविका अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्सम ध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. मग अहमदाबादच्या भौतिकशास्त्र संशोधन प्रयोगशाळेत संशोधन कार्याला सुरुवात केली.

पुणे विद्यापीठात भौतिकशास्त्र विषयात सर्वप्रथम आलेल्या त्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून क्लास वनच्या अधिकारी पदावर निवड झाली होती. माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत रेडिओधील ही वरच्या हुद्द्यावरची नोकरी होती. पण त्यांना विज्ञान संशोधनामध्ये अधिक आवड होती. त्यांना अहमदाबाद टेक्स्टाईल रिसर्च इन्स्टिट्यूटमधून नोकरीसाठी कॉल आला होता. ती संस्था देखील अहमदाबादमध्येच होती. तिथं एक इलेक्ट्रॉनिक्सची जागा रिकामी होती. चिटणीसांनी अर्ज केला आणि त्यांची निवड झाली. पण खरं म्हणजे त्यांना या नोकरीपेक्षा भौतिकशास्त्रातील संशोधनाच्या कामामध्येच म्हणजे फिजिकल रिसर्च लॅबमध्ये अधिक रस होता. या दरम्यान त्यांची तीन वेळा मुलाखत घेण्यात आली. एकदा तर स्वतः प्रा. विक्रम साराभाईंनीच त्यांची मुलाखत घेतली. पण नंतर चिटणीसांनीच साराभाईंना प्रश्‍न विचारण्यास सुरुवात केली. ही नोकरी मला करायची नाही, मला संशोधनातच अधिक काम करणं आवडेल असं त्यांनी साराभाईंना सांगितलं. त्यावर ते म्हणाले, त्याकरिता तुला डॉ. रामनाथन् यांना भेटावं लागेल. पण ते आज बडोद्याला गेले आहेत. मग दुसर्‍या दिवशी चिटणीस डॉ. रामनाथन् यांना भेटले, त्यांना संशोधनासंबंधीची आपली आवड सांगितली. त्यावर ते म्हणाले की, सध्या संशोधकांसाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती आमच्याकडे शिल्लक नाही. त्यातच आज विक्रम (साराभाई) बडोद्याला गेले आहेत, ते परत आले की मी त्यांच्याशी बोलून पाहतो. त्यावर पुन्हा चिटणीस रामनाथन् यांनाम्हणाले,  ‘‘अहो मला याच परिसरात असलेल्या आणंद जवळील एका गावातील कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सहा महिन्यांकरिता काम करण्याची ऑफर आली आहे. मी इथं काही काळ नोकरी करतो आणि जो पगार मिळेल त्यात पुढं इथं येऊन संशोधन करतो’’.’’ 15 मार्चला कॉलेज बंद झालं, 16 मार्चला अहमदाबादच्या भौतिकशास्त्र संशोधन प्रयोगशाळेत चिटणीस पोहोचलेसुद्धा. या प्रयोगशाळेकडे त्यावेळी इमारतीसाठी पैसे नव्हते. बाकीच्याही फारशा सुविधा नव्हत्या. पण ते सारे जण विज्ञान आणि संशोधनासाठी अक्षरशः वेडे झाले होते. दरम्यानच्या काळात रामनाथन् यांनी प्रयत्न करून चिटणीस यांच्यासाठी 100 रु. शिष्यवृत्ती गोळा करून ठेवली होती.

एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला पाहिजे, त्यासाठी अक्षरशः वेडंच व्हायला पाहिजे असं सांगताना ‘”Be stupid, Be hungry’’ अशा शब्दात डॉ. चिटणीस पालकांना उद्देशून सांगू लागले, ’‘या नव्या पिढीपासून सध्याचे पालक खूप दूर आहेत असं मला वाटतं. त्यांच्या आवडी-निवडी, त्यांचे प्रश्‍न बर्‍याच वेळा पालकांना कळत नसावेत म्हणून डॉक्टर किंवा इंजिनिअर्स होण्याच्या चाकोरीमध्ये ते आपल्या मुलांना घालू पाहतात. त्यामुळं आपल्या आयुष्यात ही मुलं मुली कदाचित भरपूर पैसे मिळवतील, पण स्वतःचा आत्मा हरवून बसतील. मी एवढी वर्षे काम केलं, पण सरकारी नोकरी केली असं कधीच वाटलं नाही. वेळी-अवेळी, रात्री-पहाटे, सुट्टीच्या दिवशी सतत काम केलं त्यातून प्रचंड आनंद मिळाला. साराभाई यांच्यासारख्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांबरोबर, सहकारी आणि मार्गदर्शकाबरोबर अगदी मजा करत आम्ही आमचं काम करत असू. कधी मध्यरात्री 12 वाजता, तर कधी पहाटे 5 वाजताही आम्ही त्यांना भेटत असू’’’’ –

असं सांगताना डॉ. चिटणीस मनोन 1960 च्या दशकामध्ये आम्हाला घेऊन गेले होते. पुढं अहमदाबादच्या भौतिकशास्त्र संशोधन प्रयोगशाळेत संशोधनाचं काम करताना अमेरिकेतील एम्. आय्. टी. या ख्यातनाम जागतिक कीर्तीच्या संस्थेबरोबर काही प्रकल्प करायचं ठरलं.

1950 ते 60 च्या दशकात वैश्‍विक किरणांशी संबंधित असं डॉ. चिटणीसांचं संशोधन सुरू होतं. तामिळनाडूतील कोडाई कॅनॉल इथं ते दोन वर्षे जाऊन राहिले. वैश्‍विक किरणांच्या वर्षावाबद्दल त्यांनी तिथं विशेष अभ्यास केला. दोन वर्षांत इतका डेटा जमला की त्यावेळी जगात कुणाकडंच त्या  विषयाचा तेवढा डेटा नसावा. पण त्याचं विश्‍लेषण करण्यासाठीची आवश्यक साधनं भारतात उपलब्ध नव्हती. एम्. आय्. टी. नं डॉ. चिटणीसांना संशोधन कार्यासाठी अमेरिकेत आपल्या संस्थेत येण्याविषयी आधीच आमंत्रण दिलं होतं. डॉ. साराभाई देखील त्यांना म्हणाले की, या सगळ्या माहितीचं आता तिथं विश्‍लेषण करता येईल. त्यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान आणि आवश्यक ती साधनं तुला तिथं मिळतील. मग 1958 ते 61 या दरम्यान डॉ. चिटणीस अमेरिकेत एम्. आय्. टी.त दाखल झाले.

एम्. आय्. टी.त असताना मला सी. व्ही. रामन यांचे पुतणे असलेले (पुढे त्यांना नोबेल पुरस्कार मिळाले असे शास्त्रज्ञ) एस. चंद्रशेखर यांचा सहवास लाभला. भारतातून एम्. आय्. टी.त जाऊन महिनाच झाला होता. त्यावेळी चंद्रशेखर यांचं व्याख्यान तिथं होणार होतं. मी भेटून माझी ओळख करून दिली. एम्. आय्. टी. आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ते सुमारे सव्वातास बोलले. प्रश्‍नोत्तरंही झाली. हंगेरियातील प्रो. बायस्कॉप हे त्या सत्राचे अध्यक्ष होते. त्यांनी चंद्रशेखर यांना शेवटी एक प्रश्‍न विचारला.

“Why did you do all this?’ हे इतके परिश्रम घेऊन, इतकं सगळं तुम्ही कशासाठी करता? असा त्या प्रश्‍नाचा आशय होता. चंद्रशेखर उभे राहून त्यांना म्हणाले, ‘”I am professor at the University of Chicago. I do what I like to do.’शिकागोच्या ऐन बर्फवृष्टीच्या हंगामात देखील 50-50 मैल अंतरावर पोहोचून ते दोन चिनी विद्यार्थ्यांना शिकवायला जायचे. ही एक्साईटमेंट मला त्यांच्याकडून शिकायला मिळाली.’’

दरम्यान एम्. आय्. टी. मध्ये असतानाच विक्रम साराभाई यांचा निरोप आला. भारतातील अवकाश संशोधनाचा कार्यक्रम त्यांना हाती घ्यायचा होता. त्यासाठी उपग्रहांची निर्मिती, प्रक्षेपण केंद्रांची स्थापना, संशोधनासाठी प्रयोगशाळा सुरू करायच्या होत्या. स्वातंत्र्योत्तर भारतानं विज्ञानाच्या क्षेत्रात भरारी घ्यावी यासाठी पंडित नेहरूंनी सर्व शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्याचं धोरण स्वीकारलं होतं. भाभा- विक्रम साराभाई यांच्यासह अनेक दिग्गज शास्त्रज्ञांनी या कामी नेहरुंच्या विज्ञानविषयक स्वप्नांना साकार करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले.

अवकाश संशोधनाच्या कामासाठी साराभाईंचा निरोप येताच डॉ.चिटणीसांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यांचे सहकारी आणि एम्. आय्. टी. तील वरिष्ठांना हे समजल्यावर ते भारताबद्दल चेष्टेनं बोलू लागले. डॉ. चिटणीस, तुच्या देशात अजूनही लोकांना पुरेल इतकंअन्नधान्य सुद्धा पिकत नाही. गहू सुद्धा तुम्ही अमेरिकेतून आयात करता. (अन् तो किडका असतो – ही डॉ. चिटणीसांची खास कॉमेन्ट) मग तुम्हाला हे अवकाश संशोधन कशाला हवं? अशा शब्दातील टोणे ऐकल्यावर

डॉ. चिटणीस त्यांना म्हणाले,  ‘‘तुम्ही म्हणता, नेक्या त्याच कारणासाठी आम्हाला अंतराळ संशोधन कार्यक्रम राबवायचा आहे. त्यामुळे आम्ही सॅटेलाईट कम्युनिकेशन विकसित करू शकू. त्याद्वारे आम्हाला मॉन्सूनसह हवामानाचे अंदाज कळू शकतील. त्यांच्या आधारे भारतीय शेतकरी बदल करून पिकं घेतील आणि आम्ही अन्नधान्याच्या निर्मितीमध्ये स्वावलंबी होऊन दाखवू.’’’’

डॉ. चिटणीसांच्या मुखातून भारताच्या भविष्यातील हरितक्रांतीचं बीजारोपणच जणू होत होतं. अवघ्या 100 रु. वेतनावर ते अमेरिकेतून भारतात परतले आणि डॉ. साराभाई यांच्यासमवेत त्यांनी भारताच्या अवकाश संशोधन कार्यक्रमात स्वतःला झोकून दिलं.

1970 पर्यंत त्यांनी क्ष-किरण – खगोलशास्त्रासंबंधी संशोधन केलं. त्याकरिता अग्निबाणावर बसवलेल्या उपकरणांचा त्यांनी वापर केला. अग्निबाण प्रक्षेपण केंद्राच्या जागा निवडण्यापासून ते अंतराळ क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या ‘‘इन्सॅट’’ मालिकेतील उपग्रहाच्या आखणीपर्यंत त्यांनी योगदान दिलं. शेती, हवामान, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, दूरसंपर्क अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीनं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या प्रकल्पांची आखणी आणि अंमलबजावणी यशस्वीपणे करण्याचं मोठं श्रेय डॉ. चिटणीस यांच्याकडं जातं. विशेषतः संज्ञापनाच्या (कम्युनिकेशनच्या) क्षेत्रातील भारतातील क्रांती असं ज्याचं वर्णन करता येईल असं मोठं काम त्यांनी केलं. दूरचित्रवाणी संचाच्या साहाय्याने देशातील विविध राज्यांधील 3000 खेडी त्यांनी जोडली, त्यामुळं हा प्रकल्प फक्त मनोरंजनापुरता मर्यादित न राहता शिक्षणासह अनेक क्षेत्रातील मूलभूत बदलांसाठी त्याचा फार मोठा उपयोग होऊ शकला.

प्रा. विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली भारतीय अंतराळ संशोधनासाठी भारत सरकारने जी राष्ट्रीय समिती स्थापन केली होती. तिचे सदस्य म्हणून डॉ. चिटणीस यांनी काम पाहिलं.

‘‘साराभाई यांचा आमच्यावर इतका विश्‍वास की ते आम्हाला एखाद्या प्रकल्पासाठी कुठेही पाठवायचे. अपयशाची आणि नोकरीची भीती आम्हाला कधी नव्हतीच. त्यामुळं आमची मतं आम्ही त्यांच्यापुढं ठामपणे मांडत असू. काही वेळी ती त्यांच्या मतांच्या विरोधात असायची. पण ते टिपिकल सरकारी बॉस नव्हते. त्यांच्यासारखे मार्गदर्शक (मेंटॉर) आम्हाला मिळाले. म्हणून आम्ही काही काम करू शकलो.

इतका खुलेपणा आजही आहे. आणि आता ती इस्रोची इस्त्रोची संस्कृतीच झाली आहे. दिव्यत्व प्रत्येकातच असतं. ते उघडून दाखवणारे मेंटॉर हवेत. रशिया, अमेरिका, फ्रान्स, जपान या राष्ट्रांशी आम्ही आमच्या प्रकल्पांबाबत समझोत्याचे करार केले. त्याचे मुसदे तयार करण्याची संधी मला मिळाली. संयुक्त राष्ट्रसंघासह विविध राष्ट्रांमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांध्ये मला भारताचं प्रतिनिधीत्व यशस्वीपणे करता आलं ते साराभाई यांच्यामुळे’’ अशा शब्दांत ते त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतात.

1981 ते 1985 या दरम्यान ते अहमदाबादच्या स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरचे संचालक होते. त्या काळात आणि त्यापूर्वीही नोबेल विजेते शास्त्रज्ञ चंद्रशेखर येऊन तिथं रहायचे. विद्यार्थ्यांना शिकवायचे. व्याख्यानं द्यायचे. त्याबाबतची एक आठवण डॉ. चिटणीस यांनी आवर्जून सांगितली, ‘‘त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला तेव्हा टाईम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीनं मला विचारलं होतं – तुम्हाला काय वाटतं ?

मी म्हणालो “”Why so late? एवढा उशिरानं त्यांना का पुरस्कार जाहीर झाला? नोबेल पुरस्कार मिळाल्याबद्दल मी चंद्रशेखर यांना इस्रोचा अध्यक्ष या नात्यानं अभिनंदनाचं पत्र लिहिलं होतं. त्याचवेळी माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव श्री. गिल यांचा मला फोन आला.

चंद्रशेखर यांच्या अहमदाबादमध्ये इस्रोत झालेल्या व्याख्यानाचे व्हिडिओज् तातडीने दूरदर्शनला हवे होते. त्याच दिवशी रात्रीच्या कार्यक्रमात त्यांना ते दाखवायचे होते,  ‘Why the stars are as they are?’ या विषयावर चंद्रशेखर यांनी दिलेल्या व्याख्यानचं व्हिडिओ चित्रीकरण आमच्याकडं होतं, पण ते संपादित करावं लागणार होतं. रात्री 9 वाजता चंद्रशेखर यांच्यावरील कार्यक्रम दूरदर्शनला प्रसारित करायचा होता. अगदी जलद सेवा म्हणून संध्याकाळच्या विमानानं पाठवलं असतं तरी तेवढ्या वेळेत ते दिल्ली दूरदर्शनला पोचणं शक्य नव्हतं.

आम्हाला एक खूपच चांगली कल्पना सुचली.

आमच्याकडे जो ‘अ‍ॅपल’ नावाचा प्रायोगिक उपग्रह होता, त्याच्याद्वारे अहमदाबाद अर्थस्टेशनवरून दिल्ली अर्थस्टेशनला प्रक्षेपण करणं शक्य होईल का? हे करून पाहूया असं आम्ही ठरवलं. त्याबाबतचे अधिकारही मला होते. मग आम्ही दिल्ली दूरदर्शनच्या इंजिनिअर्सना इस्रोच्या दिल्ली येथील अर्थस्टेशनमध्ये रेकॉर्डर घेऊन यावं असं सुचवलं. दरम्यानच्या काळात सुारे 5 तास काम करून आम्ही तो व्हिडिओ संपादित करून 4 वाजता उपग्रहाद्वारे पाठवला आणि अवघ्या 20 मिनिटांत तो सगळा व्हिडिओ दिल्लीला पोचलासुद्धा. आज हे वाचताना फारसं आश्‍चर्य वाटणार नाही. पण त्यावेळी चमत्कारच घडल्यासारखं वाटून गेलं.

पुढच्या काळात पी. एन्. हक्सर यांनी सुचवल्यानुसार माझी पी. टी. आय्. .(Press Trust of India) या देशातील सर्वात मोठ्या वृत्तसंस्थेवर संचालक म्हणून नियुक्ती झाली. इतकंच नाही तर त्यानंतर दोनवेळा मी पी. टी. आय्. चं अध्यक्षपद भूषवलं. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये देखील उपाध्यक्ष होतो. मृणाल सेन तेव्हा या संस्थेचे अध्यक्ष होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचा (U. G. C.) सल्लागार, गोव्यातील समुद्र विज्ञान संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलचा सदस्य म्हणूनही काम करता आलं. यू. जी. सी. तर्फे देशात शिक्षण आणि माध्यमासंबंधीची 16 संशोधन केंद्रं त्यावेळी स्थापन करण्यासाठी मला काही योगदान देता आलं याचा मला आनंद वाटतो. इस्रोधून निवृत्त झाल्यावर पुणे विद्यापीठात मी सुमारे 25 वर्षे अध्यापन केलं.’’

अशा बहुआयामी संशोधकाला, भारतमातेच्या सुपुत्राला विद्यापीठ अनुदान आयोगाचं विशेष पारितोषिक, इचलकरंजीचा ‘फाय फाऊंडेशन’ पुरस्कार, अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाचा ‘आर्यभट्ट पुरस्कार,  ‘दूरसंपर्क क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा’ विशेष पुरस्कार मिळाला आहे.

एक समर्पित, कृतार्थ, त्यागी आणि प्रचंड बुद्धिमान देशभक्ताचं दर्शन डॉ. चिटणीसांच्या रूपाने आपल्याला होतं, आणि आपण आपोआपच त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन जातो.

डॉ. चिटणीस यांच्या शतकोत्सवी वाटचालीसाठी त्यांना निरामय आयुष्य मिळावं हीच शुभेच्छा!

डॉ. कलामांची निवड करणारे गुरु!

‘नासा’’ बरोबर काही संयुक्त प्रकल्प राबविण्याच्या दौर्‍यादरम्यान डॉ. चिटणीस, विक्रम साराभाई आणि प्रकल्प संचालक एच्. जी. एस्. मूर्ती असे तिघे केंब्रीज आणि एम्. आय्. टी. ला एकत्र गेले होते. थुंबा इथल्या उपग्रह प्रक्षेपण केंद्रासाठी ईश्‍वर दास यांची अभियंता म्हणून निवड झाली होती. पण दुसरे उमेदवार होते ए. पी. जे. अब्दुल कलाम. हॉटेलमध्ये जेव्हा हे तिघे एकत्र बसले होते, तेव्हा कलाम यांनाही घ्यावं अशी आग्रही इच्छा मूर्ती यांनी साराभाई यांच्याकडं व्यक्त केली. साराभाईंनी लगेच कलाम यांचा बायोडाटा डॉ. चिटणीस यांच्याकडं दिला आणि सविस्तर पाहून कळवा असं सांगितलं. वीसेक मिनिटांत चिटणीस यांनी तो बायोडेटा सविस्तर वाचला. ‘अरोडायनॅमिक्स’’ च्या क्षेत्रातील कलाम यांची कामगिरी आणि त्यांचा अत्यंत प्रतिकूलतेधून गुणवत्तेच्या आधारे झालेला जीवनप्रवास लक्षात घेऊन इस्रोसाठी त्यांना आवर्जून घ्यावं असं साराभाईंना सुचवलं. त्यांनी लगेच होकार दिला आणि कलाम इस्रोच्या टीममध्ये दाखल झाले. ‘‘‘‘आपल्यासमोरचं आव्हान प्रचंड ताकदीनं पेलणारा सर्वोत्कृष्ट अभियंता आणि विज्ञान तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक क्षेत्रांत सहजपणे वावरणारा टीम लीडर म्हणून 1962 पासून कलाम यांचं योगदान जवळून पहायला मिळालं आणि आमची निवड किती योग्य होती ते डॉ. कलाम यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलं,’’ असं सांगताना त्याबद्दलचा एक कृतार्थ आनंद डॉ. चिटणीसांच्या चेहर्‍यावरून ओसंडत होता. कर्नाटकातील हसन इथं झालेल्या एका समारंभात राष्ट्रपती या नात्यानं डॉ. कलाम यांच्या हस्ते डॉ. चिटणीस यांना एका पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी डॉ. कलाम यांनी सर्व कुटुंबियांनाच राष्ट्रपती भवनात आमंत्रित केलं. चिटणीस यांच्या लहानग्या नातीशी सुारे 40 मिनिटे ते खेळत होते. त्यानंतरही ते चिटणीस यांचे चिरंजीव डॉ. चेतन हे संशोधन करत असलेत्या संस्थेला भेट देण्यासाठी गेले होते. डॉ. कलाम यांच्याशी जमलेला आयुष्यभराचा स्नेह हा चिटणीस यांचा फार मोठा ठेवा आहे.

लेखक : डॉ. सागर देशपांडे
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *