राजकीय चौकोनात महाराष्ट्र!

ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांचे महाराष्ट्रात राजकीय सीमोल्लंघन होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. शिवसेनेतच केवळ होते म्हणून जे मुख्यमंत्री होऊ शकले त्या नारायण राणे यांनी काँग्रेस सोडण्याची केलेली तयारी, त्यासाठीचे इशारेप्रतिइशारे आणि त्यांच्या भाजपा प्रवेशाबाबत तूर्तास व्यक्त होत असलेली अनिश्चिती या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसाच्या वातावरणातही महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी देशभरातच सध्या भाजपा नेतृत्वाकडून ‘काँग्रेस मुक्त भारता’च्या ज्या घोषणा दिल्या जात आहेत, त्याबाबतची वस्तुस्थिती पाहता आता ‘काँग्रेसयुक्त भाजपा’ अशीच स्थिती निर्माण होऊ लागल्याचं दिसतं. नोटाबंदीनंतरची बदललेली अभूतपूर्व परिस्थिती, पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर्ससह वाढत चाललेली महागाई, शेतकऱ्यांची कर्जमाफी या आणि अशा अनेक समस्या सर्वसामान्यांच्या तोंडाला फेस आणत असताना राजकीय पक्षांच्या कळपांमध्ये मात्र संधीसाधूपणाचीच नवनवी प्रात्यक्षिकं पहायला मिळतात.

भाजपाला आता थेट ग्रामपंचायतीपर्यंतची सगळी सत्तास्थानं आपल्या ताब्यात हवी आहेत, काँग्रेसची दिशाहीनता देशपातळीवर जशी आहे तशीच  महाराष्ट्रातही दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसते, तर सत्तेत राहूनही सत्तेचे पुरेसे फायदे आणि समाधान मिळत नसल्याने शिवसेनेची कधी नव्हे एवढी राजकीय गोची होताना दिसत आहे. राष्ट्रवादी आणि मनसेने आपापल्या पक्षपातळीवर प्रबोधन आणि जमेल तेवढं आंदोलन हाती घेण्याचा (विधायक!) निर्णय घेतल्याचं दिसतं. परिणामी सध्या तरी महाराष्ट्र राजकीय चौकोनात अडकून पडल्याचं दिसून येतं.

शिवसेनेतील नाराजी नाट्यानंतर खुद्द  शिवसेनाप्रमुखांनाही विरोध करण्याची  आक्रमक भूमिका घेऊन राणे यांनी काँग्रेसमध्ये उडी मारली. खुद्द शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणातही राणेंनी शिवसेनाप्रमुख स्वत: निवडणुकीच्या मैदानात उतरले तरीही तिथल्या शिवसेना उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून दाखवले, हा फार अलिकडचा इतिहास आहे. त्यामुळं शिवसेनेनं देखील चवताळून कोकणातल्या आपल्या शिलेदारांना ताकद दिली आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं. राणे यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न दाखवून काँग्रेसनं आपल्या पक्षात घेतलं खरं! पण जिथं आता देशभरात काँग्रेस पक्षाला आणि नेत्यांनाच स्वत:च्या आणि स्वपक्षाच्या अस्तित्वाची काळजी करावी लागत आहे, तिथं राणेंना काही देणं कसं काय जमणार होतं? खरं म्हणजे राणेंना स्वत:कडं महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाचं म्हणजेच राज्यातल्या सध्याच्या विरोधी पक्षाचं नेतृत्व हवं होतं. पण काँग्रेस  हायकमांडमधल्या मंडळींनी राणेंना नेहमीच सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला. आक्रमक स्वभावाच्या आणि कुठल्याही पक्षात असो, स्वत:च्या गटाचे आणि कार्यकर्त्यांचे नेहमीच स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याची पद्धत अवलंबणारे नारायण राणे यांना मात्र सुरुवातीपासूनच काँग्रेसमधील वातावरण मानवलं नसल्याचं दिसून येत गेलं. काही काळानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या समक्ष भेटीत त्यांनी आपली अस्वस्थता बोलून दाखवली. राणेंइतका स्वतःची ताकद असणारा नेता गमावणं आपल्याला परवडणार नाही याची पुरेपूर कल्पना असणाऱ्या काँग्रेस पक्षानं मात्र राणे यांच्याबाबत  नेहमीच संदिग्ध भूमिका घेतली. आपल्याला जी राजकीय पदं हवीत, आपल्या मुलांसाठीही हवीत अशी अपेक्षा बाळगून असणारे नेते नारायण राणे त्यामुळं खरोखरीच बेचैन झाले.

दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातही सत्तापरिवर्तन झालं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने शिवसेनेला अक्षरश: आपल्याबरोबर यायला लावलं. परिणामी वर्षानुवर्षे राजकीय विरोधकाच्या भूमिकेत वावरणाऱ्या शिवसेनेला सत्ता येऊनही ती मानवली नाही. त्यातच शिवसेनेच्या आमदारांना  मतदारसंघासाठी दिला जाणारा निधीही पुरेसा आणि वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. जिथं मंत्र्यांनाच फारसे अधिकार वापरायला मिळत नाहीत तिथं आमदारांचं काय? अशी अवस्था निर्माण झाली. परिणामी दिवसेंदिवस शिवसेनेची अवस्था ‘सहनही होत नाही, आणि सांगूनही उपयोग नाही’ अशी होऊ लागली. सत्तेतून बाहेर पडावं तर 15 वर्षानंतर मिळालेली सत्ता सोडण्यास काहींचा विरोध होऊ लागला, तर काही जणांनी आपला मूळ स्वाभिमान जागवत सत्ता सोडण्याचा आग्रह सुरू केला. कोणत्याही राजकीय, प्रशासकीय निर्णयाच्या बाबतीत शिवसेनेला फारसा काही ‘स्कोप’ न ठेवता निर्णय घेतले जात असल्याच्या शिवसेनेच्या तक्रारी आहेत. तर सत्तेतून शिवसेना बाहेर पडली तरी आपल्या सरकारला धोका नसल्याची खात्री मनात बाळगूनच विद्यमान मुख्यमंत्री आपल्या भूमिकेवर ठाम राहात आहेत, अनेक ‘अदृश्य हात’च हे सरकार टिकवतील अशी चमत्काराची भाषा ते आवर्जून बोलत आहेत, त्यामुळं शिवसेनेचा तीळपापड होणं स्वाभाविकच म्हणावं लागेल. त्यातच पंतप्रधान मोदी, भाजपाचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भाजपाच्या देश आणि राज्य पातळीवरील अनेक ‘शीर्षस्थ’ नेत्यांच्या बाबतीत जोरदार टीका करण्याची भूमिका शिवसेनेनं वेळोवेळी घेतल्यामुळं भाजपाच्या मंडळींनाही शिवसेनेबरोबर राहून कारभार नको असं वाटू लागलं आहे. या सगळ्यामुळं लोकांनी सत्तेतून बाहेर फेकलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र टीकेसाठी ‘आयते कोलीत’ आपण देत आहोत. हे सरकार चालवणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि त्यांच्या मंत्र्यांना कसं बरं कळत नसेल? दुसरीकडं आपला ‘भुजबळ’ होऊ नये याची दक्षता घेत घेत सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांच्या मनात सरकारविरोधाचे अनेक प्रश्न असूनही त्यांना ते प्रभावीपणे मांडणं तितकंसं सोयीचं होत नसल्याचं दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून ते सिंचन घोटाळ्याच्या चौकशीपर्यंत आणि अशाच काही महत्त्वपूर्ण निर्णयांपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांचंही तळ्यात-मळ्यात सुरू असलेलं दिसतं.

या साऱ्या पार्श्वभूमीवर हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत नारायण राणे यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीविषयी घोषणा केलेली असेल. कदाचित त्यांनी काँग्रेसला समांतर अशी संघटना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असू शकतो. नाहीतरी सध्या त्यांचे चिरंजीव ‘स्वाभिमान’ या नावाने संघटना चालवत आहेतच. राणे यांच्यासमवेत त्यांच्या दोन्ही मुलांनाही भाजपामध्ये घेण्याचा त्यांचा आग्रह आहे, पण ‘एकावर दोन फ्री’ अशी योजना भाजपा. स्वीकारणार नसल्याची मार्मिक टिप्पणी प्रसारमाध्यमांतून होताना दिसते. त्यामुळं एकीकडं काँग्रेसवर टीका करतानाच आम्ही फक्त सोनिया गांधी यांचा आदेश मानू असं म्हणायचं आणि दुसरीकडं भाजपामध्ये प्रवेशाची मुदत लांबत असल्यामुळं आपल्या समर्थकांना कामात ठेवण्यासाठी स्वतंत्रपणे कार्यरत रहायचं असं धोरण सध्या राणे पिता-पुत्रांनी स्वीकारल्याचं दिसतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नजीकच्या काळातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका राणे आपल्या समर्थकांच्या भरवशावर स्वतंत्रपणे लढवणार आहेत. याचाच अर्थ काँग्रेसमधून स्वतः बाहेर न पडता काँग्रेसवर टीका करत स्वतःचं संघटन भक्कम करीत रहायचं आणि ग्रामपंचायतींसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आपला प्रभाव कायम ठेवत भाजपामध्ये संधी शोधायची असं त्यांचं नजीकचं धोरण दिसतं.

खुद्द काँग्रेस पक्षानं त्यांच्या इतक्या वर्षांच्या वाटचालीत अशा संधीसाधू मंडळींचा इतका प्रदीर्घ अनुभव घेतलेला आहे की, अशा घटकांपासून ते फारसा बोधही घेत नाहीत किंवा ‘ठंडा करके खाओ’ या धोरणानुसार प्रकरण भिजत ठेवण्याचं धोरण स्वीकारतात. परिणामी राणे यांच्यासारख्यांनी काँग्रेसनं नेमलेल्या नेतृत्वावर केलेली टीका काळाच्या ओघात विरून जाते. परस्पर विरोधकांना काही काळ याच्या गुदगुल्या होतात आणि पुन्हा निवडणुका आल्या की, सर्वसामान्यांचे, गरीबांचे प्रश्न मांडून लढाया सुरू होतात. वर्षानुवर्षे काँग्रेसला याची सवय आहे. परिणामी राणे विरोधकांना ताकद पुरवत काँग्रेसचं महाराष्ट्र पातळीवरचं नेतृत्व या अध्यायावर मात करेल अशी चिन्हं दिसत आहेत. काँग्रेसची राणे प्रभावाखालील सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून तिथं नवीन जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी नेमणं, खासदार हुसेन दलवाई यांनी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याचे दौरे काढून निष्ठावंत काँग्रेसजनांना बळ देत राहणं हे आता काँग्रेसनं सुरू केलं आहे. राणे जेव्हा शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले, तेव्हा त्यांची काही विचारधारा बदललेली नव्हती. ती आजही बदलताना दिसत नाही. शिवसेनेत त्यांनी मिळवण्याजोगं काहीच शिल्लक नव्हतं आणि उद्धव ठाकरे या नव्या नेतृत्वाशी त्यांचं जमत नव्हतं म्हणून त्यांनी काँग्रेसशी घरोबा केला. तिथंही काही सन्मानपूर्वक मिळणार नाही याची खात्री पटल्यानं आणि नजिकच्या भविष्यात काँग्रेसला देशाच्या/राज्याच्या राजकारणात फारसं भवितव्य नसल्याच्या सार्वत्रिक वातावरणामुळं आता भाजपा शिवाय पर्याय नाही हेही राणे यांच्या लक्षात आलेलं दिसतं त्यामुळे भाजपाशी घरोबा करणं याशिवाय त्यांना पर्यायही उरलेला दिसत नाही.

भाजपाच्या दृष्टीनं राणेंशी जवळीक वाढवून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची आयती संधी सोडू नये अशी भूमिका दिसते. राणे यांच्या टीकेमुळं काँग्रेसची स्थिती आणखी खिळखिळी कशी होईल, याबरोबरच शिवसेनेला चाप लावण्यासाठी या पूर्वाश्रमीच्या शिवसेना नेत्याची मदत घेता येईल असं भाजपाचं धोरण दिसतं. शिवसेनेची त्यामुळे सुरू झालेली चडफड आणि राणेंना सत्तेत घेतल्यास त्यांच्या सारख्या बरोबर सत्तेत बसण्यामुळं निष्ठावंत आणि शिल्लक असणाऱ्या शिवसैनिकांना जाणारा संदेश अशा वैचारिक गोंधळात शिवसेना आता सापडली आहे असं दिसतं. भाजपाशी पटत नाही, पण सत्ताही सोडवत नाही, सत्ता सोडायची ठरवलं तर शिवसेनाच फुटण्याची भीती आणि न सोडावी तर मोदी, शहा आणि एकूणच भाजपाच्या झंजावातामध्ये आपल्याला भविष्य काय असेल? याबाबतच्या चिंतेमुळं शिवसेनेची कोंडी झाली आहे. यातून उद्धव ठाकरे आणि त्यांचे ‘सल्लागार’ कसे मार्ग काढतात हे पाहणं खरोखरीच औत्सुक्याचं आहे.

महाराष्ट्राचं राजकारण सध्या भाजपाशिवसेना-नारायण राणे आणि काँग्रेस या चौकोनामध्ये फिरताना दिसतं. त्याचा केव्हाही त्रिकोण होऊ शकतो. त्याचा परिणाम विद्यमान सरकारवर होऊ शकतो. दुर्दैव एकच की, या सगळ्या प्रवासात विचारधारा आणि त्यांचे मतभेद याला काहीच किंमत नाही, केवळ राजकीय सोय आणि स्वार्थ हेच केंद्रस्थानी दिसते.

लेखक – शशिकांत सावंत
संपर्क – swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *