आजगावकर नावाचे ‘साने गुरुजी’’!

कोल्हापूर जिल्ह्यातील आंतरभारती शिक्षण संस्थेचे संस्थापक-सचिव आणि फाय फाऊंडेशन पुरस्कारप्राप्त शिक्षणतज्ज्ञ श्री. अनंतराव आजगावकर यांना येत्या 27 जानेवारी रोजीपहिल्यासु. रा. देशपांडे प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिक्षणातून सर्वांगीण समाजविकासाच्या ध्येयाने आयुष्यभर अत्यंत त्यागपूर्वक कार्यरत राहिलेल्या श्री. आजगावकर यांच्या कार्याचा हा संक्षिप्त परिचय –

एकीकडे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाकडे आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नसल्याने उद्भवलेली परिस्थिती आपल्याला सध्या अनुभवावी लागतेय, त्याच वेळी दुसरीकडे विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून कार्यरत असणार्‍या शाळा, शिक्षणसंस्था, शिक्षक आणि कार्यकर्ते आपल्याला नक्कीच भेटतात. गुरुवर्य आजगावकर सर हे त्यापैकीच एक.

साने गुरुजींचं आंतरभारतीचं स्वप्न डोळ्यांत घेऊन कार्यरत झालेल्या पिढीतील धडपडणारी मुलं पाहायची असतील तर कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तूर (ता. आजरा) येथील अनंतराव आजगावकर यांना भेटलं पाहिजे. खादीचा नेहरू शर्ट, खादीचीच पांढरी विजार आणि खांद्याला खादीचीच पिशवी या वेषातील, कोणाच्याही मदतीला सदैव तयार असलेलं 87 वर्षांचं हे एक तरुण व्यक्तिमत्त्व पाहिलं की, आपल्यापुढे साक्षात साने गुरुजीच दिसायला लागतात. आपल्या कार्यपूर्ततेसाठी कदाचित गुरुजींनीच सध्या  ‘अनंत विष्णू आजगावकर’ हे नाव धारण केलं असावं असं वाटतं. आजगावकर सर या नावाने आबालवृद्धांना सुपरिचित असणारं कोल्हापूर जिल्ह्यातील हे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व!

उत्तूर इथेच 9 सप्टेंबर 1930 रोजी त्यांचा जन्म झाला. उत्तूर (ता. आजरा) आणि पिंपळगाव (ता. भुदरगड) इथे त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. पुढे माध्यमिक शिक्षणासाठी गडहिंग्लजच्या एम्. आर्. हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यावा लागला. इथूनच ते मॅट्रिक झाले. त्या शाळकरी वयात भेटलेल्या शहापूरकर आणि गोंधळी गुरुजींमुळे त्यांच्यावर साने गुरुजींचे विचार, राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुढे ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात दाखल झाले. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया यांसारख्या समाजवादी विचारांच्या नेत्यांचा प्रभाव, विद्यार्थी-कामगार संघटनांशी संपर्क, वाचन, व्याख्यानं ऐकणं, विविध सामाजिक उपक्रमांमधील सहभाग यातून त्यांचं ध्येयवादी व्यक्तिमत्त्व घडू लागलं. याच काळात कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी संघाचं सेक्रेटरीपद दोन वर्षे त्यांनी सांभाळलं. अनंतानं वकील व्हावं अशी त्यांच्या आजोबांची इच्छा होती.

त्यासाठी त्यांनी प्रवेशही घेतला. पण साने गुरुजींच्या प्रभावामुळे वकील होण्यापेक्षा राष्ट्रहितासाठी शिक्षक होऊन सार्‍या समाजाचीच वकिली करणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटलं. त्यातूनच एक ध्येयवादी समाजशिक्षक म्हणून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावं असं हे व्यक्तिमत्त्व घडत गेलं.

याच दरम्यान 1957 मध्ये त्यांनी गडहिंग्लज नगरपालिकेत कामगार सभेची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. कामगारांना किमान वेतन आणि साप्ताहिक सुट्टी मिळावी यासाठी मग त्यांनी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत दाद मागितली आणि त्यात त्यांना यशही मिळालं. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते (कै.) मोहन धारिया यांनी त्यावेळी या कामगारांची बाजू वकील या नात्यानं न्यायालयात मांडली होती.

आंतरभारती शिक्षणसंस्था :

साने गुरुजींच्या आंतरभारतीचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आजगावकर सरांनी मग आपल्या जन्मभूमीत काही सहकार्‍यांच्या मदतीने शिक्षणक्षेत्रात काम करण्याचं ठरवलं. त्याचाच एक भाग म्हणून 1958 मध्ये उत्तूर विद्यालयाची स्थापना करण्यात आली. तीनच वर्षांत म्हणजे 1961 मध्ये आंतरभारती शिक्षण संस्था विधिवत् कार्यरत झाली आणि उत्तूर परिसरातल्या 20 ते 25 खेड्यांमधल्या अडाणी, गरीब लोकांच्या मुलाबाळांसाठी ज्ञानाची पाणपोई खुली झाली. अरविंद विद्या मंदिर उत्तूर, उत्तूर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि आता डॉ. जे. पी. नाईक वरिष्ठ महाविद्यालय अशी बालवाडीपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत एकाच गावी सुविधा निर्माण झाली. पण त्याचबरोबर चिमणे (ता. आजरा), पिंपळगाव आणि बारवे (ता. भुदरगड) आणि करवीर प्रशाला (कोल्हापूर) असा अन्यत्र शाखाविस्तारही झाला. या खेडेगावांमधून आंतरभारतीच्या शाळा सुरू झाल्या नसत्या तर बहुजन समाजातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अभावी आपलं आयुष्य बेभरवशाच्या शेतीमध्ये किंवा मुंबईतील रोजगारावर घालवावं लागलं असतं.

मुलींना तर घराचा उंबरठाही ओलांडण्याची संधी मिळाली नसती. अत्यंत दारिद्र्याच्या परिस्थितीतून शिक्षण घेतलेले आंतरभारतीचे अनेक माजी विद्यार्थी आज समाजाच्या विविध स्तरांत अनेक चांगल्या पदांवर कार्यरत आहेत, त्यांच्या घराण्यांबरोबरच गावाच्या आणि परिसराच्या विकासालाही चालना देण्याचे प्रयत्न करत आहेत ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

ग्रामीण, डोंगराळ, मागास, निरक्षर आणि आर्थिकदृष्ट्या विपन्नावस्थेत असणार्‍या मुलामुलींना संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी धडपडणारे शंभरावर अध्यापक आणि कर्मचारी व नवभारताच्या उभारणीमध्ये आपापला खारीचा वाटा उचलण्यासाठी सज्ज होणारे अडीच हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी ही आंतरभारतीची खरी श्रीमंती आहे. दलित आणि वंचित-उपेक्षित समाजातील शेकडो जणांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी या शिक्षणसंस्थेचा मोठा हातभार लागला आणि त्याचे श्रेय श्री. आजगावकर सर आणि त्यांच्या सहकार्‍यांना द्यावं लागेल.

मात्र एवढ्यावरच थांबून चालणार नाही, शिक्षणक्षेत्रात समाजाचा सहभाग वाढवायचा असेल तर समाजकारणाशी प्रसंगी राजकीय कार्याची देखील नाळ जोडली पाहिजे, ही पूर्वीच्या काळाची गरज होती हे त्यांनी ओळखलं. श्री. आजगावकर सरांनी तिथेही आपल्या ध्येयवादी, त्यागी वृत्तीने काम करून एक स्वतंत्र छाप पाडली. ध्येयवादी वाटचालीमध्ये साधनशुचितेचं भान ठेवून केलेलं राजकारण हे समाज बदलण्याच्या प्रयत्नांसाठी उपयुक्तच ठरते हे त्यांनी समाजकारणातील, सक्रिय सहभागाने दाखवून दिले. विकास अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीची स्थापना, उत्तूर येथील जनता सहकारी दूध संस्थेची स्थापना, कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्ड आणि पश्‍चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघाचं संचालकपद, जिल्हा परिषद, कोल्हापूर, आजरा पंचायत समितीचे सभापतिपद, गडहिंग्लज नगरपालिका कामगार संघटना, योग विद्या धाम उत्तूर इ. संस्था, संघटना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्याचा सहभाग म्हणजे समाजकारण आणि राजकारणाचा मेळ घालून केलेली उत्तम समाजसेवाच म्हणावी लागेल. कामगार, आपल्या हक्कांपासून वंचित राहणारी मंडळी ह्या सर्वांसाठी काम करताना त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर आजगावकर सरांनी चालविलेली धडपड, सहकारी संस्थांमार्फत गरजूंना करावयाचा अर्थपुरवठा हे सारं करताना आपले अधिकार आणि त्या पदाचा किंचितही गैरवापर होणार नाही म्हणून त्यांनी पाळलेला कटाक्ष त्यांच्याच परिसरातील अनेकांच्या डोळ्यात आजही अंजन घालणारा ठरावा. स्वार्थी आणि सत्तालोलुप राजकारणी सभोवती असताना आपल्या पदाच्या सुविधा आणि मानधनही न घेणारे आजगावकर सर त्यांच्या या आजन्म व्रतामुळेच एस्. एम्. जोशी यांच्यासारख्या दिग्गजांच्या विचारांचे आणि कार्याचे वारस ठरू शकले.

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य म्हणून काम केलेल्या आजगावकर सरांनी वि. स. खांडेकर प्रशाला (कोल्हापूर), आंतरभारती विद्यालय इचलकरंजी आणि साने गुरुजी विद्यालय (कुरुंदवाड) या शाळा सुरू करण्यासाठी आपल्या संस्थांचं सहकार्य दिलं. आपल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सहकाराच्या तत्त्वांची ओळख होण्यासाठी त्यांनी विद्यार्थी सहकारी वस्तुभांडाराची स्थापना केली. उत्तूर परिसरासाठी वाचनालय सुरू करून, त्यासाठी इमारत बांधून ते ग्रामपंचायतीकडे सोपवलं. आपल्या शाळेबरोबरच अन्य संस्थांमधील मंडळींनीही काही समान शैक्षणिक मुद्द्यांवर एकत्र येऊन कार्यरत व्हावं यासाठी उत्तूर परिसरातील नऊ माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी त्यांनी अनौपचारिक पातळीवर डॉ. जे. पी. नाईक शिक्षण केंद्र या शाळासमूह केंद्राची स्थापना केली.

आजगावकर सरांच्या या कार्याची दखल घेऊन ना राज्यस्तरीय  ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, नूल ग्रामस्थांचा ‘साथी पुरस्कार’ या पुरस्कारांप्रमाणेच इचलकरंजीच्या फाय फौंडेशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. वयाच्या 87 व्या वर्षीही आज अनेक व्यथा, वेदना, दुःखं मनाशी ठेवून ते कार्यरत आहेत. कोणाकडेही हात न पसरता कष्ट, त्याग, संघर्ष आणि सेवेच्या जोरावर त्यांनी उत्तूर परिसरात उभं केलेलं शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य करू पाहणार्‍यांना निश्‍चितच प्रेरणादायी ठरेल असं आहे.

पांढरा सदरा, खाकी चड्डी आणि डोक्यावर गांधी टोपी या वेषातील आंतरभारतीचे शेकडो विद्यार्थी आज खेडेगावांमधून शिक्षण घेताना पाहिलं की, बहुजनांसाठी आजगावकर सर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी उभारलेल्या कामाचं महत्त्व पटतं. श्रमाला प्रतिष्ठा मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी जोमकाईदेवीच्या डोंगरावरील गवत कापणीचे काम मिळवून दोन दिवसांत 15 हजार पेंड्या कापल्या.

शेतीत काम करण्यासाठी शेतकर्‍यांची मुलंही संकोच करू लागतात, अशा वेळी बेरोजगारीची भीषण समस्या त्यांना पटवून देऊन शालेय जीवनापासून श्रमाची गोडी लागावी यासाठी आंतरभारतीच्या सर्व शाखांमधून प्रयत्न सुरू असतात. दंतमंजन तयार करून विकणं, औषधी वनस्पतींपासून औषधं तयार करणं, गांडूळ खत निर्मिती, कलम बांधणी अशा अनेक उपक्रमांमध्ये येथील विद्यार्थी गुंतलेले दिसून येतात.

याखेरीज आपल्या परिसरातील गावांमधून जत्रा- यात्रा संपल्यानंतर त्या परिसराची संपूर्ण स्वच्छता करणं, आपल्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करणं, विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ग्रामस्वच्छता, राष्ट्रीय सणांपूर्वी अनेक संस्थांमधून ध्वजवंदनाच्या तयारीसाठी मदत करणं अशा अनेकविध उपक्रमांमध्ये इथले विद्यार्थी गुंतलेले पाहिले की या संस्थेचं वेगळेपण नक्कीच जाणवतं.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीपासून ते योगशिक्षणापर्यंत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनापासून ते थेट ग्रामीण साहित्य संमेलनासारख्या उपक्रमापर्यंत अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये इथले शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी सक्रिय असतात. दिवंगत समाजवादी नेते एस्. एम्. जोशी, नानासाहेब गोरे, ज्येष्ठ विचारवंत ग. प्र. प्रधान, माजी केंद्रीय अर्थमंत्री मधु दंडवते, माजी शिक्षणमंत्री सदानंद वर्दे, निळू फुले, आप्पासाहेब पाटील यांच्यासह शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, मृत्युंजयकार (कै.) शिवाजीराव सावंत, माजी शिक्षण संचालक व्ही. व्ही. चिपळूणकर अशा अनेक मान्यवरांनी आजगावकर सरांचे कार्य समक्ष पाहून त्यांचं आणि त्यांच्या सहकार्‍यांचं कौतुक केलं आहे.

शिक्षणाचा धंदा करून सम्राट बनण्याची स्पर्धा सुरू असलेल्या सध्याच्या काळात आजगावकर सरांनी आपली ध्येयवादी विचारसरणी अखंड ठेवून उत्तूरसह परिसरातील खेडेगावांमधून मांडलेला हा ज्ञानयज्ञ अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. प्रशस्त इमारत आणि आजूबाजूचा प्रसन्न, निसर्गरम्य परिसर अशा वातावरणात उत्तूर विद्यालयाचं कार्य चालतं.

हे शैक्षणिक केंद्र यापुढे या भागाच्या सर्वांगीण विकासाचं, जागतिकीकरणामुळे दररोज बदलणार्‍या परिस्थितीवर स्वार होऊ पाहणार्‍या युवक-युवतींचं आणि त्यांना रचनात्मक ज्ञानाची हत्यारं देऊन संघर्षासाठी सज्ज करणार्‍या ध्येयवादी अध्यापकांचं, समाजकार्यकर्त्यांचं केंद्र बनावं ही आजगावकर सरांची आंतरिक इच्छा आहे. त्यांची गेल्या 70 वर्षांची तपश्‍चर्या पाहिल्यास हे त्यांचं स्वप्न नक्कीच साकार होईल असं वाटतं. त्यासाठी आंतरभारती शिक्षण संस्थेला आणि आजगावकरसरांना मनःपूर्वक शुभेच्छा!

लेखिका : डॉ. सागर देशपांडे
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *