ऑस्ट्रियात अतिउजव्या शक्ती सत्तारूढ आघाडीत सामील

डिसेंबरच्या पंधरा तारखेला ऑस्ट्रियात सबॅस्टियन कुर्त्झ यांच्या नेतृत्वाखालील  ‘ऑस्ट्रियन पीपल्स पार्टी’ ने ‘फ्रीडम पार्टी’ या अतिउजव्या राजकीय पक्षाशी युती करून सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयास देशाचे अध्यक्ष श्री.अलेक्झांडर फॉन देर बेले यांनी मान्यता दिल्यामुळे आता लवकरच तेथे युतीचे सरकार सत्तारूढ होईल. दुसर्‍या महायुद्धानंतर युरोपच्य राजकारणातील अतिशय महत्त्वाची घटना असा याचा उल्लेख करण्यात येत आहे.

फ्रीडम पक्ष 1956 साली स्थापन करण्यात आला होता. त्या मागे हाईन्झ ख्रिश्‍चन स्ट्रॅच यांचे कष्ट होते. या पक्षाच्या राजकीय विचारसरणीवर नाझी तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता व आहे. नेमके याच कारणांसाठी आता हा पक्ष जेव्हा सत्तारूढ युतीत सहभागी होत आहे, तेव्हा सर्वत्र काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही काळजी फक्त या पक्षाच्या सरकारातील सहभागाबद्दलच नाही तर युतीचा भाग म्हणून या पक्षाला जी खाती दिली आहेत त्यामुळे ही काळजी तीव्र झाली आहे. या पक्षाला विदेश, गृह, सुरक्षा यासारख्या महत्त्वाची खाती मिळाली आहेत. आज ऑस्ट्रिया हा पश्‍चिम युरोपातील असा एकमेव देश आहे, जेथे अतिउजवा पक्ष सत्तेत आला आहे.

ही राजकीय देवाणघेवाण झालेली असली तरी समाजातील अनेकांना ती मान्य नाही. म्हणूनच सदर युतीला विरोध दाखवण्यासाठी ऑस्ट्रियन नागरिक रस्त्यावर उतरले होते. अर्थात तेथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निदर्शकांची संख्या फारशी नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती चार ते पाच हजारांपेक्षा जास्त नव्हती. थोडक्यात म्हणजे या युतीला समाजातील सर्व थरांतील लोकांचा पाठिंबा नाही. हा पक्ष इ.स. 2000 साली जेव्हा प्रथम युतीत आला तेव्हासुद्धा अशीच निदर्शनं झाली होती. तेव्हा मात्र त्यात सुमारे दीडलाख लोकं सहभागी झाले होते. जेव्हा इ.स. 2000 साली असे झाले तेव्हा देशभरच नव्हे तर सर्व युरोपात याबद्दल जोरदार चर्चा झाली होती. या खेपेस तसे काहीही झालेले नाही. हा बदल लक्षणीय आहे.

जर्मनीप्रमाणे ऑस्ट्रियातही सार्वत्रिक निवडणूक होऊन सरकार सत्तेत आले नव्हते. ऑस्ट्रियात ऑक्टोबर 2017 मध्ये निवडणुका झाल्या व डिसेंबरमध्ये सरकार सत्तेत आले आहे. ही युती तेथील हुजूर पक्ष व अतिउजव्या पक्षांची आहे. यात चँन्सेलरपदी कुर्त्झ (वय : 31) आले आहेत. आज कुर्त्झ युरोपातील सर्वात तरुण देशप्रमुख आहे.

भूगोलाचा विचार केल्यास जर्मनी व ऑस्ट्रिया एकमेकांचे शेजारी आहेत, जसे भारत व पाकिस्तान आहेत. जर्मनीत आजही श्रीमती मर्केल यांच्या पक्षाची सत्ता आहे. जरी त्यांना आता युती करावी लागली असली तरी आजही तेथील सरकारवर मर्केलच्या पक्षाचा प्रभाव आहे. मर्केल यांच्या विरोधात युरोपातील अनेक देशांत रागाची भावना आहे. याचे कारण मर्केल यांनी मुस्लिम देशांतून येत असलेल्या निर्वासितांच्या स्वागताची भूमिका घेतली होती. या मुसलमान निर्वासितांबद्दल युरोपातील अनेक देशात रागाची व अविश्‍वासाची भावना आहे. म्हणूनच ऑस्ट्रियात  ‘येथे मुसलमानांना स्थान नाही’ असे फलक दिसतात. आता सत्तेत आलेले सरकार उघडपणे निर्वासितांच्या विरोधात धोरण आखेल, यात शंका नाही. ही घटना फक्त ऑस्ट्रियापुरती सीमित नाही. याचे परिणाम युरोपच्या राजकारणावर होतील यात शंका नाही. जर्मनी व युरोपियन युनियनच्या सभासदराष्ट्रांवर याचे निश्‍चितच परिणाम होतील. जरी या युतीने ‘आम्ही युरोपियन युनियनमध्ये राहू’ असे आश्‍वासन दिले असले तरी याबद्दल सर्वत्र संशय आहे. फ्रीडम पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे अभ्यासक चिंतेत पडले आहेत. या पक्षाला ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत सुमारे 26 टक्के मतं पडली आहेत. हा आकडा निश्‍चितच चिंताजनक आहे. या पक्षाच्या लोकप्रियतेचा दुसरा पुरावा म्हणजे आज हा पक्ष सत्तारूढ युतीचा घटक पक्ष झालेला आहे. ऑस्ट्रियात या आधी उदारमतवादी पक्ष व हुजूर पक्ष यांची युती सत्तेत होती पण ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या निवडणुकांत फ्रीडम पक्षाने जी मुसंडी मारली त्यामुळे तेथे स्थिरावलेली राजकीय समीकरणं बिघडली व आता वेगळीच युती सत्तेत आली आहे.

या अनुषंगाने दखल घ्यावी अशी बाब म्हणजे युरोपातील अनेक देशांत अतिउजव्या शक्तींचा जोर वाढत आहे. याचा अर्थ असा की ऑस्ट्रियात जे झाले ते अपवाद नसून तो या नव्या वातावरणाचा भाग आहे जे युरोपातील अनेक देशांत आहे. म्हणूनच अभ्यासक अशी भीती व्यक्त करत आहेत की, जे आज ऑस्ट्रियात झाले ते युरोपच्या इतर देशांत झाले तर आश्‍चर्य वाटायला नको.

यातील चढउतार समजून घेण्यासाठी दुसरे महायुद्ध संपल्यानंतर युरोपातील राजकारण समजून घेतले पाहिजे. दुसरे महायुद्ध संपले ते नाझी तत्वज्ञान कमालीचे बदनाम करून. त्यानंतर अनेक दशकं युरोपात अतिउजवी विचारसरणी संपली जरी नव्हती तरी आजच्यासारखी लोकप्रियसुद्धा नव्हती. उलटपक्षी असे दाखवून देता येते की, तो काळ उजव्या व अतिउजव्या विचारसरणीसाठी वाईट होता.

ही स्थिती 1980 च्या आसपास बदलायला लागली. तोपर्यंत समाजवादी समाजरचनेतील दोष समोर यायला लागले होते. तेव्हाचा देव म्हणजे सोव्हियत युनियनमधील साम्यवादावर आधारित समाजरचना. मात्र हाच सोव्हियत युनियन वेळ आल्यास अमेरिकेसारख्या भांडवलदारी देशासारखाच आक्रमक व विस्तारवादी होऊ शकतो, हे सुद्धा दिसत होते. याची सुरूवात 1956 साली हंगेरीत झाली. नंतर 1968 मध्ये झेकोस्लाव्हाकिया व त्यानंतर 1979 मध्ये अफगाणिस्तानात रशियन रणगाडे शिरले. अमेरिकेत रोनाल्ड रिगन व इंग्लंडमध्ये श्रीमती मार्गारेट थॅचर यांनी उजव्या विचारसरणीला प्रतिष्ठा व सत्ता मिळवून दिली. तेव्हापासून युरोपच्या राजकारणात उजव्या व अतिउजव्या विचारसरणीने चंचूप्रवेश केला.

त्यानंतरची अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे 1991 साली झालेली सोव्हियत युनियनचे पतन. ही घटना

तर जगाच्या इतिहासात अभूतपूर्व होती. सोव्हियत युनियनचे साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखे बघताबघता कोसळले. नंतर मग जागतिकीकरण सुरू झाले व जग झपाट्याने बदलत गेले. जागतिकीकरण म्हणजे उजव्या विचारसरणीचा विजय, असेही समीकरण रूढ झाले होते.

तरीही तेव्हाच्या उजव्या विचारसरणीत उदारमतवादाचा मोठा आशय होता. त्यामुळे जरी युरोपमध्ये अनेक ठिकाणी उजवी विचारसरणी सत्तेत येत होती तरी फारशी काळजी वाटत नव्हती.

त्यानंतर एकविसावे शतक सुरू झाले ज्याची सुरुवात अमेरिकेतील 9/11 ने झाली व ‘इस्लामी दहशतवाद’ हा नवा शत्रू जगासमोर आला. तरीही अजूनही अतीउजव्या विचारसरणीची लोकप्रियता वाढली नव्हती. जेव्हा ‘आयसिस’ चा उदय झाला व त्यांच्या अत्याचारापोटी गोरगरीब मुसलमान युरोपातील समृद्ध देशांत आश्रय घेऊ लागले, तेव्हा युरोपात जोरात चर्चा सुरू झाल्या. या निर्वासितांना प्रवेश द्यायचा की नाही? या एका मुद्द्यावर युरोपातील अनेक देशांत अतीउजवी विचारसरणी लोकप्रिय होऊ लागली. जणू काही इस्लामी दहशतवादाला उत्तर म्हणजे अतिउजवी विचारसरणी असे वातावरण निर्माण झाले. याचे एकमेव महत्त्वाचे कारण म्हणजे अतिउजवी विचारसरणीच उघडपणे ‘आम्ही मुस्लिम निर्वासितांना आमच्या देशांत येऊ देणार नाही’ अशी ठसठशीत भूमिका घेत आहेत. ही भूमिका युरोपातील अनेक देशांतील लोकप्रिय ठरली. याचा दृश्य परिणाम म्हणजे ऑस्ट्रियात फ्रीडम पार्टीला मिळालेले यश.

शिवाय फ्रीडम पार्टीने तेथील सरकारातील महत्त्वाची खाती पदरी पाडून घेतली आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे खाते म्हणजे अंतर्गत सुरक्षा खाते. याचे खात्याच्या हातात देशात शिरत असलेल्या निर्वासितांवर कोणती कारवाई करायची याचे अमर्याद अधिकार असतात. या पक्षाने दुसरे महत्त्वाचे खाते या पक्षाने घेतले आहे ते म्हणजे संरक्षण खाते. फ्रीडम पक्ष पोलंड आणि हंगेरीत अतिउजवे पक्ष यांच्यात फार प्रेमाचे संबंध आहेत.

शिवाय फ्रीडम पक्षाचे रशियाच्या पुतीन यांच्याशी खास मैत्री आहे. अशा परिस्थितीत अभ्यासकांना ‘युरोपियन युनियन’ च्या भवितव्याबद्दल काळजी वाटणे स्वाभाविक आहे.

जेव्हा इ.स. 2000 साली ऑस्ट्रियात फ्रीडम पार्टी युतीत सहभागी झाली होती, तेव्हा अनेक युरोपियन देशांनी त्या देशावर बहिष्कार टाकला होता पण 2018 सालचे वातावरण पूर्ण वेगळे आहे. आता तसे काहीही होण्याची शक्यता नाही. आज तर इंग्लंडसारखा मातब्बर देश सार्वमत घेऊन युरोपियन युनियन वाजतगाजत बाहेर पडत आहे. एवढेच नव्हे तर जर्मनीत नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत फ्रीडम पार्टीचा जुळा शोभेल अशा पक्षाला तब्बल 13 टक्के मतं मिळाली आहेत. अशा स्थितीत आगामी काळात युरोपियन युनियनचे भवितव्य काय असेल अतिउजव्या शक्ती किती लोकप्रिय होतील, याचा अंदाज बांधणे अवघड आहे.

लेखक : श्री. अविनाश कोल्हे
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *