कॅपिटल बॉम्बस्फोटाची 75 वर्षे!

जानेवारी महिना हा अनेक मोठ्या ऐतिहासिक घटनांनी भरलेला आहे. गेल्याच आठवड्यात आपण सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात बुधवार पेठेत सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेला 170 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी विस्ताराने लिहिले होते. या महिन्यात आणखी एका महत्त्वाच्या घडामोडींसाठी पुणे शहर हे साक्षीदार होते. ती घटना म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात 24 जानेवारी 1943 मध्ये झालेला पुण्यातील कॅपिटल थिएटरमधील बॉम्बस्फोट. या आठवड्यात 24 तारखेला या घटनेला बरोबर 75 वर्षे पूर्ण होत आहेत.

संपूर्ण भारताला हादरवणार्‍या पुण्यातील या कॅपिटल बॉम्बस्फोट या घटनेचा 75वा स्मरणदिन पुण्यातील इतिहासपे्रमी मंडळ, तसेच 57 वर्षे सामाजिक कार्य करणारे हिंद तरुण मंडळ साजरा करत आहेत. या निमित्ताने बुधवारी 24 रोजी सकाळी साडेदहा वाजता लष्कर भागातील कॅपिटल थिएटर म्हणजे आताचे व्हिक्टरी चित्रपटगृह एका अभूतपूर्व कार्यक्रमा निमित्ताने सजले होते. याच आठवड्यात येणार्‍या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम भव्य स्वरूपात साजरा केला जात आहे. पुण्यातल्या क्रांतिकारकांनी घडवलेल्या या बॉम्बस्फोटाच्या स्मृती या विषयावरील एका 120 चौरस फूट आकाराच्या एका भव्य रांगोळीतू साकार केल्या गेल्या. त्यासाठी राष्ट्रीय कला अकादमीच्या साठ रंगावली कलावंतांनी रात्रभर काम करून हा नाट्यपूर्ण देखावा 24 तारखेला सादर केला.

स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी बलिदान करणार्‍या पुण्यातील क्रांतिकारकांना ही वाहिलेली एक आगळीवेगळी आदरांजली आहे, असे या उपक्रमाचे सूत्रधार व इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी सांगितले. शिवकालापासून आपल्या जाज्ज्वल्य इतिहासाच्या गोष्टी शालेय विद्यार्थ्यांपर्यंत परिणाम कारकरीत्या पोहोचवण्याचे काम शेटे गेली अनेक वर्षे करत आहेत. याशिवाय हिंद तरुण मंडळाचे प्रमुख विश्‍वस्त आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक दिलीप गिरमकर हेही या उपक्रमात मंडळाचे अध्यक्ष निलेश यादव यांच्यासह मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.

रंगावलीत जिवंत करणार्‍या कॅपिटल बॉम्बस्फोटाचा इतिहास सांगणार्‍या या सोहळ्यात या घटनेतील क्रांतिकारकांच्या वारसदारांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये यातील क्रांतिकारक बापू डोंगरे यांचे चिरंजीव प्रदीप डोंगरे व सून पद्मा डोंगरे, दत्ता जोशी यांचे पुतणे भास्कर जोशी, बाबूराव चव्हाण यांचा मुलगा अशोक, दत्ता जगताप यांचे नातू निरंजन आणि मुलगी स्वाती सोनई, रामभाऊ तेलंगांचे पुतणे राजेंद्र तेलंग, नानासाहेब बेलमपल्ली यांचे चिरंजीव बाळकृष्ण, राजाभाऊ तेलंग यांचे पुतणे राजेंद्र, गणपत दरपल्ली यांचा मुलगा दत्तात्रय तसेच हरिभाऊ लिमये यांचे चिरंजीव अतुल लिमये आणि सून सीमा तसेच त्यांची नातवंडे ईशा आणि प्रतीक यांचा समावेश होता. या सार्‍यांसह डॉ. सुधीर डोंगरे, पद्मा डोंगरे, तसेच प्रदीप डोंगरे व रेखा डोंगरे यांनाही स्मृतिचिन्ह आणि शाली देऊन त्यांना सन्मानित केले गेले.

क्रांतिकारकांच्या या वारसांना तेथे आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या घोषपथकांतून त्यांना मानवंदनाही देण्यात आली. आताच्या व्हिक्टरी चित्रपटगृहाच्या या कार्यक्रमाला कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन्. यादव, तसेच अतुल गायकवाड, या भागातील स्वातंत्र्यसेनानींचे वारसदार दिलीप तुंबर, निलेश बिल्लमपेल्ली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ‍ॅड. प्रशांत यादव इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरवर्षी गणपती उत्सवात जिवंत देखावे सादर करणार्‍या हिंद तरुण मंडळाने यंदा कॅपिटल बॉम्ब घटनेवर आधारित जिवंत देखावा सादर करण्याचे ठरवले असल्याचे मंडळाचे विश्‍वस्त दिलीप गिरमकर यांनी सांगितले.

मंडळाचे पदाधिकारी प्रशांत यादव यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमामागची भूमिका मांडली आणि या पूर्वीची कॅपिटल व आताची व्हिक्टरी थिएटर असणार्‍या या ऐतिहासिक वास्तूवर ऐतिहासिक फलक लावण्याची मागणी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे केली. त्यानुसार डॉ. यादव यांनी तेथे संगमरवरी दगडावर हा इतिहास लिहून लावला जाईल, असे आश्‍वासन दिले. डॉ. यादव म्हणाले की, ही पुणे लष्कर भागातली एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू असून महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेची साक्षीदारही आहे.

या कार्यक्रमात आताच्या व्हिक्टरी थिएटरचे मालक फरोख चिनॉय आणि त्यांच्या पत्नी डॉ. रोशन चिनॉय उपस्थित होते. त्यांनी ही वास्तू या कार्यक्रमासाठी सज्ज ठेवली असून तिथे काढण्यात आलेल्या कॅपिटल बॉम्बस्फोटावरील रांगोळी तीन दिवस ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. क्रांतिकारक हरिभाऊ लिमये यांच्या सून सीमा लिमये यांनी आपल्या मनोगतातून या बॉम्बस्फोट कटाचा एक रोमहर्षक इतिहासच सांगितला.

त्या म्हणाल्या की, बॉम्ब तयार करण्याच्या कामात आमचे लक्ष्मी रोडवरील उंबर्‍या गणपती चौकातील घर वापरण्यात आले. आजारी लोकांना मसाज करण्यासाठी तिथे काम केले जात असे. त्यात गंधकाचा वापर होत होता. स्फोटकांसाठी गंधक लागते. पण येथे तसे काही नसेल म्हणून आमची जागा सुरक्षित राहिली. बॉम्बच्याभोवती टायमर म्हणून सिगारेटच्या पेटीत पूर्वी मिळत तसे चांदीच्या कागदाची आवरणे गुंडाळण्यात आली.

माझे सासरे हरिभाऊ हे माफीचे साक्षीदार बनले, पण त्यांनी शिताफीने साक्ष फिरवली व त्यामुळे सर्व क्रांतिकारक यातून निर्दोष सुटले. पुढे त्यांना चार वर्षेवेगळ्या कारणांनी तुरुंगवास भोगावा लागला. गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी त्यांचे देहावसान झाले. कॅपिटल बॉम्ब स्फोट ही घटना व त्या निमित्ताने आमचा होत असणारा सत्कार याने आम्ही धन्य झालो आहोत!

कॅपिटल बॉम्ब स्फोट घटनेचा वृत्तांत :

आजच्या पिढीलाही यातून प्रेरणा मिळेल व ब्रिटिश सरकारला हादरवून सोडणार्‍या या घटनेचा अर्थ परिणाम कारक पोहोचेल असा विश्‍वास मोहन शेटे यांनी व्यक्त केला. या घटनेचा थोडक्यात इतिहास सांगताना ते म्हणाले की, या घटनेची पार्श्‍वभूमी ‘करेंगे या मरेंगे’ या आठ ऑगस्ट रोजी दिलेल्या घोषणेपासून सुरू झाली.

या काळात पुण्यात बाबूराव चव्हाण, बापू साळवी, एस्. टी. कुलकर्णी, या भूमिगत कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन इंग्रजांच्या जुलमी सत्तेला हिसका दाखवण्यासाठी पुण्यात जोरदार धमाका करण्याचा निश्‍चय केला होता. त्यासाठी लागणार्‍या बॉम्बची व्यवस्था पुण्याजवळील खडकी येथील अ‍ॅम्युनेशन फॅक्टरीत काम करणार्‍या भास्कर कर्णिक या तरुणाने तेथील काही बॉम्ब बाहेर आणून देण्याचे काम केले. त्या काळात फेकून मारण्यात येणार्‍या या हॅण्ड ग्रेनेड बॉम्बचे टाईम बॉम्बमध्ये रूपांतर करण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी बापू डोंगरे व निळुभाऊ लिमये यांनी पुढाकार घेतला. पण हे काम करताना ते दोघेही जखमी झाले. हॅण्ड ग्रेनेडचे टाइम बॉम्बमध्ये रूपांतर करण्याच्या चाचण्या या दोघांनी प्रभात रोडवरील माधव पाटील यांच्या दुर्गा कुटीर या बंगल्यात घेतल्या. या चाचण्या करताना त्यातील स्फोटक पदार्थांचा अचानक जाळ झाला आणि त्यात हे दोघेही भाजले गेले. पण भूमि गत असल्यामुळे कुठे उघडपणे उपचार करता येत नव्हते. बरे होण्यासाठी त्यांना काही काळ उपचार घेणे आवश्यक होते. पण या अपघातातून टाईम बॉम्ब बनवण्याची युक्ती मात्र सापडली!

ब्रिटिश सरकारला हादरवून सोडण्यासाठी हा स्फोट कुठे कुठे करायचा याचा या तरुण क्रांतिकारकांनी आधी अभ्यास केला होता. त्यानुसार त्यांनी कॅपिटल थिएटरची निवड केली. या थिएटरमध्ये तेव्हा इंग्रज अधिकारी व शिपाई सिनेमे पाहाण्यासाठी येत असत. देशाला पारतंत्र्य असल्यामुळे त्या काळात राष्ट्रगीत म्हणून ‘‘गॉड सेव्ह द किंग’’ हे गीत सिनेमाच्या शेवटी लावले जात असे. हे गीत न लावता त्याऐवजी तेथे ‘वंदे मातरम्’’ हे राष्ट्रगीत लावा असे निनावी पत्र या तरुणांनी कॅपिटल थिएटरच्या मालकांना पाठवले ती एक प्रकारची धमकी किंवा इशारा होता. असे न केल्यास त्याचे परिणाम बरे होणार नाही,  असेही त्यात स्पष्ट बजावले होते.

अखेर ठरलेल्या दिवशी म्हणजे 24 जानेवारी रोजी हा स्फोट घडवण्यात आला. याचे कारण त्या दिवशी या भागात तसे शांततापूर्ण वातावरण असते असे होते. त्यानंतर येणार्‍या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा पोलिस बंदोबस्त होता. ती प्रश्‍न या निमित्ताने सोडवण्यात आला. तरुण क्रांतिकारकांपैकी तिघांनी सिनेमाचे तिकीट काढून आत प्रवेश केला आणि तेथील बसण्याच्या खुर्चीखाली टायमर लावून तो बॉम्ब लावला आणि ते तिथून बाहेर पडले.

ठरल्यावेळी तो स्फोट झाला. तो स्फोट इतका मोठा होता की त्यात चार इंग्रज मारले गेले. तसेच अन्य 18 इंग्रज जखमी झाले. या घटनेचा परिणाम दूरगामी झाला.

इंग्रज पोलिसांनी तपास करताना त्यात वापरण्यात आलेला बॉम्ब कुठून आणला याचा तपास केला असता. तो पुण्याच्या अ‍ॅम्युनेशन फॅक्टरीत तयार झाल्याचे आढळले. याचा अर्थ आपणच तयार केलेला बॉम्ब आपल्या विरोधात वापरण्यात आला याचा स्पष्ट अर्थ इंग्रज सत्ताधार्‍यांना झाला. त्यामुळे या बॉम्बस्फोटाच्या तपासाची दिशा त्यानुसार ठरवण्यात आली. खवळलेल्या इंग्रजांनी पुण्यात अनेक ठिकाणी धरपकड सुरू केली. खडकीच्या अ‍ॅम्युनेशन फॅक्टरीच्या बाहेर बॉम्ब पाठवण्यात आल्याबद्दल भास्कर कर्णिक याला ताब्यात घेण्यात आले. त्याला फरासखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथील पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. पण आपल्या तोंडून आपल्या इतर साथीरादांची नावे निघू नयेत, म्हणून कर्णिकने आधीच विचार करून ठेवला होता. त्याने बाथरूमला जायचे आहे असे कारण सांगून आपल्याकडील पोटॅशियम सायनाईड हे घातक विषारी द्रव्य प्राशन करून आत्मसमर्पण केले. त्याच्या स्मरणार्थ आजही फरासखाना पोलिस ठाण्यसमोर एक छोटे हुतात्मा स्मारक आहे. ते कर्णिक याने दिलेल्या बलिदानाचेच एक उदात्त प्रतिक आहे!

क्रांतिकारकांमधला दुसरा दत्ता जोशी यालाही अटक झाली. तुरुंगात झालेल्या अनन्वित छळामुळे त्याचा अंत झाला. या काळात एकंदर समाज इंग्रजी सत्तेविरोधात संतापला होता. शेटे म्हणाले की, पुण्यात अनेक ठिकाणी यातील संशयितांचा शोध घेण्यात आला. स. प. महाविद्यालय परिसरात तेव्हा पोलिसांचा लाठीचार्ज झाला व त्यात एक तरुण मरण पावला. तसेच शोध घेण्यासाठी तेव्हा अप्पा बळवंत चौकात पुण्यातील लष्कराने रणगाडे आणून ठेवले होते! याच भागातील जोगेश्‍वरी मंदिराचे ब्रेंदे यांच्या घरी काही जिवंत बॉम्ब होते, असे सांगण्यात आले. पुणेकरांच्या मनात इंग्रजी सत्तेच्या विरोधात असंतोष निर्माण झाला होता. कॅपिटल बॉम्ब घटनेने व त्यानंतर इंग्रज पोलिसांच्या दहशतीमुळे हा राग आणखीनच वाढत गेला.

कॅपिटल बॉम्बस्फोटाच्या तयारीत पुण्यातील या क्रांतिकारकांनी लष्कर भागातील वेस्टएण्ड आणि एम्पायर या दोन चित्रपटगृहांचाही त्यात समावेश करावा असा विचार केला होता. पण त्यापैकी त्यांनी वेस्टएण्डमध्ये हा स्फोट झाला तेव्हा तो पाण्याच्या बदलीत झाल्याचे सांगितले जाते. त्याचा धमाका किंवा आवाज मात्र मोठा होता. पुणे व मुंबई जोडणार्‍या ठाणे परिसरातील एका रेल्वेच्या लोखंडी पुलावर बॉम्बस्फोट करण्याची या तरुण क्रांतिकारकांची इच्छा होती. पण तो पूल खूप भक्कम असल्याने व तिथे सतत पोलीस बंदोबस्त असल्याने मूळ प्लॅन त्यांना बदलावा लागला. याशिवाय पुणे या स्फोटाचा खटला देशभर गाजला. पण खटल्यातील काही आरोपी माफीचे साक्षीदार म्हणून कबूल झाले, पण ऐनवेळी त्यांनी साक्ष फिरवली व परिस्थितीजन्य पुराव्याअभावी न्यायालयाने यातील सर्व आरोपींना निर्दोष सोडले. हे सर्व आरोपी होते भास्कर कर्णिक, बाबूराव चव्हाण, बापू साळवी, एस्. टी. कुलकर्णी, रामसिंग परदेशी, हरिभाऊ लिमये, दत्ता जोशी, बापू डोंगरे, भालचंद्र वायाळ आणि दिगंबर दिवेकर.

कॅपिटल बॉम्ब स्फोट घडला त्या आधीचा कालखंडही स्वातंत्र्याच्या ऊर्मीने भारलेला होता. याच काळात मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय अधिवेशन भरले होते, तर तो काळ ऐन दुसर्‍या महायुद्धाच्या धामधुमीचा होता. या अधिवेशनातच ‘छोडो भारत’’ हा ऐतिहासिक ठराव पास झाला. तर याच अधिवेशनात महात्मा गांधींनी ‘‘करा किंवा मरा’’ हा महान संदेशही देशवासियांना दिला. पुण्यात या परिस्थितीचे पडसादही उमटत होते. हॅमंड नावाचा एक इंग्रज अधिकारी लोकांवर विनाकारण अत्याचार करत होता. निशस्त्र लोकांवर बंदूक रोखून त्यांना मारण्याच्या धमक्या देत होता. त्याच्या आदेशानेच पुण्यात लष्करी रणगाडेही फिरवण्यात आले होते. खडकीच्या अ‍ॅम्युनेशन फॅक्टरीत सुपरवायझर काम करणारे भास्कर कर्णिक हे सायन्सचे पदवीधर असून मुंबई विद्यापीठाची परीक्षा उच्च श्रेणीत पास झाले होते. महात्मा गांधींच्या स्वदेशी आणि बहिष्काराच्या चळवळीत त्यांनी लहानपणी स्वयंसेवक म्हणून सहभागही घेतला होता. स्फोट करण्यासाठी आणलेली स्फोटके त्यांनी आधी आपल्या घरात लपवून ठेवली.

ते तेव्हा जंगली महाराज रस्त्यावरील एका बंगल्यात राहात होते. इराणमध्ये युद्धावर गेलेल्या कॅप्टन पित्रे यांची ती जागा होती. त्यामुळे या सोयीच्या जागेतच भूमिगत चळवळीचे साहित्य एकत्र करण्याचे काम होऊ लागले.

कॅपिटल बॉम्बची केसची माहिती अनेकांनी सांगितली आहे. त्यानुसार ही योजना पुरी करण्याचा चंग या भूमिगत क्रांतिकारकांपैकी बाबूराव चव्हाण आणि बापू साळवी यांनी बांधला. पुढे 24 जानेवारी रोजी जेव्हा कॅपिटल थिएटरमध्ये स्फोट झाला, तेव्हा आरोपींना पकडून देण्यास मदत करणार्‍यास पाच हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते!

या गुन्ह्याचा तपास करण्याचे काम रोच नावाच्या इंग्रजी पोलिस अधिकार्‍यावर सोपवण्यात आले. स्फोटातील वापरण्यात आलेले बॉम्ब खडकीच्या फॅक्टरीतले असून ते आपण पुरवले यासंबंधी कर्णिक यानेही खूप गुप्तता पाळली होती. आपल्यापर्यंत पोलिस पोचले व आपल्याला पकडले तरी आपण कुणाचीही नावे सांगणार नसल्याचा कर्णिकचा निर्धार होता. त्याला पकडल्यावर त्याने नावे सांगण्याऐवजी आत्मसमर्पणाचा मार्ग विचारपूर्वक स्वीकारला होता. ती आत्महत्या नव्हती तर देशासाठी आहुती होती!

पोटेशियम सायनाईड खाल्यावर चेहरा काळा निळा पडल्यावर त्यांना उपचार करण्यासाठी फरासखानातील पोलिसांनी समोरील पॅरामाऊंट थिएटरच्या इमारतीतील जोशी नावाच्या दंतवैद्यास बोलावले. पण त्यापूर्वीच कर्णिकांची प्राणज्योत मावळली होती.

कॅपिटल बॉम्ब स्फोटातील आणखी एक आरोपी म्हणजे दत्ता जोशी. जेमतेम एस्एस्सी होणार्‍या दत्ताने वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी हौतात्म्य स्वीकारले. त्याचे शालेय शिक्षण पुण्यातील आजच्या सरस्वती मंदिर किंवा तेव्हाच्या पूना इंग्लिश स्कूलमध्ये झाले. या क्रांतिकारकांमधला आणखी एक तरुण एस्. टी. उर्फ छगन कुलकर्णी हा तेव्हा 21-21 वर्षांचा होता.

अत्यंत गोरा असल्यामुळे तो जवळपास युरोपियन वाटे! त्याने या कामात बाबूराव चव्हाण व बापू साळवी यांना मदत करण्यात पुढाकार घेतला होता. तेव्हा बाबूराव व बापू यांचा मुक्काम माडीवाले कॉलनीत पाठक पेंटर यांच्याकडे होता. 22 जानेवारीला काही साहित्य घेऊन ते दोघे कॅपिटल थिएटरमध्ये स्फोटाची तयारी करण्यासाठी गेले. पण आपल्याकडील तयारी पुरेशी नाही याची त्यांना लगेच जाणीव झाली. पण त्या दिवशी सिनेमा पाहातानाच आपल्याला 24 तारखेसाठी काय तयारी करायची आहे याची पाहाणीही या दोघांनी केली. दोघांच्या नावाचे वॉरंट निघाल्यामुळे उघडपणे काम करणे शक्य नव्हते म्हणून ते काम दत्ता जोशी व कुलकर्णी यांच्यावर आले. मूळ कल्पनेनुसार कॅपिटलसह, वेस्टएंड व एम्पायर या तीनही चित्रपटगृहांमध्ये स्फोट करण्याची योजना होती. यासाठी किमान नऊ माणसांची गरज होती.

पण प्रत्यक्षात चारच माणसे असल्यामुळे यातून एम्पायर चित्रपटगृह वगळण्यात आले. प्रत्यक्षात स्फोट कॅपिटलमध्ये झाला व त्यात मनुष्यहानी झाली. स्फोट होऊन बरेच दिवस झाले तरी पोलिसांना कट शोधून काढण्यात यश आले नाही. पुढे 21 मार्च 1943 मध्ये पोलिस बाबूराव चव्हाण व एस्. टी. कुलकर्णी यांना पकडण्यात यशस्वी झाले. ही अटक मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमपाशी झाली. त्यानंतर पुढे इतरांना पकडण्यात आले. दत्ता जोशी यांचे एस्एस्सीचे वर्ष असल्याने तो नाना आगाशे यांच्या नागनाथ पाराजवळील गणिताच्या क्लासला गेला होता. घरी नाही म्हटल्यावर पोलिसांनी या क्लासवर धाड टाकली. दत्ता हा आगाशे यांचा आवडता विद्यार्थी होता. सायकल चोरली आहे, असे खोटे कारण सांगून पोलिसांनी दत्ताला क्लासच्या बाहेर नेले. पुढे लष्कर भागातील लॉकअपमध्ये असताना त्याला कळले की त्याच्या घरातील तीन माणसे गेल्या सहा महिन्यांमध्ये मरण पावली आहेत. हा धक्का त्याला मोठा होता!

दत्ता जोशी याच्यासह कॅपिटल बॉम्बस्फोटातील आरोपींना येरवडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले कारण पुण्यात प्लेगची साथ आली. यानंतरच हा खटला एम्. एस्. पाटील या न्यायाधीशांसमोर सुरू झाला. दत्ताने पोलिसांसमोर त्यांनी केलेल्या अत्याचाराची कृत्ये सांगितली. लोकक्षोभाचा एक परिणाम म्हणजे तपास अधिकारी रोच यांच्यावर ते साक्षीला जात असताना चिंगोपंत दिवेकर या माणसाने चाकूने हल्ला केला. 29 फेब्रुवारी रोजी कॅपिटल बॉम्ब स्फोट केस निकालात ठेवण्यात आली. शेवटी कोर्टाच्या निकालात सर्व आरोपींना मुक्त करण्यात आले, पण पोलिसांनी केलेल्या छळाचा उल्लेख निकालपत्रात नव्हता. कोर्टातून बाहेर पडताक्षणी या सार्‍यांना भारत संरक्षण कायद्याखाली पुन्हा अटक करून येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. तेथेही एकांतवासानंतर पुन्हा इतर कैद्यांमध्ये त्यांना ठेवण्यात आले. यात काही आनंदाचे दिवस गेल्यावर दत्ता जोशीची प्रकृती बिघडली. ताप आला तरी तो उतरेना मग जेलच्या दवाखान्यात हलवल्यावर त्याला मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले. प्रत्यक्षात तो विषमज्वर निघाला. अखेर ससून हॉस्पिटलमध्ये त्याला हलवले तेव्हा खूपच उशीर झाला व त्यातच त्याचा अंत झाला. अनेक अटी घालून त्याच्या मृतदेहावर ओंकारेश्‍वराच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारास नाना क्लासचे नाना आगाशे आले होते.

कॅपिटल ते व्हिक्टरी थिएटरचा प्रवास :

ब्रिटिश पद्धतीने बांधलेले मूळ कॅपिटल थिएटर हे1936 मधले असावे असा इतिहास सांगतो. 1931 मध्ये बोलपट सुरू झाले आणि या थिएटरमध्ये आधी ब्रिटिश सैनिकांसाठी नाटके व मग इंग्रजी सिनेमे दाखवले जात असत. प्रशस्त व्हरांडे. उंच छत, त्यास ब्रह्मदेशातील टिकाऊ लाकडाचा दिलेला सपोर्ट, सुंदर कमानींचे प्रवेश अशी ही वास्तू अनेक वर्षे दुर्लक्षित होती. याचे कारण तिथे एक भाडेकरू घुसला होता व त्याच्याबरोबर कोर्ट कचेर्‍या करण्यात या वास्तूचे नवीन मालक दारा बैरामजी सुखिया आणि त्यांच्या सुविद्य पत्नी दीना दारा सुखिया यांची पंचवीस वर्षे गेली! 17 मार्च 1987 रोजी सुखिया दांपत्याच्या बाजूने निकाल लागला. या विजयाच्या आनंदात कॅपिटलचे नाव व्हिक्टरी थिएटर ठेवण्यात आले! सुखिया दांपत्याने ही मूळ वास्तू 1959 मध्ये आयकर विभागाच्या एका लिलावात विकत घेतली होती.

दारा सुखियांचे 1960 मध्ये निधन झाले तर दीना सुखिया 2003 मध्ये निवर्तल्या. दीना सुखिया अनेक सामाजिक कार्यांसाठी प्रसिद्ध होत्या. ही वास्तू नंतर त्यांच्या कर्करोगतज्ज्ञ कन्या डॉ. रोशन फरोख चिनॉय व त्यांचे पती फरोख चिनॉय यांनी चालवायला घेतली.

447 आसरी असणार्‍या या चित्रपटगृहाचा कायापालट झाला. संपूर्ण थिएटरमध्ये चांगली ध्वनिव्यवस्था, मल्टिप्लेक्स सिनेमा 2001 मध्ये आल्यानंतर सर्वच एकपडदा सिनेमागृहांवर संकट कोसळले. ई-स्क्वेअर गटाने काही वर्षे व्हिक्टरी चालवायला घेतले व करार संपून पुन्हा ते चिनॉय यांच्याकडे आले आहे. साधेपणाबरोबर वास्तूचे मूळ सौंदर्य जपत त्यांनी आजही या वास्तूची टापटीप व स्वच्छता वाखाणण्याजोगी ठेवली आहे. ‘हम आपके है कौन’ या सिनेमाने या ठिकाणी 42 आठवडे व्यवसाय केला. आजही या थिएटरलला एखाद्या राजवाड्यासारखा रुबाब आहे! फरोख चिनॉय यांच्याबरोबर हे थिएटर चांगले ठेवण्यात तेथील व्यवस्थापक जहीर शेख, राजकिरण यादव आणि अंबादास जलागी यांचेही श्रेय मोठे आहे. कॅपिटल बॉम्ब स्फोटासारख्या प्रेरक घटनेने तर आता या वास्तूला चार चाँद लागले आहेत!

लेखक : श्री. विवेक सबनीस
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *