हाफिज़ सईद नावाचे संकट

जोपर्यंत भारत देश अस्तित्वात आहे, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होणे शक्य नाही. जोपर्यंत भारत शरण येऊन दयेची याचना करत नाही तोपर्यंत भारतावर वार करत रहा’, हे विधान पाकिस्तानी दहशतवादी हाफिज़ मोहम्मद सईद याने केलेले आहे. या विधानावरून त्याचा भारताप्रती असलेला द्वेष आणि त्याची दहशतवादी मानसिकता दिसून येते. त्याच्या दहशतवादी कारवायांमुळे तो नेहमीच चर्चेत राहिला आहे.

मूळचे भारतीय असलेले सईद कुटुंबीय फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेले. 80 च्या दशकात इस्लामचा अभ्यासक असलेला प्रोफेसर हाफिज़ सईद उच्चशिक्षणासाठी सौदी अरेबियात गेला. तेथे त्याच्या दहशतवादी मानसिकतेला खतपाणी मिळाले. पाकिस्तानात परतल्यावर त्याने लष्कर-ए-तयबाच्या (एल्ईटी) स्थापनेत भाग घेतला. पुढे जाऊन त्याने जमात-उद्-दवा ही नावाला समाजसेवी असलेली दहशतवादी संघटना स्थापन केली. या संघटनेची पाकिस्तानात 2500 पेक्षा जास्त कार्यालये आणि 11 धार्मिक शाळा आहेत. यांचा उपयोग तरुणांना जिहादची शिकवण देण्यासाठी होतो. जमात-उद्-दवा सध्या एल्ईटीच्या पाठिंब्यावर दहशतवादी कृत्ये करते. सईदचा प्रमुख विरोध पाकिस्तानातील राजकीय व्यवस्था, भारतातील जम्मू-काश्मीर राज्य (त्या अनुषंगाने संपूर्ण भारत) आणि काफिरांना (मूर्तीपूजक) आहे.

2001 च्या डिसेंबरमध्ये भारतात संसदेवर हल्ला झाला. या हल्ल्यामागे हाफिज़ सईदचाही हात होता. 2006 च्या मुंबईमधील लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमागेही त्याचा हात होता. भारताने निदर्शनास आणून दिल्यानंतर पाकिस्तानने त्याला नजरकैदेत ठेवले. या दोन्ही वेळी लाहोर उच्च न्यायालयाने त्याला काही महिन्यातच निर्दोष जाहीर करून सोडूनही दिले. सईदचे नाव पुन्हा भारताच्या रडारवर आले 26/11च्या मुंबई हल्ल्यावेळी. या हल्ल्यामध्ये 160 पेक्षा जास्त लोकांनी जीव गमवला. या हल्ल्याचे प्रमुख सूत्रधार हाफिज़ सईद आणि झाकी-उर-रेहमान-लखवी आहेत. या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने दखल घेत दहशतवादी कृत्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून जमात-उद्-दवावर निर्बंध लादले.  तसेच, एलईटीशी संबंध असल्यामुळे सईदला पुन्हा नजरकैदेत ठेवण्यात आले. यावेळीही लाहोर उच्च न्यायालयाने त्याला सोडले. 2009 मध्ये इंटरपोलने हाफिज़ सईद आणि झाकी-उर-रहमान-लखवी यांना रेड कॉर्नर लिस्टमध्ये टाकले. तेव्हा, पाकिस्तानने पुन्हा सईदला नजरकैदेत ठेवले. शेवटी, 12 ऑक्टोबर 2009 ला लाहोर उच्च न्यायालयाने सईदविरोधी सर्व खटले रद्द करून त्याची

निर्दोष सुटका केली. तसेच, जमात-उद्-दवाला काम चालू ठेवण्यास परवानगी दिली. पाकिस्तानातील न्यायव्यवस्थेचे निघालेले वाभाडे सर्व जगाला परिचित आहेत. सईदच्या सुटकेने दहशतवादाविषयी असलेली पाकिस्तानची दांभिक भूमिका पुन्हा एकदा जगासमोर आली.

पाकिस्तानने हाफिज़ सईदला भारताच्या ताब्यात देण्यासाठी भारताने आजवर अनेक प्रयत्न केले आहेत. 2011 मध्ये भारताने पाकिस्तानात लपलेल्या 50 दहशतवाद्यांची यादी जाहीर केली. परंतु, उभय देशांमध्ये प्रत्यर्पणाचा करार (Extradition Treaty) नसल्यामुळे त्याचा काही फायदा झाला नाही. आतापर्यंत अमेरिका, युरोपीय महासंघ, रशिया आणि ऑस्ट्रेलियाने एल्ईटीला दहशतवादी संघटना जाहीर केले आहे. अमेरिका आणि नुकतेच युरोपीय महासंघाने हाफिज़ सईदला जागतिक दहशतवादी जाहीर केले आहे. 2012 मध्ये अमेरिकेने सईदला पकडण्यासाठी एक अब्ज डॉलरचे इनाम घोषित केले होते. संयुक्त राष्ट्रसंघात सईदला जागतिक दहशतवादी जाहीर करण्याला चीनचा विरोध आहे. अर्थातच, यामागे चीनची प्रादेशिक कूटनीती आहे. परंतु, भारताच्या पाठपुराव्याला आज ना उद्या यश येणार याची खात्री देता येईल. नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परिषदेत चीनने मसूद अझरची जैश-ए-मोहम्मद आणि एल्ईटी या दहशतवादी संघटना असल्याचे मान्य केले आहे.

पाकिस्तानमध्ये सईदबद्दल राजकीय वर्तुळात वेगवेगळी मते आहेत. तेथे त्याला दहशतवादी कोणी म्हणत नसले तरी, त्याचे अंतर्गत विरोधकही आहेत. सईदने पाकिस्तानी नेत्यांच्या भ्रष्टाचारावर आणि ऐषोआरामी राहण्यावर नेहमीच टीका केली आहे. काही राजकीय नेत्यांनी तो दहशतवाद्यांचे पुनर्वसन करतो या कारणाखाली त्याला सुरक्षा दिली आहे. एकूणच सईदचा वापर पाकिस्तानी स्वतःच्या फायद्यासाठी आणि भारतविरोधी कृत्ये करण्यासाठी करत आहेत.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नुकतेच सईद हा आमच्यासाठी अडचण असल्याचे आणि त्याला अमेरिकेनेच वाढवले असल्याचे वक्तव्य केले. सध्या हाफिज़ सईद पाकिस्तानच्या राजकारणात घुसण्याचा प्रयत्न करत आहे. माजी पंतप्रधान शरीफ यांच्या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत सईदने मिल्ली मुस्लिम लीग या पक्षाला पाठिंबा दिला. 2018 च्या संसदीय निवडणुकीत पूर्ण शक्तिनिशी उतरण्याचेही त्याने जाहीर केले आहे. म्हणजे एकीकडे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर सईदवर टीका करतो तर दुसरीकडे सईदला चरायला पाकिस्तानात मोकळे रान सोडतो, अशी निंदनीय परिस्थिती आहे. जगाची दहशतवाद व प्रामुख्याने पाकिस्तानविरोधी पडणारी पावले आणि सईदची राजकीय वाटचाल यावर सईदचे भवितव्य ठरणार आहे, पाकिस्तानातील अशा अनेक सईदचे भवितव्य ठरणार आहे.

लेखक : – – प्रतिक करडे
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *