पाकिस्तानची घालमेल

 गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वीच चार पावले पुढे जाऊन बॅट सरसावत षटाकार ठोकायला निघालेल्या फलंदाजाचा आवेश मोठा शौर्यपूर्ण नक्कीच असतो पण बॅटच्या आवाक्यातून चेंडू निसटला, तर थेट यष्टीवर जाऊन आदळतो आणि नामोहरम होऊन माघारी तंबूत परतावे लागत असते. अगदी चेंडू यष्टीवर आदळला नाही आणि तो यष्टीरक्षकाच्या हाती गेला तरी बाद होण्यातून सुटका नसते. काहीशी तशीच अवस्था आता पाकिस्तानची झालेली आहे. गतवर्षी पाकने मोठ्या चतुराईने इराणमधून कुलभूषण जाधव यांचे अपहरण केले. तालिबानांच्या मदतीने हे अपहरण केल्यावर कुलभूषण हा कसा भारतीय हेरखात्याचा अधिकारी म्हणून पाकिस्तानात घातपात व हिंसाचार घडवत होता, त्याचाही डंका पिटून घेतला. अशा गोष्टी घडतात, तेव्हा त्याचा इतका डंका पिटला जात नाही. हेरखात्याचा माणूस शत्रू देशात पकडला गेला, तर आधी तशी माहिती त्याच्या देशाला म्हणजे सरकारला कळवली जाते आणि सौदेबाजी सुरू होते. कारण प्रत्येक देश दुसर्‍या देशात असे उद्योग करीत असतो. त्यामुळे आपला कोणी दुसर्‍या देशात पकडला गेला असेल, तर त्यांची अदलाबदल करून विषय निकालात काढला जात असतो. कुलभूषण हा तसा भारतीय हेर असता तर पाकने असले उद्योग नक्कीच केले नसते. उलट त्याच्या बदल्यात भारताच्या ताब्यात असलेल्या आपल्या काही हेरांची अदलाबदल करण्याचा छुपा गेम केला असता पण पाकने तसे केले नाही. कारण त्याला आपल्या मुरब्बी धूर्तपणावर अधिक विश्‍वास होता आणि कुलभूषणला पकडून त्याचा जागतिक तमाशा बनवण्याचाच मूळ हेतू होता. मात्र असे डाव खेळताना धोका असतो आणि ते जपून खेळावे लागतात. अन्यथा बॅट सरसावून पुढे धावलेल्या फलंदाजासारखी नामुष्की पदरी येत असते. पाकिस्तानची आता कुलभूषण प्रकरणात तशीच अडचण होऊन बसलेली आहे.

पाकने कुलभूषण भारताचा हेर असल्याचे घोषित केल्याने भारताने तशी जबाबदारी घेण्याचा मार्ग बंद करून टाकलेला होता. पण खरेच तो भारताचा तसा घातपाती हेर असता, तरी भारताला त्याला सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावाच लागला असता पण कुलभूषण हेर नसेल तर भारताच्या कुठल्याही कारस्थानाचा गवगवा होण्याची भिती नाही. त्याला एक अपहरण झालेला नागरिक म्हणून सुटकेची मागणी करणे भारताला शक्य झालेले आहे. म्हणूनच शिष्टाचारानुसार भारताने आधी कुलभूषणला भारतीय राजदूतांची भेट देण्याची मागणी केली. अनेकदा प्रयत्न करूनही ती मागणी मान्य झाली नाही, तेव्हा आपल्या निरपराध नागरिकाच्या मुक्ततेसाठी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दार ठोठावले. त्यापूर्वीच पाकने कुलभूषणला लष्करी कायद्यानुसार फाशीही फर्मावली होती आणि विनाविलंब जागतिक व्यासपीठावर न्यायाची मागणी करण्याचा भारताचा मार्ग खुला झाला. तिथे भारताने अशी खेळी केली, की पाकिस्तानची पुरती नाचक्की होऊन गेली. आता आपणच योजलेल्या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानची तारांबळ उडालेली आहे. दरम्यान भारताने पाकिस्तानच्या एका खर्‍याखुर्‍या हेराला नेपाळमधून पळवून नेल्याचा पाकचाच आरोप आहे. मात्र भारताने ते मान्य केलेले नाही वा पाकिस्तानने तसा उघड आरोप केलेला नाही. त्यामुळेच त्याच्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टातही जाऊ शकत नाही पण ज्याचे अपरहण भारताने केल्याचा दावा आहे, तो खराखुरा पाक हेरखात्याचा निवृत्त अधिकारी असल्याने, त्याची कुठल्याही मार्गाने सुटका करून घेण्यासाठी पाकिस्तानवर दडपण आलेले आहे. पण कुणाशी सौदा करायचा? कारण भारताने झहीर नामे पाकहेर आपल्याकडे असल्याचे कुठेही सुचवलेले नाही. पाकला कुलभूषणच्या बदल्यात झहीरची मुक्ती हवी असल्याचे संकेत आता मिळू लागले आहेत.

मागल्या आठवडाभरात पाकिस्तानच्या विविध वर्तमानपत्रात हा विषय मुद्दाम चघळला जातो आहे. कुलभूषणची अदलाबदल होऊ शकली असती, पण भारतानेच थेट आंतरराष्ट्रीय कोर्टात जाऊन तो मार्ग बंद करून घेतला, अशा आशयाच्या अनेक बातम्या पाक वर्तमानपत्रात झळकत आहेत. ह्या बातम्या वा लेख कुणा भारतीय अनुभवी अभ्यासक वा विश्‍लेषकांनी लिहिल्या असल्याचेही भासवले जात आहे पण त्यातला तपशील महत्वाचा नसून त्यातला पाकिस्तानचा उतावळेपणा महत्त्वाचा आहे. कुलभूषण प्रकरणात रंगवलेल्या नाटकाच्या सापळ्यात पाकिस्तानच अडकला असल्याने त्याला कुलभूषणची अदलाबदल करण्याचा प्रस्तावच देता येत नाही. कुणाच्या बदल्यात अदलाबदल करायची? तशी करायची होती, तर कुलभूषण हा विषय इतका जाहीरपणे गाजवायची गरज नव्हती. ज्याला हेर म्हणून भारताने मानलेलेच नाही, त्याच्या बदलीचा सौदा भारत कसा करू शकतो? त्यासाठी भारताला हेरगिरीचा आरोप पान्य करावा लागेल. ते अशक्य असल्याने आणि पाकला तशी काही ऑफर देणेही शक्य नसल्यानेच, अशा बातम्या व लेखनातून संकेत दिले जात आहेत पण त्याची काहीही गरज नाही. त्याचे ही योग्य मार्ग ठरलेले आहेत. शिष्टाचारानुसार अशा गोष्टी दोन देशांचे वकील वा परराष्ट्र खात्यामार्फत गुपचुप केल्या जात असतात. त्याची बाहेर कधी वाच्यता केली जात नाही. पाकने आगाऊपणे ती चूक केली असल्याने त्यांनीच रचलेल्या सापळ्यात त्यांचे हातपाय अडकलेले आहेत. मात्र त्यातून सुटण्याच मार्ग मिळेनासा झाला आहे. मग अशा लेखातून आपण सौदा करायला तयार असल्याचे संकेत दिले जात असतात. पण ज्याप्रकारे माध्यमे व वर्तमानपत्राचा त्यासाठी वापर केला जातो आहे, त्यातून पाकिस्तान अधिकच केविलवाणा झालेला दिसू लागला आहे कारण कुलभूषणचे अपहरण झाले, तेव्हापेक्षा पाकची स्थिती आज आमूलाग्र बदलून गेली आहे.

दोन वर्षांपुर्वी पाकिस्तान हा अमेरिकेचा जवळचा मित्र होता आणि आज पाकला ट्रंप प्रशासनाने अनुदानही नाकारलेले आहे. राज्यकर्ते आणि लष्कर यांच्यात बेबनाव सुरू झालेला आहे. त्यात सौदी अरेबियाला हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे आणि देश आर्थिक दिवाळखोरीच्या कडेलोटावर येऊन उभा आहे. त्यामुळे लष्करे तोयबा वा अन्य जिहादी टोळ्यांना लगाम लावावा लागतो आहे. अर्थकारण गळ्याशी आलेले आहे. कुठल्याही बाबतीत एकवाक्यता उरलेली नाही. अशावेळी कुलभूषण जाधव हे पाकसाठी गळ्यात फसलेले ओझे झाले आहे. तो विषय सन्मानाने निकालात निघावा, अशीच पाकची किमान अपेक्षा आहे. मात्र तो निकालात काढताना भारताच्या मागणीला शरण गेलो, असेही तिथल्या राज्यकर्त्यांना वा लष्कराला दिसू द्यायचे नाही. म्हणून मग सौहार्दाने अदलाबदलीचा पर्याय पाकला हवा आहे. त्यासाठी आपण तयार असल्याचे संकेत म्हणूनच अशा लेखातून दिले जात असतात.

मुळातच कुलभूषणच्या खटल्याचे नाटक रंगवण्याची काही गरज नव्हती. त्यातला विनोदही मजेशीर आहे. तीन महिन्यांपुर्वी पाकमध्ये अशा बातम्या होत्या की भारताने हेरांची अदलाबदली करायची पाकला ऑफर दिलेली आहे. कुलभूषण कोणाच्या बदल्यात पाकिस्तानने द्यावा? असा कोण भारताच्या कब्जात आहे? पाकचे पररष्ट्रमंत्री ख्वाजा महंमद आसीफ यांनी तसे म्हटलेले होते. अफगाणिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुणा एका दहशतवादी कैद्याच्या बदल्यात म्हणे भारताने कुलभूषणची मुक्ती मागितली आहे. जो कैदी भारताच्या ताब्यातच नाही, त्याचा सौदा भारत कसा करू शकतो? ख्वाजा यांनी अफ़गाण तुरूंगातील त्या कैद्याचे नावही सांगितलेले नाही. पण तो पेशावरच्या शाळा संकुलात बॉम्बस्फोट करणारा असल्याचे म्हटलेले होते. आज त्याच पाकचे संरक्षणमंत्री पेशावरच्या घातपाताचे खापर हफीज़ सईदवर फोडत आहेत.

एकूणच पाकची किती दुर्दशा झाली आहे, त्याचा यातून अंदाज येऊ शकतो. तीन महिन्यांपूर्वी एक पाक मंत्री पेशावरच्या शाळा संकुलातील स्फोटाचा आरोप कुणावर तरी करतो आणि आज त्याच पाकचा दुसरा मंत्री त्याच घातपाताचे खापर हफीजज़ फोडतो आहे. मुद्दा सोपा आहे. कुलभूषणला फाशी देऊन हा विषय संपणारा नाही, याची पाकला खात्री पटलेली आहे. त्यावरून जो तमाशा केला, त्याचा कुठलाही लाभ होऊ शकलेला नाही. मात्र भारताच्या ताब्यात असलेल्या कुणा पाक हेराला सोडवून घ्यायलाही कुलभूषणचा उपयोग राहिलेला नाही. त्यातच असले खेळ व पोरखेळ करण्याइतकी पाकची स्थिती सुखदायी उरलेली नाही. अमेरिकेने व जगाने पाकवर मोठे दडपण आणायचा वेग वाढवलेला आहे. अशा स्थितीत कुलभूषणचा विषय जितका लवकर निकालात निघेल तितका पाकला हवा आहे. मात्र पुन्हा एकदा भारताकडून थप्पड खाल्ली, असेही जनतेला दिसू नये अशी कोंडीही झालेली आहे. त्यामुळेच गयावया केल्यासारख्या या हेरांच्या अदलाबदलीच्या बातम्या व लेख पाक वर्तमानपत्रात छापले जात आहेत. अर्थात अशा सौदेबाजीला भारत प्रतिसाद देण्याची बिलकुल शक्यता नाही. सप्टेंबरमध्ये ख्वाजा या मंत्र्याने भारताची तशी ऑफर असल्याची थाप मारून काही साधलेले नाही. म्हणून आता जाणकार विश्‍लेषकांच्या नावाने पुड्या सोडल्या जात आहेत. त्यापेक्षा आपली अब्रू राखण्यासाठी पाकिस्तानने सत्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न केल्यास, त्या देशाचे अधिक कल्याण आहे. कारण आता जगात पाकला चीनखेरीज कुठलाही मित्र शिल्लक उरलेला नाही आणि चीनही अधिक काळ पाकचे समर्थन करण्याची बिलकुल शक्यता नाही. मुळात आपली कुवत नसताना इतका आगावूपणा करायचा नसतो. कारण नुसता आवेश आणून भ्रम निर्माण करता येत असला, तरी खर्‍या लढाया शौर्यानेच जिंकल्या जातात.

लेखक : भाऊ तोरसेकर
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *