डॉ. माशेलकर – संकटांचे संधीत रूपांतर करणारे शास्त्रज्ञ!

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आयुष्याशी सामना करत-करत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात आणि त्या माध्यमातून देशाच्या विकासामध्ये मोलाची भर घातली आहे. जगभरातील 38 विद्यापीठांनी सन्माननीय डी. लिट्. देऊन त्यांचा सन्मान केला आहे. संपूर्ण जगातील सुमारे 60 हजार शास्त्रज्ञांच्या ‘‘ग्लोबल रिसर्च अलायन्स’’ या संघटनेचे ते सध्या अध्यक्ष आहेत. येत्या 1 जानेवारी रोजी डॉ. माशेलकर वयाची 75 वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांचे जवळचे स्नेही आणि ‘जडण-घडण’’ मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी डॉ. माशेलकर यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने लिहिलेला त्यांच्या आयुष्यातील संघर्षांच्या दिवसांबद्दलचा हा लेख.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचं लहानपण अतिशय गरिबीमध्ये गेलं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत समोर आयुष्य आ वासून उभं होतं. रोजचाच दिवस त्यांच्यासाठी, त्यांच्या आईसाठी कसोटीचा होता. रोज या दोघांना खाण्याचीच भ्रांत असायची. आई डोक्यावरून कापडाचे तागे वाहून न्यायची आणि त्या रोजंदारीवर दोघांचं पोटं भरायचं. मराठी म्युनिसिपल शाळेध्ये शिक्षण फुकट असल्यामुळं ते मुंबईत शिकू शकले, नाहीतर शिकणंही अशक्य झालं असतं. त्यांची शाळासुद्धा इतकी गरीब होती, की दर शनिवारी परीक्षेसाठी उत्तरपत्रिकाही त्यांना घरूनच न्याव्या लागत. त्या स्टेपल केलेल्या उत्तरपत्रिका 3 पैशाला मिळायच्या. एका शनिवारी त्या उत्तरपत्रिका आणण्यासाठी लागणारे तीन पैसेही घरात शिल्लक नव्हते…

सातवी झाल्यानंतर आठवीला हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा होता. त्यांना 84 टक्के गुणमिळाले होते. सगळी मिळून फी होती एकवीस रुपये! पण या माय-लेकांना तितके पैसे जमवण्यासाठी तीन ते चार आठवडे लागले. अतिशय कष्टानं त्यांनी तेवढे पैसे गोळा केले, पण तोपर्यंत चांगल्या शाळांधील प्रवेश पूर्ण झाले होते. ते राहात होते त्या परिसरात आजूबाजूला तीनचार चांगली हायस्कूल्स होती. विल्सन स्कूल, आर्यन स्कूल, चिकित्सक हायस्कूल अशा गिरगावातील प्रसिद्ध शाळा होत्या. पण त्यांना युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यावा लागला. त्यावेळी ते नावाजलेलं वगैरे नव्हतंच, पण जे झालं ते एका अर्थी चांगलंच झालं, कारण तिथं त्यांना चांगले शिक्षक भेटले. अत्यंत तळमळीनं शिकवणारे शिक्षक भेटले… आणि त्यांच्या आयुष्याला चांगली दिशा मिळाली. ती शाळा गरीब होती, पण शिक्षक मात्र श्रीमंत मनाचे होते.

पुढं त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. बोर्डात त्यांचा नंबर आला. पण मॅट्रिक झाल्यावर पुढे शिकायचं कसं? हा मोठा बाका प्रसंग होता. त्यावेळी युनियन हायस्कूलमध्ये ‘‘हिरा नाईट स्कूल’’ होतं. तिथं रात्री कॉलेज करायची सोय होती. दिवसा काम करायचं आणि रात्री शिकायचं असं त्यांनी ठरवलं होतं, पण सुदैवानं त्यांना टाटा ट्रस्टची स्कॉलरशिप मिळाली. त्यावेळी महिना साठ रुपये अशी ती स्कॉलरशिप होती. ती सहा वर्षे मिळत गेली. म्हणूनच केवळ ते शिकू शकले. पण दुसरी अडचण नेहमी जाणवायची ती ही की, अभ्यास कुठं करायचा? अभ्यास करायला घरात जागाही नव्हती आणि आजूबाजूला तसं वातावरणही नव्हतं. तेव्हा ते बॉम्बे सेंट्रल रेल्वे स्थानकावर अभ्यासाला जाऊ लागले. रात्री दहा वाजता गुजरातला, अहमदाबाद-सुरतला जाणारी शेवटची एक्स्प्रेस होती. ती गेली की दहा वाजल्यानंतर त्या प्लॅटर्फॉवर कोणीही नसे. म्हणून ते तिथं अभ्यास करायचे. संकटं आली, कसोटी पाहणारे बरेच क्षण आले, पण त्यावर मात करायचे मार्गही सापडले. अर्थात ते शोधावेच लागले, पण ‘‘धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे’’ असं होत गेलं. या संकटामुळंच त्यांच्यातलं सामर्थ्य आणि आत्मविश्‍वास वाढत गेला.

पुढं त्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. इंजिनिअर झाल्यावर संशोधनासाठी इंग्लंडला गेले. तिथं गेल्यावर स्वतःला सिद्ध करून दाखवणं हीच मोठी कसोटी होती, कारण तो पन्नास वर्षांपूर्वीचा काळ होता. आज परिस्थिती खूपच बदलली आहे. पन्नास वर्षांपूर्वी नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे संचालक एक ब्रिटिश होते. नंतर लंडनच्या इन्स्टिट्यूशन ऑफ केमिकल इंजिनिअर्स या संस्थेचे 50 वे अध्यक्ष होण्याचा मान डॉ. माशेलकर यांना मिळाला. पण तेव्हाचा काळ खूपच वेगळा होता. भारतीयांकडं तुच्छतेनं बघितलं जायचं. अनादरानं, अनास्थेनं वागवलं जायचं. तुलनेनं अमेरिकेत भेदभाव कमी होता. पण इंग्लंडमध्ये परिस्थिती वाईट होती. त्यातून ते लेक्चरर होते. इंग्रजांशी स्पर्धा करून त्यांच्याबरोबर टिकायचं, जिंकायचं हे अतिशय अवघड होतं. आपल्यामध्ये गुणवत्ता असताना इंग्रजांबरोबर स्पर्धा करून जिंकायचं हे नेहमीच मोठं आव्हान असायचं, असं त्यांना वाटत असे.

ते सांगतात, ‘‘1982 मध्ये अथेन्समध्ये इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अ‍ॅन्ड अ‍ॅप्लाईड केमेस्ट्री (ज्याला आयुपॅक म्हणतात) तिथं मला बीजभाषण (की नोट अ‍ॅड्रेस) द्यायला निमंत्रित केलं होतं. गंत अशी की माझ्या आधी नोबलविजेते ‘पॉल फ्लोरी’ यांचं व्याख्यान होतं. त्यांच्यानंतर बोलायचं म्हणजे मला खूपच टेन्शन आलं. ‘पॉल फ्लोरी’ हे खूपच मोठे होते. पॉलिमरमधले ते एकमेव नोबेल विजेते होते. आमच्यासाठी तर ते दैवतच होते. त्यांच्यानंतर बोलणं हे खूप मोठं आव्हान होतं. मी खूप घाबरलो होतो. तिथंच सभागृहात माझं मलाच प्रोत्साहन द्यावं लागलं की, ‘अरे, असा काय घाबरतोस? तुझी योग्यता नसती तर त्यांनी तुला बोलावलं असतं का? आणि त्यातून भारतीय असताना बोलावलं म्हणजे तू फक्त बरोबरीचाच नाहीस तर दसपटीने तरी जास्तच आहेस.’’ अशा तर्‍हेनं माझं मलाच चढवावं लागलं… आणि पाचशेजणांच्या सभागृहात नंतर माझं सुंदर व्याख्यान झालं. तेव्हा मी खूपच तरुण होतो. तिथं जमलेल्या दिग्गजांध्ये खूपच लहान होतो.

त्यानंतर मी अमेरिकेला गेलो. तिथून मी 1978 मध्ये म्हणजे 33 व्या वर्षी भारतात परत आलो. पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचा असिस्टंट डायरेक्टर म्हणून माझी नियुक्ती झालेली होती. पण हे पद खूपच वरचं होतं. वरचं अशा अर्थानं की तोपर्यंत पन्नास, पंचावन्न वर्षाचं झाल्याखेरीज हे पद मिळत नसे. त्यामानानं मी खूपच तरुण होतो. म्हणून मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी इथंही खूप संघर्ष करावा लागला. ‘‘तू कसा या पदावर टिकतोस तेच आम्ही बघतो’’ असं आव्हान देणारे होते. त्रास देणारेही होते. अर्थात ते महाराष्ट्रीयनच होते. आपल्याच माणसांशी संघर्ष करायचा हे खूपच कष्टप्रद असतं. मानसिकदृष्ट्या त्रासदायक असतं.’’’’ पुढचा अनुभव तर आणखीनच वेगळा आहे.

जेव्हा भोपाळ वायुदुर्घटना झाली, त्यामध्ये सुमारे दोन हजार लोकं प्राणाला मुकली, त्यावेळी ते आयुष्यात पहिल्यांदा तिरुपतीला (सुट्टीवर) गेले होते. तोपर्यंत त्यांनी कधीच एवढी सुट्टी घेतली नव्हती. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी वैशाली या देखील होत्या. तेवढ्यात तिथं त्यांना सारखे फोन यायला लागले. त्यांच्यावर एक अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि त्वरित भोपाळला येण्याबद्दलचे ते फोन होते. त्यांना यायला विमान नव्हतं. त्यातच सौ. वैशाली या आजारी पडल्या. तेव्हा शासकीय अधिकार्‍यांनी सांगितलं की आम्ही विमान पाठवतो, पण तुम्ही त्वरित भोपाळला या. डॉ. माशेलकर तेथे पोहोचले. सगळा हाहाःकार उडाला होता. सरकारनं त्यांना चौकशी समितीवर नेलं. त्यावेळी लोकांना सामोरं जाणं, चौकशी करणं… त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा कसोटीचा काळ हा होता, शेकडो निष्पाप लोकांचा या वायुदुर्घटनेत बळी गेला होता. त्यांच्याशी जवळून संबंध आला. त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. खूपच तणावाचा काळ होता तो!

दुसरा एक प्रसंग त्यांना आठवतो,  ‘नागोठाण्या’ला’ जो मोठा अपघात झाला तेव्हाचा! त्यावेळी त्यात 34 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा चंद्रशेखर हे पंतप्रधान होते आणि त्यांनी डॉ. माशेलकरांना फोन केला. चौकशी समितीचे प्रमुख म्हणून त्यांनी काम करावं अशी पंतप्रधानांची इच्छा होती. त्यांच्यासाठी हाही असामान्य अनुभव होता. तिथं गेल्यावर त्यांनी पाहिलं तर एखाद्या बॉम्बमुळं उद्ध्वस्त व्हावं तसं सगळं बेचिराख झालं होतं. तिथं त्यांची दुसरी वेगळीच कसोटी होती, लोकांचा मुळीच विश्‍वास नव्हता. सरकार योग्य ती योग्यप्रकारे चौकशी करेल अशी त्यांना खात्री नव्हती. चौकशी समितीकडं तांत्रिक चौकशी करायची क्षमताच नाही अशी लोकांची धारणा होती. त्यामुळं विदेशी तज्ज्ञ बोलावण्याची त्यांची मागणी होती, आणि त्यामध्ये राजकीय दबावसुद्धा खूप यायला लागला. काही झालं की कोणाला तरी जबाबदार धरायचं, बळीचा बकरा करायचं आणि सुळावर चढवायचं ही एक पद्धत आहे आपल्याकडं, पण डॉ. माशेलकरांनी त्याला विरोध केला. जो अपघात घडला त्यामध्ये तसा कोणाचाच वैयक्तिक दोष नव्हता, पण कुणाला तरी बळीचा बकरा करायला अनेकजण उत्सुक होते. विशेषतः दिल्लीहून तसे प्रयत्न झाले. महाराष्ट्रातूनही चर्चा सुरू झाल्या होत्या, पण त्यांनी ठरवलं की कोणाही निरपराध्याला शिक्षा होणार नाही. हे दिवसही त्यांच्या दृष्टीनं फार कसोटीचे होते.

पुढं ते दिल्लीला गेले. तिथंही संघर्ष होताच. सी. एस्. आय्. आर्. ला एका सूत्रात बांधण्याची जबाबदारी महासंचालक या नात्यानं त्यांच्यावर आली. देशभरातील चाळीस प्रयोगशाळा सी. एस्. आय्. आर्.च्या अखत्यारित असूनसुद्धा स्वतंत्रपणे वागत होत्या, त्यांना एकत्र करायचं, त्यांची ‘‘टीम सी. एस्. आय्. आर्.’’ करायची. त्यांची ‘‘टीम-इंडिया’’ करायची हे त्यावेळी त्यांच्यासमोर मोठं आव्हान होतं. एका वर्षाध्ये चाळीस प्रयोगशाळांध्ये ते गेले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या प्रयोगशाळा पसरलेल्या आहेत. त्या प्रत्येक प्रयोगशाळेध्ये गेले. तिथल्या शास्त्रज्ज्ञांशी बोलायचं. हिंदी-इंग्रजी या दोनच संवादाच्या भाषा होत्या. त्यांना एकत्र आणायचं हे मोठं काम होतं. पण त्यांनी तळमळीनं काम केल्यामुळं सी. एस्. आय्. आर्.ला स्वतःचा चेहरा मिळाला, नवं रूप मिळालं. दिल्लीमध्ये त्यांनी अनेक समित्यांवर काम केलं. जवळ जवळ 12 पेक्षा अधिक समित्या होत्या. उच्चशिक्षणाची पुनर्रचना, औषधसंशोधन, इंधन समिती, पेटंट समिती इ. या समित्या ‘‘माशेलकर कमिट्या’’ म्हणून ओळखल्या जातात. अशा समित्यांवर काम करताना तुचा कस लागतो. राजकीय गटबाजी असते, सामाजिक संस्थांचा दबाव असतो. अशा वातावरणात काम करावं लागतं, या सार्‍याचा अनुभव डॉ. माशेलकरांनी घेतला. या संदर्भात ते म्हणतात, ‘‘‘‘या सार्‍या कसोटयांना मी अत्यंत संयमानं, धीरानं विचलित न होता तोंड दिलं. माझ्या आईची यामागं फार मोठी प्रेरणा आहे असं मला वारंवार वाटतं. कारण ती नेहमी म्हणायची, ‘‘राम, तू सत्याच्या मागे रहा, देव तुझ्यामागे असेल. तात्पुरत्या लाभासाठी काही करू नये.’’’’ माझीही भावना तीच आहे.’’’’

आयुष्यातले हे बरे-वाईट दिवस त्यांच्या स्मरणातून जात नाहीत. पण ते तिथं कधीच थांबले नाहीत. सतत आगेकूच करीत राहिले, नवनव्या आव्हानांना सामोरे जाऊ लागले….. अगदी आजही….. वयाच्या पंचाहत्तरीतही!

 

लेखक -डॉ. सागर देशपांडे 

संपर्क – swatantranagrik@gmail.com    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *