स्पेन विभाजनाच्या उंबरठ्यावर

थेट मुद्द्याला हात घालण्याआधी आपण स्पेनमध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या घडामोडींवर एक नजर टाकू.

 

प्रसंग पहिला : सप्टेंबर महिन्यात स्पेन्च्या राष्ट्रीय दिनानिमित्त बार्सिलोनामध्ये विरोध नोंदविण्यासाठी ‘मिलियन मार्च’ नावाचा एक भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात तब्बल 10 लाख लोकांनी उपस्थिती नोंदविली होती आणि सर्व मोर्चेकर्‍यांनी हिरव्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. कॅटलोनियन प्रांताचे अध्यक्ष कार्ल्स पिगडेमॉट हे अतिशय आक्रमक थाटात या मोर्चाचे नेतृत्व करत होते. संपूर्ण जग स्पेनमधील या घडामोडीकडे आवर्जून लक्ष देत होते.

प्रसंग दुसरा : 1 ऑक्टोबर, 2017. रविवारचा दिवस. कॅटालोनियातील लोक उत्स्फूर्ततेने बाहेर पडलेले. परंतु तेवढ्यात स्पॅनिश लष्कराने मतदानकेंंद्राचा ताबा घेऊन तेथील मतपेट्या व मतपत्रिका जप्त केल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी लष्कर व स्थानिक मतदार यांच्यात बाचाबाची झाली. मग नागरिकांवर रबरी गोळ्यांचा मारा, अश्रुधूर व लाठीमार यांसारखे खास भारतीय शैलीतले दंडुकेशाही सोपस्कार देखील पार पडले. तब्बल 400 लोक यात जखमी झाले.

प्रसंग तिसरा : एका राष्ट्रीय महामार्गावर काही कॅटालोनियन युवक टेबल मांडून बुद्धिबळ खेळत होते, तर काहीजण फुटबॉल खेळत होते. ते भारतात ज्याला ‘रास्ता रोको’ आंदोलन म्हणतात तेच करीत होते. फक्त त्यांची ‘रास्ता रोको’ची शैली वेगळी होती. सार्वजनिक संपत्तीची मोडतोड, जाळपोळ वगैरे खास भारतीय ‘रास्ता रोको’ शैली बहुदा त्यांना पसंत नसावी.

प्रसंग चौथा : नेहमी फुटबॉलची मॅच संपल्यानंतर गळ्यात गळे घालून भेट घेणारे माद्दिद व बार्सिलोना या दोन दिग्गज संघातील खेळाडू अलीकडे काहीसे परस्परांपासून फटकूनच राहत होते. रविवारी झालेल्या सार्वमतानंतरच्या फुटबॉलच्या सामन्यात तर हे दोन्ही संघ फार पूर्वीचे ‘जानी-दुश्मन’ असल्याप्रमाणेच मैदानात वावरत होते.

अर्थात या सगळ्या प्रसंगाकडे देखील जग आणि युरोपचे आवर्जून लक्ष होतं वरील सर्व प्रसंग हे आर्थिकदृष्ट्या आधीच तोळामासा झालेल्या स्पेन व त्याचाच प्रांत असलेल्या कॅटालोनिया यांच्यादरम्यान चालू असलेल्या संघर्षमय कथानकाचे सुटे भाग आहेत. पहिला प्रसंग या संघर्षातील निखार्‍याने पेट घेतला असल्याचे सुचवत होता तर बाकीचे तीन प्रसंग या वर्तमान संघर्षाचे संभाव्य परिणाम कशा प्रकारचे असू शकतात याची जणू प्रात्यक्षिके दाखवत होते.

हा झाला या कथानकाचा ‘प्लॉट.’ आता आपण बघू, या ‘प्लॉट’मागची खरी स्टोरी म्हणजे कॅटालोनियाचे स्पेनमधील स्थान? कॅटालोनियन्स स्पेनपासून वेगळे का व्हायचे म्हणतात? आणि खरेच तो तसा झाला तर उद्याचा कॅटालोनिया कसा असेल? त्याचे जगामधील स्थान काय असेल? या विभक्तीकरणाचा स्पेन, युरोप आणि जगावर काय परिणाम होऊ शकतो? अशा मुद्द्यांचा वेध आपण या लेखात घेणार आहोत.

 कॅटालोनियाचे स्पेनमधील स्थान?

स्पेनमधील पूर्वेकडचा कॅटलॉन प्रांत हा एक समृद्ध प्रदेश आहे. बार्सिलोना, गिरोना, लेडा आणि तारागोना ही चार शहरे मिळून तयार होणार्‍या या प्रांतास स्पेनमध्ये मुबलक स्वायत्तता आहे. बार्सिलोना ही या प्रांताची राजधानी आहे. कॅटालोनियाची लोकसंख्या 75 लाख आहे. म्हणजे साधारण आपल्या पुणे जिल्ह्याएवढी. परंतु ती स्पेनच्या लोकसंख्येच्या 16% एवढी आहे. संपूर्ण स्पॅनिश भूभागापैकी सात टक्के भूभाग याच प्रांताकडे आहे. स्पॅनिश तेथील राष्ट्रभाषा असली तरी स्थानिक लोकांची कॅटालिन भाषा या प्रांतात जास्त बोलली जाते.

कॅटालोनियाला स्पेनपासून वेगळे का व्हायचे आहे?

तसं पाहायला गेले तर कोणताही एक घटक यासाठी जबाबदार आहे असे म्हणता येणार नाही. कॅटालोनियातील ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक असे घटक वरील प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकतात.

कॅटालोनियाचे म्हणणे आहे की, आम्ही स्पेनमधील सर्वांत समृद्ध प्रदेश. स्पेनच्या तिजोरीत सर्वांत जास्त कर आमच्या भागातून जातो. शिवाय देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात आमचेच सर्वांत जास्त योगदान, आणि तरी देखील आम्हाला आतापर्यंत अन्यायाची आणि सापत्नभावाची वागणूकच मिळाली आहे. 1939 ते 1975 या काळात स्पेनचा हुकूमशहा जनरल फ्रँकोने कॅटालोनियन्सवर केलेले अत्याचार त्यानंतर 1978 च्या राज्यघटनेतून आणि 2006 मध्ये या प्रदेशाला स्वायत्तता आणि अधिकार वाढवून मिळाले खरे, परंतु 2010 मध्ये स्पेनच्या घटनापीठाने जादा अधिकार रद्द केले. त्याचबरोबर काही जणांचे असे म्हणणे आहे की, स्पेन हा आता आर्थिक आघाडीवर मागे पडलेला देश आहे आणि कॅटालोनियाला स्पेनसोबत राहून या आर्थिक पीछेहाटीचा भाग बनायचे नाही. याउलट त्यांना विभक्त होऊन स्वतःच्या बळावर भक्कम आर्थक प्रगती साधायची आहे.

स्पेनच्या अर्थविषयक आकडेवारीवर एक नजर टाकली तर आपल्याला कॅटालोनियाची आर्थिक ताकद दिसून येईल.

1) स्पेनच्या संपूर्ण निर्यातीमध्ये या प्रांताचे 26% योगदान आहे. 2) स्पेनला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या मोजली तर त्यामधील 24% पर्यटक फक्त कॅटालोनियाला भेट देतात. 3) स्पेनमध्ये होणार्‍या एकूण परकीय गुतवणुकीपैकी 30% गुंतवणूक एकट्या कॅटालोनियामध्ये आहे. 4) कॅटालोनियामधील दरडोई उत्पन्न स्पेनपेक्षा जास्त आहे. 5) कॅटालोनियाचा बेरोजगारी दर स्पेन पेक्षा 5% ने कमी आहे. 6) शेती अवजारे, रसायने, कापड, खाद्यान्न व त्यावरील प्रक्रिया ऑटोमोबाईल यासारखे बहुसंख्य उद्योगधंदे एकट्या कॅटोलोनियात आहेत. 7) स्पेनमधील पहिल्या पाच विद्यापीठांपैकी दोन विद्यापीठे कॅटालोनियातच आहेत. 8) स्पेनमधील भादिदनंतरचा सर्वात मोठा दोन नंबरचा विमानतळ बार्सिलोनाच आहे. 9) निसान आणि  वोक्सवॅगन कंपन्यांचे कारखानेही याच प्रांतात आहेत.

राजकीय कारण सांगायचे म्हटले तर 2014 साली झालेल्या निवडणुकांत या प्रांतातील सरकारने पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या मुुद्द्यावर जनमत घेण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर सत्तेवर आलेल्या प्रादेशिक सरकारने ही बाब आणखी रेटली. वास्तविक ते सरकार आघाडीचेच. परंतु सर्वच राजकीय पक्षांनी हा लोकप्रिय मार्ग चोखाळण्यास पसंती दिली. अपवाद फक्त स्पॅनिश पंतप्रधान मारिआनो रेहॉय यांच्या पक्षाचा. परंतु कॅटालोनियन विधिमंडळात या पक्षाचे अस्तित्व नाममात्रच. त्यामुळे रेहॉय यांच्या विरोधात फारसा परिणाम पडू शकला नाही.

कॅटालोनिया वेगळा झाल्यास त्याचे स्पेन, युरोप आणि पर्यायाने जगावर काय परिणाम होऊ शकतात?

अर्थतज्ज्ञांच्या मते, कॅटालोनिया वेगळा झाल्यास त्याचे स्पेन व युरोपवर फारसे गंभीर परिणाम होणार नाहीत. परंतु थोड्या काळासाठी दोन्ही देशांना थोडीफार आर्थिक झळ बसू शकते. विभक्तीकरणाच्या राजकीय व वित्तीय अटींवर देखील प्रामुख्याने खूप काही अवलंबून असेल कारण कॅटालोनिया जरी समृद्ध असला तरी त्यांच्यावरचे कर्ज देखील भरमसाठ आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे, कॅटालोनियामुळे जगात सार्वमताच्या बळावर खूप काही साध्य करता येते.’ असा संदेश जाऊ शकतो. कारण ब्रेग्झिटनंतर कॅटोलोनिया हे सार्वमताच्या यशाचे दुसरे उदाहरण असेल. त्यामुळे कॅटालोनियाचे स्वातंत्र्य जगभरातील फुटिरतावादी चळवळींना खतपाणी घालणारे ठरेल.

नवीन कॅटालोनियाचे जगातील स्थान काय असेल?

‘ओईसीडी’ या संघटनेतील अर्थतज्ज्ञांच्या मते 314 अब्ज डॉलर GDP असलेला कॅटालोनिया जगातील 34 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल जी की पोर्तुगाल किंवा हाँगकाँगच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी असेल. दरडोई उत्पन्नाचा निकष लावून तुलना करायची झाल्यास 35,000 डॉलर उत्पन्न असलेला कॅटालोनिया इस्रायल, दक्षिण कोरिया किंवा इटली या सारख्या देशांपेक्षा श्रीमंत व संपन्न असेल.

परंतु स्वतंत्र कॅटालोनियाला युरोपीय महासंघ प्रवेश देईल की नाही याबद्दल मात्र शंका आहे. कारण स्पेन व कॅटालोनियातील संघर्षात युरोपीय महासंघाने आतापर्यंत तरी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

स्पेनमधील सध्याची परिस्थिती काय आहे?

सध्यातरी स्पेनमधील परिस्थितीचे चित्र पाहता स्पॅनिश पंतप्रधान कॅटालोनियास स्वातंत्र्य देतील असे बिलकूल वाटत नाही. त्याचबरोबर कॅटालोनियाचे प्रमुख कार्लस प्युगडेमॉट माघार घेतील असे देखील वाटत नाही. आणि समजा कॅटालोनियाने एकतर्फी वेगळे होण्याची घोषणा केली तर स्पेनमधील केंद्र सरकारपुढे कॅटालोनियाचे सरकार बरखास्त करून त्याची स्वायतत्ता काढून घेण्याचा पर्याय शिल्लक आहे.

या सर्वांच्या केंद्रस्थानी असलेल्या सार्वमताविषयी बोलायचे झाले तर एवढेच म्हणता येईल की, सार्वमत हे लोकशाही राष्ट्रांसाठी आत्मघातकी ठरू शकते. त्यामुळे लोकशाहीत एकदा निवडून आल्यावर  लोकप्रतिनिधींनी महत्त्वाच्या प्रश्‍नावरील निर्णयासाठी पुनः पुन्हा सार्वमताचा आग्रह धरणे शहाणपणाचे नाही. कारण संबंधिताना लोक निवडून देतात तेच मुळी निर्णय घेण्यासाठी. असलेल्या अधिकारांचा वापर करून निर्णय घ्यायचे नाहीत, आणि वर पुन्हा लोकांनाच विचारायचे काय करू, अशी कार्यशैली लोकशाहीच्या गळ्यास नख लावणारी आहे. सार्वमत हे जरी प्रत्यक्ष लोकशाहीचे एक साधन असले तरी त्याचा अत्यंत मर्यादित व विवेकबुद्धीने वापर करावा हाच ब्रेग्झिट व स्पेन या कथेमागचा अन्वयार्थ आहे.

लेखक : — गणेश दहातोंडे
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *