राहुलजी, आधी जय (श्री) राम म्हणा

कुठल्याही दुखण्यावर उपाय योजायचे असतील, तर आधी त्या आजाराचे नेमके निदान झाले पाहिजे. निदान चुकले वा चुकीचेच केलेले असेल, तर उपाय व उपचार फसत जातात आणि दुखणे बरे होण्यापेक्षा आजार बळावत जातो. जे सामान्य माणसाच्या जीवनातील सत्य आहे, तेच राजकीय जीवनातील एक कटुसत्य आहे. तुम्ही आजार नाकारून वा त्याचे चुकीचे निदान करून सुदृढ निरोगी वाढीची अपेक्षाच करू शकत नसता. आजच्या काँग्रेसची वा अन्य भाजपा विरोधकांची काहीशी तशीच स्थिती झालेली आहे. त्यांना आपण सुदृढ आहोत वा आपण केलेले निदान चुकल्याचा विचारही करावा असे वाटलेले नाही. परिणामी चुकीच्या निदानावर चुकीचे उपचार चालू आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की जो चांगला डॉक्टर आहे आणि ज्याने अचूक निदान पाच वर्षांपूर्वी केलेले होते, त्याला काँग्रेस पक्षाने व पुरोगाम्यांनी उचलून बाजूला फेकून दिलेले आहे. पण म्हणून परिणाम बदलत नसतात. त्याचे भाकित केलेले दुष्परिणाम तमाम मोदी विरोधकांना भोगावे लागत आहेत. त्या डॉक्टरचे कुठलेही नुकसान झालेले नाही. त्याचे नाव आहे जयराम रमेश! तेव्हा म्हणजे 2013 सालात हे गृहस्थ यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री होते आणि त्यांनी मोदी नावाचे चक्रीवादळ येऊ घातल्याचे पहिले संकेत दिलेले होते. तर त्याने दाखवलेला धोका समजून घेण्यापेक्षा राहुल सोनियांच्या चमच्यांनी त्याची मुस्कटदाबी केली होती आणि पक्षातून चालते होण्याचाही सल्ला दिलेला होता. काँग्रेस पक्ष कुठे चुकतो आहे, त्याकडे बोट दाखवले तर रमेश यांना मोदीभक्त ठरवून पक्षाचे नेते प्रवक्ते सत्यव्रत चतुर्वेदी यांनी भाजपात जाऊन मोदीचालिसा गाण्याचा सल्ला दिलेला होता. पण शेवटी रमेश यांचे भाकित खरे ठरले आहे आणि तेव्हापेक्षा आजची काँग्रेस आणखी आजारी व दुबळी होऊन गेली आहे. त्यावरचा जालिम उपाय म्हणूनच जय ‘श्री’राम इतकाच आहे.

2013 सालात याच दरम्यान देशात सोळाव्या लोकसभेचे वेध राजकीय पक्षांना लागलेले होते आणि तेव्हाच मोदी राष्ट्रीय राजकारणात येण्याची चाहुल लागलेली होती. भाजपाच्या गोवा अधिवेशनात मोदींना पक्षाचे प्रचारप्रमुख म्हणून घोषित करण्यात आले आणि राजकीय वावटळ उठलेली होती. माध्यमात भाजपाची यथेच्छ टवाळी सुरू झाली होती आणि

प्रचारप्रमुख कशाला, मोदींनाच पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करण्याचे टवाळखोर आग्रह अनेक वाहिन्यांचे अँकर धरू लागले होते. प्रत्येकाला तेव्हा असे छातीठोकपणे वाटत होते, की भाजपाने मोदींना नेता ठरवले, म्हणजे त्या पक्षाचा पुरता बोर्‍याच वाजणारच. त्याचा इतका मानसिक दबाव होता, की भाजपाचाही कोणी प्रवक्ता ठामपणे मोदीच पंतप्रधानपदाचे उमेदवार होतील, असे सांगायला धजावत नव्हता. पण तशी चिन्हे दिसू लागली होती आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमधून त्यासाठी दबाव वाढू लागलेला होता. मग पत्रकारांच्याच सोबतीने अन्य पुरोगामी पक्ष व काँग्रेसवालेही मोदींची हेटाळणी करण्यात रममाण झालेले होते. गुजरातची दंगल व मोदींची मुस्लिम विरोधातील डागाळलेली प्रतिमा, भाजपाला पूर्णपणे गर्तेत घेऊन जाईल, असे जवळपास तमाम राजकीय विश्‍लेषकांचे पक्के मत होते. पुरोगामी राजकीय नेत्यातही त्याविषयी एकमत होते. पण त्याला अपवाद एकच पुरोगामी माणूस होता आणि त्याचे नाव जयराम रमेश होते. एकदा त्यांनी जाहीरपणे प्रचलीत पुरोगामी भूमिकेला छेद देणारे वक्तव्य केले होते. ‘नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातील काँग्रेससमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे’, असे ते धाडसी विधान होते. कारण तेव्हा भाजपा नेत्यांनाही मोदी चमत्कार घडवतील, अशी खात्री वाटत नव्हती आणि जयराम रमेश मात्र त्याचाच संकेत आपल्या वक्तव्यातून देत होते. मग जगभरचे पुरोगामी रमेश यांच्यावर तुटून पडले तर नवल नव्हते. पण मागल्या चारपाच वर्षांत रमेश यांचे भाकित तंतोतंत खरे ठरले आहे.

मुद्दा असा की तेव्हाच, म्हणजे पाच वर्षांपूर्वी कॉग्रेसने व अन्य पुरोगाम्यांनी रमेश यांच्या त्या विधानाचा गंभीरपणे विचार केला असता आणि मोदी नावाचे ऐतिहासिक आव्हान समजून घेण्याचा प्रयत्न केला असता, तर आज चित्र किती वेगळे दिसले असते? पहिली गोष्ट म्हणजे इतक्या सहजपणे मोदी असा मोठा विजय लोकसभा निवडणुकीत मिळवू शकले नसते. काँग्रेसची इतकी भयंकर धूळधाण उडाली नसती आणि पुरोगामी पक्षांची अशी वाताहत नक्कीच झाली नसती. आजाराचे नेमके निदान केलेले होते आणि ते मान्य करून योग्य उपाययोजना तेव्हाच आखल्या गेल्या असत्या, तर मोदींना 2014 ची निवडणू्क इतकी सोपी गेली नसती. कदाचित एन्डीएला बहुमत मिळाले असते. पण भाजपाला स्वबळावर बहुमताचा पल्ला नक्कीच गाठता आला नसता. कोणीतरी एखाद्या शहाण्याने रमेश यांना विश्‍वासात घेऊन मोदींचे आव्हान इतके मोठे व निर्णायक कशाला वाटते आहे किंवा त्यावर उपाय कोणता, असा प्रश्‍न विचारण्याची तसदी घेतली असती, तरी किती वेगळा घटनाक्रम दिसला असता ना? पण सत्य कटू असते तितकेच नावडतेही असते. म्हणूनच कोणीही ते निदान ऐकूनही घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यातून प्रत्येक पुरोगाम्याने व काँग्रेस पक्षाने मोदींच्या त्या अभूतपूर्व विजयाला हातभार लावण्याचे पुण्यकर्म करून घेतले. त्यापेक्षा या डॉक्टरलाच चुकीचा ठरवण्याची जोरदार शर्यत सुरू झाली. कॉँग्रेसची किंवा पुरोगामी पक्षांची गोष्ट सोडून द्या. माध्यमात वा विविध विद्यापीठात मोदीविरोधी बुद्धिमंतांची कमतरता नाही. त्यांपैकी कोणीतरी जयराम रमेश यांच्याशी संपर्क साधू शकला असता आणि त्यांच्याकडून येऊ घातलेल्या मोदी वादळाची कारणमीमांसा समजून घेऊ शकला असता. पण आपल्याच मस्तीत जगणार्‍यांना कोण समजावू शकतो? रमेश यांचे तेच एकमेव विधान नव्हते. त्यांचे आणखी एक निदान जसेच्या तसेच खरे ठरलेले आहे.

पुढल्या काळात म्हणजे 2013 च्या उत्तरार्धात अखेर भाजपाने मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आणि त्या वर्षाच्या अखेरीस चार विधानसभांच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यात दोन राज्यांतली काँग्रेस सत्ता पुरती नामशेष झाली आणि दिल्लीतून तर काँग्रेस पुरती उखडली गेली. त्यानंतर काँग्रेसने उचललेले धाडसी पाऊल म्हणजे राहुल गांधी यांना उपाध्यक्ष हे नवे पद बनवून तिथे स्थानापन्न करण्यात आले. त्यानंतर राहुल उघडपणे पक्षाची संघटना व निवडणूक विषयक निर्णय घेऊ लागले. त्याही संदर्भात जयराम रमेश यांनी स्पष्ट नाही तरी सूचक शब्दात भाकित केलेले होते. राहुल यांनी पक्षाचे नेतृत्व आपल्याकडे घेतल्यानंतर जी संघटना बांधणी सुरू केली, त्याविषयी रमेश काय म्हणाले होते? राहुल अतिशय मेहनत घेऊन कॉँग्रेस पक्षाची नव्याने उभारणी करीत आहेत. पण राहुलची बांधणी ही 2019 सालच्या निवडणुकांसाठी चालू असून, आम्ही काँग्रेसजन 2014 ला होऊ घातलेल्या लोकसभा मतदानासाठी चिंतेत सापडलेले आहोत. यातला सूचक भाग असा होता, की आपल्या पक्षाचे निर्णय घेणार्‍या राहुलना काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक येऊन उभी असल्याचे अजिबात भान नाही. ते पाच वर्षांनंतर निवडणुका असल्यासारखे बेफिकीर निर्णय घेत आहेत, असे रमेश यांना सांगायचे होते. पण तितके स्पष्ट बोलणे काँग्रेसी आविष्कार स्वातंत्र्याला मंजूर नसल्याने, रमेश यांनी ‘लेकी बोले सुने लागे’ अशा स्टाईलने आपली वेदना कथन केलेली होती. कोणीतरी राहुलना निवडणुका 2014 मध्ये असल्याची आठवण करून द्यावी, इतकाच त्यांच्या विधानाचा अर्थ असावा. पण त्याचीही कोणी दखल घेतली नाही आणि राहुलना काँग्रेसचा पुरता बट्ट्याबोळ करण्याची मोकळीक देण्यात आली. त्यातले तथ्य असे की आता मात्र 2019 च्या लोकसभेसाठी राहुल कामाला लागलेले दिसतात. पण ते आज नव्हे तर मागली पाच वर्षे तशी तयारी करीत आहेत.

आता नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होऊन चार वर्षे उलटत आलेली आहेत आणि मोदीमुक्त भारताची भाषा सुरू झालेली आहे. पण ती भाषा अजिबात नवी नाही. तब्बल सोळा वर्षांपूर्वी मोदीमुक्त गुजरातची घोषणा सुरू झाली होती आणि पुढल्या बारा वर्षांत ती देशव्यापी होत गेली. त्यातूनच मोदी देशाच्या कानाकोपर्‍यांत पोहोचले आणि पर्यायाने आता  मोदीमुक्त गुजरातच्या ऐवजी मोदीमुक्त भारत, अशी त्या घोषणेत सुधारणा झालेली आहे. पण ज्या  मोदींपासून गुजरात वा भारत मुक्त करायचा तो  मोदी काय चीज आहे, ते कोणाला समजून घेण्याची गरज वाटलेली नाही. तशी गरज वाटली असती, तर तेव्हाच या लोकांनी जयराम रमेश यांना गाठून मोदी आव्हान म्हणजे काय, ते समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असता. त्यानंतर मोदींचे इतके अफाट यश समोर आल्यानंतर तरी या राजकीय अभ्यासक नेत्याकडे विचारणा केली असती. पण मोदीमुक्तीच्या वल्गना नित्यनेमाने करणार्‍या कोणाही राजकीय नेता वा अभ्यासक विचारवंताला रमेश यांच्याशी गुफ्तगु करण्याची इच्छाही झालेली नाही. तर खर्‍या आव्हानाला सामोरे जाण्याचा विषयच कुठे येतो?

जेव्हा मोदी गुजरातपुरते मर्यादित होते, तेव्हा त्या माणसातले आव्हान रमेश यांनी ओळखले असेल, तर आजही ते आव्हान कसे पेलावे, याचे उत्तर त्याच माणसाकडे मिळू शकते. देशातील पत्रकार वा राजकारण्यांनाही ज्याचा सुगावा लागला नाही, तेव्हा मोदींची कुवत ओळखणारा माणूस फ़ालतु नसतो. प्रामुख्याने तो काँग्रेस नेता असून मोदींचे आव्हान ओळखतो व बोलून दाखवतो, याला महत्त्व होते. पण लक्षात कोण घेतो? आजही कोणाला रमेश यांची आठवण झालेली नाही. काँग्रेस अधिवेशनात तेच जुने टाकाऊ भंगार नेते पुढे होते आणि ज्यांनी पक्षाला मागल्या दहापंधरा वर्षांत रसातळाला नेऊन ठेवले आहे. रमेश त्या मंचावर किंवा राहुलच्या जवळपासही नव्हते.

अर्थात चार वर्षांपूर्वी उपाध्यक्ष झाल्यावर राहुलनी जयपूरला जसे तावातावाने भाषण ठोकले होते, तसेच आताही अधिवेशनातले भाषण आवेशपूर्ण होते. पण त्यात आशय किती होता आणि विषय किती होता? त्याचे उत्तर नकारार्थी आहे. कारण आजही राहुलना वा अन्य काँग्रेसी नेत्यांना मोदी या विषयाचा थांग लागलेला नाही आणि त्याच मोदींपासून देशाला मुक्ती द्यायची आहे. पण त्याच मोदींना सर्वात आधी आव्हान म्हणून ओळखणार्‍या रमेश यांना विश्‍वासात घ्यायचे नाही. मग मोदीमुक्ती व्हायची कशी? नुसते फुसके आरोप केले वा गदारोळ उठवला म्हणजे मोदी पराभूत होतील, हा सोळा वर्षात खोटा पडलेला सिद्धांत आहे. आधी मोदींच्या जमेच्या बाजू समजून घ्याव्या लागतील व आपल्या दुबळ्या बाजू स्वीकाराव्या लागतील. शत्रूला दुबळा समजून त्याला पराभूत करता येत नाही. त्याची बलस्थाने ओळखून हल्ल्याची रणनीती आखावी लागते. ती बलस्थाने ओळखू शकणारे सल्लागार वा रणनीतीकार सोबत घ्यावे लागतात. थोडक्यात राहुलना ‘जय‘श्री’राम’ असा जयघोष करीत रमेश यांच्या आश्रयाला जाणे आवश्यक आहे. चिदंबरम, सुरजेवाला किंवा कपिल सिब्बल यांच्यासारख्या तोंडपुज्यांना काही काळ हाकलून द्यावे लागेल. रमेश यांच्यासारख्या नावडत्या गोष्टी ठणकावून सांगणार्‍यांना जवळ घ्यावे लागेल. ज्याला पाच वर्षांपूर्वी मोदी हे मोठे आव्हान असल्याची जाणीव झाली होती आणि राहुल निवडणुकाकडे पाठ फिरवून पक्षबांधणी करीत असल्याचे साफ बघता आले होते, त्यालाच हाताशी धरून मोदी नावाच्या आव्हानाला सामोरे जाता येईल. कारण रमेश यांच्यापाशी स्वतंत्र बुद्धी आहे आणि मनातले बोलण्याची हिंमत आहे. त्याला प्रोत्साहन द्यावे लागेल. कारण तेव्हा जे स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठे आव्हान होते, ते आता देशातील सर्वात मोठे व सर्व पक्षांसाठी मोठे आव्हान झालेले आहे. मात्र त्यातले आव्हान ओळखणार्‍यांचा दुष्काळ पडलेला आहे.

खिशात खुळखुळणारे पैसे वाढले, मग आपला खर्च वाढत असतो आणि तो भागवायचा तर सतत अधिकाधिक पैसे मिळवावे लागतात. काँग्रेसला सात दशकांत सत्तेसाठी झगडावे लागत नव्हते. म्हणून चिदंबरम्, अन्थोनी वा कपिल सिब्बल इत्यादी बांडगुळे पोसणे शक्य झाले. त्यात मते मिळवू शकेल वा जनतेला पक्षाकडे आणू शकेल अशा नेत्यांना संधी नाकारली गेली आणि आता अशी बांडगुळेच पक्षाला पोखरून खाऊ लागली आहेत. त्यांना हाकलून नव्या दमाच्या व मेहनतीला सज्ज असलेल्या नेत्यांना जवळ करावे लागेल. स्थिती ओळखून आव्हाने पेलणारे नेतृत्व उभे करावे लागेल आणि तिथे जयराम रमेश यांच्यासारख्या कुशाग्र बुद्धीच्या नेत्यांना पर्यायच नाही. पण अधिवेशनात त्यांना कुठे व कितीसे स्थान होते? त्यांच्या इतके स्पष्ट व नेमके बोलू शकणारे कोण मंचापर्यंत पोहोचू शकले? ते झाले नाही तर नुसत्याच मोदी विरोधातल्या वल्गना वा गर्जना कामाच्या नाहीत. ममता व चंद्रशेखर राव यांनी फेडरल फ्रंट बनवण्याचा घाट घातला आहे. म्हणजेच तेही राहुलच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याच्या मनस्थितीत नाहीत. मग मोदीमुक्ती व्हायची कशी? कारण आजही स्थिती पाच वर्षांपूर्वीचीच आहे. मोदीमुक्तीच्या गर्जना करणार्‍या कोणालाही नेमका मोदी कोण व कसा त्याचाच थांग लागलेला नाही. मग त्यापासून मुक्ती मिळायची कशी?

मात्र दरम्यानच्या पाच वर्षांत तोच मोदी आणखी आक्राळविक्राळ रूप धारण करून सामोरा येत आहे. मोदीमुक्तीचा घटोत्कच त्याने उलटा विरोधकांवरच कोसळून पाडला, तर 2019 सालात काय होईल? तितकी नामुष्की नको असेल, तर राहुल गांधीनी अगोदर जय‘श्री’राम म्हणत रमेश यांचा धावा केला पाहिजे. रमेश वा त्यांच्यासारखे अनेक  लहानमोठे वस्तुनिष्ठ नेते काँग्रेसपाशीही नक्की आहेत. फक्त त्यांना ओळखून मदतीला घेणे व मोदीविरोधातली भेदक रणनीती तयार करणे अगत्याचे आहे.

लेखक – श्री. भाऊ तोरसेकर
संपर्क – swatantranagrik@gmail.com  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *