‘सिंहासन’कार अरुण साधू

साधू यांचे निधन झाल्याच्या बातमीने जरा धक्काच बसला. एकतर अलिकडे त्यांची भेट झाली होती. गोविंद तळवळकर यांची श्रद्धांजली सभा आटोपल्यावर कुमार केतकरांबरोबर मी जाणार होतो. केतकरांनी साधूंना वांद्र्याला सोडले. दादर ते वांद्रे त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यांचा कधी कधी फोन व्हायचा. मध्ये चित्राचे राईट्स विकायला हवे होते तेव्हा फोन केलेला साधू म्हणाले, ‘या कधीतरी एकदोनदा गप्पा मारायला. त्याआधी त्यांनी एकदोनदा सांगितलेले की मला मॅक्झिन्स हवेत. ती जर सेकंड हँड मिळाली तर चालेल तर मी म्हटले बघतो. पण तशा फार भेटी झाल्या नाहीत, मी असे म्हणायचो, ‘कधी वांद्र्याला जाईन तेव्हा भेटेन; गप्पा मारेन पण असे काही झाले नाही आणि मग पर्वाची भेट त्यांची शेवटची ठरेल असे कधी वाटले नव्हते.

लहानपणापासून जी पुस्तके परत परत वाचावीशी वाटतात ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ ही पुस्तके होती. ‘मुंबई दिनांक’ मधील दिगू टिपणीसचे वर्णन दिनू रणदिवेवरून केल्याचे तसेच डिकास्टा, जॉज फर्नांडिस वरून केल्याच्या गोष्टी चर्चेत होत्या. दिगु कारण सगळेच मित्र तेव्हा वाचणारे होते. एक लेखक म्हणून पहिल्यांदा भेटले ते महानगरमध्ये ते कॉलम लिहायचे कधीमधी फोनवर बोलणे व्हायचे. त्यांचे आणि माझे एक वेगळे नाते होते. ते असे की ते टाईम मॅक्झिन्सचे ते पुरुष स्ट्रींगर होते. मी स्वतः टाईम मॅक्झिन्ससाठी 2008 पासून काम करायला लागलो स्ट्रिंगर म्हणून. एका भेटीत त्यांना हेही सांगितले.

स्वतः साधू यांनी एकदा सांगितले होते की त्यांनी जेव्हा टाईम्सच्या वार्ताहारांना सांगितले की ते लेखक आहेत आणि त्यांनी कादंबऱ्या वैगरे लिहिल्या आहेत तेव्हा साधूंनी पुढे लिहिले होते की हे ऐकून त्यांना खूप आश्चर्य वाटले याचे कारण पत्रकारितेतून त्यांना वेळच मिळत नव्हता. आणि मग त्यांनी टाईमचे काम कसे करतात वैगरे लिहिले होते. त्यात असे लिहिले होते की कुठलीही स्टोरी असेल तर विमानाने तेथे जायचे आणि जर विमान नसेल तर charterd विमान करायचे या गोष्टी खूप भपकेबाज वाटल्या होत्या. नंतर टाईम्सचे काम करताना त्या आल्याच.

साधू यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. ‘सिंहासन’ वगैरे झालेच शोध यांची कादंबरी समकालीन काळाचा मोठा तुकडा सांगणारी होती. सिंहासन आणि ‘मुंबई दिनांक’ या कादंबऱ्यांनी राजकीय कादंबरीचा मानदंड निर्माण केला. इतर राजकीय कादंबऱ्यांना सतत त्यांच्याशी तुलनेला सामोरे जावे लागते. यावरचे  सिनेमेही तसे कादंबरीला न्याय देणारे आहेत. जर ‘झिपऱ्या’ ही रस्त्यावरच्या मुलाची गोष्ट ‘झिपऱ्या’ या कथेवर सिनेमा यावा असे अनेकांना वाटत होते. प्रत्यक्षात तो सिनेमा आला आणि तसे काही घडले नाही. त्यांची ‘विप्लवा’ ही कादंबरी मला आवडली आणि जे कृष्णमूर्तींच्या तत्त्वज्ञानाबद्दल मी त्यातच वाचले.

कथापण ते लिहित पण साधूंना कोणी कथाकार म्हणणार नाही. त्यांचे चीन वरचे पुस्तक चीन समजून घ्यायला खूप उपयोगी पडले. फिडेल आणि क्रांती फिडेलच्या क्रांतीची अलीकडे नवीन एडिशन निघाली तेव्हा बरे वाटले. अक्षांश-रेखांश हे महानगरच्या कॉलममधले हे पुस्तक होते. ‘तिसरी क्रांती’ हे रशियावरचे पुस्तक. एकूण साधूंनी मराठी समाजाला बरेच काही दिले. पण त्या अर्थाने जसे पु. ल. किंवा कुसुमाग्रज सारख्या साहित्यिकांच्या मराठी समाजाने आदर केला तसे साधुंबाबत घडले नाही.

साधू हे खूप स्पष्टवक्ते होते, पत्रकार होते. शेवटच्या काळात free press journal संपादित करत असताना अचानक त्यांनी सोडून दिले. मराठी लोकांसाठी साधू इंग्रजीतले गृहस्थ होते, तर इंग्रजी लोकांसाठी साधू मराठी असे काहीतरी विचित्र झाले होते. परिणाम असा व्हायचा की साधूंना महाराष्ट्र फौंडेशनने जरी अवॉर्ड दिला तरी ते इतके मोठे साहित्यिक लोकांना वाटले नाही. याची कारणे शोधावी लागतील.

मला असे वाटते की केतकरांपासून साधूपर्यंत जी काही मंडळी आहेत वाचणारी, त्यांचा एक ग्लोबल आउटलुक असतो. असा आउटलुक मराठी माणसाला झेपत नाही. याला पु.ल. मराठी नाट्यसंगीत मराठी भावगीते याच्यावर पोचलेला साधू कधीच आवडले नाही हे माझे एक निरीक्षण आहे. साधूंनाही कधी मराठी माणसांमध्ये मिरवावेसे वाटले नाही. पण ते स्पष्ट आणि ठळकपणे बोलत. प्रामुख्याने परदेशी नियतकालिके वाचायचे. असे वाटायचे की यांना कोणाबद्दल आदर नाही की काय?

मराठी माणसाच्या मर्यादा त्यांना नेमक्या माहीत होत्या. विशेषतः कथा कादंबऱ्यांबद्दल त्यांनी एकदा लिहिले होते. अनेकजण आपल्या आत्मचरित्राला कथा कादंबऱ्यांचे रूप देतात. हा टोला अनेक नवीन लेखकांना होता पण तो खराही आहे. साधूंशी ज्या कधी मोडक्या तोडक्या गोष्टी झाल्या, त्याच्यात दोन गोष्टी लक्षात आल्या एक म्हणजे ते डोळ्याला डोळे भिडवून कधी बोलत नव्हते. दुसरीकडे पाहत आणि थांबत थांबत ते बोलत. ते, कुमार केतकर, गांगल अशा काही मंडळींचा अड्डा होता.

दोन राजकीय कादंबऱ्या लिहिल्या त्यांची कुठल्याही राजकीय नेत्याशी मैत्री नव्हती. पत्रकारितेचे जे काही पाहून पाहून निरीक्षण केले. ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’, दोनही कादंबऱ्यांवर चित्रपट झाला. मला वाटते बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्रपटाच्या स्क्रिप्टसाठी त्यांनी मदत केली असावी, मला नक्की माहीत नाही.

जीवनाचा हा आनंद मनमुरादपणे घेतला. तळवलकरांइतके नाही पण त्यांना ब्रिटिशांबद्दल वाटत होते. साधूंनी अजून लिहायला हवे होते. वाचन, खाणे पिणे या गोष्टीत ते चोखंदळ होते. त्यांच्या लिखाणात तसा उबग जाणवत नाही, जो साठोत्तरी लेखकांच्यात जाणवते. आणीबाणीचे त्यांनी समर्थन केले आणि सोनिया गांधींवर त्यांनी अतिशय गौरवास्पद लिहिले. ही अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाची कादंबरी वाटते. विप्लव ही कादंबरी अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाची वाटते. द्विमिती आणि त्रिमितीचे त्यात फार सुंदर वर्णन आले आहे. एखादी वैज्ञानिक कल्पना समजावून देण्याचे काम मराठी विज्ञान कादंबऱ्यांना करावेच लागते. या कादंबरीत ते साधले आहे.

मराठी संपादकांच्या सतत सगळ्यांना ठोकून काढण्याच्या वृत्तीवर त्यांनी टीका केली होती. त्यांची चीन आणि रशियावरची पुस्तके ते देश समजावून घ्यायला मदत करतात. ‘ड्रॅगन जागा झाल्यावर’मध्ये त्यांनी माओचे स्पष्ट चित्रण केले. चीनमध्ये झालेल्या बदलांनंतर त्यांनी पुस्तकाला नावे पोस्टस्क्रिप्ट लिहिले. ‘फिडेल, चे आणि क्रांती’ हे पुस्तक दीर्घकाळ आउट ऑफ प्रिंट होते. अलिकडेच त्याची नवी आवृत्ती आली. हे छोटेखानी पुस्तक चे गवेरा आणि फिडेल यांचा करिष्मा समजावून देते. त्यांनी विक्रम सेठच्या ‘सूटेबल बॉय’ या कादंबरीचा अनुवाद केले याचे त्यांच्या अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटले होते. पण अनुवाद आणि स्तंभलेखन पैशासाठी उपयोगी असतात अशी त्यांची भूमिका होती.

एकदा बहुधा मॅजेस्टिक गप्पात ते म्हणाले ‘मी जर लेखन करत असेल आणि कोणी भेटायला आले तर बायकोला विचारले साधू बिझी आहेत का? तर ती सांगते नाही या. म्हणजे लेखन करणे ही आपल्याकडे काम मानले जात नाही.

साधू एक निरीक्षक होते आणि खरा निरीक्षक हा किनाऱ्यावरून बघतो असे काहीतरी साधूंचे असावे. ते गेल्याने मराठी समाजाचे नुकसान झाले हे मात्र खरे.

लेखक : शशिकांत सावंत
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *