भीमा कोरेगावनंतर : काही निरीक्षणे

//एक//

आधी भीमा कोरेगावला मग त्याची प्रतिक्रिया म्हणून राज्यभर जे काही प्रतिसाद उमटले त्यावरून आपल्या राज्याचं पोलीस दल समाज मनाची नाडी ओळखण्यात कसं थिटं पडलं आहे, हे विदारकपणे समोर आलेलं आहे. गेल्या वर्षभरापासून भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती, त्यासाठी गावोगाव बैठका घेतल्या जात होत्या, पोस्टर्स लागलेली होती तरी यावर्षी कोरेगावला लाख्खो लोक येणार आहेत याची कुणकुण पोलिसांना लागलेली नसावी, यापेक्षा अधू  ‘पोलिसी’ दृष्टी कोणती असावी? काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या अखेरच्या काळात मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना अडवण्याच्या घटना घडल्या, अलीकडच्या काळात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांत गोंधळ होतोय पण, त्याची कोणतीही आगाऊ कल्पना पोलिसांना मिळालेली नसते. अलिकडे निघालेले मराठा मोर्चे, त्यात होणारी अ‍ॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी, आधी खैरलांजी आणि आता नितीन आगे हत्या खटल्याच्या लागलेल्या निकालामुळे खदखदणारा असंतोष याची किंचितही चाहूल पोलीस दलाला लागलेली नसावी, यावरून या खात्यात आता जाणत्याआणि माहीतगार अधिकारी-शिपायांची उणीव असल्याचं दिसतं आहे. पुण्याचे पोलीस अधीक्षक, जिल्ह्याचे उपअधीक्षक (गृह) आणि भीमा कोरेगावचे पोलीस निरीक्षकांना यांना पोलिसी कामाची प्राथमिक अक्षरओळख करून देण्याची गरज आहे, असाही याचा अर्थ आहे. खरं तर, महाराष्ट्राला आग लागणार आहे याची कल्पना न आल्याबद्दल या तिघांनाही आकलन आणि आवाका नसल्याचा ठपका ठेवून निलंबित करायला हवं होतं पण, स्वभावानं नको तितकं मऊ असलेल्या मुख्यमंत्र्यांकडून अशी कडक कारवाईची अपेक्षा बाळगणं व्यर्थच आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्याचं हे एक षड्यंत्र होतं, असाही एक सूर काढला जात आहे. एक ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यानं अनेकांचा उठलेला पोटशूळ त्यामागे असू शकतो. महाराष्ट्राचा पुरोगामीपणा लक्षात घेता, त्यात तथ्य वाटत नसलं तरी त्याची खातरजमा देवेंद्र फडणवीस यांनी करवून घ्यायला हवी, हाही या महाराष्ट्रात उसळलेल्या आगडोंबाचा एक निष्कर्ष आहे.

भीमा-कोरेगावला काही अतिभव्य शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी गेल्या वर्षभरापासून सुरू आहे, असा फीडबॅक औरंगाबाद पोलिसांनी मुंबईत मुख्यालयाला पाठवला होता, अशी चर्चा औरंगाबादच्या पत्रकारांत असल्याचे निशिकांत भालेराव या ज्येष्ठ पत्रकार मित्राने सांगितले. ही माहिती जर खरी असेल तर, ती माहिती प्राप्त झाल्यावर पोलीस मुख्यालयातील ज्या-ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेय त्यांना जाब विचारण्याची जबाबदारी गृहखाते सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी न कचरता पार पाडायला हवी. सतीश माथुर यांचे ‘पोलिसिंग स्किल’’ जवळून मला माहिती आहे. छगन भुजबळ यांनी शिवसेनेत बंड करायचे ठरवल्यावर त्यांच्यासोबतच्या प्रत्येक आमदाराला महाराष्ट्राच्या विविध भागातून खुश्कीच्या मार्गे नागपुरात सुरक्षित पोहोचवण्याची (यात नागपूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त असलेले अरविंद इनामदार यांचाही वाटा मोठा होता) आणि नंतर त्या सर्वांची पूर्ण काळजी घेण्याची कामगिरी असो की मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर उसळलेल्या हिंसाचारात बजावलेली कळीची कामगिरी, की दोन बड्या नेत्यांचे संभाषण टेप करण्याची अतिउत्साहात झालेली घटना निस्तरणे असो; सतीश माथुर यांनी कुशलपणे निभावलेल्या या अशा अनेक हकिकती मला ठाऊक आहेत. महासंचालक झाल्याच्या खुशीत शैथिल्य आलेले आहे की काय कळण्यास मार्ग नाही पण, अशात अनेक गंभीर घटनांतही सतीश माथुर यांच्यातील कर्तव्यदक्ष पोलीस हरवल्यासारखा वाटतो आहे, हे मात्र खरं!

// दोन //

भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर हे मला आवडणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्यात असलेली सर्वसमावेशकता, कोणत्याही प्रश्‍नाबाबत व्यापक भूमिका घेण्याची त्यांची सवय, भूमिकेशी प्रामाणिक राहण्याचा त्यांचा अट्टाहास, हे त्यांचे गुण वाखाणण्यासारखे आहेत. शक्यतो वायफळपणा, वाचाळवीरपणा न करता नीट अभ्यासांती तयार झालेले आपले म्हणणे मृदू शब्दांत पण, ठामपणे मांडणे हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. राज्यातील एक अत्यंत आशादायक नेतृत्व अशी प्रकाश आंबेडकर यांच्याविषयीची माझी भावना आहे. केवळ रिपब्लिकनच नव्हे तर त्याबाहेर जाऊन सर्व जाती धर्माच्या लोकांचं नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी करायला हवे आणि संपूर्ण समाजाने त्यांना नेता म्हणून स्वीकारायला हवे, असे मला कायम वाटत आलेले आहे.

प्रदीर्घ काळ यशस्वी झालेला अकोला पॅटर्न, बहुजन समाजाला बरोबर घेऊन एकेकाळी निर्माण केलेली हवा, यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे राजकीय क्षेत्राचे कायम लक्ष वेधलेले असते आणि मीडियाचे तर ते ‘ब्ल्यू आईड बॉय’  आहेत. भीमा कोरेगावचे पडसाद म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या बंदच्या आवाहनाला संपूर्ण महाराष्ट्रातून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला हे खरे असले तरी वास्तवाचा विचार करता, संपूर्ण राज्यभर त्यांचा एकसंध प्रभाव आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल; भारिप-बहुजन महासंघाचा प्रयोग कमालीच्या बहरात असतानाही प्रकाश आंबेडकर यांना मानणारे पाच आमदार विधानसभेवर निवडून आलेले नव्हते की ताब्यात कोणतीही महापालिका नव्हती की अकोला वगळता एकही जिल्हा परिषदेत सत्ता नव्हती. एक मात्र खरे, प्रकाश आंबेडकर यांच्या प्रभावाची बेटे राज्यात ठीकठिकाणी आहेत. तरीही प्रकाश आंबेडकर यांच्या बंदच्या हाकेला राज्यभर प्रतिसाद का मिळाला असावा, याबाबत तीन शक्यता सध्या चर्चेत आहेत. एक- खैरलांजी ते नितीन आगे या प्रवासातला बराच काळ साचत गेलेला असंतोष व्यक्त करण्याच्या संधीच्या शोधात दलित होते आणि ती संधी कोरेगावच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकर यांनी मिळवून दिली. दोन- रामदास आठवले यांना शह देण्यासाठी कोणाच्या तरी इशाऱ्यावर प्रकाश आंबेडकर यांनी हे आंदोलन उभे केले. तीन- महाराष्ट्रातील दलित जनतेने आता खरोखरीच प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे.

परवाच्या बंदमधून तिसरी शक्यता जनतेने व्यक्त केली असेल तर त्याचे मनापासून स्वागतच आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणाचा आजवरचा बाज पाहता दुसरी शक्यता अगदीच गैरलागू ठरते. कारण राजकारण करताना आजवर काही तडजोडी कराव्या लागल्या असल्या तरी प्रकाश आंबेडकर कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणासाठी तरी पर्याय म्हणून आंदोलन उभे राहण्याच्या खेळीला फशी पडण्याची शक्यता नाही. महाराष्ट्र बंदमधून केवळ पहिली शक्यता व्यक्त झालेली असेल तर प्रकाश आंबेडकर यांना सर्वमान्यत्वासाठी अजून वाट बघावी लागणार आहे. मला मात्र, हा बंद म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या शक्यतेची सरमिसळ आहे, असे वाटते. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेना-भाजपला तिसरा समर्थ पर्याय मिळण्याच्या दिशेने पडलेले हे एक पाऊल आहे, असेही म्हणायला त्यातून वाव मिळाला आहे.

// तीन //

भीमा कोरेगावच्या निमित्ताने नेतृत्व करण्याची संधी प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत अचूक टायमिंग साधत कौशल्यानं निभावलेली असली तरी यानिमित्ताने दलित विरुद्ध सर्व, असे जे काही समाजिक दुहीचे चित्र निर्माण झालेले आहे; त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. अल्पसंख्याक ‘एक’ विरुद्ध बहुसंख्याकातले ‘अनेक’ अशी स्थिती निर्माण होते तेव्हा एखादा समाज शिकला आणि काहीसा संघटित झाला म्हणजे तो संपूर्ण समाजाचं नेतृत्व करण्याइतका प्रबळ झाला असे होत नाही. याला जोड आर्थिक शक्तिमानतेची साथ मिळावी लागते, तेव्हाच शीर्षस्थ नेतृत्वासाठी हवे असलेले संख्याबळ लोकशाहीत जमा होत असते.

आज जगात चीनचा बोलबाला आहे त्याची कारणे आर्थिक आहेत. इंग्रजांनी जगावर प्रदीर्घ काळ राज्य केले त्याचे प्रमुख कारण त्यांच्या आर्थिक क्षमतेत आहे. महाराष्ट्रात मराठा प्रदीर्घ काळ सत्तेत आहेत कारण त्यांची आर्थिक साम्राज्ये आहेत; यादव, करुणानिधी, जयललिता हीदेखील याचीच उदाहरणे. (मायावती, ममता बॅनर्जी आधी सत्तेत आल्या आणि मग आर्थिक केंद्र बनल्या.) आंबेडकरी समाज आता शिकलाय, गटागटात का असेना संघटित झालाय पण, त्याने आता एक आर्थिक ताकद म्हणून पुढे यायला हवे. त्यासाठी व्यापारउदीम-उद्योग आदी क्षेत्रात या समाजाला जम बसवावा लागेल. आर्थिक साम्राज्यातून जात आणि धर्माच्या भेदापलीकडील कट्टर समर्थक मतदारांच्या बँका तयार होतात, हे लक्षात घेतले पाहिजे. यापुढे केवळ इतिहासाला कवटाळत बसून चालणार नाही तर निर्विवाद नेतृत्वासाठी त्या इतिहासाला पाठीवरच्या पोतडीत टाकून, वर्तमानाच्या खांद्यावर मांड ठोकून भविष्याचा वेध घेण्याची आणि काटेकोर एकेक पाऊल उचलण्याची गरज आहे. केवळ दलित आणि बहुजनांच्या भरवशावर नेतृत्व करायचे असेल तर प्रकाश आंबेडकर यांना हे आव्हान पेलावेच लागेल.

//चार //

भीमा कोरेगावच्या प्रतिक्रियेच्या निमित्तानं जे काही अनुभवायला मिळाले त्याबद्दलही लिहायला हवेच- पत्रकारितेत येऊन या वर्षी चाळीस वर्षं पूर्ण झाली. त्यापैकी 25 वर्षं आणि आणखी काही महिने नागपुरात घालवली. नागपूर म्हणजे दीक्षाभूमी, नागपूर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेडक्वार्टर. नागपूर म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला, नागपूर म्हणजे असंख्य चळवळींचं केंद्र. नागपूर म्हणजे उपराजधानी, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरणारे शहर. एक पत्रकार म्हणून अनेक आंदोलने, मोर्चे, गोळीबार, बाबरी मशीद पाडली गेल्यावरची दंगल अंगाला दगड चाटून जात असल्याच्या अंतरावरून पाहिली आणि पोलिसांचा गोळीबार पहिला, गोवारींची चेंगराचेंगरी, पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरामुळे हलबाचे हिंसक झालेले आंदोलन आणि विदर्भवाद्यांचा आंदोलनातला आक्रमकपणा या काळात अनुभवयाला मिळाला. आणखी एक आवर्जून सांगायला हवे, दीक्षाभूमीवर साजऱ्या होणाऱ्या धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाचे वृत्तसंकलन एक पत्रकार म्हणून बारा वर्षे केलं. दीक्षाभूमीला खेटून असलेल्या बजाज नगर, अभ्यंकर नगरमध्ये राहिलो; दीक्षाभूमीवर येणाऱ्या आठ-दहा लाख लोकांच्या गराड्यात सापडून दोन-तीन दिवस अस्तित्वच गुडूप होणाऱ्या वसंत नगरमध्ये आमचे प्रदीर्घ काळ वास्तव्य राहिले पण, कधी श्‍वास कोंडला नाही की जीव गुदमरला नाही की भय दाटून आले नाही. एवढ्या गर्दीतून, तर कधी अन्य भागात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात मुलगी शाळेतून किंवा पत्नी कार्यालयातून एकटी घरी कशी येईल, केव्हा येईल याच्या काळजीची निरांजने माझ्याच काय कोणाही माणसाच्या डोळ्यात कधी पेटली नाहीत. अभिमानाने नमूद करतो, खैरलांजी हत्याकांडानंतर हिंसेचा आगडोंब पेटलेला असतानाही एकटी कार चालवत हॉस्पिटलमध्ये आजारी पित्याला भेटायला येताना आमच्या कन्येला भीतीचा लवलेशही कधी शिवला नाही. अडवले गेल्यावर हॉस्पिटलमध्ये जायचेय सांगितल्यावर रस्ता करून दिला गेला किंवा पर्यायी रस्ता सांगितला गेला असल्याचा अनुभव आमच्या कन्येच्या पोतडीत जमा आहे!

मे 1998 मध्ये औरंगाबादला बदली झाली तेव्हा घनिष्ठ मित्र असलेले उल्हास जोशी औरंगाबादचे पोलीस आयुक्त होते. शुक्रवारची दुपारची नमाज अदा झाल्याशिवाय आम्ही पोलीस अधिकारी घरी जेवायला जात नाही, असे ते एकदा म्हणाले. तेव्हा 16 वर्षांच्या विदर्भातल्या वास्तव्याच्या काळात हिंदू-मुस्लिम दंगलीसाठी कुख्यात असणार्‍या गावातील दंगली कशा प्रचंड प्रमाणात कमी झाल्या आहेत हे लक्षात आले आणि 1977 पूर्वीचे औरंगाबाद आठवले. पुढची साडेचार पावणेपाच वर्षे औरंगाबादला असेपर्यंत आंदोलन, मोर्चा कोणाचाही असो औरंगाबादला हेच दडपण अनुभवायला येत असे. एक जरी जोराचा आवाज आला तरी लेकीला घरी आणण्यासाठी धाव घ्यावी लागत असे.

आता 2014 च्या मे महिन्यात पुन्हा औरंगाबादला परतल्यावर लक्षात आले; मराठा मोर्चांचा अपवाद वगळता कोणत्याही पक्ष-संघटनेचा मोर्चा असो की आंदोलन; याला अगदी शिक्षकांचा मोर्चाही अपवाद नाही; शिक्षकां(?)नीही तुफान दगडफेक केली…भय इथले संपलेले नाही तर ते अजून वाढलेलेच आहे. 1 ते 4 जानेवारी या काळात वेगवेगळ्या रंगाचे झेंडे घेतलेली, वेगवेगळ्या पक्षाच्या घोषणा देणारी, आपापल्या नेत्यांच्या नावांचा जयजयकार करणारी टोळकी औरंगाबादपासून ते पुण्यापर्यंत दिसत होती. औरंगाबादच्या ज्या हिंदू-मुस्लिम दंगली भीषण समजल्या जातात त्यांपैकी 1969 ची दंगल मी साक्षात अनुभवलेली आहे. पण तेव्हाही असा विखार, असा जळजळता द्वेष पहायला मिळालेला नव्हता. तेव्हा ‘ ‘त्यांनी’ गुलमंडीच्या पलिकडे आणि ‘यांनी’ अलिकडे काय धुमाकूळ घालायचा तो घालावा असा जणू प्रघात होता…आता हिंसाचाराची नवी केंद्रे निर्माण झालेली आहेत, बेभान झालेली ही टोळकी गल्लोगल्ली फिरताना, दगडफेक-जाळपोळ करताना, कुणाचा तरी जाती-धर्मावरून अर्वाच्य आणि क्वचित अश्‍लीलही उद्धार करताना करताना दिसत होती. गावोगावी-गल्लोगल्ली समाजाच्या मनावर अघोरी द्वेषाचे, दहशतीचे व्रण उमटवणारा हा असा समाज आम्हाला अपेक्षित होता? वाटले, आपण नागपूर सोडण्यात चूक तर केली नाहीये ना?

अशा स्थितीत पोलीस शांत राहिले. ती पोलिसांची अगतिकता नव्हती, असहाय्यता नव्हती, बेफिकिरी नव्हती तर तो समंजसपणा होता. पोलिसांच्या कारवाईने आगडोंब उसळला असता. अशा अविवेकी, उन्मादी, हिंसाचारी आंदोलकांवर कारवाई समर्थनीयच आहे. त्यात पक्षीय, जातीय, धर्मीय राजकारण आणण्याची कोणतीही गरज नाही.

लेखक : प्रवीण बर्दापूरकर
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *