छोटा आशय – मोठा आशय

नोबेल पारितोषिक विजेत्या ओरहान पामुकने एक लेखात म्हटले आहे की, ‘प्रकाशक नेहमीच आम्हाला सांगतात की पुस्तकाचा आकार थोडा कमी करा आणि वाचक म्हणतात की पुस्तक थोडं मोठं लिहा यातलं खरं काय?’

मी रोजच घरातली पुस्तकं चाळत असतो, दुकानात जाऊन पुस्तकं चाळतो. जुन्या पुस्तकांच्या दुकानात जातो. मोठ्या आकाराची पुस्तकं पाहून लोक घाबरतात. परवा कोणाला तरी अरुण शेवतेंचं ‘ऐवज’ हे पुस्तक दिलं तर तो म्हणाला की, ‘लोकांना या आकाराची पुस्तकं बघूनच भीती वाटते, कारण लोकं सोशल मीडियावर खूप वेळ घालवतात. त्यांना छोट्या छोट्या गोष्टी/व्हॉट्स् अ‍ॅपवरचे संदेश, फेसबुकवरील पोस्ट वाचायची सवय झाली आहे.’

पण हे खरं आहे का? अनेक विरोधी उदाहरणे सांगता येतील. लिऑन युरिस, जेम्स क्लॅवेल ही माणसं हजार हजार पानांच्या कादंबऱ्या लिहितात. इंग्रजीत आजही असे कादंबरीकार आहेत ज्यांच्य कादंबऱ्यांची लांबी हजार पानांपेक्षा जास्त आहे आणि त्यांचा खपही खूपच चांगला आहे. इन्फिनेट जेस्ट ही कादंबरी बाराशे पानांची आहे. प्रचंड तपशिलांनी ती व्यापली आहे. पण लोकांना ती आवडते. भारतातल्या एका कादंबरीचं उदाहरण मी नेहमी देतो- ती म्हणजे ‘प्रथम अ‍ॅलो- पहिली जाग’. सुनील गंगोपाध्यायांच्या या बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद जवळपास 1763 पानांचा आहे. एक हजार पानांचा एक भाग आणि सातशे त्रेसष्ठ पानांचा दुसरा भाग. हे दोन्ही भाग एकत्र ठेवले तर डिक्शनरीपेक्षा मोठा आकार तयार होतो. कोणी म्हणेल की इतकी पुस्तकं कोण वाचतं? पण प्रत्यक्षात या कादंबरीची मराठीतील पहिली आवृत्ती संपली. बंगालीत तर तिचा खप प्रचंड आहेच पण इंग्रजीत देखील आहे.

महानायक ही विश्वास पाटलांची कादंबरी भरपूर खपते. जी माणसं फारसं काही वाचत नाहीत ती मृत्युंजय सारखी मोठी कादंबरी वाचताना आढळतात. महाभारताचे जवळपास अकरा खंड आहेत. आणि मराठवाडा पब्लिशिंग कंपनीने ते काही वर्षांपूर्वी ते प्रसिद्ध केले. त्याला खूप मागणी आहे. आता प्रत्येक खंडाची चारशे-पाचशे पानं म्हटली तरी अकरा खंडांची पाच हजार पाने होतात. ज्याअर्थी इतकी पाने प्रसिद्ध होतात त्याअर्थी लोकं ती वाचतच असणार. माझं आवडतं असं आणखी एक मोठं पुस्तक म्हणजे रामकृष्ण वचनामृत. जवळपास तीन भागांमध्ये व्यापलेलं हे पुस्तक प्रत्येकी पाच-सहाशे पानं असं करत साधारण सोळा-सतराशे पानांचं आहे. रामकृष्णांच्या आठवणी, गप्पा, त्यांच्या मैफलीतील किस्से हे सारं एम् म्हणजे महेंद्रनाथ गुप्ते यांनी लिहून ठेवलं. आणि इंग्रजीत ‘गॉसपेल्स ऑफ रामकृष्ण’ या नावाने ते प्रसिद्ध आहे. अर्थात बंगालीत तर ते प्रसिद्ध आहेच. प्रश्न असा पडतो की खरंच लोकांना मोठी पुस्तकं वाचायला आवडतात की छोटी?

सध्या मी जॅक रिचर या डिटेक्टिव्हच्या प्रेमात पडलो आहे. ली चाईल्ड या कादंबरीकाराने हे पात्र निर्माण केलं. जॅक रिचरच्या जवळपास वीस कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत आणि मी त्यातील सहा कादंबऱ्या वाचल्या आहेत. त्याबाबतीत मी मागे लिहिलं होतंच. आता जॅक रिचरचा नवा कोरा कथासंग्रह नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध झाला आहे. मी तो मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. त्याच्याबरोबर एक कादंबरी होती. सहसा मला स्क्रीनवर वाचायला आवडत नाही. पण या कादंबरीची तीन प्रकरणं मी ऑनलाईन वाचली आणि मी या संपूर्ण कादंबरीच्या प्रतीक्षेत आहे.

असं का होतं की माणसं मोठ्या कादंबऱ्यांच्या किंवा तपशिलांच्या प्रेमात पडतात. याचं खरं कारण असं आहे की माणसांना तपशील आवडतात. आपलं सगळं जगणं तपशिलानं व्यापलेलं आहे. ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’  ही अलीकडची गाजलेली कादंबरी. रेडिओवरच्या चर्चेत मी, निखिलेश चित्रे आणि सारंग दर्शने अशा तिघांनी मिळून या कादंबरीविषयी गप्पा मारल्या. कादंबरीबद्दल बोलताना मी इतका आवेशात आलो की, मी पाय आपटत होतो. त्यामुळे पहिला बराच मजकूर वाया गेला. रेडिओवाले म्हणाले – पाय आपटू नका, त्याचा आवाज होतो. चांगली पुस्तके तुमच्यात आवेश निर्माण करतात.

भालचंद्र नेमाडेंची कोसला नंतरची चतुष्ट कादंबरी प्रसिद्ध झाली. त्या सगळ्या कादंबऱ्या सलग वाचण्याची एक वेगळीच गंमत आहे. कोसला गाजली. भालचंद्र नेमाडेंनी ती पंधरा-वीस दिवसांत लिहिली असं म्हणतात. त्यांच्या बिढार, जरीला, हूल या तीन कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. बिढारचं नंतर दोन भागांत रूपांतर करण्यात आलं- बिढार आणि हूल या नावाने चांगदेवाचं पूर्ण विश्व या कादंबऱ्यात व्यापलेलं आहे.

हे विश्व काय आहे? माझा मित्र अविनाश कोल्हे म्हणतो की, जराही निराशा आली की तो ही कादंबरी वाचतो. माझा असा अनुभव आहे की, चांगदेवचं हे विश्व कधीही वाचलं तरी निराशाच येते. चांगदेव वेगवेगळ्या महानगरात प्राध्यापकाची नोकरी करतो, तिथले अनुभव यात आहेत. चांगदेव बारीक, गोरापान, तरतरीत तरुण आहे. त्याला फुप्फुसाचा कसला तरी आजार आहे. त्या आजाराचं वर्णन कादंबरीत येतं पण आजाराचं नाव काही कळत नाही. तर असा हा चांगदेव हुशार आहे. शेक्सपियरवरची वाचनालयातील सगळी पुस्तकं वाचलेला हा तरुण नोकरी शोधत आहे. तो मुंबईत येतो. मुंबईत त्याचे सगळेच मित्र एका प्रकाशकाच्या भोवती गोळा झाले आहेत. पुण्याला कुलकर्णी नावाच्या प्रकाशकाची त्यांची चांगली मैत्री आहे. हे कुलकर्णी प्रकाशक आडदांड, धिप्पाड, पाहुणचारासाठी प्रसिद्ध असणारे आणि लेखकांना त्यांची जागा दाखवून देणारे आहेत. अर्थात रा. ज. देशमुख यांच्यावरून हे पात्र घेतले आहे.

हे कुलकर्णी प्रकाशक या मुलांना म्हणतात की तुम्ही इतकी बडबड करता तर कादंबरी लिहून दाखवा. मुलं म्हणतात की, आत्ता ज्या प्रकारच्या कादंबऱ्या बाजारात आहेत त्या प्रकारची कादंबरी आम्ही पंधरा दिवसात लिहून दाखवू. आणि खरंच असं घडलं की देशमुखांचं आव्हान स्वीकारून भालचंद्र नेमाडेंनी खरंच पंधरा-वीस दिवसांत कादंबरी लिहून काढली. अर्थात अशोक शहाणे यांनी त्या कादंबरीवर खूप संस्कार केले असं म्हणतात. भालचंद्र नेमाडे आणि अशोक शहाणे या दोघांनी मिळून मराठी साहित्यावर ‘क्ष किरण’ नावाचा गाजलेला लेख लिहिला. खरं तर हा कोलॅबरेशनचा काळ होता. पिकासो आणि ब्राक या दोघांनी मिळून अनेकदा एकत्रितपणे चित्रं काढली. ते अनेकदा एकमेकांच्या चित्रांवर सह्या करत. 1908-11 च्या काळातील दोघांची चित्रं पहिली तर पिकासोची चित्रं कोणती आणि ब्राकची चित्रं कोणती ते ओळखताही येत नाही. हे विशी-तिशीचे वय होते.

तरुण वयातील काळात लोकं एकत्र येतात, गप्पा मारतात, काहीतरी कोलॅबरेट करतात, त्या कोलॅबरेशनमधून जे तयार होतं त्याचं श्रेय नक्की कोणाचं हे त्या काळात सांगता येत नाही. नंतर त्यावर भांडणं होतात. अलीकडे मला पॉलक्लीचं पुस्तक मिळालं. पॉलक्लीने उभ्या आयुष्यात जवळपास नऊ- दहा हजार चित्रं काढली. त्या साऱ्या चित्रांचा कॅटलॉग अकरा भागांत विभागला आहे. जवळपास एक लाख दहा हजार रुपये अशी त्याची किंमत आहे. त्यातला एक कॅटलॉग मला माझ्याच संग्रहात सापडला. माझ्या दिवाणात तो एका कोपऱ्यात लपला होता. या कॅटलॉगची ऑनलाईन किंमत आहे एकशे वीस-तीस पाऊंड म्हणजे साधारण अकरा-बारा हजार रुपये. या काळातील पॉलक्लीची चित्रं पहिली तर कँडिस्की सारख्या त्याच्या अनेक समकालीन चित्रकारांशी त्याचं खूप साम्य आढळतं.

जगभरातल्या सर्वच कलावंतांच्या तरुण वयातील कामाच्या बाबतीत हे आढळून येतं. यातली पॉलक्लीची चित्रं ही त्याने साधारणपणे वीस ते तीस या वयाच्या कालखंडात काढलेली आहेत. भालचंद्र नेमाडे आणि त्यांच्या मित्राचा काळही असाच विशी- तिशीचा आहे. मराठीतील काकतकर नावाच्या संपादकांच्या भोवती मुंबईत गोळा झालेली ही मंडळी!

त्यात दुर्गाबाईंसारख्या किंचित ज्येष्ठ लेखिकाही होत्या. रहस्यरंजन नावाचं मासिक काकतकर चालवत. एके वर्षी मजकूर न मिळाल्यामुळे त्यांनी अशोक शहाणे आणि भालचंद्र नेमाडेंना दिवाळी अंक काढायला सांगितला. याच काकतकरांनी ‘झाडे नग्न झाली’ नावाची खानोलकरांची कादंबरी प्रसिद्ध केली होती. ही कादंबरी खूप गाजली. आणि मग त्यावर पुन्हा परिष्करण करून खानोलकरांनी ‘रात्र काळी घागर काळी’  ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी श्री. पु. भागवतांनी जवळपास छापून पूर्ण केल्यावर याच कादंबरीचे आणखी एक प्रकरण घेऊन खानोलकर आले. ते ही प्रकरण परिशिष्ट म्हणून त्या कादंबरीत घातले आहे. ‘झाडे नग्न झाली’ ही कादंबरी अधिक आटोपशीर आहे, असे खानोलकारांचे चरित्र लेखक जया दडकर यांचे मत होते. अलीकडेच मौज प्रकाशनाने ‘झाडे नग्न झाली’ ही कादंबरी ‘काही कविता आणि एक कादंबरी’ या नावाने छापली आहे. पुन्हा जडण-घडणीच्या काळातील खानोलकरांची कादंबरी वाचताना नंतरचे खानोलकर कसे होते याचा अंदाज येतो. खानोलकर, पॉल क्ली, नेमाडे, पिकासो- निर्मितीक्षम अशी ही सारीच मंडळी नंतरही निर्मिती करत राहिली. खानोलकरांनी कादंबरीच्या बरोबरीने कविता, कथा, नाटकं लिहिली. अत्यंत विपन्नावस्थेत आयुष्य गेलेल्या या कलावंताला थोडेफार पैसे मिळाले ते नाटकांमुळेच! भालचंद्र नेमाडे शिक्षण क्षेत्रात रुजू झाले आणि प्राध्यापक म्हणून त्यांनी नाव तर कमावलेच पण भारतातील इंग्रजी साहित्यावर पीएच्. डी. साठी प्रबंध लिहिला. विलक्षण शांतपणे कारकीर्द केली. आणि हे उत्तरार्धातले भालचंद्र नेमाडे हिंदूमध्ये आढळतात. सतत वेगवेगळ्या सेमिनार्समध्ये पेपर वाचणारे, अभ्यास करणारे असे हे भालचंद्र नेमाडे टपोरेगिरी करणाऱ्या पांडुरंग सांगवीकर किंवा चांगदेवपासून खूप फटकून आहेत.

माणसं वयाबरोबर बदलतात. तरुण वयातल्या आठवणींचं हळुहळू साहित्यात रूपांतर होतं. निर्मितीक्षम कलावंताला तरुणपणातील धडपड ही एक मोठी बिदागी असते. त्यावर ते आपला पाया पुन्हा पुन्हा रचत राहतात. नुकतेच दिल्लीमध्ये सुधीर पटवर्धनांचे प्रदर्शन पहिले. त्यावर माझे मित्र गिरीश शहाणेंनी सुंदर लेख लिहिला आहे. प्रदर्शनात प्रामुख्याने इंडोअर चित्रं आहेत- म्हणजे सुधीर पटवर्धनांनी घराच्याच अंतरंगात काढलेली. एका चित्रात तर ते आरशात पाहून सेल्फी काढताना दिसत आहेत. गिरीश शहाणेंनी म्हटले आहे की, त्यांनी आपली डॉक्टरकी बंद केल्यावर निवृत्तीच्या काळात मोठा फ्लॅट घेतला आणि ते घरातच काम करु लागले.

याचा मोठा परिणाम त्यांच्या कलावंत मनावर आणि कलात्मक आशयावर झाला. गिरीश शहाणे यांचा हा निबंध मुळातच वाचायला हवा. पण दिल्लीत सुधीर पटवर्धनांबरोबर चित्रं पाहताना आणि त्यांच्याबरोबर फोटो काढून घेताना, अशोक वाजपेयींपासून अनेक दिग्गजांना त्यांच्या प्रदर्शनात भेटताना पुन्हा पुन्हा आठवत राहिलं ते हेच की कलावंत वय वाढतं तसा परिपक्व होतो.

ऑपेरा गाणारी मंडळी त्यांच्या वयाच्या साठी-सत्तरीनंतर अधिक सुंदर आवाज लावतात. मन्सूर, भीमसेन जोशींचा आवाज उत्तरार्धात अधिक खुलतो. सगळेच कलावंत आयुष्यभर अनुभव घेतात आणि तो आपल्या कला-कृतीत ओततात. रसिक म्हणून आपल्याला त्यांचा उत्तरार्ध अधिक परिपक्व वाटतो यात नवल नाही. म्हणूनच उत्तरार्धात लिहिलेल्या कादंबर्‍या अधिक मोठ्या असतात. वॉर अँड पीसेस हिंदू उत्तरार्धात केलेलं काम अधिक अवकाश व्यापून टाकतं. सुधीर पटवर्धन यांचं साठीनंतरचं हे प्रदर्शन जवळपास तीन मजले भरेल इतक्या आकारात दिल्लीत होतं. सुरुवातीला विचारलेला प्रश्न हाच- माणसांना छोटा आशय आवडतो की मोठा? मला वाटतं छोट्या आशयाची गंमत असतेच, पण मोठा आशय तुम्हाला कलावंताच्या अंतरंगात नेतो.

लेखक : शशिकांत सावंत
संपर्क : swatantranagrik@gmail.com

One thought on “छोटा आशय – मोठा आशय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *