ICAN नोबेल शांतता पुरस्काराचे मानकरी

दरवर्षी जगभरातून विविध क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल काही व्यक्तींची अथवा संस्थांची निवड नोबेल पुरस्कारासाठी करण्यात येते. या विविध क्षेत्रामधील सर्वात महत्वाचे क्षेत्र म्हणजे शांतता हे होय. जगभर अथवा कोणत्याही भागात कोणत्याही कारणाने अस्थैर्य आले तर ते शांततेत बदलण्यासाठी अथवा असे अस्थैर्य येऊ नये यासाठी परिश्रम घेणार्‍या व्यक्ती अथवा संस्था यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा हा शांतता पुरस्कार दि इंटरनॅशनलकॅम्पेन टू अबॉलिश न्यूक्लेअर वेपन्स (ICAN) या संस्थेला देण्यात आला आहे.

आण्विक क्षेत्रासंबंधी काम करणार्‍या व्यक्ती अथवा संस्थांना यापूर्वी देखील नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मात्र यंदाच्या वर्षी आण्विक क्षेत्रासंबंधी काम करणार्‍या संस्थेला हा पुरस्कार मिळणे खूप महत्वाचे आहे. जग हेतिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे आणि तिसरे महायुद्ध हे आधीच्या दोन्ही महायुद्धांपेक्षा भयंकर आणि संहारक असणार आहे कारण यात वेपन्स ऑफ मास डिस्त्रकशन म्हणजेच आण्विक हत्यारांचा वापर होणे क्रमप्राप्त आहे. ICAN संस्थेने संयुक्त राष्ट्रांमध्ये आण्विक हत्यारांवर पूर्ण बंदी यावी यासाठीच्या करारावर सर्व राष्ट्रांची संमती मिळावी यासाठी भरीव अशी कामगिरी केली आहे आणि सुमारे 120 देशांनी त्यांच्या या प्रयत्नांना पाठबळ देत या करारावर स्वाक्षरी केली आहे. हा पुरस्कार जाहीर करताना नोबेल पुरस्कार समितीचे अध्यक्ष बेरीट अँडरसन यांनी उत्तर कोरियाच्या आण्विक चाचण्या आणि इराणच्या आण्विक कार्यक्रमाविषयी अमेरिका घेत असलेल्या भूमिकेचा उल्लेख केला. आण्विक क्षेपणास्त्रांचा धोका माहीत असून देखील अमेरिका, रशिया, चीन यांसारखी राष्ट्रे त्यांना आधुनिक आणि अधिक संहारक करण्याचा प्रयत्न करत आहेत याचाही त्यांनी उल्लेख केला. आण्विक हत्यारे ही जगासमोरील एक महत्वाची समस्या असून उत्तर कोरिया सारखीच इतर काही राष्ट्रे आपली आण्विक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या राष्ट्रांना रोखण्यासाठी अथवा ज्यांच्याकडे यापूर्वीच अशी क्षमता प्राप्त आहे अशांना त्याचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी कोणत्याच कायद्याची तरतूद नाही आणि या निगडीत जे काही कायदे अस्तित्वात आहेत ते अगदीच तुटपुंजे आणि महासत्तांच्या बाजूने झुकलेले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ICAN करत असलेले काम खूप महत्वाचे आणि दिलासादायक आहे.

सुरुवातीच्या काळात आण्विक क्षेत्रातील संशोधनाबद्दल नोबेल पुरस्कार देण्यात आले मात्र आता आण्विक कार्यक्रम रद्द करण्यात यावे यासाठी प्रयत्न करणार्‍या संस्थेला हा पुरस्कार देण्यात आल्याने जगासमोरील हा महत्वाचा प्रश्‍न असून जागतिक महासत्तांचे त्याकडे लक्ष वेधले जाईल अशी अपेक्षा आहे. आण्विक क्षेत्रातील शांततेसाठी प्रयत्न करणार्‍या फिलिप नोएल बेकर यांना 1959 साली नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते तेव्हाच या प्रश्‍नाचे महत्व खरेतर अधोरेखीत झाले होते मात्र आंतरराष्ट्रीय समुदाय याबाबतीत कोणतीही ठोस भूमिका आणि कायदे करण्यात अपयशी ठरले आहेत. ICAN करत असलेले प्रयत्न त्यामुळे अत्यंत महत्वाचे ठरत असून त्यामुळेच ते नोबेल पुरस्कार मिळण्यास पात्र ठरले आहेत.

ICAN ही सुमारे 100 देशातील बिगर सरकारी संस्थांची (NGO) सामायिक संस्था म्हणून काम करते. या सर्व संस्था आण्विक क्षेत्रातील शांततेसाठी प्रयत्न करतात. ICAN जगातील सर्व राष्ट्रांनी संपूर्णपणे आण्विक क्षेपणास्त्रे नष्ट करावीत यासाठी प्रयत्न करत आहे. या संस्थेचे प्रमुख बित्रीस फिन या आहेत. आम्ही केलेल्या सामुदायिक प्रयत्नांचा हा गौरव आहे आणि सर्व राष्ट्रांनी आपापले आण्विक कार्यक्रम बंद करावे यासाठी लक्ष वेधण्यासाठी सर्वोत्तम इशारा यातून मिळत आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार शांतता क्षेत्रासाठी अत्यंत प्रभावी काम करणार्‍या संस्थेला मिळणे हे खरेच गौरवाची गोष्ट आहे. या संस्थेच्या प्रयत्नांना भविष्यात आंतरराष्ट्रीय समुदायाची संपूर्ण साथ मिळणे गरजेचे आहे.

लेखक : – – संकेत नर्के
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *