भूले बिसरे गीत

छोडो कल की बातें…

चित्रपट : हम हिंदुस्तानी (1960)

दिग्दर्शक, गीत : प्रेम धवन

संगीत : उषा खन्ना

गायक : मुकेश

कलाकार : सुनील दत्त, आशा पारेख, जॉय मुखर्जी,

हेलन, प्रेम चोप्रा आणि संजीव कुमार

साधेपणातील सौंदर्याचे हे संगीतमय उदाहरण! अत्यंत सरळ, सुंदर स्वच्छ शब्दांनी जबरदस्त क्रांतिकारी विचार पेललेले आहेत आणि देशामधील प्रत्येक सुजाण नागरिकासमोर सादर केले आहेत. याच्या गांभीर्याचा अंदाज करणे खरेच आवश्यक आहे.

आजच्या धडाम्धुडूम् संगीताच्या पार्श्‍वभूमीवर हे गीत, फार मोठा विरोधाभास आहे. पण कधी कधी विरोधाभासातून प्रत्यक्ष परिणाम खोलवर रुजू शकतो. जसे, वृक्षाची मुळं गुरुत्वाकर्षणाकडे आकर्षित होऊन खोलवर रुजतात, तर त्याचेच खोड उलट दिशेला सूर्य प्रकाशाचे पूजक होते, त्यातूनच नवनिर्मिती घडते!

हिंदी रजतपटाच्या शंभर वर्षांहून अधिक कालखंडामधे अत्यंत यशस्वी महिला संगीतकार म्हणून उषा खन्नांचे कौतुक करावे तेवढे थोडेच होणार आहे. त्यापूर्वी, इशरत सुलताना, जद्दनबाई आणि सरस्वती देवींसारख्या बोटावर मोजण्याएवढ्याच महिला अपवादाने संगीत दिग्दर्शनामधे दिसल्या.

पण बॉलीवुडच्या झगमगाटाला न घाबरता, पुरुषी वर्चस्वाची आव्हानं पेलून यशस्वी ठरणार्‍या एकमेव संगीत दिग्दर्शक उषा खन्ना आहेत, आजमितीलाही त्या एकमेवच आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो.

स्वत:ला, गर्वाने, ‘हम हिंदुस्तानी’, म्हणवून घेत हे तरुण काय नारा देता आहेत बरे? तर कालच्या कालबाह्य झालेल्या विचारांना, तत्त्वांना कवटाळून बसू नका, त्यांचे बंध झुगारून चला, नवजीवनाची वाट चालूया, नवनिर्माणात झोकून देऊया.

पारतंत्र्याच्या बेड्या तोडून पुढे चालायचे. मागे वळून आता पाहणे नाही. आधुनिक तंत्र आणि मंत्राचीच कास धरूया माझ्या नौजवान बांधवांनो, आपण सिद्ध होऊ नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी.

आपल्या पूर्वजांनी, ताजमहाल, अजंठा-वेरूळसारख्या अजरामर कलांचा समृद्ध ठेवा आपल्यासाठी घडवून ठेवला आहे, जो उच्च कोटी संपन्नतेचा आदर्श नमुना तर आहेच, शिवाय त्यांचा दर्जा जागतिक आहे. असेच अद्भुत कर्तृत्व आपण सर्व जण मिळून करून जगाला चकित करून सोडू.

प्रत्येक पिढीला मागच्या पिढ्यांचे विचार जुने वाटतात. हे वरवर पाहता काही अंशी खरे आहे, पण जेव्हा नवी पिढी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित गोटी घडवू पहाते तेव्हा, हाती उपलब्ध असलेल्या प्राचीन परंपरांच्या मजबूत पायांवर उभारलेले पण नव्या पद्धतीने साकार केलेले दिसतात.

जुन्या विचारांना सोडा, याचा अर्थ नव्या पद्धती अवलंबून नव्या राष्ट्राची उभारणी करणे, अशा पद्धतीने स्वप्नामधल्या आदर्श हिंदुस्तानाची निर्मिती आपण सगळे मिळून करू या, हा विचार खूप महत्त्वाचा आहे.

माटी में सोना है हाथ बढाकर देखों । सोने की ये गंगा है चांदी की यमुना– हे शब्द फार महत्त्वाचे वाटतात कारण आपला देश कृषिप्रधान असल्याने प्रत्येक गवताच्या पात्यावरच्या दव बिंदूंचा, खळाळत्या निर्झरांचा, सुगंधित मातीचा विचार आणि त्याचे अनन्यसाधारण महत्त्व, परिणामकारक रीतीने नव्या पिढीसमोर ठेवण्यात कवी यशस्वी झाले आहेत.

हे गीत जरी 1960 साली लिहिले असले, तरी कोणत्याही पिढीला नावीन्याने नटलेले वाटेल, आपल्यासाठीच ही सृजनाची ललकार आहे असे वाटेल, हे या गीताचे बलस्थान आहे.

नायक सुनील दत्त, नायिका आशा पारेख या लखलखत्या तार्‍यांपेक्षाही लक्षात राहते, ते हे सर्वांगसुंदर गीत. कारण त्यामधून झिरपणारे तेजोमय विद्युतप्रवाही शब्द, रोमारोमांत रोमांच उभे करतात!

आजकाल, ‘गूगलच्या मदतीने ज्ञानार्जनाची गरज भागवणारे अनेक एकलव्य दिसतात; काही अंशी ही गरज पूर्ण होतही असेल, पण  ‘हे शब्दांचे धनअमूल्य आहे. झगमगत्या शब्दांचे साज, वृत्त अलंकाराच्या कोलांट्या, उपमा-उत्प्रेक्षांचे बेगडी थर, अशा काहीही क्लृप्त्या न करता, हे बोल अतिशय परिणामकारक झाले आहेत. कारण त्यामधील सच्चेपणा, शाश्‍वत मूल्यांचा विचार आणि साधेपणा.

आओ मेहनत को अपना ईमान बनाये। अपने हाथों को अपना भगवान बनायें ।

हे किती सत्यकथन आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आहे, यात काही दुमत असण्याचे कारणच नाही पण आज या मूल्यांपासून माणूस, का कोण जाणे, पण थोडा कानाडोळा करतो आहे का? असा प्रश्‍न सतावतो आहे.

समोरच्या चंगळवादी अमिषांना बळी पडतो आहे हे कुठे तरी थांबले पाहिजे, असे मनापासून वाटते! प्रेमधवन एक लोकप्रिय आणि चांगले कवी होते, पण हे – छोडो कल की बातें, कल की बात पुरानीमात्र सर्वोत्तम वाटते ते याचमुळे.

स्वतंत्र भारताचा 69 वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना हे गीत फार प्रेरणादाई वाटेल असा विश्‍वास वाटतोय. शिवाय एकमेव महिला संगीत दिग्दर्शक उषाजींचे कौतुक या अनुषंगाने करावे असाही एक दृष्टिकोन आहे!

मुकेशसारख्या बिनीच्या गायकाने हे सुंदर गीत आणखीच श्रवणीय केले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या प्रजासत्ताक दिनाचे अनेक देखावे या गीतातून बघायला मिळतात. आजचा देदीप्यमान सोहळा बघितला की, अंतरात्मा देशाभिमानाने क्षणभर सुखावतोही.

याच अनुषंगाने आणखी एक काळजी व्यक्त करावीशी वाटते, परवाच कुठे तरी वाचले, की कुठल्याशा निरीक्षकाने, भारतामधल्या महानगरामध्ये केलेल्या निरीक्षणाच्या अहवालामध्ये असे नमूद केले आहे की, 93 टक्के लोकांनी  ’26 जानेवारी म्हणजे काय?  या प्रश्‍नाचे उत्तर- ‘Dry Day’ असे दिले.

हा सर्व्हे खरा आहे की खोटा, हा जरी संशोधनाचा विषय असला तरी हा विनोद होऊ शकत नाही, ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे!

जरी आपण मंगळावर पोहोचलो असलो तरी – अभी पलटना है रुख़ कितनें दरियाओं का कितने पर्बत राहों से हैं आज हटाने! हेसुद्धा खरे आहे. तरच,- चाहो तो पत्थर से धान उगा कर देखो शक्य आहे!

लेखिका : सौ. रंजना पाटील
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *