मानस भूषण पुरस्कार आणि डॉ. शिरवैकर

पुण्यातील सर्वात ज्येष्ठ असणारे मनोविकारतज्ज्ञ डॉ. रघुनाथ वैकुंठ शिरवैकर यांचा मानसभूषण हा जीवनगौरव पुरस्कार देऊन नुकताच सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे हा सत्कार त्यांचेच विद्यार्थी असणारे आणि आजचे आघाडीचे मनोविकारतज्ज्ञ यांनी केला. मनोविकारशास्त्र हे आज प्रगत असून पुण्यातील त्याच्या पाऊलखुणा यानिमित्ताने समजावून घ्यायला मदत होणार आहे. प्रसिद्ध अभिनेते व मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, डॉ. विद्याधर वाटवे तसेच डॉ. उल्हास लुकतुके ही सारीच मंडळी यामागे आहे. पण त्यासोबत इंडियन असोसिएशन ऑफ ह्यून बिहेवियर या संस्थेचे अध्यक्ष व मानसशास्त्रज्ञ डॉ. सी. जी. देशपांडे यांचाही यात पुढाकार आहे. या सत्कार सोहळ्यात इंडियन सायकिअ‍ॅट्रिक सोसायटीची पुणे शाखा तसेच पुणे सायकिअ‍ॅट्रिक असोसिएशन यांचा पुढाकार आहे हे विशेष म्हणावे लागेल.

डॉ. शिरवैकर यांनी मनोविकारशास्त्र, मानसशास्त्र व मानसिक आरोग्य या क्षेत्रात महाराष्ट्राची गेली 65 वर्षे अविरत सेवा केली आहे. त्यात पुण्यात 1960 च्या दशकापासून त्यांनी मनोविकारतज्ज्ञ कशा प्रकारे प्रॅक्टिस करू शकेल याचा एक भक्कम पायाच घातला आहे. अत्यंत उत्तम शिक्षक व रुग्णाला समजावून घेण्याची विलक्षण हातोटी तसेच परिणामकारक निदानपद्धती यामुळे डॉ. शिरवैकर त्यांच्या विद्यार्थी वर्गात अत्यंत लोकप्रिय शिक्षक तर होतेच, शिवाय त्यांनी त्यांच्या निदानपद्धतीबाबत स्वत:चे असे एक स्कूल ऑफथॉट तयार केले आहे. आज वयाच्या 92 व्या वर्षात असताना त्यांचे विद्यार्थी व चाहते त्यांचा कृतज्ञतेपोटी व प्रेाने सत्कार करून त्यांना जीवनगौरव पुरस्कार देत आहेत ही नक्कीच एक आनंदाची गोष्ट आहे. यानिमित्ताने पुण्यातील एका ज्येष्ठ मानसविकारतज्ज्ञाच्या निमित्ताने या शास्त्राची वाटचाल व उद्याची दिशा नेकी काय असेल याचा अंदाज घ्यायला मदत होईल. नुकताच 19 नोव्हेंबर रोजी डॉ. शिरवकरांचा झालेला हा सत्कार हे केवळएक चांगले निमित्त आहे.

डॉ. शिरवैकर आणि मनोविकारशास्त्र:

गेली पाच सहा दशके पुण्यात स्थिरावलेल्या डॉ. शिरवैकरांचा जन्म 28 जून 1926 रोजी गोवा परिसरातील मडगाव इथला. शाळेनंतर त्यांचे पुढचे वैद्यकीय शिक्षण मुंबईत झाले. मुंबईतल्या बॉम्बे युनिव्हर्सिटीतून त्यांनी उत्तम गुणांनी एम्बीबीएस्ची पदवी घेतली ती प्रसिद्ध जी. एस्. मेडिकल कॉलेजातून. 1950 नंतर 1955  पर्यंत ते लंडन येथे होते. तेथे त्यांनी मनोविकारशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला. तसेच त्या काळापासूनही प्रचलित असणार्‍या नार्को अ‍ॅनॅलिसिस पद्धतीचेही प्रशिक्षण ससेक्स परगण्यातील बेलमॉण्ट हॉस्पिटल येथे घेतले. लंडनमध्ये 1955 मध्ये त्यांनी सायोकॉलॉजिकल मेडिसिन या विषयात पदविका मिळवली ती रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन या विभागांची.

पन्नासच्या दशकात मनोविकारशास्त्रात इतके पद्धतशीर प्रशिक्षण घेतलेल्या मोजक्या डॉक्टरांपैकी शिरवैकर हे एक होते आणि त्यांना तिथेही चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकत होती पण ते सारे नाकारून त्यांनी भारतात येणेच पसंत केले. याचे कारण आपल्या देशात आपल्या ज्ञानाची सर्वात जास्त गरज असल्यचे भान त्यांना होते. भारतात आल्यावर त्यांनी आपल्या कामाचा पहिला पदभार मिरजेतील गोहेन सायकियाट्रिस क्लिनिकमध्ये घेतला. तिथे ते 1955 ते 59 या काळात काम करत होते. त्यानंतर त्यांना पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात मानद मानसशास्त्रांचे डॉ. शिरवैकर आणि मनोविकारशास्त्राचे प्राध्यापक म्हणून पाचारण करण्यात आले. 1961 ते 73 या बारा वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी या विषयात विद्यार्थ्यांध्ये रस निर्माण केला. आपल्या उत्तम शिकवण्यामुळे ते विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले ते याच काळात! आपल्या ज्ञानाचा लाभ त्यांनी मिरज, सोलापूर आणि औरंगाबदच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयांनाही दिला. याच काळात त्यांनी अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडवण्याचे काम केले.

विद्यार्थ्यांना मनोविकारक्षेत्रातील अभ्यासक्रमाची अधिकृत मान्यता मिळावी हे त्यांचे ध्येय असून या कामात त्यांना मानसशास्त्रज्ञ डॉ. सी. जी. देशपांडे यांची मोलाची मदत मिळाली. देशपांडे सर तेव्हा पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर विभागात मानसशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांच्या मदतीने डॉ. शिरवैकर यांनी पुणे विद्यापीठात सायकोलॉजिकल मेडिसिन हा विषय शिकवणारा विभाग सुरू केला. यासाठी त्यांनी 1070 ते 73 या काळात विशेष मेहनतही घेतली व स्वत: ते अभ्यासक्रम आयोजित केले होते. त्यांच्याकडील या गुणवत्तेुळेच डॉ. शिरवैकर यांच्या विविध सरकारी जागांवर प्रतिष्ठेने नेणुका झाल्या. त्यापैकी मानसोपचारतज्ज्ञ निवडण्यासाठी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पहिले होते. याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मानसिक आरोग्य सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून दिला. 1956 मध्येच त्यांची इंडियन सायकियाट्री सोसायटचे आजन्म अभ्यासक किंवा लाईफ फेलो म्हणून नेणूक करण्यात आली.

आपल्या बहुश्रुत स्वभावामुळे व विविध क्षेत्रातील ज्ञानाबद्दलच्या औत्सुक्यामुळे त्यांनी मानसोपचारक्षेत्रातील विविध भागांध्ये काम करत असणार्‍या अभ्यासक व तज्ज्ञांशीही वेळोवेळी संपर्क ठेवला. त्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ सायकोअनॅलिसीस या संस्थेचे अधिष्ठाता डॉ. हेराल्ड, न्यूयॉर्क विद्यापीठाचे डॉ. हेन्री कोल्ब, फिलाडेल्फियाचे डॉ.जोसेफवुल्प, प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्रॉईडचे शिष्य डॉ. कार्ल मेनिंगर, शिकागो विद्यापीठाचे डॉ. रॉय ग्रिंकर आणि लंडन विद्यापीठाचे डॉ. मॅक्स जोन्स यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या फुटपट्टीवरच शिक्षकाची उंची मोजता येते, असे त्यांचे ठाम मत आहे. त्यामुळेच शिरवैकर यांच्या नामवंत विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने त्यांच्या डोक्यावरील शिरपेचात मानाचे तुरे खोवले आहेत! या विद्यार्थ्यांध्ये निवृत्त कर्नल जी. आर. गोलेचा, तसेच डॉ. व्ही. जी. वाटवे या दोघांनीही नंतर इंडियन सायकीअ‍ॅट्रीक असोसिएशनच्या पश्‍चिम विभागाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांचे आणखी एक विद्यार्थी असणार्‍या डॉ. मोहन आगाशे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांनी काढलवेल्या कासव या सिनेमाला राष्ट्रपतींचे सुवर्णकमळ हा पुरस्कारही मिळाला आहे.

डॉ. शिरवैकर यांना सतार वादनाचा छंद असून त्यातील प्राविण्य त्यांनी उस्ताद विलायत खाँ यांच्या मार्गदर्शनाखाली संपादित केले. याशिवाय व्यक्तिचित्रे काढणे, हाही शिरवैकरांचा आवडता कलाप्रकार आहे. स्वत: एक सर्वज्ञ डॉक्टर व फिजिशियन असताना त्यांच्या यशात त्यांची सुविद्य पत्नी सौ. विमल यांचा सिंहाचा वाटा आहे. मनोविकाराच्या आपल्या कामातील यशाबद्दल ते म्हणतात की, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मिळणार्‍या यशात रुग्णाचे नेके निदान व योग्यऔषधोपचार यांचा मोलाचा वाटा असतो. कोणतेही निदान रुग्णाचा पूर्वेतिहास तसेच त्याची नीट विचारपूस केल्याशिवाय होऊच शकत नाही. यासाठी रुग्णाची पूर्वपीठिका समजावून घेण्यात जास्तीत जास्त वेळ खर्ची घातला पाहिजे. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून आम्ही क्रमिक पुस्तकांपेक्षा रुग्णांकडूनच जास्त शिकत असतो! मी जेव्हा मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कामास सुरूवात केली त्या 1960 च्या दशकात रुग्णांसाठी केवळ तीन प्रकारची औषधेच बाजारात उपलब्ध होती. म्हणूनच रुग्णाचे योग्य निदान होणे हे सर्वात जास्त महत्त्वाचे होते. या काळात सायकोथेरेपी, इलेक्ट्रोकन्व्हल्जीव थेरेपी आणि नार्कोअनॅलिसीस या तीन प्रकारांवर डॉ. शिरवैकर यांना अवलंबून राहावे लागत असे. पण जसजसा अनुभव वाढत गेला तसे निदान करण्याचे क्षेत्रही विस्तारत गेले असल्याचे आपल्या 65 वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीवर बोलताना त्यांनी सांगितले. आपल्या कारकीर्दीच्या सुरूवातीलाच एपीलिप्सी झालेल्या रुग्णाचे चुकीचे निदान स्किझोफ्रेनिया किंवा खिन्नम नस्कता असे करण्यात आले होते. त्यापूर्वी 1950 च्या दशकात लंडन विद्यापीठाच्या मानसोपचार संस्थेत आपल्याला प्रवेश मिळाला व तेथे अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले त्यात डॉ. आयझेंक, डॉ. स्टेंगेल, डॉ. स्लॅटर, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. डेनिस विल्यम्स असून त्यातल्या अनेकांनी या विषयावरील क्रमिक पुस्तकात लेखन केले होते. तेथील अनुभवामुळे आपण तेव्हाच आपले आयुष्य मानसोपचारतज्ज्ञ म्हणून खर्ची घालण्याचा निर्णय घेतला.

भारतात परत आल्यावर महाराष्ट्रातील मीरच परिसरात अमेरिकन मिशनतर्फे रुग्णालय नव्याने सुरू करण्याची जोखीम स्वीकारल्याची आठवणही डॉ. शिरवैकर सांगतात. प्रत्यक्षात ते सुरू करण्यासाठी अमेरिकेतील डॉ. गोहेआ हे स्वत: येणार होते, पण ते येऊ शकले नाही. त्यामुळेच अत्यंत कमी पगावरावर ही जबाबदारी आपण एक आव्हान म्हणून स्वीकारली. एका रिकाम्या वास्तूत मानसोपचार केंद्र उभे करणे हे एक मानसोपचारतज्ज्ञ म्हणून मला देण्यात आलेले पाहिले काम होते! याठिकाणी मी सहकारी डॉक्टरांना व दोन नर्सेसना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. चार वर्षात तिथे 24 खाटांचे सुसज्ज मेंटल हॉस्पिटल उभे राहिले! या ठिकाणी मी अनेक प्रकारच्या केसेस हाताळल्या असल्याची आठवण डॉ. शिरवैकर सांगतात. निराशाग्रस्त असणार्‍या एका महिलेच्या डोळ्यातील बुब्बुळांच्या हालचालींवरून तिला मी मेंदूत गळू झाला असल्याचे प्राथमिक निदान केले होते. ते नंतर खरे ठरले. मद्रासमधील एका न्यूरोसर्जनकडे मी तिला उपचारांसाठी पाठवले व तो गळू काढून टाकल्यामुळे वाचली व बरीही झाली! याठिकाणीच एका हिंसक बनलेल्या रुग्णाला शांत करण्यासाठी मी प्रेाचा व सहानुभूतीचा आधार घेतला व त्याला नसेतून औषध देण्यात यशस्वी झालो.

भावनिक असंतुलन आणि उद्रेक तसेच घोर निराशेतून निर्माण झालेली मनोव्यथा सोडवताना आपल्याला अशा रुग्णांच्या अनेक चाचण्या घ्याव्या लागल्या व त्यात यश संपादन करता आले. आपल्या पोटात काहीतरी झाले आहे आणि ते शल्यचिकित्सेशिवाय बरेच होणार नाही, अशी ठाम समजूत असणार्‍या रुग्णावर अनेक उपचार होऊनही तो त्यातून बरा होत नव्हता. त्यास आपल्याकडे आणल्यावर अनेक नार्कोअनॅलिटिक मुलाखतींमधून त्याचे नेके निदान होऊन अखेर तो पूर्ण बरा झाला! ठाण्यातील मेंटल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिक्षक म्हणून काम करतानाही असेच वेगळे अनुभव घेता आल्याचे डॉ. शिरवैकर सांगतात. ते म्हणाले की, या ठिकाणी आपल्याला व्यवस्थापकीय कामे अधिक करावी लागत. सरकारी रुग्णालयातील अनास्था कमी करण्यासाठी आपण येथे वक्तशीरपणा व शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. ती न पाळणार्‍यांवर कामावरून काढून टाकण्यापर्यंत कारवाई केली. याचा परिणाम असा झाला की इतरांनी त्यापासून धडा घेतला व इतर कर्मचारी शहाणे झाले. मानसिक रुग्णांवर लक्ष ठेवणार्‍या कर्मचार्‍यांना यातून एक चांगला शिस्तीचा धडा मिळाला! पण यातून तेथील कामगार संघटनांचे नेते नाराज झाले. पण ते विषयही नंतर अनेक प्रयत्नांती निवळले.

याच काळात डॉ. शिरवैकरांनी आणखी एक आव्हानात्मक केस हाताळली. आपल्या दहा वर्षांच्या मुलाच्या अपघाती निधनाने सैरभैर झालेल्या मातेचा शोक काही केल्या कमी होत नव्हता. आपल्या या एकुलत्या एका लाडक्या मुलाची आठवण आई विसरत नव्हती. पण तिच्यावर उपचार करत तिला वास्तव स्वीकारायला लावण्यात डॉ. शिरवैकरांना यश आले. या मानसिक शोकाकुल परिस्थितीतून ती महिला अखेर बाहेर पडू शकली. ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये असतानाच डॉ. शिरवैकरांना एका साधूची केस तपासण्यासाठी आली. यापूर्वी त्याने रेल्वे स्थानकावर त्याच्या जागेबाबत बराच गोंधळ घातला असून रेल्वे अधिकारी, पोलिस आणि नंतर कोर्टातही शिविगाळ केली होती. त्याचे भक्तगण त्याला मेंटल हॉस्पिटलमधून सोडवू इच्छित होते. डॉ. शिरवैकरांनी या साधूचे निदान त्याला स्किझोफ्रेनिया झाला असल्याचे केले व त्यास मुक्त करणे धोकादायक असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे ही गोष्ट या साधूच्या शिष्यांनाही दाखवून दिल्यावर पटली! आपल्याकडे अशा अनेक तथाकथित साधू व साध्वींची मानसिक तपासणी करण्याची गरज आहे असे डॉ. शिरवैकरांना वाटते. या प्रश्‍नाला एक मानसशास्त्रीय बाजू आहे तीही तितकीच महत्त्वाची आहे.

पुढे पुण्याला येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम करायला लागल्यानंतर शिरवैईकरांना बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून हॉस्पिटलशीही थेट संबंध आला. तेथील मानसोपचार विभागात काम करता आले. वैद्यकीय विषयाच्या तिसर्‍या वर्षातील विद्यार्थ्यांना शिकवताही आले. पण या विषयासाठी परिक्षेत केवळ पाच त दहा गुण असल्याने त्यांच्या तासाला सुरुवातील विद्यार्थी येत नसत. पण मानसोपचार विषयातील अनेक उदाहरणे मी देत असल्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयात रस वाटायला लागला व हळूहळू या तासांना विद्यार्थी संख्या वाढू लागली! याचा एक चांगला परिणाम म्हणजे विद्यापीठाच्या नियमानुसार मी पुढे याच विषयातील सर्वच्या सर्व 24 तास देऊ शकलो व या विषयाबद्दल विद्यार्थी वर्गात रस निर्माण करू शकलो. पुढे त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी याच विषयात पदव्युत्तर वर्ग घेण्याची विनंती केली. त्याची परिणती पदव्युत्तर मानसशास्त्रीय औषधे यावरील पदविका अभ्यासक्रमात झाली आणि याविषयाकडे विद्यार्थी तितक्याच उत्सुकतेने येऊ लागले! हा विषय घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वीसपर्यंत वाढवण्यात आली. पाच वर्षांनी आपली बीजेधील व मेंटल हॉस्पिटलमधील सेवा संपल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधीही गेली आणि आपल्यानंतर आलेल्या शिक्षकांना ती गोडी पुन्हा निर्माण करता आली नाही, याचे डॉ. शिरवैकरांना वाईट वाटले.

वैद्यकीय मानसशास्त्र या विषयाची अनास्था ही एकंदर मेंटल हॉस्पिटलमधील काळजी करायला लावावी अशीच गोष्ट आहे, असे डॉ. शिरवैकरांचे मत आहे. हिस्टेरियाबद्दल आपल्या एका उत्साही सहकार्याला खरे काय आहे ते एकदा समजावून सांगावे लागले, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

वैद्यकीय मानसशास्त्राची नीट कल्पना नसेल तर कधी कधी डॉक्टरांकडून चुकीचे निदानही केले जाऊ शकते. कुत्रा चावल्याची एक केस मानसिक व्याधी असल्याचे धक्कादायक निदान एका डॉक्टराने केले होते. पण कुत्रा चावल्यामुळेच पेशंटचे वागणे बदलले असल्याचे अखेर रुग्णाच्या नातेवाईकांनी मान्य केले. आणखी एका प्रकारात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यावर दोन दिवसांनी त्याला कुत्रा चावला असल्याचे निष्पन्न झाले होते. एकाच रुग्णाच्या निदानात दोन डॉक्टरांधील असणार्‍या मतभेदामुळेही पेच निर्माण होताना दिसतात. यासाठी जनरल मेडिसिन व सर्जरी या विषयात चांगले ज्ञान असणे आवश्यक असते.

स्किझोफ्रेनिया किंवा डिप्रेशन यांसारखे विकार औषधोपचारातून किंवा इतर अन्य माध्यमातूनही त्यावर काम करता येते. पण वेळीच ते नियंत्रणात आणले नाहीत तर त्याचा त्रास अशा रुग्णांच्या नातेवाईकांनाही होतो. ते वेळीच टाळणे शक्य आहे. स्वयंपाक करताना शिल्लक राहिलेल्या उष्टा किंवा खरकटा भात बघून एका स्त्रीच्या मनात त्याबद्दल भीतीची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे तिने घरात स्वयंपाक करणेच थांबवले होते. याचा परिणाम म्हणजे घरच्यांना सलग दोन आठवणे भात व पोळी न खाण्याचा उपास घडला व त्यांना केवळ फळे व बिस्किटांवर गुजराण करावी लागली. डॉ. शिरवैकरांकडे या महिलेला घेऊन आल्यावर मग तिच्यावर सायकोथेरपी आणि अन्य माध्यमातून उपचार करण्यात आले.

बिहेवियर थेरपी किंवा वर्तनावर आधारित उपाय हे एक स्वतंत्र शास्त्र असून त्यासंबंधीचे अधिक प्रशिक्षण डॉ. शिरवैकर यांनी फिलाडेल्फिया विद्यापीठातील तीन आठवड्यांचा एक विशेष अभ्यासक्रम करून पूर्ण केले होते. त्या आधारे त्यांना दोन केसेस अभ्यासासाठी व उपचार करण्यासाठी देण्यात आल्या. यावेळी मिळालेल्या डॉ. वोल्पे अणि डॉ. गोल्डस्टीन यांच्या मार्गदर्शनाचा त्याना पुढेही खूप उपयोग झाला. शाळेत शिकवणार्‍या एका शिक्षिकेला वर्गातील मुलांच्या पार्टीत एकदा दोन उंदीर तिथे अन्नपदार्थांजवळ घुटमळताना दिसले. याचा तिला इतका जबर धक्का बसला की ती असे उंदीर आपल्या घरातही असतील व त्यामुळे त्याचा परिणाम घरच्यांच्या आरोग्यावर होईल या भीतीपोटी सारं घरदार पाण्याने धुवून स्वच्छ करू लागली. या उंदरांची लागण आपल्या पतीलाही झाली असेल या भीतीने तिने तिच्या पतीला घरात येण्यापूर्वी त्याच्या अंगावरचे कपडे धुण्याच्या टबमध्ये टाकायला भाग पाडले. तिचे हे विक्षिप्त वागणे पाहून अखेर त्याने तिला डॉ. वोल्पे यांच्याकडे आणले व ती केस डॉ. शिरवैकरांकडे आली. उपचाराला सुरूवात करतानाच या महिलेने तीन दिवस पाण्यापासून लांब राहाण्याची सूचना डॉ. शिरवैकरांनी तिला दिली व तिने ती मान्यही केली. नंतर तिच्या घरात उंदीर असतील तर ते कुठे कुठे फिरत असतील व तिला त्यांची भीती कितपत वाटत असेल याचे वर्णन त्यांनी तिलाच करायला लावले. उंदीर तिच्या अंगावरून फिरू लागले तर काय होईल ही कल्पनाही तिला करायला लावली व यातून तिची भीती कमी करण्यात आली. ही महिला स्वत:च्या अंगावरचे कपडे सोडून सारे घरदार धुवत होती व स्वत: मात्र अस्वच्छ राहात असल्याचेही त्यातून निष्पन्न झाले.

 घरातील स्वयंपाकघरात शिरलेल्या एका पालीची भीती किंवा फोबिया निर्माण झालेल्या एका गृहिणीला या प्रकाराचा इतका धक्का बसला की तिने स्वयंपाकघरात पाऊल टाकणेच बंद केले. स्वयंपाक करणे तर लांबचीच गोष्ट होती. तिच्या मनातील पालीबद्दलची भीती घालवतानाही डॉ. शिरवैकरांना असेच प्रयोग करावे लागले. आपल्या सहकार्याच्या मदतीने त्यांनी एक पाल पकडून बाटलीत भरली व ती बाटली या गृहिणीच्या समोर तिला दिसेल अशी ठेवली. मग ती बाटली तिच्या पलंगावर शेवटी मांडीवर ठेवून ती भीती घालवण्याचा प्रयत्न केला. शेवटी तिला तिच्या स्वयंपाकघरात जायला सांगितले. तिथे कपाटांच्या मागे पाली आहेत हेही सांगितले. त्यानंतर तिला चहा करायला सांगितला. बाटलीतली पाल एव्हान अन्न न मिळाल्याने मरणोन्मुख झाली होती. तीही या गृहिणीला दाखवली व सांगितले की हा प्राणी साधा असून त्यापासून कोणताही धोका नाही. प्रयत्नांती ते तिला पटले. या सार्‍या बिहेवियरल किंवा माणसाच्या वर्तणुकीवर अवलंबून असणार्‍या गोष्टी असून हे वर्तन उपचारान्ती बदलवता येते.

आपल्या पतीच्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे व पुढे नोकरी गेल्यामुळे निराशावस्थेत गेलेल्या त्याच्या पत्नीला दिवसातून अनेकदा देवाची पूजा करण्याची सवय लागली व तिच्या मनात अनेक वाईट-साईट विचार येऊ लागले. तिची केस जेव्हा डॉ. शिरवैकरांकडे आली तेव्हा त्यांनी आधी तिच्या मनातील येणारे सर्व वाईट विचार प्रकटपणे बोलायला व ते 50 वेळा घोकायला सांगितले. हे झाल्यावर हे विचार मनात येण्यामागची कारणे शोधून ते का घडले हेही स्पष्ट केले. मग अखेर तिला तिची नेकी चूक ध्यानात आली. ती नंतर शांत झाली. आपल्या कारकीर्दीतला हा अनुभवाचा ठेवा पुढच्या पिढ्यांधील तरुण मानसोपचारतज्ज्ञ व मानसशास्त्रज्ञांनाही व्हावा ही डॉ. शिरवैकरांची यामागची भूमिका आहे. म्हणूनच त्यांनी असे अनेक अनुभव लिहून ठेवले आहेत. त्यांच्यामते व त्यांच्या निरीक्षणानुसार आज अनेक मानसोपचारतज्ज्ञ हे केवळ सायकोट्रॉफिक औषधे यांच्यावर अवलंबून असतात. आपल्या रुग्णाचा पूर्वेइतिहास समजावून घेण्यास ते फारसा वेळ देतच नाहीत. त्याउलट आपण प्रत्येक नवीन रुग्णाला किमान अर्धातास बोलते करत होतो, असे ते स्पष्टपणे सांगतात. यातून त्या रुग्णासोबत एक विश्‍वासाचे नातेही निर्माण करता येते. सिझोफ्रेनियासारख्या विकारांवर आयुष्यभर उपचार करावे लागतात. अनेक वर्षांनंतरही तेच रुग्ण आपल्याकडे त्याच कारणासाठी उपचार करून घेण्यासाठी येतात व ते न कंटाळता करणे आपले कर्तव्य आहे.

डॉ. शिरवैकर शेवटी म्हणतात की, आपल्याकडे गेल्या 65 वर्षांत येणारे बहुतेक रुग्ण आपल्याशी एका सकारात्मक नात्याने जोडले गेले. त्यांचे प्रश्‍न जास्तीत जास्त कमी करण्याचा आपण प्रयत्नही केला. यामागे आपण आपल्या गुरूंकडून जे शिकलो ते या सार्‍यांपर्यंत पोचवू शकलो हेच आहे. माझे माझ्या तरुण मानसोपचार तज्ज्ञांना हेच सांगणे आहे की आपण आपल्या आयुष्यात जे शिकतो

ते प्रामुख्याने आपल्या रुग्णांकडूनच. केवळक्रमिक पुस्तकांधून नाही! रोग निदानापेक्षा रोगांच्या लक्षणांकडे जास्त लक्ष द्या असेच मला त्यांना मनापासून सांगावेसे वाटते. रुग्णांसाठी जास्तीत जास्त वेळ देणे व त्यांच्याकडून जास्तीत जास्त विश्‍वासार्ह माहिती गोळा करणे हाच त्यावरील रास्त मार्ग आहे.

या इतक्या व त्यापेक्षा अधिक केसेस सोडवणारे डॉ. शिरवैकर यांचे मनोविकारतज्ज्ञ म्हणून असणारे कौशल्य आपल्याला दिसतेच. याच्या जोडीला मानवी मनाची गुंतागुंत व त्यातून उदभवणारे प्रश्‍न यांची ओळखही होते. या सार्‍याला एक मानवौ चेहरा देण्याचा प्रयत्न डॉ. शिरवैकरांनी केलेला दिसतो. वैद्यकीय जगतात ही एक महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल.

डॉ. शिरवैकरांच्या या मानसोपचारतज्ज्ञ म्हणून असणार्‍या व्यक्तिमत्त्वासंबंधी जितके जाणून घ्यावे तितके कमी आहे. आज एकविसाव्या शतकात मानसिक ताण तणाव व निराशेचे क्षण अनेकांच्या आयुष्यात कधी ना कधी येतात. त्याला सामोरे कसे जावे याचा एक परिपाठच डॉ. शिरवैकरांनी त्यांच्या कारकीर्दीत घालून दिला आहे. त्यांनी यावर अनेक पुस्तकेही लिहिली व त्याचा उपयोग आजच्या व्यवहारी जगात होतो.

पुण्यात स्थिरावलेले डॉ. शिरवैकर हे यामुळेच आज वयाच्या उत्तरकालातही अनेक मानसोपचारतज्ज्ञ व रुग्णांचे आधारवड आहेत. त्यांच्या कार्याला मनापासून सलाम!

लेखक : विवेक सबनीस
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *