A Past – We Can’t afford?

अलिकडच्याच काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. सकाळी लवकर फिरायला बाहेर पडलो होतो. स्वच्छ हवा, वातावरण प्रसन्न होतं. घाऊक प्रदूषणाला अजून थोडा वेळ होता, त्यामुळं गाड्यांच्या कर्णकर्कश्श हॉर्न ऐवजी भारद्वाज, बुलबुल, चिमांचे आवाज ऐकू येत होते. रस्त्यावर वाहनांची वर्दळही तुरळकच होती. तेवढ्यात आपल्या मोटारसायकलवरून भरधाव जाणारा तरुण कशासाठी तरी (बहुधा कुणाचा तरी फोन घेण्याच्या निमित्तानं असावा) रस्त्याच्या बाजूला थांबलेला दिसला. त्याच्या टी-शर्टवरील एका ठळक वाक्याकडं माझं लक्ष गेलं. ते वाक्य असं होतं. ‘A Past – we can’t afford.’

फिरून झाल्यावर घरी परतल्यानंतर आणि त्यानंतरही काही दिवस हे वाक्य मेंदूत रुतून बसलं. आजही आहेच. मधाच्या पोळ्यावरून एकदम मधमाशा घोंघावत उठून आवाज करत वाट फुटेल तिकडं पळताहेत, अगदी तसेच अनेक विचार डोक्यात घोंघावू लागले. आम्हाला आज भूतकाळाचं/इतिहासाचं ओझं का वाटू लागलं आहे? हे ओझं अडाणी (म्हणजे कागदावरची साक्षरता नसलेले, पण ज्यांच्याकडे मुळातच शहाणपण आहे अशा) लोकांपेक्षा साक्षर झालेल्या, काही इयत्ता शिकून पदव्या घेतलेल्या, बर्‍यापैकी पैसा कमावणार्‍या आणि बदलत्या जगातली गरजेची नव्हे तर चैनीचीही साधनं हाताशी असणाऱ्या, ‘तिसऱ्या’ जगात वावरणाऱ्यांना हे ओझं अधिक वाटू लागलं आहे की काय? असाही विचार मनात येऊन गेला.

या पार्श्वभूमीवर यंदाच्या इंग्रजी नववर्षाची सुरुवातच मुळी महाराष्ट्रात एका दु:खद, वेदनादायी अध्यायानं झाली. पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव परिसरातील दंगल, तत्पूर्वीची वडु येथील समाधीची विटंबना आणि या दोन्ही प्रकारानंतर ‘महाराष्ट्र बंद’ चं केलेलं आवाहन, राजकारण्यांची संभ्रमात टाकणारी आणि प्रक्षोभक अशी वक्तव्यं! यामुळं जाळपोळ, मारहाण, धरपकड, खासगी वाहनं, सरकारी वाहनं आणि आस्थापनांची मोडतोड. या सगळ्या दुर्दैवी प्रकारांमुळं पुन्हा एकदा महाराष्ट्रात जातीयवादाचा वणवा पेटला. अशा वेळी सर्वाधिक नुकसान  होते ते सर्वसामान्यांचं आणि हत्या होते ती समंजसपणाची, सभ्यतेची, सौहार्दाची आणि परस्परांविषयीच्या सद्भावनांची! दुर्दैवानं 21 व्या शतकातील महाराष्ट्रात आजही अशा दु:खद घटनांना समाज म्हणून आपल्याला सामोरं जावं लागत आहे. आपल्या देशाच्या, देशबांधवांच्या दृष्टीनं हे फारच विघातक आहे.

देशात काय अन् राज्यात काय सरकारं बदलली म्हणजे लगेच क्रांती झाली अशा संभ्रमात वावरणाऱ्यांना या घटनेनं एक प्रचंड तडाखाच दिला आहे, असं म्हणावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पुढं छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, ‘प्रबोधन’कार ठाकरे अशा अनेक नरवीरांनी आपल्या देशाला, हिंदुस्थानाला, त्यातल्या महाराष्ट्रासारख्या प्रगतीच्या वाटेनं जाण्याची सदैव क्षमता असलेल्या प्रांताला सर्वसमावेशकतेची फार मोठी शिकवण आचरणात आणून दाखवली. शिवरायांनी तर अठरापगड जातींना एकत्र आणून स्वराज्याची उभारणी केली आणि आपल्या खर्‍या शत्रूंच्या छातीत धडकी भरेल, अशी कामगिरी करून ठेवली. स्वराज्याचा शत्रू तो आपला शत्रू. मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो, अगदी रक्ताच्या नात्यातला असो, त्याला क्षमा नाही हे सूत्र त्यांनी अवलंबलं. स्वत:च्या सैन्यात अगदी मुसलमानांसह सर्व जाती-धर्मातील माणसांना त्यांनी देशनिष्ठा आणि गुणवत्तेच्या निकषावर समाविष्ट केलं. पण वेळ आली तेव्हा शाईस्तेखानाची बोटं आणि अफझलखानाचं पोट कापलंच. स्वराज्यातील महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या, खंडोजी खोपड्याला आणि अफजलखानच्या बाजूनं लढलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यालाही त्यांनी सोडलं नाही. स्वत:च्या मामांनाही त्यांनी स्वराज्याच्या विरोधात केलेल्या कामगिरीची शिक्षा दिलीच की! त्याच शिवछत्रपतींच्या स्वराज्यात आज देशाचे खरे शत्रू चोहोबाजूंनी सीमेवर आपल्या जवानांची मुंडकी उडवत असताना, मुंबईवर दहशतवादी हल्ला करीत असताना, आझाद मैदानावर मोर्चे काढून पोलिसांना आणि पोलिस दलातल्या महिला पोलिसांनाही आपल्या गैरवर्तनाचे तडाखे देत असताना… या अशा खऱ्या शत्रूंशी असलेला मुकाबला करणं गरजेचं असताना दुर्दैवानं आपण ‘भारतीय’ म्हणून न वागता आपापसातच जाती-धर्म-पंथ-भाषांच्या नावावर संघर्ष करणार असू, एकमेकांची डोकी फोडणार असू तर आणखी किती वर्षे आपण आपल्याच महापुरुषांचा पराभव करत बसणार आहोत? हा प्रश्न आपण सर्वांनीच स्वत:ला विचारायला नको का?

अलिकडंच झालेल्या भीमा-कोरेगावच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर छत्रपतींच्या कोल्हापूर गादीचे वंशज आणि राज्यसभेचे सदस्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसिद्ध केलेलं निवेदन खूप महत्त्वपूर्ण वाटतं. त्यात त्यांनी म्हटलंय, “इतिहासात होऊन गेलेल्या लढायांना जातीयतेचा रंग देत कुणी समाजाचे स्वास्थ्य बिघडवू पाहत असेल तर ते कदापिही खपवून घेतले जाणार नाही. शिवछत्रपतींच्या स्वराज्यात जातीपातीला थारा नव्हता. हेच विचार पुढे शाहू, फुले, आंबेडकर यांनी समाजात रुजवले. यामुळेच महाराष्ट्रात सर्वच जातीधर्माची माणसे गुण्यागोविंदाने राहतात. परंतु जनतेची ही एकी काही समाजविघातक शक्तींच्या डोळ्यात खुपते आहे.’’

“यासाठी काही समाजकंटक, संघटना इथे जातीय तेढ वाढावी यासाठी सतत प्रयत्नशील असतात. असे लोक त्यांचे राजकीय हित साध्य करण्यासाठी जातींना लढवतात. याला दोन्ही समाजाने बळी पडू नये. एखाद्या घटनेचे निमित्त करून कुणी समाजमन कलुषित करीत असेल तर त्याला वेळीच पायबंद घातला गेला पाहिजे. बहुजन समाजाने देखील अशा राष्ट्रविघातक शक्तींच्या हातचे बाहुले बनता कामा नये. अशा बिकट प्रसंगी समाजाने धैर्याने आणि संयमाने पुढे जात खरे शत्रू कोण आहेत, हे ओळखायला शिकले पाहिजे’’ असेही संभाजीराजेंनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे.

महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्यांनी, सर्व राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींनी आणि अशा समाजविघातक कृत्यांच्या निमित्तानं आपला राजकीय स्वार्थ साधू इच्छिणाऱ्यांनी या निवेदनातील शब्द न् शब्द समजून घ्यायला हवा. दीर्घकाळच्या तपश्‍चर्येनंतर समाजवस्त्राचे धागे कुठे जुळून येत असतील तर स्वार्थापायी ते पुन्हा पुन्हा कसे उसवता येतील याच विचारांचा सदैव रियाज करणाऱ्यांनी कधीतरी व्यक्तीगत राजकीय स्वार्थाच्या पलिकडं जाऊन या देशाचा, इथल्या लोकांचा विचार करायला नको का? भले अशा नेत्यांना कदाचित असा विचार करणं ‘सवयीमुळं’ शक्य होत नसेल, पण समाज म्हणून आपणच सतर्क रहायला हवं. अन्यथा आजही इतिहासातल्या अशा अनेक घटना आपल्या मानगुटीवर भविष्यातही एक भूतकाळाचं ओझं होऊनच राहतील.

आपल्या समाजात एक वर्ग असा असतो की तो बहुतेक वेळा इतिहासातच रमतो. त्यातही सनावळ्या, लढाया आणि जय-पराजयांच्या इतिहासातच रमतो. त्यावेळचा समाज समजून घेत बसत नाही. अशा लोकांचे बऱ्याच वेळा वर्तमानाकडं आणि पर्यायानं भविष्याकडंही दुर्लक्ष होत राहतं. तर दुसरा एक वर्ग असतो की, त्याला वाटतं, बहुधा आपल्यापासूनच या जगाची सुरुवात झाली असावी. त्यापूर्वी इथं काही नसावंच. जे अभ्यासायचे, विचार करायचा तो फक्त वर्तमानातच. अशा दोन्ही टोकांचा विचार करणार्‍यांपेक्षा आपण सर्वांनी समाज म्हणून समन्वयाचाच मध्यमवर्ग स्वीकारायला हवा. इतिहासातल्या घटना समजावून घेऊन, त्यातल्या मूळ प्रेरणा, घटना, त्यांचे तपशील, त्यांच परस्परांशी नातं, त्या घटनांचे परिणाम, या साऱ्याबाबतचे उपलब्ध पुरावे याचा वर्तमानकाळीचे भान ठेवून अभ्यास करायला हवा. भूतकाळातल्या केवळ पराक्रमांचेच गोडवे गात बसून काय होणार? वर्तमानकाळात करावयाच्या पराक्रमासाठी त्यातून काय शिकता येईल? हा विचारच आपल्याला भविष्याकडं घेऊन जाणार आहे, हा विचारच आता समाजापुढं व्यापकपणे जायला हवा पण ज्यांना ह्याच्याशी काही देणं- घेणं नसतं किंवा असलंच तर ते केवळ आपल्या संधीसाधू राजकीय फायद्या-तोट्यांपुरतं दिसतं अशांच्या डोळ्यातल्या ‘ ‘विघटनाचा मोतीबिंदू’ कोण काढणार? एक प्रगतिशील, जबाबदार समाजघटक म्हणून अशा मंडळींच्या दृष्टिदोषाला आपण आपल्या डोळ्यात, कानात, मनात आणि मेंदूत थारा देता कामा नये. सत्तरी ओलांडलेल्या भारतीय नागरिकांनी राज्यघटनेच्या आधारानं एवढी तरी सामूहिक प्रगल्भता दाखवायला हवी. महाराष्ट्राच्या वर्तमानात घडणाऱ्या घटनांचा हा एक बोध आहे, असं वाटतं.

ज्यांनी भारताच्या एकात्मतेलाच अत्यंत धूर्तपणानं सुरुंग लावला आणि या देशावर दीडशे वर्षे राज्य केलं, त्या इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी असलेल्या लॉर्ड मेकॉले यानं ब्रिटिश पार्लमेंटला उद्देशून 2 फेब्रुवारी 1835 रोजी केलेल्या भाषणात म्हटलं होतं, ‘”I have travelled across the length and breadth of India…. I don’t think we would never conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage”

दुर्दैवानं आम्ही आजही मेकॉलेलाच विजयी करत आहोत. या देशाच्या वैभवशाली इतिहासाला आणि ब्रिटिश काळातल्या वर्तमानाला नख लावून मेकॉले आणि त्याच्यासारख्या धूर्त इंग्रजांनी स्वातंत्र्य मिळूनही भारतीय मंडळी परस्परांच्या विद्वेषातच कशी गुंतून पडतील याची अत्यंत पद्धतशीरपणे व्यवस्था करून ठेवली आहे. हे आजही आम्ही समजून घेणार नसू तर मात्र “A Past – we can’t afford.’’ हे वाक्यच आपल्याला सतत आठवत राहील. इतिहासाचं ओझं नको व्हायला, यासाठी भविष्याचा वेध घेत घेत वर्तमानाला आनंदी करण्याची शपथ!

लेखक : डॉ. सागर देशपांडे
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *