टेम्प्टिंग वाटणारा ‘गुलाबजाम’

दिग्दर्शक : सचिन कुंडलकर

कलाकार : सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर

सचिन कुंडलकर यांचा चित्रपट म्हटलं की कलर्स, फ्रेशनेस आणि मुख्यतः तरुणाईशी निगडित असलेलं कथानक यांचा मेळ घातलेला दिसून येतो. त्यांच्या मागील चित्रपटांकडं बघितलं तर ‘‘गंध’’ किंवा ‘रेस्टॉरंट’ नंतर फारच क्वचित त्या दर्जाचे चित्रपट बघायला मिळाले. ‘गुलाबजाम’ मात्र नक्की या दोन चित्रपटांची आठवण करून देतो. ‘गुलाबजाम’ पाहताना विनोदाची अचूक वेळ असो अथवा पात्रांची मानसिक गुंतागुंत, सगळं नेटसपणे बांधून ठेवण्याचा एक छान प्रयत्न आपल्याला दिसतो.

चित्रपटाची कथा ही एका लंडनहून परत आलेल्या तरुणावर आधारित आहे. स्वयंपाकाची गोडी असलेला आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) हा पुण्यात येतो ते अस्सल मराठी स्वयंपाक शिकायला. योगायोगानं त्याची डबे बनवणार्‍या राधाशी (सोनाली कुलकर्णी) गाठ पडते. एकीकडं राधाकडून स्वयंपाक शिकायचाच आहे, असा हट्ट धरून आणि ते साध्य करण्यासाठी काहीही करणारा आदित्य, तर दुसरीकडं आडमुठी आणि तितकीच लहरी राधा याची जुगलबंदी बघण्यात नक्कीच आनंद मिळतो. हळुहळू कथानक पुढं सरकत असताना अजून रंगत जातं. त्यांची मैत्री, राधाच्या आयुष्यातील काही गडद क्षण यावर दिग्दर्शकानं घेतलेला अँगल हा मोठ्या पडद्यावर बघण्यासारखा आहे.

या दोघांव्यतिरिक्त चित्रपटातलं मुख्य आकर्षण ठरतं ते म्हणजे ‘‘जेवण’’. गुलाबजामपासून ते अगदी पुरणपोळीपर्यंत आणि कांदाभजीपासून ते अळूवडीपर्यंत सगळे पदार्थ एकाच वेळी. बघून तोंडाला पाणी नाही सुटलं तर मी खवय्या नाही असं गृहीत धरावं. सगळ्या खाद्यपदार्थांच्या प्रेझेन्टेशनवर बरीच मेहनत घेतली आहे. जेवणातला घरगुतीपणा हा दिसून येतो. कदाचित त्यामुळेच ते जास्त ‘‘टेम्प्टिंग’’ वाटतं.

या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे याची सिनेमॅटोग्राफी आणि प्रॉडक्शन डिझाईन. राधाच्या घरापासून ते लंडनमधल्या दृश्यांपर्यंत फार छोट्या छोट्या गोष्टींवर घेतलेली मेहनत दिसून येते. छायाचित्रीकरणाबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ‘‘कलर शेड’’ कसा बदलत जातो, हे बघण्यासारखं आहे. एखाद्या पात्रातील बदलानुसार बदलणारे कलर्स हे जाणवतात. याशिवाय कॉस्च्यूम डिझाईनसुद्धा छान झालेलं आहे.

अभिनयाबाबतीत सोनाली ही अजूनही मराठीतली स्टार अभिनेत्री का आहे, हे ती सिद्ध करून जाते. व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू असलेल्या पात्राला पुरेपूर न्याय तिनं दिला आहे. काही दृश्यांमध्ये डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. सिद्धार्थ चांदेकर काही ठिकाणी हवा तितका प्रॉमिसिंग वाटत नाही. रेणुका शहाणे, समर नखाते आणि चिन्मय उदगीरकर हे पाहुणे कलाकार असले तरीही भाव खाऊन जातात.

पटकथेतले काही सीन्स फार खेचलेले वाटतात तर काही ठिकाणी चित्रपट पुढे जात नाही. पण एकूणच कथेची वीण ही पात्रांमधून आणि खाद्यपदार्थांमधून दाखविण्यात दिग्दर्शक यशस्वी झालाय असं म्हणायला हरकत नाही. संगीत थोडं बरं होऊ शकलं असतं.

गुलाबजामचा प्रतीकात्मक उपयोग छान वाटतो. तसंच अस्सल मराठी खाद्यपदार्थांची मेजवानी चित्रपटाचा बांधा मजबूत करते. याशिवाय, क्लायमॅक्सला राधाची नजर जेव्हा कॅमेर्‍यात पडते, तो सीन प्रामुख्यानं प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पडतो.

‘गुलाबजाम’’ हा चित्रपट त्याच्या कथानकामुळं, अभिनयामुळं आणि अर्थात खाद्यपदार्थांसाठी आवर्जून बघण्यासारखा आहे. दृश्यात्मक रीत्या तर तो आवडेल असा आहेच पण त्याला उत्तम सिनेमॅटोग्राफीची जोड आहे. कुंडलकरच्या आर्ट आणि कमर्शिअल फिल्म्स्‌मधला दुवा असणारा हा चित्रपट असं म्हटलं तरी तो दिग्दर्शकाची एक वेगळीच छाप सोडून जातो.

लेखक : श्री. अक्षय जामोदकर
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *