पुणे कॅन्टोन्मेंट-पुणे मनपा आणि 200 वर्षे!

पुणे कॅन्टोन्मेंट उर्फ पुणे लष्करी छावणीस या महिन्यात 200 वर्षे पूर्ण होत आहेत. बघता बघता पुणे लष्कर हा पुणेरी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनला होता, त्यास आता संपूर्ण दोन शतके पूर्ण झालीत! 1817 ते 2017 असा हा विलक्षण मोठा प्रवास आहे. काही दिवसांवर आलेल्या 2018 मध्ये आपण लवकरच प्रवेश करतोय. त्या वर्षालाही एक वेगळा ऐतिहासिक संदर्भ आहे. भारतात व्यापारासाठी व नंतर सत्तेसाठी लढाया जिंकत पुढे चाललेल्या ब्रिटिश सरकारला पुणं जिंकायला 1818 साल उजाडावं लागलं. बरोब्बर दोनशे वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. पुण्यातल्या पेशवाईचा अस्त आणि त्यानंतर आजपर्यंत या शहराचा बदलत गेलेला चेहरामोहरा हे ऐतिहासिक वास्तव या निमित्ताने आपल्यापुढे उलगडत जात आहे.

या अख्ख्या दोन शतकांची एक वेगळीच गंमत आहे. ती म्हणजे जसं जग बदललं तसं पुणंही बदलत गेलं! याच काळात जगभरात हळूहळू औद्योगिकीकरणाने वेग घ्यायला सुरुवात केली होती. कॅमेरा, टेलिफोन, टेलिग्राम, रेल्वे, वीज, विमाने आणि सिनेमा असे वेगवेगळे शोध याच दोनशे वर्षांच्या कालखंडात लागले होते. सायकली, मोटारी, सार्वजनिक पाणीपुरवठा, डांबरी रस्ते असे बदल होत होत सार्‍या जगाबरोबरच पुणेही बदलत गेले. या सार्‍याचे भले-बुरे पडसाद पुण्यावरही पडू लागले. विसाव्या शतकात पहिल्या व नंतर दुसर्‍या महायुद्धामुळे आलेले नवनवे तंत्रज्ञान जगाबरोबरच पुणेरी संस्कृतीमध्येही रुजत गेले. या दोन शतकांच्या कालखंडात लोकांचे पेहराव, फॅशन्स, विचार करण्याची पद्धत, जगण्याकडे पाहाण्याची दृष्टी आणि एकंदर जीवनशैलीच झपाट्याने बदलत गेली!

1851 मध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरू केलेली पहिली मुलींची शाळा, तर त्या पाठोपाठ इंग्रजी सत्ता उखडून टाकण्यासाठी झालेल्या स्वातंत्र्ययुद्धात पुण्याचा सहभाग हा 1857 मधलाच! याच वर्षी या स्वातंत्र्ययुद्धातील एक बंडखोर नानासाहेब पेशवे पुण्यात आहेत या अफवेुळे ब्रिटिश सरकार अस्वस्थ झाले होते. त्यामुळे पुण नगरपालिका स्थापन व्हायला 1858 हे साल उजाडले. त्यासही 2018 मध्ये 160 वर्षे पूर्ण होताहेत! पण 19 व्या शतकात पुण्यातील प्रबोधन हे देशासाठी एक आदर्श मानली जाणारी घटना ठरली. त्यात मुख्य म्हणजे शिक्षणाचा प्रसार आणि विधवा विवाह यासारख्या नव्या प्रथांना मिळालेले उत्तेजन.

पुण्यातील स्त्रियांची मानसिकता बदलत जाण्याचा हाच तो कालखंड. स्त्रीला केवळ चूल आणि मूल या बंधनातून मुक्त करण्याचे एक साधन म्हणून सायकलवरून फिरणार्‍या पुणेकर तरुणीला पाहून मार्गारेट कझिन्स या परदेशी महिलेला 1941 मध्ये विलक्षण आश्‍चर्य वाटले होते! शिवाय पुण्यात टिळक, गोखले, आगरकर, चिपळूणकर, न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे आणि महात्मा फुल्यांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे. 20व्या शतकाच्या आरंभी टिळकांच्या निधनानंतर गांधीयुग सुरू झाले. एकेकाळचे पेन्शनरांचे पुणे 1961च्या पानशेत पुरानंतर बेफाम वेगाने वाढत गेले! आधी औद्योगिक वाढ मग आयटी हब आणि आता स्मार्ट महानगरीकडे वाटचाल करणारे आजचे पुणे.. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी! दोनशे वर्षांतील हे चित्र वरवर असे वाटते तितके गोड गोड नाही. त्यासाठी अनेकांचे त्याग आहेत. शहरीकरणाचे तोटे आपण आज सोसत आहोत. पुणे लष्कराला पूर्ण झालेल्या 200 वर्षांच्या निमित्ताने हा एक धावता आढावा घेण्याचा मी प्रयत्न केला.

पुणे कॅन्टोम्नेंट बोर्डचा इतिहास व पुस्तक :

‘‘अ बॅलड ऑफ 200 इअर्स’’ हे पुस्तक पुणे लष्कराच्या वतीने नुकतेच प्रकाशित करण्यात आले. इतिहासाचे अभ्यासक असणार्‍या डॉ. दीर्घा नारायण यादव यांनी या पुस्तकाचे लिखाण केले आहे. ते पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांना मेहबूबा यूसुफ शेख आणि सुखदेव बाबूराव पाटील यांची मदत मिळाली. हे पुस्तक म्हणजे गेल्या 200 वर्षांचा पुणे परिसर व कॅन्टोन्मेंट बोर्डाचा इतिहासच आहे. 19, 20 आणि आता 21व्या शतकातील पुण्याचे हे एक चरित्रच आहे! हा पुण्याचा आत्माही वाटेल!

यादव पुढे म्हणतात की, इतिहासात पुण्याला पुण्यविषयक किंवा पवित्र शहर असेही एक नाव होते. त्यानंतर दहाव्या शतकात त्याला पुण्यक वाडी असे नवे नाव मिळाले. राष्ट्रकूटानंतर शिवाजी महाराजांपर्यंत हा प्रवास थक्क करणारा आहे. बाहेरून येणारी आक्रमणे, त्याला दिले गेलेले प्रत्युत्तर यातून महाराष्ट्रीय स्पिरिट म्हणता येईल याचे केंद्र बनले ते पुणे शहरच! छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांनी घालून दिलेला आदर्श पुणे लष्कराच्या उभारणीसाठी उपयोगी ठरला आहे, याची कृतज्ञता यादव व्यक्त करतात.

पाच नोव्हेंबर 1817 रोजी खडकीच्या घनघोर युद्धात पेशव्यांची पीछेहाट झाली आणि पुण्यात ब्रिटिश राजवटीने प्रवेश केला! तत्कालीन नियमांनुसार पुणे लष्कराची अधिकृत वाढ व्हायला सुरुवात झाली ती 1819 पासून. तत्कालीन जिल्हाधिकारी एच्. डी. रॉबर्टसन आणि पुणे लष्कराचे वरीष्ठ अधिकारी कर्नल गिफोर्ड यांच्या संयुक्त प्रयत्नांधून पुणे लष्कराचे व त्यापुढील आव्हानांचे शिवधनुष्य पेलले गेले! पूर्वेकडील माणिक नाला तर पश्‍चिमेकडील भैरोबा नाला तसेच घोरपडी आणि वानवडी यांच्या बेचक्यातील ही मोक्याची जागा निवडण्यात आली. ही जागा तेव्हा अनेक जमीनदार व वतनदारांच्या मालकीची होती. स्थानिक जहागीरदार, मिरासदार आणि इनामदारा यांच्याशी बोलणी करून व त्यांना नुकसान भरपाई देऊन मगच ही जमीन लष्करासाठी मिळवण्यात आली. खर्‍या अर्थाने 1827 मध्ये पुणे लष्कराला खर्‍या अर्थाने स्वत:चा आकार असणारा भूप्रदेश तयार करता आला.

याच काळात पुणे लष्कराला देश म्हणून भारताची खर्‍या अर्थाने सेवा करण्याची संधी मिळाली. लष्करी दृष्ट्या देशाचा दक्षिण विभाग म्हणून पुण्याचे असणारे महत्त्व हळुहळू वाढत गेले. पुढे पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धात येथील अनेकांचे हौतात्म्य देशसेवा करताना कामी आले. यात नागरी सुविधा, न्यायलये आणि त्यासाठी लागणारे व्यवस्थापन यातून गेल्या दोनशे वर्षांतील लष्करी बोर्ड आजच्या आधुनिक रूपात उभे राहिले आहे! ‘ ‘अ बॅलड ऑफ 200 इअर्स’’ हे पुस्तक साकारताना आपल्याला एम्. वाय्. शेख, सुखदेव पाटील, विजय चव्हाण, मनीष खंडागळे, अनिता जेस्ती आणि सुनिला नायर यांची बहुमोल मदत मिळाल्याची कृतज्ञता यादव व्यक्त करतात. याशिवाय पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर राजीव सेठी आणि दक्षिण विभागाच्या अनेक लष्करी अधिकार्‍यांचे ऋणही ते मान्य करतात. पुणे लष्कर विभागाचे महासंचालक जोनश्‍वर शर्मा यांची प्रेरणा ही या पुस्तकाच्या निर्मितीमागचे मुख्य कारण असल्याचेही यादव यांनी स्पष्ट केले आहे. लष्करी मनोवृत्तीच्या माणसात एकंदरच इतिहासाबद्दल व विशेषत: स्थानिक इतिहासाबद्दल असणारे प्रेम विलक्षण असते, याचा प्रत्यय यादव यांच्या प्रस्तावनेतून येतो.

मुठा नदीच्या तीरावर वसलेल्या पुण्यातून एकेकाळी माणिक नाला, नागझरी आणि पेशवे नाले वाहात असत. या पुण्यात पुणे कॅन्टोन्मेंटची स्थापना झाली व ते आज देशातले सर्वात जुने कॅन्टोन्मेंट म्हणून ओळखले जाते. पुण्यासाठी वापरण्यात आलेला इंग्रजीतला पूना हा शब्द पुण्यपुरा या नावापासून तयार केला व त्याचे कॅप्टन बेन्सन याच्याकडे जाते. हे नाव 1883 मध्ये देण्यात आले. जुन्या ऐतिहासिक संदर्भानुसार मुघल बादशहा अल्लाउद्दीन खिलजी याने पुण्यावर 1294 मध्ये स्वारी करून ते देवगिरीचे यादव यांच्याकडून ते ताब्यात घेतले. त्यानंतर शिवकालापर्यंत एका स्वतंत्र मुस्लिम वंशाने या ठिकाणी राज्य केले असल्याचे इतिहासकार सांगतात. इसवीसन 1636- 37च्या सुारास 12 वर्षांच्या बालशिवाजीने येथे येऊन या शहराचा कायापालट केला. शिवाजी महाराजांना पुणे हे जहागिरी वडिलोपार्जित मिळाले होते. यापूर्वी पुण्याची अवस्था बिकट होती. विजापूरच्या निजामशाहीचा हा भाग महाराजांनी एक प्रकारे स्वतंत्र करून तिथे शांतता प्रस्थापित केली. 1649 मध्ये त्यांनी पुण्याजवळील सिंहगड आणि पुरंदर हे किल्लेही सर केले.

मुघल सत्तेकडून ताब्यात घेतलेल्या पुण्यात महाराजांनी मराठा सत्ता प्रस्थापित केली. याच काळात अहमदनगर येथील मुघल सत्तेचा सूत्रधार खान जहाँ याने पुण्यावर स्वारी करून तिचे नाव मोहियाबाद ठेवण्याचा एक प्रयत्नही केला असल्याचे सांगितले जाते. ब्रिटिश कालखंडात 1803 मध्ये लॉर्ड वेलस्ली याने दुसर्‍या बाजीरावाशी संबंध जोडायचा प्रयत्न केला. त्या काळात त्याला पुण्याच्या पूर्वेकडील गारपीर भागात लष्करी छावणी उभारावी असे वाटले. ही गोष्ट अर्थात पेशव्यांच्या पतनापूर्वीची म्हणजे 1818च्याही आधीची आहे. या परिसराला एकेकाळी दख्खनचे कॅन्टोन्मेंट असेही म्हटले जाई. ब्रिटिश कालखंडात हा भाग हा

पुण्यातील संगमाजवळील ब्रिटिश रेसिडेंटलाही जवळचा होता. पुढे हाच भाग बॉम्बे प्रेसिडेन्सीमधला एक महत्त्वाचा लष्करी व्यवस्थापनाचा महत्त्वाचा तळ बनला. एकेकाळचे पुरोगामी पुणे हे अल्पावधीत आधुनिक अ‍ॅग्लोइंडियन बनले, असा दावा डेव्हिड किंकेड याने केला. त्यापूर्वी पेशवाईत बाळाजी विश्‍वनाथ पेशवा यांनी ब्रिटिशांची मदत फ्रेंच आरमारापासून संरक्षण करण्यासाठी घेतली होती. या माध्यमातून ब्रिटिशांनी व्यापाराच्या निमित्ताने पुण्यात प्रथम चंचूप्रवेश केला व तसा एक करारही करण्यात आला. पुढे पेशवाईच्या अस्थिर कालखंडात ब्रिटिशांचा हस्तक्षेप होत गेला. त्याची परिणती अखेर खडकीच्या युद्धात होऊन पुणे ब्रिटिश सत्तेखाली आले. या नंतर मात्र पुण्याला अधिकृतरीत्या लष्करी तळाचे व लष्करी व्यवस्थापनाचे एक व्यापक स्वरूप प्राप्त होत गेले. पुणे लष्कराच्या चतु:सीमा याच काळात निश्‍चित करण्यात आल्या. विविध व्यावसायिकांना एकत्र करून पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये व्यवसायासाठी जागाही देण्यात आल्या. या सिव्हिलियन्सना कॅम्प फॉलोअर्स असे संबोधले जाई! लष्कराच्या अनेक गरजा ही मंडळी पूर्ण करत. पुणे परिसरातील कायदा व सुव्यवस्था व कार्यक्षेत्र निश्‍चित करण्यासाठी क्रिमिनल मॅजिस्ट्रेट किंवा फौजदारी न्यायदंडाधिकारी नेण्यात आला. ब्रिटिशांचे कायद्याचे राज्य पुणे परिसरात अधिकृतरीत्या सुरू झाले ते याच काळात! सर एल्. स्मिथ हे त्या काळात म्हणजे 1827 मध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी होते.

पुणे हे लष्करी केंद्र बनण्याचे आणखी एक कारण होते. ते म्हणजे पुण्याचे हवामान व मुंबईच्या जवळ असणारा त्याचा फायदा. 4.25 चौरस मैल क्षेत्राच्या पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये सुरुवातीला 4,620 सैनिक होते असा उल्लेख सापडतो. या परिसरातील रस्त्यालगत तंबूत हे सैनिक राहात. माणिक व भैरोबा नाला याच्या मध्यवर्ती भागात पुढे त्यांच्या वसाहती व प्रशिक्षण केंद्र सुरू झाली. या ठिकाणी परेड, विविध मैदानी खेळ व गोळीबाराचा सराव करणारी ठिकाणेही विकसित झाली. लष्करी भागातले गाळीबार मैदान हे त्यातलेच एक! सातारा व सोलापूर रस्त्यावर पुढे ब्रिटिश सैन्यासाठी बराकीही बांधण्यात आल्या. मधल्या भागात लष्करी अधिकारी व विविध सोयीसाठी राखून ठेवण्यात आला. या भागाचा एक विकास आराखडाच तयार करून त्याच्या चतु:सीमांध्ये काय असावे याचे नियोजन करण्यात आले. भारतात रेल्वे गाड्या आल्यानंतर हा भाग रेल्वेचाही एक महत्वाचा भाग बनला.

भौगोलिक दृष्ट्या पुणे कॅन्टोन्मेंट परिसर हा पुण्यापेक्षा काहीशा उंचीवर वसला आहे. पुण्याची आल्हाददायक हवा हा परिसर वाढायला व अधिकाधिक विकसित व्हायला कारणीभूत ठरली. या पूर्वी पेशव्यांनी पुण्यात मराठी साम्राज्याचा भक्कम पाया रोवला होता त्याचा लाभ पुणे कॅन्टोन्मेट बोर्डाला झाला. सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही हा भाग अतिशय संपन्न होता. त्याचा लाभ पुणे लष्कराला आपोआप झाला. आर्थिक व लष्करी दृष्ट्या मराठी सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी मुंबईला जोडणारा बोरघाटातला रस्ता व पुढे रेल्वे रूळ टाकण्यात आले. मुंबई राज्याशी पुण्याचा असा जवळून संपर्क झाल्यामुळे पुण्यास मुंबई राज्याची उन्हाळी राजधानी म्हणूनही तेव्हा घोषित करण्यात आले होते! ब्रिटिशांच्या राज्य व संस्कृतीच्या सहवासातून पुण्यात परंपरा आणि आधुनिकता या दोन्हीचा सुरेख मिलाफ झाला.

पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट हा भाग पुढे महानगरी बनत चाललेल्या पुणे शहराचाच एक अविभाज्य भाग बनला. असे असतानाही या दोन्ही लष्करी भागांना त्यांचे वैशिष्ठ्य आजही अबाधित ठेवता आले आहे. तसेच तत्कालीन ब्रिटिश संस्कृतीचा ठसाही या भागावर उमटवता आला. व्यवस्थापनाच्या दृष्टीने पुणे कॅन्टोन्मेंटचे दोन भाग करण्यात आले. त्यात एक लष्करी तर दुसरा व्यापारी असणारा सदर बाजार भाग. बराच काळ या भागाचे नेतृत्त्व ब्रिटिश व्यक्तींकडेच असे. पण खान बहादूर एम्. एच्. दस्तुर हे पहिले भारतीय अधिकारी म्हणून नेण्यात आले. लष्करी पालिका म्हणून कॅन्टोन्मेंट कमिटीची स्थापनाही याच काळात झाली. 1883 मध्ये सदर बाजार भागात नंतर मोठ्या प्रमाणावर व्यापारी दृष्टीने विकास झाला. मेन स्ट्रीट व ईस्ट स्ट्रीट अशी नावे त्या रस्त्यांना देण्यात आली. त्यातल्या मेन स्ट्रीटला पुढे महात्मा गांधींचे नाव देण्यात आले. सुरुवातीला छोटी व कच्ची बांधकामे असणारा हा परिसर पुढे एक व दोन तसेच तीन मजली इमारती बांधल्याने बदलत गेला. तळमजल्यावर व्यवसाय व वरच्या मजल्यांवर राहाण्याची व्यवस्था अशी या इमारतींची रचना आपोआप तयार होत गेली. लष्करी भागातील इमारतींचे स्थापत्य हे प्रामुख्याने इंडो-युरोपियन पद्धतीचे आहे. यातील बहुतेक इमारती या स्थानिक बेसॉल्ट दगडातून बांधण्यात आल्या. याच परिसरातील ब्रिटिश पद्धतीचे बंगले उंच पाया आणि भव्य व्हरांडे पद्धतीने उभारण्यात आले. यातील अनेक बंगले भारतीय किंवा स्थानिक पुणेकरांनी बांधले असून ते नंतर भाडेतत्त्वावर ब्रिटिश अधिकार्‍यांना देण्यात आले होते. कॅन्टोन्मेंट भागातील महत्त्वाच्या इमारती या गॉथिक पद्धतीने बांधण्यात आल्या. युरोपियन बांधकामाचा त्यावर विशेष प्रभाव असलेला दिसतो. याकडे पाहिल्यावर ब्रिटिश ऐतिहासिक वारसा घेऊनच त्या इथे उभारण्यात आल्या आहेत की काय याचा प्रत्ययही येतो! रस्ते व पाणी पुरवठा या सोयी इथे लवकरच सुरू करण्यात आल्या, ते वर्ष होते 1867.

नवीन मोदीखाना भागात इ.स. 1900 मध्ये एक रुग्णालय सुरू झाले होते, तर पुढे 1928 मध्ये कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल बांधण्यात आले. लष्कर भागातील पहिली दफनभूी 1822 मध्ये लोटियन रोड भागत काढण्यात आली. पुणे शहर आणि कॅन्टोन्मेंट यांच्यातील संबंध सख्ख्या भावांसारखे प्रेाचेच राहिले आहेत. पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट हे दोन्ही पुणे शहरात दुधात साखर मिसळावे तसे बेालून मिसळले आहे.

पुणे महानगरपालिकेची सुरुवात :

महापालिकेपूर्वीची पुणे नगरपालिका ही आकाराने लहान होती. 1850 च्या म्युनिसिपॅलिटी अ‍ॅक्टनुसार पुणे नगरपालिका 1858 च्या सुमारास अस्तित्वात आली होती. याशिवाय पुणेकरांनीही अशा नगरपालिकेची लेखी मागणी केली होती. त्यामध्ये सुरुवातीला दोन तृतीयांश सदस्य हे सरकारचे तर उरलेले एक तृतीयांश बिगर सरकारी होते. त्यांची पहिली निवडणूक 1882 मध्ये झाली. ती पुणे जिल्हाधिकार्‍याच्या आखत्यारीत येत होती. जिल्हाधिकारी हाच त्याचा अध्यक्ष म्हणून ते काम 1885 पर्यंत पाहात असे. 1877-78च्या सुमारास सदस्यांची संख्या वाढून 36 झाली. पुढे 1920 मध्ये म्युनिसिपल कायद्यात बदल झाल्याने सरकारी नेलेल्या सदस्यांपेक्षा लोकनियुक्त प्रतिनिधींची संख्या वाढली. 1923 मध्ये साहित्यसम्राट न. चिं. केळकर हे निवडून आलेले पहिले लोकप्रतिनिधी होते!

नगरपालिकेनंतर जेव्हा पुणे महापालिकेची स्थापना 1951 च्या सुमारास झाली तेव्हा महापालिकेचे पहिले आयुक्त स. गो. बर्वे यांनी तत्कालीन पुण्याच्या नागरी सुविधांचा आढावा घेतला. 1858 मध्ये पुणे नगरापालिकेची उत्पन्न 28,005 रुपये होते, तर पुणे महापालिका सुरू झालेल्या वर्षी ते 1,12, 77,859 रुपये इतके होते. पुणे महापालिकेचे कार्यक्षेत्र तेव्हा 50 चौरस मैल व लोकसंख्या सुारे पाच लाख होती! उत्पन्नाचे मूळ स्रोत हे विविध करप्रणाली यातून मिळत होते. पूर्वी त्यामध्ये घरपट्टी, भंगी पट्टी, पाणी पट्टी आणि रस्ता पट्टी यांचा समावेश होता. 1921 नंतर त्यात ड्रेनेज पट्टी, थिएटर कर, आणि हॉटेल कर लागू झाले. याशिवाय जकातीची सुरुवात 1876 पासून झाली होती.

1875 पर्यंत पुण्यात स्वच्छ पाणी पुरवठा हा कात्रजच्या तलावातून होत होता. उपलब्ध कागदपत्रांतील माहितीच्या नुसार तेव्हा पुण्यातील 539 घरांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची नोंद आहे! पुढे जेव्हा 1870 मध्ये खडकवासला धरण बांधायला सुरुवात झाली तेव्हा प्रत्यक्ष पाणी पुरवठा 1879 पासून पुण्याला सुरू करण्यात आला. सार्वजनिक वाहतूक ही संकल्पनाही पुण्यात 1870 पासून सुरू झाल्याची नोंद आहे. त्या काळात छकडे व नंतर टांगे आणि व्हिक्टोरिया घोड्या गाड्या यांच्यातूनच ही वाहतूक होत असे. पुण्यात टांग्यांचे आगमन 1903 मध्ये झाले. 1951 मध्ये शहरातील वाहन संख्या अवघी 8,620 इतकी कमी होती! पुणे तेव्हा खर्‍या अर्थाने शांत व पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त शहर होते. पुण्यात भूमिगत गटारे बांधायलाही 1919 पासून सुरुवात झाली. रस्ते साफ करण्याची जबाबदारीही तेव्हा आरोग्य खात्याकडे होती.

आरोग्य खात्याकडून आधीपासूनच घराघरात डीडीटी हे औषध फवारणीचे काम होत असे. तसेच उंदीर, घुशी पकडण्याचे कामही केले जात असे. विविध धर्मीयांच्या दहन व दफनभूींची संख्या या काळात 59 इतकी होती. रस्त्यावरील वाहतुकीसाठी 1950 मध्ये व त्यापूर्वी आधीही रस्ते रुंदीकरणाची मोहिम काढण्यात आली होती. शहराच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ताही 1935 मध्ये रुंद करण्यात आला. डांबरीकरणाच्या कामासही याच काळात सुरुवात झाली व त्यास वेगही आला. एकेकाळी पुण्यात मलेरियाची साथ होती. पण 1917 मध्ये मुठा नदीवर बंडगार्डन येथे बांधारा बांधला व शहरात ठीकठिकाणी साठून राहाणार्‍या पाण्याचे व त्यावर अंडी घालणार्‍या डासांचे प्रमाण एकदम कमी झाले. मुठा नदी सुधारणेचा घाट याच काळात घालण्यात आला होता हे आज आवर्जून सांगायला हवे!

1877 मध्ये पुण्यात तेल व रॉकेलवर लावले जाणारे 431 दिवे रस्त्यावर लावले जात होते. त्यांना दिवाबत्ती म्हणत. 1921-22 पासून हळुहळू रॉकेलच्या दिव्यांची जागा विजेच्या खांबावरील दिव्यांनी घेतली. आधी साठ व मग शंभर वॅट क्षमतेचे दिवे रस्त्यावर लावण्यात आले. 1950-51मध्ये रस्त्यांवरील विद्युत दिव्यांची संख्या 1,035 इतकी होती! याच काळात पुण्यात एकंदर दहा सार्वजनिक उद्याने तयार करण्यात आली होती. त्यातले पहिले उद्यान म्हणजे छत्रपती संभाजी महाराज उद्यान. याच काळात महापालिकेत स्वतंत्र उद्यान विभाग सुरू झाला.

पुणे महानगरापलिकेची स्वत:ची सार्वजनिक बससेवा 1 मार्च 1950 पासून सुरू झाली. पुणे म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट किंवा पीएम्टीकडे या काळात शेवर्ले कंपनीच्या 35 नवीन बसेस खरेदी करण्यात आल्या होत्या. त्याच्या जोडीला काही बसथांबे ही उभारण्यात आले. पीएम्टीपूर्वी पुण्यात सिल्व्हर जुबली बस ही एक खासगी स्वरूपाची बस सेवा कार्यरत होती, असे जुन्या पिढीचे लोक सांगतात.

पुण्याचे पहिले आयुक्त म्हणून स. गो. बर्वे यांची 19 जानेवारी 1949 रोजी नेणूक करण्यात आली होती. पुणे शहर व उपनगरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचाही कारभार त्यांना पाहण्यासाठी नेण्यात आले होते. महापालिकेच्या या बाल्यावस्थेत अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची आखणी करण्यात आली. अर्थात त्यातल्या अनेक योजन तांत्रिक कारणामुळे प्रत्यक्षात उतरू शकल्या नाहीत. त्यापैकी शहरातील मुठा नदीच्या दोन्ही भागांवर शंभर फूट क्षेत्रात हिरवळ व त्यामागे मोठे रस्ते बांधण्याची योजना बर्वे यांनी आखली होती. नदी पात्राला लागून असणार्‍या या क्षेत्रात कोणतेही बांधकाम नको अशी ही योजना नंतर मात्र कधीही प्रत्यक्षात येऊ शकली नाही. तत्कालीन पुणेकरांना याचे आजही वाईट वाटते. कदाचित मुठा नदीची दुरवस्था त्यातून काही प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत झाली असते हे खरे आहे. पुण्यातील रस्ते, बागा, पोहोण्याचे तलाव आणि अनेक नागरी सुविधा यांच्या संदर्भात विस्तृत योजना आखण्यात आल्या होत्या.

आज पुणे महापालिकेच्या स्थापनेनंतर 68 वर्षांनी पुण्याचे बदलते चित्र पाहिले की बर्वे यांच्यासारख्या द्रष्टेपणाचे कौतुक व अभिमान वाटतो. पुणे कॅन्टोन्मेंट हा परिसरही पुण्याशीच एकनिष्ठपणे संलग्न राहिला व त्यातून या सर्वच भागाची खर्‍या अर्थाने भरभराट झाली. आज स्मार्ट सिटी व मेट्रो रेल्वेसारख्या योजनांध्ये 21 व्या शतकातील पुण्यापुढे मोठी आव्हाने आ वासून उभी आहेत. ती कशी सोडवली जातील याकडे सर्व पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे. आता घोडामैदान फार लांब नाही!

 

लेखक -विवेक सबनीस 

संपर्क – swatantranagrik@gmail.com    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *