मराठी भाषा आणि भाषेसंबंधीचे आजचे प्रश्न

भूतकाळात भारतावर अनेक आक्रमणे झाली. यातून मूळ भारतीय तसेच हिंदू संस्कृतीवर आणि पर्यायाने भाषेवर त्याचे परिणाम दिसू लागले. इतर भारतीय भाषांबरोबरच मराठी भाषेचा उगमही खूप जुना आहे. आजचा प्रश्न आहे तो मराठी भाषा ही आपली मातृभाषा असूनही तिचा आज वापर जास्तीत जास्त कसा करता येईल हा. किंवा तिच्या भवितव्याविषयी व्यक्त केली जाणारी काळजी पाहाता त्यावर मार्ग काढून तिचे आजचे स्वरूप उद्या कसे तयार करता येईल? मराठी भाषेसंबंधीचे अनेक प्रश्न यानिमित्ताने आज पुढे येताना दिसतात.

इंग्रजी कालखंडात अनेक स्थानिक भाषा मारल्या गेल्या आहेत, अशी भाषातज्ज्ञांची ओरड एकीकडे चालू असताना दुसरीकडे आपली ज्ञानभाषा मराठीऐवजी इंग्रजी होत आहे. इंग्रजांच्या वसाहतवादी कालखंडात भारतात मराठीसह सर्वच स्थानिक भाषांवर इंग्रजीचे भलेबुरे परिणाम होत गेले आहेत. इंग्रजीमुळे मराठी भाषा मरत आहे, मराठी शाळा बंद पडत आहेत ही भीती जरी अनेक तज्ज्ञ व्यक्त करत असले तरीही मराठीचा वापर दैनंदिन जीवनात चालू आहेच. तो कुठेही थांबलेला नाही. गेल्या शतकात मराठीप्रमाणे संस्कृतचेही भवितव्य काय असा प्रश्न विचारला जात असे. पण संस्कृतचा व मराठीचा अभ्यासही अनेक ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन आणि अन्य युरोपीय भाषातज्ज्ञांनी केला व त्याचे मोल जाणले. आपल्याकडे त्यामुळे आजही संस्कृतमधील साहित्यावर बऱ्यापैकी अभ्यास केला जातो. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरासारख्या अनेक संस्थांमध्ये आज संस्कृततज्ज्ञ अनेक देशी व परदेशी तरुण संशोधकांना मार्गदर्शन करताना दिसतात. मराठीबाबतही तसेच आहे. युरोपातील अनेक जिज्ञासू संशोधकांनी मराठीतले साहित्य अभ्यासण्यासाठी मराठी भाषा शिकून घेतली व त्या भाषेत बोलायलाही सुरुवात केली. अर्थात ही अत्यंत बोटावर मोजता येतील तसेच अपवादात्मक असणारी दुर्मिळ उदाहरणे आहेत.

असे असले तरी आपल्या मनातील मराठी भाषेच्या भवितव्यासंबंधी असणारे प्रश्नचिन्ह व भीती कुठेही कमी झालेली दिसत नाही. एकीकडे मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत तर दुसरीकडे इंग्रजीमुळेच आपल्या मुलांचे भवितव्य प्रकाशमान होईल असा मानसिक गंड पालकांमध्ये वाढत चाललेला दिसतो. आपल्याकडे त्यामुळेच गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात पहिलीपासून इंग्रजीचा आग्रह धरला गेला. तेव्हा या गोष्टीस अनेक भाषातज्ज्ञांनी विरोधही दर्शवला होता. इंग्रजी बोलता येणे म्हणजे सर्व काही असा पोकळ समज आहे हेच यातून सिद्ध झाले. मराठी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम आणि इंग्रजी माध्यम अशा तीन प्रकारच्या शाळांमधून आपोआप शिक्षणाच्या दर्जासंबंधी अधिक संभ्रम निर्माण झाला. आपलं मूल मराठी माध्यमात शिकलं तर ते मागे राहील ही भीती आणखीन वाढतच गेली.

आज अनेक जुन्या व दर्जेदार शिक्षण देणाऱ्या मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही ही परिस्थिती जरी मराठी समाजाने निर्माण केली असली तरी आज ती आपण एक वास्तव म्हणून स्वीकारली पाहिजे. आहे या परिस्थितीत मराठीचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. इंग्रजी कालखंडापासून मराठी भाषेचे जे नुकसान झालेले आहे, ते आज भरून निघणार नाही, हे कटू वास्तव आपण पचवले पाहिजे. नव्या उमेदीने आपण पुन्हा एकदा कामाला लागले पाहिजे. त्याचा एक भाग म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून एकीकडे मराठीतले भाषाप्रेमी एकत्र आले आहेत. अर्थात मराठी भाषेला केवळ अभिजात भाषेचा दर्जा मिळून हे प्रश्न सुटणार नाहीत. त्यापलिकडे जाऊन आपल्याला आपले भाषिक धोरण हे बदलत्या परिस्थितीकडे पाहून पुन्हा नव्याने ठरवावे लागेल. तसेच केवळ धोरण ठरवल्याने जादूची कांडी फिरेल असेही नाही. वैयक्तिक पातळीवर मराठी भाषेसंबंधी काय करता येईल याचाही आता पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे.

मराठीच्या प्रश्नावरील नवीन पुस्तक :

‘ ‘भाषेतून भाषेकडे…’

’या विचारमंथनाला पूरक असे एक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. ‘भाषेतून भाषेकडे.. आणि भाषांतराकडे’  या नावाचे एक पुस्तक नुकतेच पाहण्यात आले. त्या निमित्ताने झालेल्या चर्चेमुळे पुन्हा एकदा या विषयाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. प्रा. प्र. ना. परांजपे यांनी हे पुस्तक मोठ्या परिश्रमपूर्वक लिहिले असून प्रफुल्लता प्रकाशनाचे श्रीपाद सपकाळ यांनीही मोठ्या जबाबदारीने ते प्रकाशित केले. या निमित्ताने आजच्या भाषिक प्रश्नांकडे पुन्हा एकदा नव्या दृष्टीने पाहाण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली. या पुस्तकाची ओळख करून देणे हाच यामागचा हेतू आहे.

प्रा. प्र. ना. परांजपे यांनी गेल्या पन्नास वर्षांमध्ये लिहिलेल्या भाषाविषयक आणि भाषांतरविषयक लेखांचा संग्रह म्हणजे भाषेतून भाषेकडे..आणि भाषांतराकडे हे पुस्तक. इचलकरंजी येथील आपटे प्राथमिक शाळेत असताना साने गुरुजी, फडके, खांडेकर, माडखोलकर, र. वा. दिघे, नाथमाधव, वि. वा. हडप, ह. ना. आपटे, ना. ह. आपटे यांच्या कादंबऱ्या परांजपे यांनी वाचून काढल्या. वि. श्री. जोशी यांच्या वासुदेव बळवंत या पुस्तकाने व त्यातील भाषेने ते प्रभावित झाले. पुढे इतर मराठी अभिजात साहित्याची ओळख होत असताना बाबूराव अर्नाळकर यांच्या रहस्यकथा यांनी त्यांना वेड लावले. प्रा. परांजपे व त्यानंतरच्या वाचनप्रिय पिढ्या काहीशा याच मार्गाने गेल्या आहेत!

थोडे मोठे झाल्यावर रा. श्री. जोग, वा. ना. देशपांडे आणि नंतर गो. नी. दांडेकर यांची आवडलेली वाक्ये व वचने लिहून ठेवणेही प्रा. परांजपे यांच्या आवडीचा भाग होता. पुढे मराठीऐवजी इंग्रजीत एम्. ए. व त्यानंतर क्रमाक्रमाने भाषाविज्ञानाचे अभ्यासक म्हणून त्यांनी केलेला अभ्यास यातून या पुस्तकाचा जन्म झाला. विद्यापीठीय अभ्यास व अध्यापन यासाठी आपण इंग्लिश भाषा व वाङ्मय याची निवड केली असली तरी त्याची तुलना मनात मराठीशी होत असे. इंग्लिशच्या अभ्यासातून मिळालेल्या मर्मदृष्टीचे उपयोजन आपण मराठीत केले असल्याचे प्रा. परांजपे यांनी आपल्या भूमिकेतून स्पष्ट केले आहे. भाषेतून भाषेकडे.. भाषांतराकडे या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभातही आपली भूमिका मांडताना प्रा. परांजपे म्हणाले होते की, भाषेचा दुरभिमान असता कामा नये. तसेच भाषेत बरोबर किंवा चूक असे काही नसते. भाषेच्या वापरातून लोक त्यातले स्वीकारतात तेच रूढ होत जाते. याशिवाय भाषा स्थिर किंवा साचेबद्धही नसते. त्यामुळे भाषेला शुद्ध किंवा अशुद्ध म्हणण्यापेक्षा प्रमाण भाषेचा आग्रह धरायला हवा.

यानिमित्ताने देशाच्या भाषिक धोरणाबद्दलही पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बरीच चर्चाही झाली. या समारंभाचे अध्यक्ष व ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. प्रमोद तेलगिरी म्हणाले की, राष्ट्र- राज्य संकल्पनेचा आभाव आणि बहुभाषकता यामुळे भारतातील सर्वच भाषांचे नुकसान झाले आहे. याउलट युरोपात एकभाषक संस्कृती आहे. एक भाषा, एक धर्म आणि एक वंश यांच्या आधारे युरोपीय देशांची जडणघडण झाली. अर्थात त्याचेही काही तोटे त्यांना सहन करावे लागले. त्या अर्थाने भारत हे नेशन स्टेट किंवा राष्ट्र-राज्य नसल्यामुळे आपल्या मुलांनी इंग्रजीतूनच शिक्षण घ्यायला हवे, याबद्दलची मानसिकता देशातल्या सर्वच भाषांमध्ये वाढीस लागली. इंग्रजीचे प्राबल्य पाहाता देशातील अगदी बंगाली, तमिळ व मल्याळम् यांच्यासारख्या प्रगत भाषांमध्येही ज्ञानभाषेत पीएच्.डी.चे प्रबंध सादर होऊ शकले नाहीत. हेच आपल्या देशाचे वास्तव आहे. बहुभाषकतेमुळे एकप्रकारे आपल्या सर्वच भाषांचे नुकसान झाले आहे. आपल्याकडे सर्वच भाषांचा म्हणावा तसा विकास होऊ शकला नाही. डॉ. तेलगिरी पुढे म्हणाले की, आपल्याकडे इंग्रजीच्या प्रभुत्वाच्या काळात लोकहितवादी किंवा लोकमान्य टिळकांनी मराठीतून व्यापक लिखाण केले. त्यातून त्यांनी स्वभाषिकतेचे महत्त्वच पटवून देण्याचा प्रयत्न केला. असे असतानाही स्वातंत्र्यानंतर आज भारताची ओळख ही तीन गोष्टींवर ठरते आहे ती म्हणजे या देशातील माहिती तंत्रज्ञान किंवा आय्टी, गणित आणि इंग्रजी. बहुभाषिक असूनही आपल्या देशात इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याअर्थाने आज एकविसाव्या शतकात इंग्रजी ही आपली एक अ‍ॅसेट बनली आहे. एकभाषिक असणाऱ्या अन्यदेशांना हा लाभ आज म्हणावा तितका घेता आलेला नाही. आपल्याकडील बहुभाषिक मर्यादेची भरपाईही आपण करू शकतो. यासाठी मराठीतले चांगले साहित्य इंग्रजीत भाषांतरित करणे शक्य आहे. त्यातून मराठीचा विकास व्हायलाही आपोआप चालना मिळेल. यासाठी केवळ मराठी अस्मिता म्हणून न बोलत बसता नव्याने भाषिक धोरण ठरवायला हवे.

डॉ. तेलगिरी यांच्या मते इंग्रजीचा राग केवळ ती एक परकीय वसाहतवादी भाषा आहे म्हणून न राहता ती एक कौशल्य निर्माण करणारी भाषा आहे, हेही मान्य केले पाहिजे. त्या भाषेने आपल्या जीवनात एक मोठा बदल घडवून आणला आहे. मराठी भाषेतील शब्दार्थकोष हेही सतत अद्ययावत पद्धतीने संस्थात्मक पातळीवर तयार व्हायला हवे. इंग्रजीतील ऑक्स्फर्ड डिक्शनरीच्या गेल्या 400 वर्षांमध्ये अनेक आवृत्या निघाल्या आहेत. मराठीतून इंग्रजीकडे पाहिल्याने आपण आज केवळ इंग्रजीचा दुःस्वास करत आहोत. त्यातील भावनिक आवाहन यापलीकडे जाऊन अधिक व्यापक व नव्याने विचार होणे गरजेचे आहे.

या पुस्तकात देशीवादाचा पुरस्कार करणारे त्याचे उद्गाते असणारे मराठी साहित्यिक समीक्षक डॉ. भालचंद्र नेमाडे यांची प्रस्तावानाही महत्त्वाची आहे. आपल्या देशीवादापलीकडे नेमाडे वेगळा विचार मांडत नाहीत, ही या लेखाची एक मर्यादा आहे. नेमाडे यांनी प्रा. परांजपे यांच्या ग्रंथाचे संदर्भमूल्य मोठे आहे असे स्पष्ट केले आहे. ते म्हणतात की, मराठी भाषकांना इंग्रजी भाषेबद्दल सिद्ध असलेला विरोधाभास आपली भाषेसंबंधी एकूण सांस्कृतिक जाण कमी पडत असल्याचे दर्शवतो. एकोणिसाव्या शतकात मराठी लोकांनी ज्या आत्मविश्वासाने आणि धडाडीने परतंत्र वसाहतवादी वातावरणातसुद्धा मराठीचा विकास घडवत आणला तो स्वातंत्र्योत्तर मराठी पिढ्यांना आपण कुठे कमी पडतो आहोत, हे पटवून देण्यास पुरेसा आहे. केवळ इंग्रजीला विरोध करून मराठी भाषेची उपेक्षा संपत नाही. यामागे दुरभिमान, चुकीचे आकलन, भावनिकीकरण, चुकीची धोरणे, चुकीचे नियोजन याचाही विचार व्हायला हवा.

भालचंद्र नेमाडे म्हणतात :

या पुस्तकाच्या निमित्ताने नेमाडे भाषेच्या सांस्कृतिक संरचनेबद्दल काही विवेचन करताना दिसतात. ते म्हणतात की, भाषेचा व संस्कृतीचा अतूट संबंध आहे. भाषेशिवाय आपल्याला विचार करता येत नाही आणि संकल्पनांचा बोधही होत नाही. भाषेचा आणि जगण्याचा अतूट असा परस्परसंबंध आहे. मानवाचा आपल्या जन्मत:च बरोबर आलेल्या भाषेशी असलेला हा जैविक संबंध आजच्या परभाषांशी येणार्‍या उपर्‍या वाढत्या संपर्काच्या संदर्भात प्राथमिक व पायाभूत असतो.

त्या अर्थाने मातृभाषा हीच ज्ञानभाषा असते असे सांगून नेमाडे पुढे म्हणतात की, विश्वाकडे बघण्याची दृष्टी आपली भाषाच आपल्याला करून देत असते. भाषिकाचे वास्तवाचे आकलन ती ती भाषा आपल्या पद्धतीने करून देत असते. सगळ्याच भाषा सारख्याच सामर्थ्यशाली असतात. सर्व प्रकारच्या सामाजिकीकरणाचे धडे मुलांना स्वभाषेतूनच मिळतात. शिक्षणव्यवस्थेत व्यक्तिमत्त्वाची प्राथमिक पायाभरणी स्वभाषेतच व्हावी, अशीच सुसंस्कृत समाजाकडून अपेक्षा असते. चिनी, जपानी, रशियन, फ्रेंच, जर्मन इत्यादी सर्व प्रगत सुसंस्कृत समाज भाषेच्या ह्या कार्यक्रवणतेला सांभाळत आहेत. त्यामुळेच या देशांमध्ये आपल्यासारख्या भाषिक समस्या फार नाहीत.

भाषेवर दर युगात अनेक प्रतिभावंतांचे नानाविध प्रयोग होत असतात व ती अधिकाधिक अर्थवाही, सार्वत्रिक मान्यताप्राप्त आणि सत्ताधारी संस्था म्हणून कार्य करू लागते. या उत्क्रांती प्रक्रियेतून कोणताही मानवी समाज सुटलेला नाही. भाषेचे असंख्य क्षेत्रांतील अगणित वापर अनेकविध अर्थच्छटा, उपमा उत्प्रेक्षादी अलंकार, प्रतिमाप्रतिकादी आकृतीबंध, तर्कबद्ध सूत्ररचना, सारांश-विस्तार आणि इतर भाषांमधून भाषांतर करण्याची समनिर्देशक अशा विविध आविष्कारपद्धतींमुळे आशयलक्ष्यी बदल घडवून आणले जातात. जितका भाषेचा अधिक क्षेत्रांमध्ये वापर होईल, तितकीच तिची अर्थवाहकता विस्तारते. ह्यामुळेच इंग्रजीसारख्या भाषा समृद्ध झाल्या आहेत आणि मराठीसारख्या भाषा खंगत गेल्या आणि परावलंबी झाल्या. व्यवहार, साहित्य व व्यापक स्वरूपात चालणाऱ्या सांस्कृतिक प्रक्रियांनाभाषेचे अनुशासन सुप्तपणे ऊर्जेच्या अभावी भाषा मरू लागतात. त्यामुळे भाषेला व्यापक अर्थाने संस्कृतीची रक्षणकर्ती मानले आहे. यात भाषेचे मूलतत्त्व म्हणून मौखिकतेला असाधारण महत्त्व आहे.

याच तर्काने कोणतीही भाषा तिच्या अनेक बोलींमध्येच अस्तित्वात असते. महाराष्ट्रातच मराठीच्या 35 बोली आज जिवंत आहेत. या बोलींना दुय्यम किंवा अशुद्ध समजणे अज्ञानाचे द्योतक आहे. या बोलींनाही त्याचे नैसर्गिक स्थान व प्रतिष्ठा मिळायला हवी. सर्व वर्णभेदांची मिळून झालेली भाषा ही प्रत्येक व्यक्तीची राष्ट्रीय ओळख ठरते. नेमाडे पुढे म्हणतात की, भाषा ही समाज मानसावर अधिकार गाजवून विविध सामाजिक समूहांना जातीजमातींना सुसंघटित ठेवण्याचे राष्ट्रीय कार्य करत असते. त्यामुळेच भाषेचा राष्ट्रीयतेशी संबंध अधिक आहे. भाषिक अस्मितेबद्दल नेमाडे म्हणतात की, हिंदुस्थानसारख्या बहुभाषिक देशात एकंदर 1652 स्वतंत्र भाषा अजून टिकून आहेत. हा उपखंड त्यामुळेच भाषाशास्त्रीय संशोधनाला सतत आव्हान देत राहिला आहे. त्या अर्थाने भाषा आणि संस्कृती या परस्परावलंबी असून भाषेचा र्‍हास हा आपोआपच संस्कृतीचा ऱ्हास घडवून आणतो.

मराठीवर इंग्रजीचे झालेल्या आक्रमणासंबंधीच्या विवेचनात नेमाडे म्हणतात की, पेशवाईत हिंदुस्थानात आलेल्या पाश्चात्त्य-पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रजी प्रवाशांचा एतद्देशीयांशी झालेले विचारविनिमय ह्या सांस्कृतिक अवनतीची अनेक उदाहरणे आपल्या अनेक पुस्तकांमधून वाचायला मिळतात. गुलामगिरीखाली वावरलेल्या आपल्या अनेक पिढ्यांना स्वभाषेचे पवित्र स्थान शिक्षणक्षेत्रातही टिकवता आले नाही. स्वार्थापोटी इंग्रजीसारख्या साम्राज्यवादी परभाषेचा मुख्य भाषा म्हणून वापर करणारा वर्ग उच्चभ्रूंमध्ये विशेषत: फोफावतो आहे. परभाषेत ज्ञान आहे, किंवा इंग्रजी ज्ञानभाषा आहे अशी खोटी विधाने करणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे. ज्ञान फक्त स्वभाषेत असते परभाषेत माहिती असते.

इंग्रजीसारख्या परभाषेच्या आक्रमणामुळे मराठीवर त्याचे किती दुष्परिणाम होतात हे नेमाडे यांनी अधिक विस्तृतपणे मांडले आहे. त्यांच्या मते परभाषेच्या शिरजोरीमुळे ज्ञानसाठा करणे आणि मूल्यसंवर्धन करणे ही स्वभाषेची दोन्ही सांस्कृतिक कार्ये संपुष्टात येतात आणि परक्या संस्कृतीची परक्या भाषेतून येणारी विसंगत मूल्ये सबंध समाजाचा एकजिनसीपणा विस्कळित करू लागतात. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात आपली देशीकरणाची प्रक्रिया खुंटली ती यातूनच. याउलट कोरिया आणि जपानसारखी लहान राष्ट्रेही स्वायत्ततेमुळे कित्येक क्षेत्रांमध्ये आपल्या पुढे गेले. युनेस्कोच्या आग्रहानुसार किमान प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतून हवे असे ठरले असतले तरी आता केवळ लज्जारक्षणापुरते मातृभाषेचे शिक्षण आपल्याकडे उरले आहे. किती मर्यादेपर्यंत मातृभाषा वापरावी व किती मर्यादेनंतर परभाषा आपल्या उपयोगासाठी किंवा समृद्धीसाठी वापरावी याचा विवेक मराठी आणि हिंदुस्थानातील इतर शिक्षणशास्त्रज्ञांना आजही नाही. यातून फक्त इंगजी शिकणाऱ्यांनाच सुशिक्षित म्हणवयाची पाळी आपल्यावर येईल, तर मराठीतून शिकणारा अशिक्षित अडाणी!

नेमाड्यांच्या मते आपल्या इंग्रजीतल्या विद्वत्तेला आंतरराष्ट्रीय स्तरावरही फारशी किंमत नाही. परभाषेच्या दुय्यम ज्ञानामुळे आपले कोणतेच प्रश्न कधी सुटणार नाहीत, हे आपले शैक्षणिक भाषिक धोरण ठरवणाऱ्यांना पटले पाहिजे. स्वभाषेचा वापर हा केवळ भावनिक किंवा अभिनिवेशी विचार नसून तो उपयुक्ततावादीही असू शकतो. तो लोकशाहीवादी तर आहेच तसेच देशी साधनसामुग्रीचा सर्जनशील वापर करणाराही आहे. सुदैवाने मराठीला विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत भक्कम एकभाषिक परंपरा आहे. नेमाडे शेवटी म्हणतात की, कोणतीही भाषा ती बोलणाऱ्या समूहाच्या बौद्धिक वकूबावर ठरत असेल, तर मराठी लोकांनी नव्या युगात आपल्या शेजारच्या भाषा, राष्ट्रभाषा आणि मुख्य म्हणजे इंग्रजी या सगळ्यांशी कोणती धोरणे आखावी, कोणती रणनीती अनुसरावी ह्या आपल्या जगण्याच्या प्राथमिक कसोट्या ठरल्या पाहिजेत. त्या आपण किती निष्ठेने पार पाडू, यावर आपण किती बुद्धिमान आहोत, हे पुढची पिढी ठरवेल.

भाषावृद्धीचे काही व्यवहार्य मार्ग :

इंग्रजीसंबंधी नेमाडे यांची मते सर्वश्रुत आहेत. पण भाषेतून भाषेकडे.. या पुस्तकात प्रा. प्र. ना. परांजपे यांनी मराठी विकासाच्या वाटा या लेखातून मराठीच्या विकासाचा एक मार्गदर्शक नकाशा हवा अशी थेट मागणीच केली आहे. मराठी भाषेच्या विकासाची इच्छा अनेकांची आहे. सरकारी व खासगी पातळीवर तसे अनेक प्रयत्नही गेल्या तीस- चाळीस वर्षांमध्ये होत आहेत. हा गोंधळ अजून संपलेला नाही. व्यवस्थापनाच्या अभावी या सर्व प्रयत्नांचे रूपांतर चळवळीत होऊ शकलेले नाही. या साऱ्याचे नेतृत्व हे कुणाला पेलवेल असे सध्या तरी चित्र दिसत नाही. मराठीच्या विकासासाठी एक रोडमॅप किंवा एक मार्गदर्शक नकाशा तयार करायला हवा. त्यासाठी एक अभ्यासगट तयार करावा लागेल. त्यात मराठी शुद्धलेखन समस्येच्या मर्यादा, हिंदी इंग्रजीतून येणाऱ्या शब्दांबद्दलचे व्यावहारिक धोरण, इंग्रजी आत्मसात करण्याच्या आकांक्षेला वाव देणारे माध्यमविषयक धोरण, साहित्य व भाषा यांमधील भेद, मराठी राजभाषा होण्यासंबंधीचे कार्यक्रम व पथ्ये इत्यादी घटनांबाबतचे धोरण तयार करायला हवे. ते सामान्य मराठीप्रेमी माणसाला पटवून द्यायला हवेत.

यासाठी प्रा. परांजपे यांनी मराठी वृत्तपत्रांमध्येही मोठा बदल होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या निरीक्षणानुसार संपादकीय लेखनाचा भाषेवरील प्रभाव कमी झाला आहे. बातम्या व तत्सम इतर लेखनातील भाषेचा दर्जाही समाधानकारक नसतो. केलेल्या चुका दुरुस्त करता येत नसल्याने पत्रकार निर्ढावत तर वाचक बेफिकीर होत चाललेत. चांगल्या वाचनीय मराठीत इंग्रजीतून मराठीत अनुवादित करणारी सेवा देणाऱ्या संस्थांची आता गरज आहे. याशिवाय मराठीत भाषांतरे करण्यासाठी भाषांतर धोरणही ठरवले गेले पाहिजे. यातून लक्ष्य भाषेतील बौद्धिक संपदेत भर पडते तसेच त्या लक्ष्य भाषेचाही विकास होतो. तसेच एकेदरीत भाषेची लवचिकता आणि अर्थ व्यक्त करण्याची क्षमताही वाढते. म्हणूनच भाषेच्या विकासात भाषांतरे मोठा हातभार लावतात. त्यासाठी चांगले भाषांतरकर्ते व्हावेत यासाठी सरकारी पातळीवर विशेष प्रयत्न व्हायला हवेत. विद्यापीठात भाषांतर विभाग निर्माण व्हायला हवेत. मराठीत भाषांतरित व्हायला हवेत अशा विविध ज्ञानशाखांमधील मूलभूत ग्रंथांच्या याद्या तयार करायला हव्यात. त्यातून निर्माण होणारे पारिभाषिक प्रश्न सोडवायला हवेत.

मराठीचे भाषा वैभव समजण्यासाठी अद्ययावत भाषाकोष निर्माण व्हायला हवेत. भाषेतील सर्व शब्द कसे गोळा करायचे, यासंबंधीचे प्राथमिक कामही आपल्याकडे नीट झालेले नाही. यासाठी सरकार, धनिक, कष्टाळू संशोधक आणि तरुण अभ्यासक यांना एकत्र आणायला हवे, अशी प्रा. परांजपे यांची आणखी एक सूचना आहे. शब्दनिधीनंतर त्याचे संपादन, प्रकाशन, विक्री व सातत्यपूर्ण सुधारणा करत वेगवेगळ्या विषयांवरील कोश सिद्ध करत राहायला हवेत. वाढलेल्या भाषिक व्यवहाराची दखल घेणारे कोश निर्माण झाले तर ते भाषेच्या वाढीमध्ये तसेच विकासामाध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मराठीतील कोषनिर्मिती कुंठितावस्थेत आहे. महाराष्ट्र शासन, राज्य मराठी विकास संस्था आणि महामंडळ यांनी योजनाबद्ध कोषनिर्मितीकडे वळायला हवे, अशी सूचनाही प्रा. परांजपे यांनी केली आहे.

दोन हजार वर्षांची परंपरा असलेली संपन्न भाषा, तिचे अध्यापन, संशोधन, जतन, ग्रंथ प्रकाशन इत्यादींसाठी केंद्र सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये देत असते. तमिळ भाषेने मराठीसाठी अभिजात भाषेचा दर्जाही मिळवला. पण यासाठी या भाषेचा अभिमान धरणाऱ्यांनी, अभ्यासकांनी, राजकीय पुढाऱ्यांनी व राज्य सरकारने योजनापूर्वक व एकजुटीने प्रयत्न केले. मराठीतही त्यास चांगली सुरुवात झाली असली, तरी तमिळ भाषकांकडून केलेले प्रयत्न पाहाता मराठी भाषकांनाही खूप शिकण्यासारखे आहे. विशेषत: तमिळ भाषेप्रमाणे स्वतंत्र मराठी विद्यापीठ स्थापन करायला हवे. सध्याच्या मराठी विभागाच्या आवाक्यातील हे काम नाही. मराठी विद्यापीठात मराठी भाषा, समाज, संस्कृती, त्याचा इतिहास, भाषाविज्ञान, प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील मराठीचे अध्यापन, तसेच अन्य भाषकांसाठी मराठी यावर तिथे काम व्हायला हवे, ही सूचनाही प्रा. परांजपे यांची आहे. आपल्याकडे अशा स्वतंत्र मराठी विद्यापीठाची राजकीय घोषणाही झाली होती व ती केव्हाच हवेत विरली!

मराठी भाषेच्या विकासासाठी राजाश्रय व लोकाश्रय हे दोन्हीही असायला हवेत. 1960 नंतर मराठीला राजभाषेचा दर्जा मिळून आता 50 वर्षे होऊन गेली आहेत. आज मराठी शाळा कमी होत असल्यामुळे या भाषेला लोकाश्रय कमी मिळतो आहे असेच चित्र दिसते. आज मराठीचा राजाश्रयही तोंडदेखला आहे. याशिवाय भाषिक प्रदूषणाच्या बाबतीत कुणी पोटतिडकीने बोलायला लागले की चालायचंच अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते. ती हतबलतेतून की अनास्थेतून येते हे सांगता येत नाही. मराठीच्या विकासासाठी चालायचंच या वृत्तीचा त्याग करून नेमकेपणा व अचूकता याचा आग्रह धरायला हवा.

या चर्चेचे हे सार महत्त्वाचे आहे. नेमाडे यांनी भाषेची मानवी जीवनातील बोधन प्रक्रियाच त्यांच्या मांडणीतून विस्ताराने व तितकीच नेमकेपणाने मांडली आहे. अर्थात यासाठी केवळ इंग्रजीवर टीका करून चालणार नाही. ती वेळ आता केव्हाच निघून गेली आहे.

जगातील देशांच्या भाषिक सीमा इंग्रजीच्या निमित्ताने दोन शतकांपूर्वीच पुसायला सुरुवात झाली होती. आज आहे या परिस्थितीतूनच मार्ग काढायला हवा. मराठी माणूस म्हणून आपल्यात अनेक मानसिक व भाषिक गंड असले तरी ते आपल्याला नक्की जमेल असा विश्वास बाळगायला हवा.

लेखक : विवेक सबनीस
संपर्क : swatantranagrik@gmail.com

One thought on “मराठी भाषा आणि भाषेसंबंधीचे आजचे प्रश्न

  • January 22, 2018 at 8:39 am
    Permalink

    खूपच सुंदर विश्लेषण.. बऱ्याच गटांचे हे ही म्हणणे आहे की हिंदी चा विरोध सुद्धा तितकाच गरजेचा आहे. कारण ह्या पूर्वीचा इतिहास पाहता, हिंदी भाषेने उत्तर भारतातील बहुतांशी भाषांचा नाश केला. पण मला तस अजून तरी वाटत नाही हा पण खबरदारी घेणं सर्वात जास्त महत्वाचं आहे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *