2017 मधील नोबेलचे मानकरी

शरीरशास्त्र

जैविक घड्याळाचे अंतरंग उलगडताना

माणूसच काय परंतु संपूर्ण सजीव सृष्टीचे निसर्गाशी असलेले नाते अतूट आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 2017 चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणार्‍या जेफ्री सी हॉल (वय 72), मायकेल रोझबॅश (वय 73) आणि मायकेल डब्ल्यू यंग (वय 68) या शास्त्रज्ञांच्या त्रयीने जैविक घड्याळाचे अंतरंग उलगडून हे सिद्ध करून दाखवले आहे. नोबेल असेम्ब्लीने 2 ऑक्टोबरला या पारितोषिकाची घोषणा केली. या तिघाही शास्त्रज्ञांना नऊ लाख स्वीडिश क्रोनरचे (सुमारे 72 कोटी रुपये) पारितोषिक विभागून देण्यात येईल. हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

 

काय आहे संशोधन?

शरीरात असणार्‍या विशिष्ट चक्राच्या मदतीने दिवसाच्या कुठल्या भागात कुठल्या क्रिया करायच्या याची निश्‍चिती होत असते व त्यानुसार आपण आपल्या क्रिया करत असतो. या चक्राला शास्त्रज्ञांनी सरकॅडियन सायकल (Circadian Cycle), सरकॅडियन रिदम (Circadian Rhythm) म्हटले आहे. वनस्पती, प्राणी, माणूस, सूक्ष्मजीव म्हणजे सर्वच सजीवांमध्ये हे चक्र सुरू असते. प्राथमिक पातळीवर सर्वच सजीव प्रकाशाला व अंधाराला प्रतिसाद देत असतात व त्या प्रत्येकाच्या शरीरात जैविक घड्याळाचे काम सुरू असते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ जनरल मेडिकल सायन्सच्या (NIGMS) मते, जैविक घड्याळ म्हणजे सजीवांच्या शरीरात असणारे घड्याळ होय. या संशोधनामुळे जीवशास्त्र व वैद्यकशास्त्रात नवीन संशोधनाच्या संधी निर्माण झाल्या आहेत असे यू.के. तील मेडिकल रीसर्च कौन्सिलमधील शास्त्रज्ञ मायकेल हस्टिंग म्हणाले.

 

जैविक घड्याळ आणि सरकॅडियन रिदम म्हणजे काय?

जैविक घड्याळ आणि सरकॅडियन रिदम या दोन्ही संकल्पना एकमेकांऐवजी वापरल्या जातात. परंतु त्यात सूक्ष्म भेद आहे. उळीलरवळशप या मूळच्या लॅटिन शब्दातील लळीलर या शब्दाचा अर्थ रििीेुळारींशश्रू आणि वळशा या शब्दाचा अर्थ वरू असा  होतो. सरकॅडियन रिदमचा अभ्यास करणार्‍या शाखेला क्रोनोबायोलॉजी असे म्हणतात. 1984 साली रोझबॅश व हॉल यांनी पेशीत काही प्रथिने रात्री जमा होतात व सकाळी नष्ट होतात असे संशोधनात आढळले होते. त्यानंतर मायकेल यंग यांनी जैविक घड्याळाशी संबंधित असलेल्या क्लॉक जीन चा शोध लावला. या तिघांनी जैविक चक्रातील इतरही अन्य प्रथिनांचा शोध लावला आहे.

जैविक घड्याळे वेळेच्या नियमनासाठी सरकॅडियन रिदम निर्माण करतात. सरकॅडियन रिदमचे काम एखाद्या स्विच बटण सारखे असते. प्रकाश पोहचवणे व रोखणे यासाठी याचा उपयोग होतो. या प्रकाश –अंधार चक्रामुळे स्लीप- वेक सायकल ची गती वाढते व मंदावते व त्यामुळे जैविक घड्याळे सेट केली जातात. सरकॅडियन रिदममुळे शरीरातील संप्रेरकांच्या स्रवण्यावर, शरीराच्या तापमानावर, चयापचय क्रियेवर परिणाम होतात. हे जैविक घड्याळ मेंदूच्या तळाशी असलेल्या (hypothalamus)

भागातील 20,000 न्यूरॉन्सने नियंत्रित केले जाते. या 20,000 न्यूरॉन्सच्या रचनेला सुपरचेझमॅटिक न्यूक्लियस (Superchaisamatic Nucleus) असे म्हणतात. हे न्यूरॉन्स डोळ्यांच्या मदतीने सिग्नल मिळवतात. त्यानंतर विविध संप्रेरके स्रवतात व जैविक घड्याळे सुरू होतात. सरकॅडियन रिदम पृथ्वीच्या परिभ्रमणाशी संलग्न असतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास पृथ्वीच्या परिभ्रमणानुसार सर्व जीवसृष्टी चालते. रात्रीच्या वेळी अंधार असतो तेव्हा डोळ्याच्या मदतीने मेंदूला (hypothalamus भागाला) संदेश पोचतो व त्यामुळे शरीरात मेलाटोनिन संप्रेरक स्रवते. झोपण्याच्या 2 तास आधीपासूनच ही क्रिया सुरू होते व मध्यरात्री ती उच्चांकाला पोचलेली असते.

जेव्हा आपली झोपण्याची व सकाळी उठण्याची वेळ निश्‍चित असते तेव्हा सरकॅडियन रिदमचे काम अत्यंत व्यवस्थित सुरू असते. बाहेरच्या वातावरणाशी शरीराच्या आतील वातावरणाचा संबंध असतो त्यातून अनेक क्रिया घडत असतात. म्हणून हे संतुलन ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.परंतु जेव्हा शरीराबाहेरील वातावरण व शरीराच्या आतील वातावरण यांच्यातला संबंध बिघडतो तेव्हा विविध आजार होण्याची शक्यता बळावते. मानसिक आजार, झोप वेळेवर न येणे, मज्जातंतूंचे आजार होतात. त्यामुळे निरोगी आयुष्य जगण्यासाठी निसर्ग व आपले सहसंबंध बिघडू न देणे हाच त्यावरील उपाय आहे.

 

 

रसायनशास्त्र

क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप

स्टॉकहोम, 4 ऑक्टोबर : दरवर्षीप्रमाणे यंदाही नोबेलपुरस्कार जाहीर होण्यास सुरुवात झाली. या वर्षी रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कार ‘क्रायोव्हलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी या विषयातील ती आद्य प्रवर्तक शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आला. या तंत्राद्वारे सजीवांची आण्विक मोजपट्टीवर अचूक आणि तपशीलवार छायाचित्रे घेणे साध्य झाले आहे.

 

पुरस्कार प्राप्त संशोधक पुढीलप्रमाणे-

 

– जॅक्वेस डुबोशेट, वय 75 वर्षे, हे स्वित्झर्लंडचे नागरिक आहेत. सन 2007 मध्ये लॉसने विद्यापीठातून त्यांनी निवृत्ती घेतली.

– जोकिम फ्रँक, वय 77 वर्षे, यांचा जन्म जर्मनीमध्ये झाला असून ते आता अमेरिकेचे नागरिक आहेत. न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठामध्ये बायोकेमिस्ट्री व मॉलिक्युलर बायोफिजिक्सचे प्राध्यापक आहेत. 2014 त्यांना फिलाडेल्फिया येथील फ्रॅकलिन इन्स्टिट्यूटकडून लाईफ सायन्समधील बेंजानिज फ्रँकलिन पदकाने गौरविण्यात आले आहे.

– रिचर्ड हेंडरसन, वय 72 वर्षे, जन्म स्कॉटलँडमध्ये झाला असून ब्रिटिश नागरिक आहेत. 1973 पासून ब्रिटिश मेडिकल रिसर्च कौन्सिलच्या मॉलिक्युलर बायोलॉजी (आण्विक जीवशास्त्र) प्रयोगशाळेत ते कार्यरत होते. त्यांनी 1996 ते 2006 या कालावधी दरम्यान या प्रयोगशाळेचे संचालकपद भूषविले आहे.

क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी हे विज्ञान आणि अभियांत्रिकीचे दुर्मिळ वैशिष्ट्य असून याद्वारे प्रक्रिया सुलभ व अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडता येते. या वैशिष्ट्याच्या आधारे शास्त्रज्ञांनी उच्च प्रतीच्या थ्रीडी प्रतिमा मिळवल्या व त्याद्वारे कॅन्सर व झिका या अत्यंत भयानक अशा रोगांच्या विषाणूंविरोधात प्रतिजैविक प्रथिने तयार करण्याच्या कार्यात मदत मिळणार आहे. अशा या बहुमूल्य क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीला मागील वर्षी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट्स् ऑफ हेल्थ’ या संस्थेने ‘मेथड ऑफ द इयर’ असे नाव दिले होते. यापूर्वी शास्त्रज्ञांना सजीवांच्या शरीराच्या सर्वात लहान जागांचे निरीक्षण करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागत होती त्यात केवळ द्विमितीय व कमी प्रतीची छायाचित्रे मिळत असत. त्याच प्रमाणे इलेक्ट्रॉनिक दुर्बिणीद्वारे निरीक्षण करत असताना इलेक्ट्रॉनच्या उच्च प्रकाशमानतेमुळे जैविक पदार्थ नष्ट होत असत.

1975 ते 1986 दरम्यान जोकिम फ्रँक यांची द्विमितीय मायक्रोग्राफ्स एकत्र करून त्यापासून त्रिमितीय छायाचित्रे मिळविले. 1990 मध्ये हेंडरसन यांनी या तंत्राच्या साहायाने प्रथिनांना त्रिमितीय स्वरूपात प्रस्तुत केले. यासाठी त्यांनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा उपयोग केला. ड्युबोश यांनी या प्रक्रियेतील शेवटचे कोडे सोडविले यामध्ये त्यांच्या निदर्शनास आले की पदार्थाला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये ठेवण्याअगोदर जलदगतीने थंड केल्यास त्यातील पाणी न गोठता त्या पदार्थाभोवती एक स्थायूचे आवरण बनविते. या क्रियेमध्ये त्यांचे स्कॅनिंग चालू असताना पदार्थांची जैविक रचना व मूळचा आकार बदलत नाही.

या सर्व प्रयोगांचा परिपाक म्हणून आज शास्त्रज्ञांना सजीवांच्या शरीरातील अत्यंत लहानशा अवयवाचेही अचूक छायाचित्र घेणे झाले आहे. याद्वारे शास्त्रज्ञांना एखाद्या आजाराची अचूक व तपशीलवार माहिती घेणे व त्यानुरूप औषधांमध्येही विकास घडवून आणणे सोपे होणार आहे.

उदाहरण घ्यायचे झाल्यास, झिका विषाणूंच्या बाबतीत क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी तंत्राच्या आधारे या विषाणूच्या रचनेचे अचूक आकलन होऊन त्याच्या कोणत्या भागास लसीने लक्ष्य करायचे व निर्णय घेता येणार आहे. क्रायोइलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी तंत्राचा शोध लागल्यापासून आतापर्यंत अभियंत्यांनी त्यातील हार्डवेअर अधिक विकसित स्वरूपात आपल्या समोर आणून ठेवले आहे. त्यात द्रवाच्या लहानश्या व आकार नसलेल्याही थेंबाची अचूक रचना सुद्धा पाहणे सहज साध्य झाले आहे. अजून सुद्धा या तंत्राचे विकसन चालूच आहे. शास्त्रज्ञांच्या मते हे तंत्रज्ञान अद्याप उच्च प्रतीच्या विभेदनक्षमतेपर्यंत पोहोचलेले नाही. चांगल्या प्रतीच्या जैविक रचनेच्या दृश्यमानतेसाठी काही वर्षे वाट पहावी लागणार असल्याचेही शास्त्रज्ञांद्वारे स्पष्ट करण्यात आले.

 

आल्फे्रड नोबेल आणि रसायनशास्त्र :

बालपणी सेंट पीटर्सबर्ग येथे राहत असताना आल्फ्रेड नोबेल यांना रसायनशास्त्र व तंत्रज्ञानाचे चांगले शिक्षण प्राप्त झाले. रशियाचे प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ निकोलाय झिनिज यांच्या मार्गदर्शनाखाली नोबेल यांनी रसायनशास्त्राचे धडे घेतले. नोबेल 15 वर्षांचे असताना त्यांच्या गुरूने म्हणजेच झिनिज यांनी त्यांना सर्वांत प्रथम मायट्रोग्लिसरिज व त्याची स्फोटकक्षमता याचे प्रात्यक्षिक दाखविले 17 व्या वर्षी युरोपच्या अभ्यास सहलीवर असताना, (ज्यामध्ये पॅरिसचाही समावेश होता,) त्या काळचे सर्वांत बुद्धिमान रसायनशास्त्रज्ञ ज्यूत्स पेलोझे यांच्यासमवेत काम केले. प्रयोगशाळेमध्ये नवीन प्रयोग व कल्पनांना आकार देताना नोबेल यांनी खूप आनंद लुटला. त्यांनी त्यांच्या जीवनकालावधीमध्ये संपूर्ण युरोपभर विविध ठिकाणी अनेक प्रयोगशाळा उभारल्या.

भौतिकशास्त्र

गुरुत्वाकर्षण लहरींचा शोध

 

दर वर्षी या काळात जाहीर होणारं नोबेल पारितोषिक सामान्यांच्या उत्सुकतेचा आणि वैज्ञानिकांच्या प्रतिष्ठेचा विषय असतो. या वर्षी तर ही उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे कारण, यंदाचं भौतिकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक गुरुत्वाकर्षण लहरींच्या शोधाला मिळालं आहे. हे पारितोषिक मिळवणारे तिघेही शास्त्रज्ञ अमेरिकाचेच. रेनर वेईस, बॅरी बॅरिश आणि कीप थॉर्न यांनी मुख्यत्वे लायगो (LIGO –  Laser Interferometer Gravitational-Wave Observatory) वेधशाळेत केलेल्या त्यांच्या कामाबद्दल त्यांना नोबेल देण्यात आले आहे. यामध्ये मिळणारी 11 लाख डॉलर्सच्या रकमेपैकी निम्मी रेनर वेईस यांना तर उरलेली निम्मी बॅरिश आणि थॉर्न यांना मिळणार आहे.

 

काय आहेत गुरुत्वाकर्षण लहरी ?

आतापासून सुमारे 100 वर्षांपूर्वी अल्बर्ट आइनस्टाइने गुरुत्वाकर्षण लहरींचे भाकीत केले होते. आइनस्टाइनच्या म्हणण्यानुसार विद्युतचुंबकीय लहरी, पाण्यात दगड टाकला कि पसरणारे तरंग यांच्याप्रमाणेच गुरुरुत्वाकर्षण लहरीसुद्धा असतात आणि याचा उल्लेख त्याने त्याच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतातही केला होता. गुरुत्वाकर्षण लहरींची निर्मिती मोठ मोठ्या महत्तार्‍यांचे स्फोट, एकमेकांभोवती फिरणारे तारे आणि कृष्णविवरे एकमेकांवर आपटल्यामुळे होते. अशा या प्रचंड आणि अवाढव्य गोष्टीमुळे स्पेस-टाइम फॅब्रिकमध्ये (Space-Time Fabric) कंपने निर्माण होतात. स्पेस-टाइम फॅब्रिक हे काळ आणि अवकाश वेगळे नाहीत हे सांगण्यासाठी आइनस्टाइनने वापरलेली संज्ञा होय. यामध्ये संपूर्ण अवकाश ही एक चादर मानली जाते, त्यानुसार तारे, ग्रह यांसारख्या खगोलीय वस्तूंच्या वस्तुमानामुळे ही चादर दाबली जाते.

आता या गुरुत्वाकर्षण लहरींच्या शोधासाठी 2002 साली लायगो प्रयोगशाळा बांधण्यात आली. त्यातली एक लुईझियानात आणि दुसरी वॉशिंग्टन राज्यात. या दोन्ही वेधशाळांमधलं अंतर जवळपास 3000 किलोमीटर आहे. त्या एवढ्या अंतरावर का बांधण्यात आल्या या करता सुद्धा एक खास कारण आहे. गुरुत्वाकर्षण लहरी या अत्यंत नाजूक आणि शोधायला अवघड असतात. यात परत भूकंप, आणि अन्य भूगर्भीय हालचालींमुळे त्यांचा शोध घेणे अजून अवघड होऊन बसतं. म्हणूनच  सापडलेली माहिती ही गुरुत्वाकर्षण लहरींचीच आहे ना? हे पडताळून पाहण्यासाठी या दोन वेधशाळा आहेत. पण 2010 उजाडलं तरी शास्त्रज्ञांना गुरुत्वाकर्षण लहरी शोधण्यात यश आलं नव्हतं, म्हणूनच फेब्रुवारी 2015 मध्ये अ‍ॅडव्हान्स्ड लायगो (Advanced LIGO) या नावाखाली पुन्हा नव्याने शोधमोहीम चालू करण्यात आली. याचा परिणाम म्हणून सप्टेंबर 2015 रोजी गुरुत्वाकर्षण लहरी सापडल्या, पण हा शोध सिद्ध करण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही वेळ घेतला. सरतेशेवटी 11 फेब्रुवारी 2016 रोजी गुरुत्वाकर्षण लहरी सापडल्या आहेत अशी घोषणा लायगोद्वारे करण्यात आली.

या शोधामध्ये भारतीय शास्त्रज्ञांचाही मोलाचा वाटा होता तसेच लायगो वेधशाळेने शोधलेली माहिती पुण्याच्या आयुकामध्ये (IUCAA Inter University Center for Astronomy and Astrophysics)  येत होती. लायगो प्रयोगशाळा फक्त कच्ची माहिती काढत होती, ती पुढे गणितं वापरून सोडवणे आणि पुढे त्याचे रूपांतर हव्या त्या गोष्टीत करणे तसेच शोधनिबंधाचा काही भाग लिहणे याचे काम संजीव धुरंधर आणि त्यांच्या गटाकडे होते. आइनस्टाइनचा सापेक्षतावाद, हिग्ज-बोसॉनचा शोध या नंतर गुरुत्वाकर्षण लहरींचा शोध हा भौतिकशास्त्राच्या इतिहासात तिसरा सर्वात महत्त्वाचा शोध आहे, आणि त्यात भारतीय शास्त्रज्ञांचासुद्धा वाटा आहे ही एक अभिमानाची बाब म्हणावी लागेल.

याच्या पाठोपाठ भारतीयांसाठी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, हिंगोलीमध्ये प्रस्तावित असलेली लायगो वेधशाळा. याची घोषणा  मंत्रीमंडळाने  फेब्रुवारी महिन्यात केली असून याकरता हिंगोलीच्या औंध जवळचा भाग निश्‍चित करण्यात आला आहे. याची लांबी 4 किलोमीटर तर रुंदी 150 मीटर असेल. या प्रकल्पाचे नाव लायगो-इंडी (LIGO-INDI) ठेवण्यात येणार आहे आणि हा प्रकल्प भारतीय वैज्ञानिकांसाठी एक सुवर्णसंधी असेल हे मात्र नक्की.

 

अर्थशास्त्रातले नोबेल

अर्थशास्त्राचे नोबेल डॉ. रिचर्ड थेलर यांना विवेकाचा आणि स्वनियंत्रणाचा अभाव ही मानवाची कच्ची स्थाने अंतिमतः बाजारपेठांवर काय परिणाम करतात? छोटी छोटी प्रोत्साहने वैयक्तिक आर्थिक निर्णय बदलण्यास कारणीभूत होतात का? होतात, तर कसे? अशा प्रश्‍नांचा अभ्यास करणार्‍या शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्कूलमध्ये कार्यरत डॉ. रिचर्ड थेलर यांना 2017 साठीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. बिहेव्हिअरल

इकोनॉमिक्स मधील त्यांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर करत असल्याचे रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसने स्पष्ट केले. 2008 मधील डॉ. थेलर आणि कास सनस्टेन यांच्या ‘नज’ (र्छीवसश) या पुस्तकातील निरिक्षणे आणि प्रतिपादनांमुळे आर्थिक आणि मानसशास्त्रीय अभ्यासाची वाट खुली झाली आहे. वेवेकाचा अभाव, सामाजिक प्राधान्यक्रम आणि स्वनियंत्रणाचा अभाव ह्या मानवी स्वभावांमुळे वैयक्तिक आर्थिक निर्णय आणि बाजारपेठ यांवर कसे परिणाम होतात याचे सखोल विवेचन डॉ. थेलर यांनी केले आहे, असे रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस ने नमूद केले आहे.

डॉ. रिचर्ड थेलर हे अर्थव्यवस्थेतील बदलांचे, परिस्थितीचे अधिक वास्तवदर्शी आकलन व्हावे यासाठी माणसांचा, मानवी स्वभावाच्या दृष्टीकोनातून अभ्यास करण्याची अर्थशास्त्रीय शाखा सुरू करणार्‍या अर्थशास्त्रज्ञांपैकी एक आहेत. आर्थिक निर्णयांच्या संदर्भात आजवर असे समजले जात असे की माणूस मूलतः विवेकी आणि शास्त्रीय बुद्धीने निर्णय घेणारा आहे. डॉ. थेलर यांनी दाखवून दिले आहे की,

माणूस मर्यादित अर्थाने विवेकी असतो, त्याच्याकडे स्वनियंत्रणाचा अभाव असतो. डॉ. थेलर यांनी व्हाईट हाऊसचे (अमेरिकी राष्ट्रपती) माजी आर्थिक सल्लागार कास सनस्टेन (Cass Sunstein) यांच्यासह ‘नज’ (Nudge) थिअरी मांडली. त्यात छोटी छोटी आर्थिक प्रोत्साहने कशाप्रकारे माणसांना विशिष्ट निर्णय घेण्यास प्रवृत्त करतात याचे अभ्यासपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. त्याचबरोबर ह्या थिअरीच्या आधारे राजकारणी अथवा राजकीय व्यवस्था, आर्थिक तुटीच्या काळात सरकारची खर्च करण्याची क्षमता कमी झालेली असताना, मतदारांना कशा प्रकारे वेगळ्या वाटेवर घेऊन जाऊ शकते हे त्यांनी मांडले होते. त्यासाठी डॉ. थेलर आणि सनस्टेन पेंशन योजना ह्या अनिवार्य बचत योजना कशा आहेत हे उदाहरण मांडतात. बिहेव्हिरल अर्थशास्त्रज्ञ मांडतात की नव्याने रुजू झालेल्या कर्मचार्‍यांसमोर पेंशन योजना किंवा इतर असा पर्याय मांडला तर बहुतेक वेळा कर्मचारी पेंशन योजनेचा स्वीकार करतात. कारण, लोक इतर वेळखाऊ आणि कष्ट लागणार्‍या पर्यायांकडे जात नाहीत. याचाच अर्थ सरकार लोकांना वृद्धापकाळातील निश्रि्चत उत्पन्न आणि सुरक्षेसाठी ’नज’ करते. ह्याच उदाहरणावरून त्यांनी असेही दाखवून दिले आहे की तात्कालिक कारणांमुळे घेतलेल्या निर्णयांंमुळे लोक आपल्या वृद्धापकाळासाठी नियोजन करण्यात चुकतात. ह्या मांडणीतील परिणामकारकता आणि अंमलबजावणीची शक्यता तपासण्यासाठी ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी विशेष अभ्यास गटांची स्थापना केली होती.

डॉ. थेलर यांनी ‘मेंटल अकौंटींग ही संकल्पना मांडली. मेंटल अकौंटींग ह्या संकल्पनेनुसार माणूस कोणत्याही आर्थिक निर्णयासाठी आपल्या मेंदूतच विविध कप्पे करून त्या निर्णयाचा विविध अंगानी विचार करतो. तो निर्णय घेण्यामागची कारणे, तो निर्णय घेतल्यानंतर मिळणारे लाभ, होणारे चांगले-वाईट परिणाम यांचा वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये विचार केला जातो. त्याचबरोबर ग्राहकांची बदलती आवड, खर्च करण्याची प्रवृत्ती, क्षमता यांमुळे उद्योगक्षेत्र मागणी वाढलेली असतानादेखील किंमतीत वाढ करताना दिसणार नाहीत. पण कच्चा माल, इतर खर्च यांमुळे उत्पादन खर्चात वाढ होणार असेल तर किंमतीत वाढ केली जाईल.

अर्थशास्त्रात मानवी स्वभावाचा विस्तृत विचार करत, त्यावर आधारित बदलती गृहीतके विचारात घेऊन बाजारपेठेतील बदलत्या कलांचा अभ्यास 1970 च्या दशकापासून प्रामुख्याने सुरू झाला. डॉ. रिचर्ड थेलर ह्या अर्थशास्त्राच्या शाखेच्या उद्गात्यांपैकी एक आहेत. 72 वर्षीय डॉ. थेलर 1967 मध्ये केस वेस्टर्न विद्यापीठातून स्नातक झाले. 1970 मध्ये रोचेस्टर विद्यापीठातून स्नातकोत्तर तर 1974 मध्ये त्याच विद्यापीठातून डॉक्टरेट पूर्ण केली. 2008 साली आलेलं कास सनस्टेन यांच्यासह लिहिलेलं ‘नज’, त्याचबरोबर क्वासी रॅशनल इकॉनॉमिक्स (आभासी विवेकी अर्थशास्त्र), विनर कर्स: पॅराडॉक्सेस अँड अ‍ॅनामोलीस ऑफ इकॉनॉमिक्स ही पुस्तके डॉ. रिचर्ड थेलर यांनी लिहीली आहेत. डॉ. देवरा 1995 पासून शिकागो विद्यापीठातील बूथ बिझनेस स्कूलशी निगडित आहेत. त्याचबरोबर सेंटर फॉर डिसिजन रिसर्च ह्या संस्थेचे संचालक तर बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स प्रोजेक्ट मध्ये नोबेल विजेते रॉबर्ट शिलर यांच्यासह सहसंचालक म्हणून कार्यरत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *