कास पठार व आपण

भारताचा पश्‍चिम घाटाचा प्रदेश जैवविविधतेने नटलेला आहे. महाराष्ट्रात या भागास सह्याद्री पर्वतरांगा या नावाने ओळखले जाते. पर्यावरणावादी, अभ्यासक, संशोधक तसेच पर्यटकांसाठी हा प्रदेश अजूनही आव्हानात्मक ठरतो. पश्‍चिम घाटातील सुमारे 39 स्थळांना 2012-13 मध्ये जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील कास या पठाराचा समावेश आहे.

कास पठार :

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात महाबळेश्‍वरजवळ कास पठार आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात या पठारावर विशिष्ट प्रकारची फुले फुलतात. या कालावधीत पर्यटकांचा ओढा वाढलेला असतो.

समुद्रसपाटीपासून सुमारे 1200 मीटर उंचीवर कास बसलेले आहे. हंगामी फुले तसेच काही प्रदेशनिष्ठ फुलपाखरांच्या प्रजाती हे या पठारावरील खास आकर्षण आहे. जैवविविधतेने हा प्रदेश अतिशय समृद्ध आहे. या पठारावर प्रदेशनिष्ठ वनस्पतींचे प्रमाणही लक्षणीय आहे. पर्यटकांच्या वाढत्या उन्मादामुळे या पठार जैवविविधतेस प्रचंड धोका निर्माण झाला आहे. सध्या पर्यटकांमध्ये ‘विकेंड पर्यटकां’चे प्रमाण वाढते आहे. शिवाय मुंबई, पुणे, कोल्हापूर या भागातून येथे पर्यटक येतात कासचा प्रदेश जैवविविधता समृद्ध असल्याने पर्यटक येथे येणे स्वाभाविकच आहे. परंतु येथे आल्यावर येथील संपत्तीचे नुकसान होईल अशी वर्तणूक पर्यटक करतात. परिणामी येथील वनस्पती, फुले, फुलपाखरे यांच्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे.

शिवाय या भागात व आजूबाजूच्या प्रदेशात शेतीचे प्रमाण प्रचंड आहे. या भागातील शेतकरी आपली गुरे या पठारावर चरायला घेऊन येतात. यामुळे देखील जैवविविधता धोक्यात आली आहे. कास पठारावर कास पठार समितीद्वारे सध्या दररोजच्या पर्यटक संख्येवर मर्यादा ठेवली आहे. परंतु अतिउत्साह, बेजबाबदारपणा, पर्यावरणदृष्ट्या असंवेदनशील वागणूक, पर्यटकांचा हेकेखोरपणा या बाबी कायम आहेत.

पर्यटकांची सजगता आवश्यक :

कास पठारावर निसर्ग आनंदाने फुलतो. परंतु मानवी हस्तक्षेप, पर्यटकांचा उच्छाद यामुळे हे पठार ओरबाडले जाते. कासचे संवर्धन केवळ पर्यटनासाठीच नव्हे तर निसर्ग संतुलनासाठीही आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून जनजागृती केली जातेच, परंतु आपण स्वतःही संवर्धनाच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. कासवर आज जे काही पर्यटक येतात ते सर्वच नुकसानकारक कृती करतात असे नाही. परंतु कासच्या र्‍हासास मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या रूपातील मानवी हस्तक्षेप जबाबदार असल्याचे प्रकर्षाने जाणवते पर्यटकांनी सोबत आणलेले खाऊचे पॅकेट्स् पाण्याच्या बाटल्या, कॅरीबॅग्ज, असे पर्यावरणदृष्ट्या घातक पदार्थ निःसंकोचपणे पठारावरच टाकून देतात. यामुळे नुकसान होते. पठारावर वाहनांचे प्रमाण वाढल्याने हवेच्या प्रदूषणातही वाढ होत आहे. सध्या तर कासवर जी फुले आणि फुलपाखरे आढळतात त्यांच्या संख्येत घट झाल्याचे जाणवते. तसेच कास पठाराचा पर्यटनाचा कालावधी देखील बदलत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे काही फुले उशिरा खुलतात. हे बदलले ‘टाइमटेबल’ म्हणजे आपण निसर्गाच्या चक्रात ढवळाढवळ करत असल्याचा ठोस पुरावा आहे. याची वेळीच जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

कासचे संवर्धन :

कास पठारावरील फुलांचा बहर हा निसर्गाचा अनोखा चमत्कारच आहे. कासचे वैशिष्ट्य कायम राहिले पाहिजे. यासाठी कासच्या संवर्धनाची गरज आहे. शासन सरकारी पातळीवर संवर्धनाचे प्रयत्न करतेच. परंतु या संवर्धनात सर्वात मोठा वाटा सामान्य नागरिकांचा ठरणार आहे. संवेदनशील पर्यटन कास पठाराच्या जतनासाठी आवश्यक आहे. तिथे दिलेल्या सूचनांचे पालन जरी पर्यटकांनी केले तरी संवर्धनात मोठा हातभार लागणार आहे. या प्रदेशातील स्थानिक संवर्धनाचे महत्त्वाचे भागीदार बनू शकतात सध्या पर्यटकांचा ओढा भरपूर आहे. त्यामुळे या भागात अनेकांना उत्पन्नांचे स्रोत निर्माण झाले आहे. परंतु कास जर उरलेेच नाही तर अशा कुटुंबियांनाही धोका आहे. यामुळे या स्थानिकांना कासचे महत्त्व पटवून देऊन कास संवर्धनात सर्वांना सहभागी करून घेतल्यास नक्कीच मोठ्या प्रमाणात परिणाम होईल.

निसर्ग संतुलन हे मानवी अस्तित्वासाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. मानव हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे कासच्या संवर्धनाकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. पूर्वीच्या काळी मानव निसर्गाची पूजा करून संवर्धनाचे प्रयत्न करण्यात योगदान द्यायचा. आताही तशी कृती आवश्यक आहे.  उपभोगवादी वृत्ती निसर्ग विनाशास कारणीभूत ठरते आहे. संवर्धन, जतन आणि जीवन हा प्रवास सोयीचा करणे आवश्यक आहे, नाहीतर पुढील 25-30 वर्षांत पुढच्या पिढ्यांना केवळ कासचे फोटो दाखवून असे काही तरी होते हे सांगायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *