‘डार्केस्ट आवर’च्या निमित्ताने

जगाच्या संस्कृतीवर दूरगामी परिणाम करतील, प्रचंड उलथापालथ घडवून आणतील अशा काही घटनांमध्ये पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाचं स्थान खूप वरचं आहे. ह्या महायुद्धांनी जगाचे जगण्याचे मापदंड बदलून टाकले याबाबत काही शंकाच नाही.

एका बाजूला युद्धस्य कथा रम्य म्हणत असताना, दुसरीकडे ढासळत जाणारी नीतिमूल्ये किंवा बदलत जाणार्‍या अनेकानेक व्याख्या यांची सरमिसळ दुसर्‍या महायुद्धानंतरची. या महायुद्धांनी जगाला अनेक आठवणी दिल्या; पुसता न येणार्‍या जखमांसकट.

मात्र त्याचबरोबर जगाने नेतेही दिलेत. त्यांना मोठं होत जाताना, उत्तुंग होत जाताना पाहिलंय या जगाने.

या महायुद्धात जगाने हिटलर अनुभवला, मुसोलिनी बघितला, रूझवेल्ट आणि स्टॅलिनही पाहिला. अशाच नेत्यांच्या मांदियाळीत विन्स्टन चर्चिलच्या नावाशिवाय ह्या यादीला पूर्णत्व कसं मिळणार!

चर्चिल तसा आपल्याकडे अनेक कारणांसाठी नकारात्मक अर्थाने लोकप्रिय. एक म्हणजे सरळ सरळ भारताला चोर-डाकूंचा देश म्हणून मोकळा झाला की राव! (आता आजूबाजूला आपण बघतो आहोतच काय घडतंय ते!) भारतीय स्वातंत्र्याचा कट्टर विरोधक. गांधींना Half naked man म्हणून हेटाळणाराही हाच. मात्र असं असलं तरी त्याचं जागतिक इतिहासातील स्थान पुसून टाकता येणार नाही. एक लेखक म्हणूनही चर्चिल प्रसिद्ध आहे.

शिवाय उत्तम वक्ता म्हणूनही. (चर्चिलला नोबेल पारितोषिक त्याच्या साहित्य लेखनासाठी मिळालंय.)

बर्‍याच काळापासून मी ह्या चित्रपटाची वाट पाहत होतो. इतिहासाचा अभ्यासक म्हणूनही मला चरित्रपटांचं स्थान वेगळं वाटत आलेलं आहे. प्रत्येक वेळी इतिहासाचा नवा काहीसा वेगळा परिप्रेक्ष्य उलगडत जात असतो त्यातून. एक चित्रपट निर्मितीचा भाग म्हणूनही चरित्रपट निर्मिती अत्यंत अवघड असते.

त्यातही महायुद्धाच्या नायकांना पडद्यावर उभं करणं खर्‍या अर्थानं आव्हानात्मक. त्या दिग्दर्शकाला, त्या अभिनेत्याला, संहिता लेखकाला खूप बारीकसारीक बारकावे टिपावे लागतात. तसं झालं नाहीतर तेवढ्या तीव्रतेने प्रेक्षकांना ते अपील होत नाही.

काही महिन्यांपूर्वी ख्रिस्तोफर नोलन ने ’डंकर्क’ या अशाच महायुद्धावर बेतलेल्या चित्रपटाची निर्मिती केली होती. तो प्रत्यक्ष फिल्ड वरचा प्रसंग टिपणारा चित्रपट असं जर म्हटलो तर डार्केस्ट अवर हा पडद्यामागे घडणार्‍या घटनांचा वेध घेऊ पाहतोय असं म्हणावं लागेल. युरोपात हिटलर नावाचं भूत अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. इंग्लंडला युरोपच्या भूमीवर पाय ठेवता येईल एवढी सुद्धा जमीन आता शिल्लक राहिलेली नाही अशातच इंग्लंडचे ताज्या दमाचे 3 लाख सैनिक डंकर्क या समुद्रकाठच्या शहरात अडकून पडलेले. अशा तंग वातावरणात इंग्लंडच्या संसदेत उडणार्‍या खडाजंगीने चित्रपटाची सुरुवात होतेय. पाठीमागे विलक्षण गतीने, चढत जाणारं संगीत. आणि अशातच चर्चिलचा काहीसा विक्षिप्त, हेकेखोर स्वभाव वैशिष्ट्य दाखवणारा प्रवेश.

चर्चिल उभा करणं सोपं नाही. त्याच्या आवाजात प्रचंड अस्पष्टता असायची. अडखळत बोलण्याची त्याची सवय गॅरी ओल्डमन ने हुबेहूब उचलली आहे. तडफदार भाषण करणारा चर्चिल गॅरीने हुबेहूब वठवलाय. प्रत्येक मोठ्या अभिनेत्याला आपल्या अभिनयाचा कस लागेल अशा भूमिका पार पाडाव्या लागत असतातच कधीना कधी. गॅरी ओल्डमनची चर्चिलची भूमिका देखील त्याचा असाच कस पाहायला लावणारी आहे. उत्तम संगीत, उत्कृष्ट कॅमेरा आणि गॅरी ओल्डमनचा अफलातून अभिनय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.

केवळ गॅरीच नाही तर या सिनेमातील सहकलाकारांनी सुद्धा त्यांच्या भूमिका सुंदर निभावल्या आहेत. चर्चिलच्या पत्नीची एकूणच त्याच्या आयुष्यातील तिची भूमिका, उभयतांमधील उत्कट प्रेम सिनेमा उलगडत जाताना उलगडत जातं.

आणखी एक महत्वाची भूमिका केलीये चर्चिलच्या वैयक्तिक टाईप रायटरने. एलिझाबेथ लायटनची भूमिका करणारी लिली जेम्स भाव खाऊन जाते आहे. हा चित्रपट केवळ युद्धाची पार्श्‍वभूमी रेखाटणारा युद्धपट नसून, ब्रिटिश संसदेतील सरकार विरुद्ध विरोधी पक्ष हा संघर्ष देखील आहे. केवळ एवढंच नाही तर ब्रिटिश जनमानसात आणि संसदीय परंपरेत असणारे राजाचे स्थान देखील महत्त्वाचे आहे.

म्हणूनच हा चित्रपट राजा आणि सरकारचे देखील संबंध अधिक बारकाव्यांनी टिपताना दिसतो. सुंदर चित्रपट शेवटाकडे जात असताना प्रेक्षकांना अंतर्मुख बनवून जातात. ’डार्केस्ट अवर’ आपल्याला शेवटाकडे घेऊन जाताना चर्चिल त्याचं सुप्रसिद्ध भाषण संसदेत देत असतो. गॅरी ओल्डमन ने ते भाषण प्रचंड ताकदीने उभे केलंय. त्यातील ओळी अशा आहेत.

We shall go on to the end. We shall fight in France, we shall fight on the seas and oceans, we shall fight with growing confidence and growing strength in the air, we shall defend our island, whatever the cost may be. We shall fight on the beaches, we shall fight on the landing grounds, we shall fight in the fields and in the streets, we shall fight in the hills; we shall never surrender.

लेखक : श्री. पूर्वल पाटील
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *