भूले बिसरे गीत – बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना…

चित्रपट : जिस देश में गंगा बहती है (1960)                                               

दिग्दर्शक : राधू करमरकर

गीत : शै़लेंद्र

संगीत : शंकर-जयकिशन

गायक : लता मंगेशकर आणि मुकेश

कलाकार :  राज कपूर, पद्मिनी, प्राण, ललिता पवार आणि राज मेहेरा इ.

दुसर्‍याच्या आनंदामधे स्वत:चा आनंद अनुभवण्याची ही वृत्तीच माणसाला ‘‘अब्दुल्ल दिवाना’’ बनवू शकते! परमेश्‍वर प्राप्तीचा निर्व्याज आनंद या मंडळींना अनुभवता येत असावा असे नेहमी वाटते!

‘जिस देश में गंगा बहती है’’, या चित्रपटाचा नायक ‘‘राजू’’ म्हणजे राज कपूर आणि नायिका ‘‘कम्मो’’, नृत्यांगना पद्मिनी, यांच्यावर चित्रित झालेले हे धमाल युगुल गीत अवीट आहे. चार्ली चॅप्लीनची आठवण करून देणारा निरागस चेहेरा आणि अदाकारीची काहीशी तशीच शैली असणारा राजू हा खरं तर गुप्त पोलिस, एका लुटारू डाकूंच्या टोळीच्या मागावर या जंगलामधे दाखल झालेला असतो. अनाहूतपणे आणि त्याच्या स्थायीभावाप्रमाणे तो एका माणसाचे प्राण वाचवतो. योगा योगाने हा ‘माणूस’’ त्याच डाकूंच्या टोळीचा सरदार निघतो आणि कम्मो ही त्याचीच तरुण, रांगडी सुंदर पोर असते!

.. 2 ..

राजू आपल्याच गोताला ‘‘काळ’’ होणार आहे याची कम्मोला पुसटशीही कल्पना नसते पण आपल्या वडिलांचे प्राण वाचवणारा, एक भोळा भाबडा तरुण, सहवासामधे प्रथमच आला आणि ही त्याच्या प्रोत कधी पडली तिला समजलेच नाही पण समोरची पार्टी काही प्रतिसाद देत नाही त्यामुळे यांची बेचैनी स्वस्थ बसू देत नाही, वेळोवेळी राजूचे लक्ष वेधण्यासाठी; त्याला उद्युक्त करण्यासाठी ती त्याला म्हणते-

तू तर नुसता बेगानी शादीमधे पागल झालेला अब्दुल्ला आहेस, बुद्धू कुठचा, मी उपवर झालेलीच आहे. लवकरच विवाहबद्ध होऊन, दूर निघूनही जाईन; तुझ्यापासून. तू तसाही मला परकाच आहेस, का उगि माझ्या मागे गोंडा घोळत बसलास! आता हे तिचे स्वत:चे स्वप्नरंजन बरं का, कारण राजू त्याच्या ड्यूटीवर आहे, बाकीचे उद्योग त्याला परवडणारे नाहीत. पण कम्मोचे अल्लड तारुण्य तिला शांत बसवेल तेव्हा ना!

तिला वाटतं कसा हा बावळट, एवढी मी सारखी त्याच्या समोर इकडून तिकडे बागडते आहे, मधेच माझ्या पैंजणांची खुळखुळ त्याच्या कानी पडावी म्हणून धडपडते आहे, माझ्या नवथर प्रेाला साद मिळवण्याची आस धरून प्रयत्नांची पराकाष्टा करते आहे, पण हाय! याच्या डोक्यात काही प्रकाश पडेल तेव्हा ना!

राजूही तिच्या बरोबर सामिल होऊन तिला उत्तर देतो, हे बघ बाई, मी हा ‘‘असाच’’ आहे बेगानी शादीमधे दीवानगी अनुभवणारा. ‘दिल की इन बातों को मुश्किल है समझाना’’, त्या मागची त्याची कारण मीमांसा अशी आहे की मी, ‘आपले’’, ‘‘परके’’ मानतच नाही, मी दुसर्‍याच्या आनंदामधेच माझा आनंद लुटतो माझा समजून, त्या मुळे लग्न कोणाचे का

असेना तो किंवा ती खुश तसा मी पण खुशच असतो!

आपला पेशा, आपले कर्तव्य, याची बुज राखण्यासाठी तो जरी भोळेपणाचे सोंग पांघरत आसला तरी कम्मोसारख्या सुंदर तरुणीबरोबर वैवाहिक जीवन जगण्याची संधी चालून आली तरी तिचा गैरफायदा न घेता केवळ आपण तिच्या प्रेमाला पात्र आहोत एवढीच जाणीव त्याला मोलाची वाटते.

जगामध्ये, प्रामाणिकपणा, निर्व्याज स्नेह, सच्चेपणा हीच शाश्‍वत मूल्यं टिकून आहेत. अशा व्यक्ति कितीही साध्या वाटल्या तरी त्यांची थोरवी कणभरही कमी नसते. कोणतेही चांगले काम नि:स्वार्थ; समर्पित भावाने करणारे ‘‘अब्दुल्ला’’ या जगामधे आहेत म्हणूनच जग अजुनही इतके सुंदर राहू शकले! आज जे अपयशी प्रेापोटी क्रूरपणे अ‍ॅसिड फेकून सूड उगवणे, आपल्या अधिकाराचा गैरवापर करून लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेणे.

..3..

गोरगरीबांना अवास्तव लालूच दाखवून त्यांच्या अज्ञानाचा फास त्यांच्याच गळी घालून भ्याडासारखे पळून जाणे, असे प्रकार ऐकले की मन विद्ध होऊन जाते, तेव्हा अशा या ‘‘अब्दुल्लाची’’ आठवण प्रकर्षाने होते.

गीतकार कवि शैलेंद्रजींचे सार्थ बोल, संगीतकार शंकर-जयकिशन यांचे उत्तम संगीत, गायक लतादिदी आणि मुकेशजी. यांचे विलक्षण मोहक स्वरसाज, यांचा त्रिवेणी संगम या गीताला अजरामर करून गेला आहे. शिवाय जोड उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाची, मोहक पदन्यासांची आणि निखळ अभिनयाची सारे कसे मस्त जमून गेले आहे!

या गीताचं मर्म तर मला वेगळ्याच रूपात भेटलं आहे; म्हणजे, जी तरुणी, सुंदर आणि अनघड आहे, जी कोणत्याही परिस्थितीमधे ‘‘लव्ह जिहादला’’, आत्मसमर्पणाला पेटली आहे. हाती आलेल्या तरुणाला पटवण्यासाठी ना ना युक्ती लढवते आहे, त्याला बुद्धू, दिवाना, ललचाया अशी दुषणं देते आहे तीच वास्तविकपणे भोळी, निरागस आहे. या उलट जो भाबडेपणाचा बुरखा धारण करून वावरतो आहे तो खरा एक कर्तव्यदक्ष पोलीस शिपाई, अत्यंत संयमी आणि सुसंस्कृत धाडसी तरुण आहे.

राजूने आपल्याला अनुकूल असलेल्या परिस्थितीचा सहज फायदा घेण्यासाठी कम्मोची ढाल कधीच केली नाही की तिच्या वडिलांचे प्राण वाचवले म्हणून तिचा कोणताही गैर फायदा घेतला नाही, त्या उपकारांची परत फेडीची सुद्धा अपेक्षा ठेवली नाही, ही फार अंर्तुख करणारी बाब वाटते. कदाचित म्हणूनच हे गीत अविस्मरणीय होउ शकले असे वाटते.

हे अब्दुल्ला अजात शत्रू असतात म्हणूनच ते आत्मविश्‍वासाने आणि निधडेपणाने म्हणू शकतात- ‘‘विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीति तिजला पराजयाची’’-ही उन्मन अवस्था जो अनुभवू शकतो तोच खरा अब्दुल्ला नाही का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *