गोल्डन ग्लोब सोहळा २०१८

हॉलीवुड दुनियेतील एक मानांकित पुरस्कार सोहळ्यांपैकी एक गोल्डन ग्लोब पुरस्कार. यंदाचा 75 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा बेवर्लि हिल्स, कॅलिफोर्निया या ठिकाणी पार पडला आणि विशेष गाजलाही! नेहमीप्रमाणे हॉलीवूड स्टार्सनी आवर्जून उपस्थिती लावली. इतर पुरस्कारांप्रमाणे या मानाच्या पुरस्कारासाठी पात्र ठरणे, हे हॉलीवूड कलाकारांचे स्वप्नच असते. छोट्या पडद्यावरचे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक नॉर्मन लियर आणि  ‘वेस्ट साइड स्टोरी’ ची अभिनेत्री रिटा मोरेंनो यांनी लाल स्कूटीवरून सोहळ्यात दमदार एण्ट्री घेतली. या विशेष एण्ट्रीची चर्चाही तितकीच झाली.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काळ्या रंगाचा ड्रेसकोड. बहुतांश कलाकारांनी काळा पोशाख परिधान करून लैंगिक शोषणाविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाला पाठिंबा दर्शवला हॉलीवुडमधील सत्तर महिलांनी हार्वी वेनस्टेन या निर्मात्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला होता.

त्याविरोधात वातावरण तापले होते. त्याच्या निषेधार्थ हार्वेच्या मार्चेसा ब्रँडवर हॉलीवुड स्टार्सनी बहिष्कार टाकला.

7 जानेवारी 2018 ही रविवारची रात्र म्हणजे हॉलीवुड प्रेमींसाठी उत्कट भावनापूर्ण भाषणे, विचित्र- अस्वाभाविक विजय (वियर्ड विन्स), आणि बदलत्या हॉलीवुड संस्कृतीची समालोचने(कॉमेण्ट्री) असा कार्यक्रम होता. हटक्या एण्ट्री नंतर खरी रंगत आली ती सेत मेयर्सच्या लांबलचक स्वगतामुळे! त्याच्या या स्वगताचा मुख्य मुद्दा होता हॉलीवुड संस्कृतीचे बदलते स्वरूप आणि लैंगिक शोषणाविरुद्धची हाक.

कार्यक्रमाचा मुख्य सूत्रधार या नात्याने त्याने हे विषय विनोदपूर्ण शैलीमध्ये मांडले. यामध्ये वेनस्टेनपासून वूडी अ‍ॅलेनपर्यंत सर्वांचा उल्लेख केला गेला. त्यानंतर या सोहळ्यातील विशेष उल्लेखनीय पुरस्कार म्हणजे सेसील बी डेमील जीवन गौरव पुरस्कार आणि या पुरस्कराची मानकरी ठरली टॉक शोची राणी आणि व्यवसायातील सामर्थ्यशाली स्त्री ओप्रा विन्फ्रे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर तिने दिलेले भाषण तितकेच दमदार होते. त्या भाषणावरून तिला अमेरिकेची अध्यक्षा बनवा अशीही खिल्ली उडवली गेली. तिच्या प्रेरणादायी भाषणामध्ये क्षितिजावरती नव्या दिवसांची सुरुवात दिसत आहे आणि ह्या दिवसांची पहाट होण्यास आता या सोहळ्यासाठी उपस्थित असणार्‍या सामर्थ्यशाली महिला आणि जे कलाकार म्हणून झटत आहेत त्यांचे प्रयत्न कारणीभूत असतील. वेनस्टेन प्रकरणावरून लिंगसमानतेसाठी महिलांनी टाइम्स अप आणि मी टू अगेन यासारख्या चळवळी सुरू केल्या. ओप्राच्या मते पुन्हा अशा चळवळी करण्याची गरज भासणार नाही, अशी आशा आहे. ओप्राच्या या सर्वविषयव्याप्ती भाषणात तिला दोन वेळा उभे राहून मानवंदना मिळाली.

ओप्राची या सोहळ्यातील बैठकीची जागाही विशेष होती. स्टेजसमोर मध्यभागी तिला मानाचे स्थान होते. त्यामुळे स्टेजवर भाषण देणार्‍यामध्ये प्रत्येकाच्या दृष्टीसमोर ती होती आणि बहुतांशी भाषणांमध्ये तिचा उल्लेख येत होता.

निकोल किडमन हिनेही कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठवला. तिला एच बीओवरील  ‘बिग लिटल लाइज’ या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तिचे या मालिकेतील पत्र जे वकीलपेशावरून गृहिणीकडे वळते, हे ही एक प्रकारचे चुकीचे किंवा अपमानास्पद संबंध आहेत. माझी या मालिकेतील भूमिका या सोहळ्याच्या मुख्य विषयाशी संबंधित आहे. हे पात्रही अशाच अपमानाचा बळी आहे.

मी अशी आशा करते की, अशा कथानकांमधून समाजामध्ये जागृती होईल आणि ही चर्चा जिवंत राहील, तसेच पुढे बदलास कारणीभूत ठरेल, असे तिने भाषणात सांगितले.

केइली क्लर्कसन आणि केथ अर्बन हे संगीत कलाकार स्टेजवर गाणे सादर करण्यासाठी खूपच उत्सुक होते आणि त्यांच्या त्या मूळ गाण्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला. जेम्स फ्रँको याला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा पुरस्कार मिळाला.

त्यावेळी त्याने टॉमी विझोचे जे पात्र चित्रपटात सादर केले होते. त्या चित्रपट निर्माता टॉमीला स्टेजवर बोलावले आणि जेव्हा टॉमीने बोलण्यास सुरुवात केली. त्यावेळी फ्रँकोने त्याला बाजूला सारून स्वतःच बोलत बसला. टॉमी हा एक विचित्र व्यक्तिमत्त्वाचा म्हणून ओळखला जातो आणि फ्रँकोनेही तसेच पात्र स्टेजवर प्रस्तुत केले.

स्टर्लिंग ब्राऊनला टीव्ही क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यावेळी त्याने दिलेल्या भाषणातून तो एक प्रेरणादायी वक्ता असल्याचे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. गेल्या वर्षीच्या सोहळ्यातही त्याने दीर्घ पण उत्तम भाषण दिले होते. त्याला नेहमीच कृष्णवर्णीय म्हणूनच रोल मिळाले पण त्यामागची त्याची भूमिका त्याने भाषणात स्पष्ट केली.

‘‘मी टू’ आणि ‘टाइम्स अप’  सारख्या चळवळींच्या उल्लेखाबरोबरच हॉलीवुडमधील पगाराबाबतची स्त्रीपुरुष असमानता हा विषयही विनोदीरीत्या चर्चिला गेला. जेसिका केस्टेन हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा

(इन मोशन पिक्चर) पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी या विषयाला विनोदी छटेने रंगवले. हा पुरस्कार फ्रांसिस मॅकदोरमंड हिला मिळाला. त्यावेळी तिने भाषण करताना वापरलेले अपशब्द बीप करावे लागले याबाबत सेन्सॉरने नाराजी व्यक्त केली.

उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारासाठी सर्व नामांकने पुरुष दिग्दर्शकांची होती आणि मिळालेला पुरस्कार हा अनपेक्षित होता. गुलीरमो डेल टोरो यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. लिमिटेड सिरिज आणि मोशन पिक्चर टेलिव्हिजनसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निकोल किडमनला सन्मानित करण्यात आले. अशा विविध चर्चा आणि विषयांच्या हाताळणीमुळे हा सोहळा रंगतदार ठरला.

इतर काही महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी

सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स सांगीतिक किंवा विनोदी

अभिनेता – गॅरी ओल्डमन (डार्केस्ट अवर)

अभिनेत्री – साओर्स रोनन (लेडी बर्ड)

सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स इन मोशन पिक्चर

अभिनेता – जेम्स फ्रँको (डिझास्टर आर्टिस्ट)

सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर-अ‍ॅनिमेटेड-कोको

लेखक : हिमानी कोत्रे
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *