मला समजलेली प्रसारमाध्यमे

बराच काळ तुम्ही एकच काम करत असाल तर हळुहळू तुम्ही त्यातले ‘मास्टर’ बनत जाता. 2014 मध्ये ‘स्वतंत्र नागरिक’ चं काम सुरू केलं तेव्हा पत्रकारितेबद्दलचं माझं ज्ञान शून्य होतं. बातमी कशी लिहावी इथपासून माझी सुरुवात झाली ती लिहिलेला लेख ‘विशेष लेखां’ त गणला जावा इथपर्यंत. जसजसा काळ पुढं सरकतो तसतसं तुम्हाला त्या त्या क्षेत्रातले छक्केपंजे समजायला लागतात. वाचत असलेली बातमी जेव्हा लिहिली जात असेल तेव्हा त्या वेळी लिहिणार्‍याच्या मनात कोणता उद्देश असेल हे ‘गेस’ करण्याचं ‘स्किल’ हळुहळू जमायला लागलं.

इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात होतो तेव्हा ‘हिंदू’ वाचायला सुरुवात केली होती. ‘हिंदू’ चंच ‘फ्रंटलाईन’ देखील वाचायचो. मला आजही आठवतं, संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरूला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ज्या दिवशी फाशी दिली जाणार आहे तो दिवस आधी ठरवलेला असतो. ज्याला फाशी दिली जाणार आहे त्याच्या कुटुंबियांना त्याची कल्पना देण्यात आलेली असते. मात्र अफजल गुरूला फाशी देण्यात आली ती अचानक! त्याच्या घरच्यांनाही सरकारनं अंधारात ठेवलं होतं(नंतर सरकारनं दावा केला की फाशी दिली जाणार आहे असं पत्र त्याच्या कुटुंबियांना पाठवण्यात आलं होतं. पण ते त्यांना मिळालं अफजल फासावर लटकल्यावर.) काश्मीरमध्ये दंगे होतील म्हणून सरकारनं ती काळजी घेतली होती. या संपूर्ण घटनेची ‘फ्रंटलाईन’ नं तेव्हा कव्हर स्टोरी केलेली. मला तो अंक जाम आवडला. काश्मीर अशांत होईल म्हणून काय झालं? अफजल गुरूनं संसदेवर हल्ला केला म्हणून काय झालं? पण अफजल गुरूच्या कुटुंबाला न कळवता त्याला फासावर लटकवणारं सरकार आपली पापं कुठं फेडणार आहे असं तेव्हा मी छाती ठोकून म्हणायचो.

‘‘चाणक्य’ त आल्यानंतर स्वतंत्र बुद्धीनं विचार करायला शिकलो. (काहीजण ‘उजवा’ विचार शिकलो, असं वाचतील. तेही शिकलो. पण मुख्य म्हणजे त्यावेळी माझे जे विचार होते त्यांना  ‘दुसरी बाजू’ ही असते हे लक्षात येत होतं. सध्या मी स्वतःला बर्‍यापैकी ‘सेंट्रिस्ट’ समजतो. अर्थात हा दावा खोडून काढू पाहणारे अनेक मित्र हा लेख वाचत असतीलच. असो.)

मी आजही  ‘हिंदू’ वाचतो.  ‘हिंदू’ च्या कव्हरेजबद्दल माझ्या मनात आदर आहे. सामाजिक प्रश्‍न आणि पर्यावरणावर मला आवडलेलं ‘हिंदू’ इतकं कव्हरेज कुणाचंही नाही. ‘एक्स्प्रेस’ जी बातमी अघळपघळ देतं तीच बातमी मोजक्या शब्दात कशी मांडावी हे ‘हिंदू’ कडून शिकावं (म्हणूनच चक्क दहा रुपये देऊन  ‘हिंदू’ विकत घ्यायला वाईट वाटत नाही.) यूपीएससी करणार्‍यानं पेपरच्या कंटेन्टकडं बघून ‘हिंदू’ ला बायबल मानावं हे माझं मत आजही कायम आहे.

पण हा सगळा आदर आहे तो ‘हिंदू’ च्या अ-राजकीय बातम्यांबाबतचा. त्यांचं राजकीय बातम्यांचं कव्हरेज वाचत असताना आजही मी ‘हिंदू’ ची विचारसरणी डोक्यात ठेवून असतो. 2014 ला मोदी सत्तेत आले तेव्हा ‘हिंदू’ ला होणारी जळजळ अगदी अंगावर येत होती. तुम्ही त्या काळातले त्यांचे पेपर बघाल तर अ-राजकीय बातम्यांचं प्रमाण तेव्हा कितीतरी कमी झालं होतं. बघाल तिकडे  ‘मोदी असे, मोदी तसे’’. आजही  ‘हिंदू’ त टोकाचा विचार करणारी पत्रकार म्हणजे स्मिता गुप्ता. त्याकाळच्या माझ्या भाबड्या मनानं तिच्या प्रत्येक लेखाचा विरोध करणारी ‘लेटर्स टू द एडिटर’ लिहिली होती. अर्थात त्यांना काही त्यांच्या पेपरात जागा मिळाली नाही. असो.

माध्यमांबाबतचं माझं पुढचं निरीक्षण म्हणजे ‘लोकांना जे आवडतं ते देणं.’ अर्थात हे सगळ्यांनाच माहीत आहे. माझ्या निरीक्षणानुसार या बाबतीत मराठी पेपर्सनी सगळ्यांना मागं टाकलेलं आहे. फेसबुकवर तुम्हाला मराठी पेपर्सच्या ‘स्पॉन्सर्ड’ जाहिराती आल्या असतील, ‘एक बातमी वाचून तुम्ही आमच्या पेजला’ लाईक करा. तर अशी  ‘स्पॉन्सर(यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतात)’  केलेली बातमी कोणती असते? पहा, ‘‘सनीला बघण्यासाठी केरळात जमली तोबा गर्दी!,‘ ‘‘पंतप्रधान मोदी झोपणार ट्रम्पच्या बेडवर!’, असे आहेत ‘जिओ’ चे नवे प्लॅन्स!  इत्यादी, इत्यादी.

पण या बाबतीत मी त्यांना अगदीच दोष देत नाही. दोष आहे तो वाचणार्‍यांचा. बघायचंच असेल तर कोणत्याही मराठी पेपरच्या वेबसाईटवर जाऊन ‘ट्रेंडिंग’ असणार्‍या बातम्यांची शीर्षकं वाचा. देशप्रश्‍नाबाबतची जवळजवळ एकही बातमी आपल्याला त्यात दिसणार नाही. खून, बलात्कार, बॉलिवूड, व्हायरल व्हिडिओ, नवीन मोबाईल, हार्दिक पटेलची  ‘सेक्स टेप’ असे त्या ट्रेंडिंग बातम्यांचे विषय. एक उदाहरण देतो – जगात असा कोणताही देश नसेल ज्यात डोनाल्ड ट्रम्पवर विनोद झाले नसतील. खुद्द अमेरिकेतही ट्रम्पची थट्टा करणारे कार्यक्रम लोकप्रिय आहेत. आपल्याकडेही असे विनोद होतात –  ‘ट्रम्प तात्या!’ ट्रम्प यांच्यावरून अमेरिकेत आणि भारतात – महाराष्ट्रात होणार्‍या विनोदांचे विषय पहा. त्यांचे विनोद अमेरिकेचे रशिया-ब्रिटन-ऑस्ट्रेलिया- चीन आदी देशांशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांवर आधारित असतात. आपल्याकडे? डोनाल्ड भाऊ! आज बसू! डोण्या, जत्रंला चल. वैचारिक दिवाळखोरी म्हणजे दुसरं काय?

आणि ऐकलं का? आजकाल राहुल गांधी खूप काही बोलतात म्हणे! गुजरातच्या निवडणुका सुरू झाल्यापासून एकही दिवस असा गेलेला नाहीये जेव्हा राहुल काही म्हणाले नाहीत.(आम्ही पंतप्रधान पदाचा मान राखतो हे राहुलनी म्हटलेलं जेव्हा वाचलं अगदी त्याच वेळी यूपीए सरकारच्या काळात मनमोहन सिंगांचा ऑर्डिनन्स भर पत्रकार परिषदेत फाडून टाकणारे राहुल खाड्कन डोळ्यासमोर उभे राहिले!) गांधींच्या सभेला आजकाल इतकी प्रसिद्धी मिळतेय की ते गुजरातेत मोदींना धूळ चारणार हे ‘जवळपास’ स्पष्ट झालंय. ( हे  ‘स्पष्ट झालंय,’ जेव्हा मोदींनी अजून प्रचाराची सुरुवातही केलेली नाहीये. टोकाचा मोदी विरोधक असला तरी त्याला हे मान्य करावं लागेल की मोदींची प्रचाराची पद्धत ही गरजत, धुळीचे मोठमोठाले लोट उडवत येणार्‍या रणगाड्यासारखी आहे. वाटेत येणार्‍या प्रत्येकाला ती चिरडून टाकते.) कोणत्याही पक्षाला निवडणुकीत स्पष्ट बहुत मिळण्याची शक्यता सोडता देशातल्या कोणत्याही माध्यमाला ही मधली शक्यता ओळखणं जमलेलं नाही हे माझं प्रामाणिक मत आहे. म्हणूनच मी गुजरातच्या निकालाची आतुरतेनं वाट पाहत आहे.

माझ्या लेखातला हा शेवटचा मुद्दा, ज्यातून या लेखाचाच जन्म झाला आहे, तो म्हणजे श्री श्री रविशंकर यांनी राम मंदिराचा प्रश्‍न सोडवण्यासाठी घेतलेला पुढाकार. गेल्या काही दिवसांपासून मी या विषयासंदर्भात ज्या ज्या बातम्या वाचल्या त्या ‘एकीतही’  (हो, एकीतही) श्री श्रींच्या या पुढाकाराचं कौतुक वाचलेलं नाहीये. राममंदिराचा प्रश्‍न सोडवण्यासाठी श्री श्री कसे ना ‘लायक’ आहेत हे पटवून देण्यासाठीच सगळ्या बातम्या लिहिल्या जात आहेत. श्री श्रींनी चर्चा सुरू केल्यानंतर कोण कोण त्यांना विरोध करतील यावर सगळा ‘फोकस’ आहे. योगी आदित्यनाथांची भेट श्री श्रींनी घेतली. हा मुद्दा चर्चेनं सोडवण्यासाठी आदित्यनाथ तितके उत्सुक नाहीत असा दावा केला जातोय. माझा साधा विचार आहे, जर का आदित्यनाथांनी पुढाकार घेतला आणि मुस्लिमांच्या विरोधामुळं त्यांना तोंडावर पडायची वेळ आली तर जी राजकीय किंमत चुकवावी लागेल ती त्यांना परवडेल का? आणि हाही ‘कॉन सेन्स’ आहे की शांततापूर्ण मार्गानं हा प्रश्‍न सोडवायला घेतला तर दोन्ही धर्मांतील टोकाचा विचार करणार्‍या लोकांकडून याला विरोध होणारच. श्री श्रींनीही ही शक्यता लक्षात घेतल्याचा माझा अंदाज आहे. त्यांच्या मते, ‘बहुतांश’ मुस्लिमांचा राममंदिराला पाठिंबा आहे. माध्यमे इथंच थांबतील का? श्री श्रींना नोबेल पारितोषिक हवंय म्हणून त्यांचा हा खटाटोप चाललाय. भूतकाळात केलेली पापं धुण्यासाठी ते हे नाटक करतायत. गुजरात निवडणूक काही दिवसांवर आली असताना त्यांना ही ‘अवदसा’ का आठवावी? या शंकांना अंत नाही. न्यायालयानं ‘हे प्रकरण आपापल्यात मिटवा’ असं म्हटल्यानंतर राममंदिराचा प्रश्‍न हा कोणत्यातरी अ  ‘राजकीय’ माणसाच्या पुढाकारानेच सुटेल असं मला वाटतं.

तो सोडवण्यासाठी श्री श्री किती लायक आहेत याचा विचार तूर्त तरी करायला नको. त्यांनी पुढाकार घेतला आहेच तर त्यांना एक संधी द्यायला हवी. तब्बल 51 वर्षांनंतर कोलंबिया आणि फार्क बंडखोर यांच्यात शांतता करार झाला. त्यासाठी कोलंबियाच्या अध्यक्षांना शांततेचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं. जाता जाता हे सांगतो की त्या शांतता प्रक्रियेत श्री श्रींचा देखील सहभाग होता.

लेखक :पंकज येलपले
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *