रहे ना रहे हम…

वर्षभरात आपल्या देशाला वेगवेगळ्या क्षेत्रांध्ये खेळाडू व कलाकारामुळे बरेच मानसन्मान प्राप्त होतच असतात. अशा वेळेस ज्यांनी अनेक वर्षे आपल्या कलेची पूजा केली आणि रसिकांच्या मनावर राज्य केले अशा या जगाचा निरोप घेतलेल्या दिवंगत कलाकारांच्या आठवणीला आपण उजाळा देणार आहोत.

वक़्त रहता नहीं कहीं टिककर

इसकी आदत भी आदमी सी हैं

गुलजार साहेबांच्या या ओळी वर्ष सरताना किती मार्मिक वाटू लागतात. येणारा प्रत्येक दिवस जातच असतो, पण त्याची प्रकर्षाने जाणीव वर्षाच्या अखेरीस होते. बघता बघता वर्ष सरून जाते आणि वर्षभराच्या आठवणी मनात कल्लोळ निर्माण करतात. वर्षभरात काय कमावले आणि काय गमावले याचे हिशोब जमवले जातात. आनंदाचे क्षण आठवले जातात पण या सर्वांबरोबर आपल्याला भरभरून आनंद देऊन अचानक सोडून गेलेल्या मंडळींची आठवणही तितकीच महत्त्वाची.

तारक मेहता

ज्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत त्या मालिकेचे सर्वेसर्वा असणारे प्रसिद्ध लेखक आणि विनोदी नाटककार तारक मेहता यांनी जगाचा निरोप घेतला. गुजराती रंगभूमीच्या विकासात त्यांचे  मोलाचे योगदान आहे.  ‘‘नवूं आकाश नवी धरती’’ आणि ‘‘कोथळामांथी खिलाडी’’ ही त्यांची गाजलेली गुजराती पुस्तके आहेत. ‘ ‘दुनियाने उंधा चष्मा’’ या त्यांच्या सदर च्या अनोख्या लेखनशैलीमुळे त्यांनी रसिकांची मने जिंकली होती. ‘दुनियाने उंधा चष्मा’ या गुजराती नावाचाच

हिंदीमध्ये अनुवाद ‘‘तारक मेहता का उल्टा चष्मा’’ असा करण्यात आला. 2015  मध्ये त्यांना पद्मश्री या अवॉर्डने सन्मानित केले होते. 1 मार्च रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. विनोदी लेखनशैलीने लाखो रसिकांच्या चेहर्‍यावर आनंद फुलवणार्‍या तारक मेहतांच्या जाण्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

विनोद खन्ना

1968 साली ‘‘मन का मीत’’ या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेतून विनोद खन्ना यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. बर्‍याच चित्रपटांमध्ये खलनायक आणि सहाय्यक अभिनेता म्हणून काम केल्यावर 1971 साली ‘‘हम तुम और वो’’ मध्ये त्यांनी प्रमुख अभिनेत्याचे काम केले. ‘ ‘मेरे अपने’’, ‘कुर्बानी’’, ‘पूरब और पश्‍चिम’’,  ‘रेशमा और शेरा’’,  ‘हाथ की सफाई’’,  ‘हेरा फेरी’’, ‘मुकद्दर का सिकंदर’’, ‘ अमर, अकबर, अँथनी’’ अशा अनेक चित्रपटांमधील बहुरंगी-बहुढंगी भूमिकांना त्यांनी न्याय दिला आहे. भारतीय अभिनेता आणि निर्माता म्हणून प्रसिद्ध असणार्‍या विनोद खन्नांना दोन फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डस् मिळालेली आहेत. 1999 मध्ये त्यांना फिल्मफेअरचे लाइफटाइम अचीव्हमेंट अवार्ड मिळालेले आहे. ते भारतीय राजकारणातही सक्रिय होते.  बरेच वर्ष त्यांनी कॅन्सरशी झुंज दिली. अखेरीस त्यांनी 27 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला.

रीमा लागू

आपल्या आईकडून (मंदाकिनी भडभडे) अभिनयाचा वारसा मिळालेल्या रीमा लागू यांनी लहानपणापासूनच अभिनयाचे धडे गिरवले होते. अभिनयाचे बाळकडूच त्यांना मिळाले होते जणू. घर तिघांचं हवं, चल आटप लवकर, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण, पुरुष, बुलंद, सविता दामोदर परांजपे, विठो रखुाय, सासू माझी ढासू यासारख्या दर्जेदार नाटकांधून त्यांनी काम केले होते. ‘‘पुरुष’’ या नाटकातील त्यांची भूमिका तर प्रचंड गाजली होती. दूरदर्शनवरील खानदान, श्रीमान श्रीमती, तू तू मैं मैं, दो और दो पांच या मालिकां-मधून त्यांचा अभिनय बहरत गेला.

मराठी रंगभूीवरील समर्थ नायिका आणि बॉलिवूडमधील अनेक नायकांची ‘‘आई’’, अशा बहुरंगी-बहुढंगी भूमिका त्यांनी साकारल्या. मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, कुछ कुछ होता है, कयामत से कयामत तक, कल हो ना हो, वास्तव यातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. आपल्या अभिनयाने सिने-नाट्यसृष्टीवर ठसा उमटवणार्‍या रीमा लागू यांच्या जाण्याने संपूर्ण भारत हळहळला होता.

मधुकर तोरडमल

प्रा. मधुकर तोरडमलांच्या ‘‘तरुण तुर्क, म्हातारे अर्क’’ या नाटकाने एक काळ गाजवला आहे. तब्बल 5000 प्रयोगांची मजल गाठलेल्या या नाटकासाठी ते बरेच चर्चेत होते. प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून त्यांचा परिचय होता. ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. ‘ज्योतिबाचा नवस’’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘‘सिंहासन’’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’’, ‘आपली माणसं’’,  ‘आत्मविश्‍वास’’, ‘शाब्बास सूनबाई’’ अशा काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.  2 जुलैला ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांनी जगाचा निरोप घेतला.

सुमिता संन्याल

बंगाली आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने छाप पडणार्‍या सुमिता संन्याल यांनी बंगाली भाषेत 40 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. सगीना महाते(1970) या हिंदी चित्रपटात त्यांनी दिलीप कुमारांसोबत काम केले आहे. बंगालीसोबतच त्यांनी बर्‍याच बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमधूनही काम केलं आहे. हिंदीमध्ये त्यांनी आशीर्वाद (1968), आनंद (1971), गुड्डी (1971), मेरे अपने (1971) आणि द पीकॉक स्प्रिंग (1996) या  चित्रपटांमध्ये विशेष कामगिरी केली आहे. हिंदी चित्रपट आणि नाटकांसोबतच मालिकांमध्येही त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

उमा भेंडे

1960 मध्ये आकाशगंगा या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेक्षेत्रात पदार्पण केले. उमा भेंडे यांनी मराठीशिवाय छत्तीसगडी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतही भूमिका केल्या आहेत.  ‘आकाशगंगा’’, ‘आम्ही जातो आमुच्या गावा’’, ‘भालू’ आणि ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची दाद मिळाली होती.  ‘हवास तू’’,  ‘गुडिया हमसे रुठी रहोगी’,  या दोन गाण्यांमुळे त्या अजूनही प्रेक्षकांच्या मनामध्ये जिवंत आहेत. त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी त्यांच्यामुळे अशीच अजरामर राहतील.

इंदर कुमार

इंदर कुमार यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात 1996 मध्ये ‘मासूम’ या चित्रपटाने झाली आणि 2017 मधील ‘‘हू इज द फर्स्ट वाइफ ऑफ माय फादर’’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यांनी 20 पेक्षा जास्त बॉलिवूड चित्रपटात काम केले होते. ‘‘तिरछी टोपीवाले’’,  ‘कही प्यार ना हो जाये’’, ‘पेइंग गेस्ट’’, ‘तुमको ना भूल पायेंगे’’,  ‘ये दूरियां’’, ‘खिलाडियों का खिलाडी’’ या चित्रपटातील त्यांच्या  भूमिकाही विशेष गाजल्या होत्या.  ‘‘वॉन्टेड’’ मधील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.  ‘‘क्योंकी सास भी कभी बहू थी’’ या मालिकेत त्यानी साकारलेली ‘मिहिर विरानी’ ही भूमिका बरीच गाजली होती. वयाच्या अवघ्या 44 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

सीताराम पांचाल

बॉलिवूड अभिनेता सीताराम पांचाल यांनी 1994 मध्ये बैंडिट क्वीन या चित्रपटात काम करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘‘द लिजंड ऑफ भगत सिंग’’ मध्ये त्यांनी लाला लजपतराय यांची भूमिका साकारली होती.  ‘‘पानसिंग तोमर’’, ‘पीपली लाइव्ह’’, ‘ जॉली एल्एल्बी 2’’, ‘स्लमडॉग मिलिनेयर’’ सारख्या चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारून आपली एक वेगळीच अशी एक ओळख बॉलिवूड सिनेजगतात त्यांनी निर्माण केली होती. गेल्या तीन वर्षांपासून ते मूत्रपिंड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्रस्त होते. गेल्या महिन्यात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून मदतीसाठी आवाहन केले होते. या बिकट परिस्थितीमध्ये सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (सीआईएन्टीएए- सिंटा) त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले होते. हरियाणा राज्य सरकारनेही त्यांना आर्थिक मदत केली होती. बॉलिवूड अभिनेता सीताराम पांचाल यांच्या निधनाने अनेकांच्या हृदयाला चटका लावला.

टॉम ऑल्टर

अभिनेता, लेखक आणि पद्मश्री अ‍ॅवॉर्ड विजेते टॉम आल्टर यांचे त्वचेच्या कर्करोगामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. नासीरुद्दीन शाह, बेंजामिन गिलानी आणि शबाना आझमी यांच्यासोबत रोशन तनेजा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 1972-74 या दरम्यान अभिनयाचे धडे गिरवले. एफ् टी आय् आय् मधून आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना पहिली संधी चेतन आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘साहेब बहाद्दूर’’ या चित्रपटातून मिळाली. चरस, रामभरोसे, हम किसीसे कम नहीं, परवरिश, शतरंज के खिलाडी, क्रांती, कुदरत, नौकरी या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

आल्टर यांचे हिंदी व उर्दू भाषेवर विशेष प्रभुत्व होते. त्यांना भारतीय संस्कृतीचे विशेष ज्ञान होते. त्यांना उर्दू वाचता येत होते आणि त्यांना शायरीची विशेष आवड होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक ठिकाणी प्रदर्शित झालेल्या ‘‘ओशन ऑफ अ‍ॅन ओल्ड मॅन’’ या आर्ट फिल्ममधील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांची विशेष स्तुती केली जाते. 1977 मध्ये त्यांनी ‘मोटलेय प्रॉडक्शन्स’ ही नाट्यसंस्था स्थापन केली. या संस्थेने निर्माण केलेल्या नाटकांपैकी सॅम्युअल बकेट यांच्या ‘वेटिंग फॉर गोदो’चे प्रयोग बरेच गाजले. टॉम ऑल्टर यांनी दिल्लीच्या Pierrot’s Troupe या नाट्य संस्थेसोबतही काम केले. ‘गालिब इन दिल्ली’ मध्ये उर्दूतील प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांची भूमिका आल्टर यांनी अतिशय सुंदर साकारली. स्पोर्टस् वीक, क्रिकेट टॉक, संडे ऑब्झर्व्हर, आऊटलुक आणि डेबोनेर यांमध्ये त्यांचे क्रिकेटविषयीचे लेख छापून येत असत. सचिन तेंडुलकरची टीव्हीवरील पहिली मुलाखत त्यांनीच घेतली होती. चाळीस वर्षे सिनेक्षेत्रात काम करून 500 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

राम मुखर्जी

हिंदी तसेच बंगाली सिनेक्षेत्रातील ख्यातनाम डायरेक्टर, प्रोड्यूसर व पटकथा लेखकांपैकी एक असलेले राम मुखर्जी यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. ते मुंबई येथील हिमालय स्टुडिओचे फाऊंडर मेंबर होते. प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी ही त्यांची कन्या आहे. हम हिंदुस्थानी (1960), लीडर(1964) सारख्या चित्रपटांचे त्यांनी निर्देशन केले होते. त्यांची लेक राणी मुखर्जी हिची डेब्यू फिल्म ‘‘बियेर फूल’’ चे ते डायरेक्टर होते. ‘‘राजा की आयेगी’ बारात’ या डेब्यू फिल्मचे दिग्दर्शन ही त्यांनीच केले आहे.

गिरिजा देवी

गिरिजा देवी या सेनिया आणि बनारस घराण्यातील प्रसिद्ध गायिका होत. भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धनात, तसेच ठुमरी या गायनप्रकाराच्या प्रचार आणि संवर्धनामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. गिरिजा देवी यांना 1972 मध्ये पद्मश्री किताब, 1989 मध्ये भारत सरकारद्वारे कला क्षेत्रातील पद्म भूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले गेले. त्यांच्या कार्यामुळे आणि त्यांच्या गायकीमुळे त्यांना ‘ठुमरीची राणी’ म्हणून ओळखले जात असे. सुप्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांनी 23 ऑक्टोबर रोजी जगाचा निरोप घेतला.

शशी कपूर

2011 साली पद्म भूषण आणि 2015 साली दादासाहेब फाळके पुरस्कार यांनी गौरवण्यात आलेले शशी कपूर त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि बॉलिवूड जगतातील त्यांच्या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. 1960 च्या दशकात त्यांनी बॉलिवूड चित्रपटांतून काम करण्यास सुरुवात केली. हाउसहोल्डर और शेक्सपियर वाला सारख्या इंग्रजी चित्रपटात प्रमुख भूमिका करणारे हिंदी सिनेक्षेत्रातील ते पहिलेच अभिनेते होते. धर्मपुत्र, चार दीवारी और प्रेमपत्र, जब जब फूल खिले, वक्त, ए मॅटर ऑफ इनोसन्स, प्रीती परली 67, हसीना मान जायेगी, प्यार का मौसम, चोर मचाये शोर, दीवार, कभी-कभी, दूसरा आदमी आणि सत्यम शिवम सुंदरम अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या अनेक  चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयसामर्थ्याने त्यांनी भूमिकांमध्ये जीव ओतला. 1977 मध्ये त्यांनी आपली होम प्रॉडक्शन कंपनी ‘‘फिल्मवालाज’’ लाँच केली. त्यांनी आतापर्यंत 116 चित्रपटांमध्ये काम केले असून त्यातील  61 चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. असा हा दिग्गज अभिनेता  4 डिसेंबर रोजी प्रदीर्घ आजारामुळे कालवश झाला.

 

लेखिका – ऐश्वर्या पाटील 

संपर्क – swatantranagrik@gmail.com  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *