सोल इन स्टोन!

मूळच्या वाई येथील कलावंत सौ. वनिताजगन्नाथ जाधव यांचे ‘सोल इन स्टोन’’ हे वाई येथील विविध वास्तूंवर आधारित चित्रप्रदर्शन येत्या 1 ते 5 डिसेंबर या दरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कला दालनात आयोजित करण्यात आलं आहे.

वाईसारख्या समृद्ध ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ज्ञान संपन्न शहरातील वास्तूंची वेगळी ओळख करून देणारं प्रदर्शन म्हणून आपण जरुर पहायला हवं. असं सांगितलं जातं की, प्रख्यात इंग्रजी लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी संपूर्ण जगाचा प्रवास केला, मात्र ते अमेरिकेला गेले नाहीत, ‘ज्या देशाला इतिहास नाही त्या देशात काय बघायचं?’ असं त्यांचं म्हणणं होतं. आपला देश याला किती अपवाद आहे याचा आपण सर्वांनीच विचार केलेला बरा.

आपल्या देशात, महाराष्ट्रात गावोगावी इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्याला पहायला मिळतील. अनेक ऐतिहासिक ग्रंथ, किल्ले, स्मारकं, समाध्या, वाडे, शस्त्रं, पोषाख, वस्तू, वास्तू, मंदिरं, मूर्ती, शिल्पचित्रं, भित्तीचित्रं, शिलालेख, अस्सल चित्रं, दागदागिने, खाद्यपदार्थ, चाली-रीती, परंपरा, सण, उत्सव, म्हणी, वाक्प्रचार, कविता, पोवाडे, आरत्या, लोकगीतं, बखरी, पत्रव्यवहार, सनदा, वंशावळी, नकाशे… अशा कितीतरी माध्यमातून इतिहास आपल्याला खुणावत असतो. ज्याला ज्या माध्यमातून इतिहासाकडं डोकावण्यात आनंद मिळतो, त्यानं ते ते माध्यम निवडावं, इतिहास आपल्याला आपोआप साद घालायला लागेल. त्यातही महाराष्ट्रातील ज्या गावांना, स्थळांना, शहरांना विविध ऐतिहासिक व्यक्तींचा आणि घटनांचा वारसा लाभला आहे. तिथला इतिहास तर पुन्हा पुन्हा अनुभवता

येतो. त्याला इतिहासाकडं बघण्याची एक खानदानी दृष्टी मात्र हवी.

अशी दृष्टी लाभलेल्या कलावंत म्हणून वाई (जि. सातारा) येथील सौ. वनिता जगन्नाथ जाधव यांच्या कलाप्रवासाकडं पहावं लागेल. मुळातच महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास, ज्ञानपरंपरा आणि संपन्न कलेचा वारसा जपून ठेवणारं एक समृद्ध ऐतिहासिक गाव म्हणून ‘वाई’ नं आपला लौकिक गेली अनेक वर्षे सांभाळून ठेवला आहे. भारतातील वेदविद्या शिक्षणाचं आणि ग्रंथांचं एक प्रमुख केंद्र असलेल्या वाईचा लौकिक शतकानुशतकं देश-विदेशात पसरलेला आहे. वाईतील विद्वतेच्या दबदब्याची साक्ष देताना सांगण्यात येतं
– ‘त्याकाळी वैदिक विद्वानांत शंभर त्र्यंबकेश्‍वरकर म्हणजे एक नाशिककर, शंभर नाशिककर म्हणजे एक काशीकर आणि असे शंभर काशीकर म्हणजे एक वाईकर!’ चारही वेदांच्या पाठशाळा वाईत होत्या, ज्ञानाचा हा वारसा हजार वर्षांपर्यंत मागे साक्ष देत रहातो. इथले गुरुवर्य नारायणशास्त्री मराठे संन्यासोत्तर स्वामी केवलानंदसरस्वती झाले. आचार्य विनोबा भावे आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे दोघे स्वामींचे शिष्योत्तम होते, एवढ्यावरुन ही वाईच्या ज्ञान परंपरेची महती लक्षात यावी. (संदर्भ – मधूनेने यांचा द्रविड हायस्कूल शताब्दी विशेषांकातील लेख) महाराष्ट्राचा वैभवशाली सांस्कृतिक इतिहास जपणार्‍या या गावानं आपल्या समृद्धीच्या अनेक खुणा जपून ठेवल्या आहेत. या संदर्भात श्री. प्रवीण जोशी लिहितात, ‘‘शिवशाही, पेशवाई यांचा विजयी इतिहास, ज्ञानोपासनेची परंपरा आणि तीर्थक्षेत्राची सात्विकता या तिन्हींचा संगम कृष्णाकाठच्या वाई मध्ये दिसतो.

पाषाणाच्या आत्म्याला कलाकाराचा स्पर्श झाला की, शिल्पांना, वास्तूंना पाषाणाच्या दीर्घायुष्याबरोबर मानवी संस्कृतीचे चैतन्यही लाभते. मन ह्या निश्‍चल दगडांनाही लय, श्‍वास प्राप्त होतात. आणि एरवी क्षणभंगूर भासणारं प्राजक्ताचं फूलही पिंडीवर पडलं की, चिरंतन भासायला लागतं. शिल्पातला प्रत्येक आकार, त्याला झालेला संस्कृतीचा स्पर्श, इतिहासाची आभा हे सारं कवीमनाला साद घालतात.

जडजलाच्या वर्तनाची स्पंदने अवतीभवती नांदू लागतात. छाया, प्रकाश आणि कॅनव्हास यांच्या आधारे सौ. वनिता जाधव यांनी हीच स्पंदनं टिपली आहेत.

वाईच्या वास्तूशिल्पांना तीन माध्यमांतून व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे.’’

कला आणि चित्रकलेतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या सौ. वनिता जाधव या मूळच्या वाईच्या. आपले पती जगन्नाथ जाधव यांच्या नोकरीच्या निमित्तानं जगभर त्यांनी प्रवास केला आणि गेली अनेक वर्षे त्या पुण्यात स्थायिक झाल्या आहेत.

कला क्षेत्राशी संबंधित विविध क्षेत्रांध्ये त्यांनी विशेष रुची घेतली आणि जगभरातील ख्यातनाम संस्थांधून जे जे प्रशिक्षण घेता येईल ते ते त्यांनी घेतलं. न्यूयॉर्क, झुरिच येथील संस्थांसह बॉम्बेआर्ट सोसायटी, संस्कार भारती, द आर्ट स्टुडंटलीग ऑफ न्यूयॉर्क, भांडारकर इन्स्टिट्यूट आणि इंटॅक (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ट्रेनिंग) अशा विविध संस्थांशी अनेक वर्षापासून त्या संबंधित आहेत. ‘इंटॅक’ च्या वाई-पाचगणी विभागाच्या समन्वयक म्हणून ही त्या काम पाहतात.

चित्रकलेच्या एलिमेंटरी परीक्षेपासून ते विद्यापीठ स्तरांवरील स्पर्धांध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. दुबई येथील दूतावासाच्या प्रशालेत त्यांनी कला शिक्षक म्हणून काम केलं आहे. बगदाद, सौदी अरेबिया इथंही त्यांनी काम केलं आहे.

यशवंतरावचव्हाण आर्ट गॅलरी मुंबई, इंडिया आर्ट गॅलरीपुणे, नेहरुसेंटर मुंबई, इंडिया हॅबिटॅटसेंटर नवी दिल्ली, जहांगीरआर्ट गॅलरी मुंबई, कम्युनिटी हॉल अ‍ॅटलांटा – अमेरिका, रिच फोरम स्टॅनफोर्ड अशा अनेक नामवंत ठिकाणी त्यांची चित्रप्रदर्शनं भरली आहेत.

‘‘इंटॅक’ संस्थेच्या माध्यमातून वाई-पाचगणी परिसराचा समृद्ध ऐतिहासिक आणि कलेचा वारसा जतन करून ठेवण्याच्या दृष्टीनं त्या कार्यरतआहेत. वाईतील गणेश मंदिराचं जतन, संवर्धन, प्राज्ञपाठशाळेतील हस्तलिखितांचं जतन, शिक्षकांचं प्रशिक्षण, कलास्पर्धा, लघुपट निर्मिती, हेरिटेज क्वीझ, निबंध आणि चित्रप्रदर्शन, पोस्टर स्पर्धा आणि आता वाई-पाचगणी परिसरातील पौराणिक-ऐतिहासिक स्थळांची अचूक माहिती देणारा नकाशा (हेरिटेज मॅप) त्यांनी तयार केला आहे.

‘‘फोटोपेंटिंग’ च्या अनोख्या माध्यमातून सौ. वनिता यांनी कॅनव्हासवर वाईतील अनेक मंदिरं आणि वास्तूंना सजीव केलं आहे. त्यांच्या कुंचल्याचे स्ट्रोक्स, छायाचित्रण आणि प्रत्येक चित्राला सुयोग्य काव्यपंक्ती अशा विविध माध्यमातून साकारलेली, मुळातूनच सुंदर असलेली वाई आणखी विलोभनीय दिसू लागते.

‘‘सोल इन स्टोन’ म्हणजे दगडांचं अंतरंग किंवा आत्मा. वाईतील मंदिरं, वास्तू, मूर्ती घडवणार्‍या शिल्पकारांनी दगडांध्ये भाव ओतले, चैतन्य दिलं. सौ. जाधव यांची चित्रं या परंपरेकडं बघण्याचा नवा दृष्टिकोन देतात. या वास्तूंच्या आत्म्याचं अंतरंग मांडतात. मंदिरांधलं गूढरम्य वातावरण, मोठा इतिहास पाहिलेल्या वास्तूंची भव्यता हे सारं काही त्यांनी चित्रकलेच्या चौकटीत बद्ध केलं आहे.

त्यांचीही चित्रं, छायाचित्रं आपल्याला आनंद देणारी शिल्पांची स्पंदनं तर आहेतच त्याशिवाय आपल्याच संस्कृतीबद्दल प्रत्येकाच्या मनात सार्थ अभिमान जागृत करणारी ठरतील. हा अभिमान पुढच्या पिढ्यांपर्यंत अजरामर व्हावा हा या कलाकृतींच्या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे.

निसर्ग माणसाला जगण्याची प्रेरणा देत असतो. त्या निसर्गात असणार्‍या वेगवेगळ्या ऊर्जा माणसाची जगण्याची उमेद वाढवत असतात. ही उमेद वाढवण्याचं काम अश्मयुगातील कलावंतांनी केलं आहे. दगडांध्ये कोरलेली अनेक मंदिरं, लेणी, वास्तू, आपली श्रद्धास्थानं आहेत. ती पौराणिक स्थापत्य कला टिकवून ठेवणं, त्यांचं सौंदर्य अबाधित ठेवणं याबाबतच्या आपापल्या जबाबदारीची जाणीव या प्रदर्शनाच्या निमित्तानं नक्कीच होऊ शकेल. एका छोट्या खेड्यापासून सुरू झालेला आणि न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेपर्यंत पोचलेला सौ. जाधव यांचा सुमारे 45 वर्षांचा कलाप्रवास देखील या प्रदर्शनाच्या निमित्ताने समजून घेता येऊ शकेल. आज आपल्या शाळांध्ये कलांकडं विशेषतः चित्रकलेकडं पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असतो, चित्रकलेसाठी स्वतंत्र शिक्षक असण्याची गरज आता केव्हाच संपली आहे. अनेक विषय शिकवणार्‍या आणि थोडीशी चित्रकलेची आवड असणार्‍या किंवा चित्रकलेचे अंग असलेल्या एखाद्या उपलब्ध शिक्षकावरच बर्‍याच वेळा हे काम सोपवलं जातं. विविध कलांना प्रोत्साहन देण्याच्या निमित्तानं करण्यात येणारी गुणवाढ हा आपल्या शिक्षणक्षेत्रात वादाचा विषय ठरतो.  वाढत्या उपयुक्ततावादाच्या काळात कलांसारख्या आंतरिक समाधान आणि आनंददेणार्‍या घटकांकडं शिक्षणक्षेत्राचं म्हणावं तसं लक्ष नाही हे फार दुर्दैवी आहे. सौ. जाधव यांच्या चित्रप्रदर्शनाच्या निमित्तानं चित्रकला, शिल्पकला, विविध मंदिरांची कलात्मक उभारणी आणि अशाच कला पूर्ण वास्तूंची निर्मिती

हा वैभवशाली वारसा समजून घेतानाच तो जतन करण्याची, त्याचं संवर्धन करण्याची जाणीव निर्माण होण्याच्या प्रक्रियेला थोडीशी जरी गती मिळाली तरी ती मोठी सुरुवात होईल असं वाटतं.

लेखक : डॉ. सागर देशपांडे
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *