योग्य आणि बरोबर

मराठी भाषा आणि त्यातले प्रत्येक शब्द व त्यातील स्वतंत्र अर्थच्छटा मला नेहमीच खुणावत असतात. याचे कारण प्रत्येक शब्दाला असणारी अर्थच्छटा ही काही महत्त्वाची गोष्ट आपल्याला देऊन जाते. उदाहरणार्थ वर दिलेले शीर्षक योग्य आणि बरोबर या दोन्ही शब्दांनी मला असाच मोह घातला होता. वरवर सारखे वाटणारे हे दोन शब्द

मला असेच खुणावू लागले. त्यांच्यातील नेमका फरक काय आहे हे मला अधिक खोलात जाऊन शोधावेसे वाटले. यासाठी अर्थातच काही कारणे व वाचनात या शब्दांवरील भेद प्रत्ययास आला.

त्यापुढे जाऊन अधिक विचार केल्यावर असे लक्षात आले की, या दोन्ही शब्दांच्या अर्थातच एक मोठी गफलत आहे. प्रत्येकाला आपण विचार करतो व त्यानुसार वागतो ते योग्य आहे असेच वाटते. या त्याच्या योग्य वाटण्यावर त्याची मानसिकता किंवा माईंडसेट आणि त्याची जीवनशैली ठरत असते. विशेष म्हणजे आपण करत असणारी गोष्ट योग्यच आहे हा विचार ठाम होत गेल्यानंतर तो बदलणे आवघड जाते. प्रत्येक दुसर्‍याला आपले वागणे योग्य असल्याची खात्री वाटत असल्याने या दोन स्वतंत्र योग्य वाटणार्‍या व्यक्तींमध्ये मतभेद व संघर्ष निर्माण होतात.

योग्य आणि बरोबर मधला फरक : 

एकप्रकारे आपल्याला जे योग्य वाटते ते आपल्यापुरते खरे असते. तसे दुसर्‍याचे खरे हे त्याच्यापुरते असते. म्हणजे प्रत्येकाला त्याचे योग्य वाटणे ही सापेक्षताही आपण स्वीकारत असतो. हा झाला या विषयाचा एक भाग. आता थोडे पुढे जाऊ. प्रत्येकाच्या या योग्य वाटण्यापलीकडेही बरोबर असणे नावाची दुसरी गोष्ट अस्तित्वात असते. ते बरोबर काय असते हे थोडे नंतर पाहून पण यामागचे एक सूत्र म्हणजे प्रत्येक योग्य हे बरोबर असेलच असे नाही. याचे कारण बरोबर असणे हे सांगोपांग विचार करून सत्याच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न असतो. आणि बरोबर हे एकच असते, जसे योग्य हे सापेक्ष असू शकते शिवाय योग्य हे अनेकही असू शकतात.

आता थोडे आणखी पुढे जाऊ व या शब्दांमधील भेदाचा तटस्थपणे पाहायचा प्रयत्न करू. माणसाने निर्माण केलेल्या शब्दांचे अर्थ नेमके काय आहेत हे माणूस नसणारा जीव किंवा तत्सम गोष्ट कदाचित अधिक नेमकेपणाने सांगू शकेल. या तटस्थपणा किंवा दूरस्थपणासाठीच कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करण्यासाठी संगणक किंवा त्यापूर्वीची गणनयंत्रे निर्माण झाली.

असे सांगितले जाते की, दुसर्‍या महायुद्धात जेव्हा व्हॅक्यूम ट्यूबचा शोध लागला, तेव्हा मार्क एनियक यांसारखी अवाढव्य गणनयंत्रे बांधली गेली. ही गणनयंत्रे हीच आजच्या संगणक किंवा कॉम्प्युटरची जननी! त्यानंतर ट्रान्झिस्टरचा शोध लागला. त्याच काळात व्हॉन नॉयमॉन यांनी आपली इन्फर्मेशन आणि गेम थिअरी विकसित केली. गणनयंत्रांचा आकारही पुढे लहान होत गेला. त्याचबरोबर त्याची स्मृतीही वाढत चालली. तसेच गणिती क्रिया करण्याची गतीही वाढत गेली. जोडीला या गणनयंत्राची स्मृतीही वाढू लागली. आपल्याकडे पुण्यात सी-डॅक या संस्थेने 1990 च्या दशकात सुरुवातीला परम दशसहस्र या महासंगणकाची निर्मिती केली होती हे आठवत असेलच. त्याचवेळी लाईट मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप, अत्यंत सूक्ष्म असे प्रोब इत्यादींच्या सहाय्याने मेंदूची रचना, बांधणी, कार्यपद्धती यांच्यावरही संशोधन सुरू होते. अर्थात मेंदूतील सर्व क्रिया संगणकासारख्याच होत नाहीत. शून्य-एक किंवा उघडे बंद अशा द्विमूल्यांवरच चालतात. संगणकासारखी मेंदूत वलये किंवा सर्किट्स आहेत. मेंदूत लक्षावधी मज्जापेशी आणि त्यातली प्रत्येक इतर हजारो पेशींना जोडलेली. मेंदू आणि संगणक यांचे उद्दिष्ट एकच आहे ते म्हणजे सत्य शोधणे. सत्य सांगणारे जे दोन शब्द आपण मघाशी बघितले योग्य आणि बरोबर त्यातील अर्थच्छटा शोधणे.

तर असे संगणक किंवा त्यांच्या पुढची अवस्था असणारे प्रगत रोबो किंवा यंत्रमानव कोणती भाषा वापरत असतील. आता योग्य आणि बरोबर या शब्दांमधला फरक काय आहे? चार गुणिले चार याला बरोबर असणारे उत्तर एकच असू शकते. ते म्हणजे सोळा. पण याच तर्काने पुढे गेले तर पण योग्य उत्तरे अनेक असू शकतात. गणिताच्या परिभाषेत बोलयाचे तर योग्य उत्तर हे तुम्ही आधी लावलेल्या निकषांवर, संदर्भाच्या चौकटीवर, काही आडाख्यांवर किंवा सोप्या शब्दात सांगायचे तर मनात येईल तसे ठरवू शकता. यानुसार गणितात असा नियम तयार करता येईल की योग्य उत्तर हे बरोबर उत्तरापेक्षा एका अंगाने कमी, वा जास्त, वा  त्याचा वर्ग वा त्याची दुप्पट असेल. असे असले तर गणितातला हा नियम भाषाशास्त्र, भौतिकशास्त्रे व जीवशास्त्र यांना कसा लावणार? म्हणजे या विश्‍वात किंवा तारकाचक्रात उत्क्रांत झालेली मानवी संस्कृती असेल तर या सार्‍यात समान असे काय असू शकेल?

थोडं आणखी पुढं गेलं तर ते सांगता येईल. योग्य – अयोग्य आणि चूक – बरोबर या चार शब्दांची उलटापालट झाली तर योग्य हेच चूक किंवा अयोग्य असू शकते म्हणजे जे चूक आहे तेच योग्य ठरते! अशी ही विश्‍वव्यापी व्याख्या ठरू शकते. एक एकप्रकारे मानवी तर्कशुद्धतेचा तो उपहासही ठरतो! कोणत्याही ठराविक माहिती विचारणार्‍या प्रश्‍नाचे बरोबर उत्तर नसतेच असेच त्यातून स्पष्ट होताना दिसते. थोडक्यात नि:संदर्भ, निरर्थक उत्तर हेच योग्य उत्तर ठरते! तर दुसर्‍या बाजूला तर्कशुद्ध, खरं आणि म्हणजेच बरोबर उत्तर एकच असतं. म्हणजे एका प्रश्‍नाचे योग्य व बरोबर अशी दोन उत्तरे असतात. प्रसिद्ध भयकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांच्या यक्षप्रश्‍न या कथेतून त्यांनी योग्य आणि बरोबर यांच्या गणिती मूल्यांचा हाच मुद्दा अतिशय प्रभावीपणाने मांडला आहे. जेव्हा मी ही कथा व त्यामागची गणिती पार्श्‍वभूमी वाचली तेव्हा मला

मराठी शब्दांमधल्या अर्थच्छटा व त्यांची ताकद अधिक प्रकर्षाने जाणवली. थोडक्यात गणित हे भाषेसारख्या न मोजता येणार्‍या ठिकाणीही वापरता येऊ शकते!

माणूस आपल्या नेहमीच्या रोजच्या व्यवहारातही योग्य आणि बरोबर या दोन शब्दांची सातत्याने गल्लत करताना दिसतो. त्याच्या दृष्टीने बरोबर आणि योग्य या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. याचे कारण आपल्याला देण्यात आलेल्या पर्यायी शब्दांमध्ये किंवा थिसॉरसमध्ये हे दोन्ही शब्द एकाच अर्थासाठी वापरता येतात असे सांगितले जाते. स्थूलपणे हे ठीक आहे. पण योग्य शब्द कुठे वापरायचा आणि बरोबर कुठे वापरायचा हे थिसॉरस सांगत नाही. त्यासाठी व्यवहारात किवा कुणाला हे शब्द वापरून लिहिण्यापूर्वी त्यांचा नेमका अर्थ आधी समजावून घ्यावा लागेल.

यासाठी थोडे मानवी मानसशास्त्रातही डोकवावे लागेल. मानवी संवेदना, त्यानुसार निर्माण होणार्‍या जाणीवा आणि त्यांच्या आधारे सोडवले जाणारे प्रश्‍न या तीन गोष्टींशी याचा थेट संबंध जोडला जातो. कोणत्याही बुद्धिवादी माणसाला आपण ज्या परिस्थितीतून जात आहोत ते लक्षात घेता त्या स्थितीकडे कोणत्या नजरेतून पाहायचे असा तर्कशुद्ध प्रश्‍न पडतो. वयाने मोठा किंवा अनुभवी माणूस असेल तर तो नेमका अडतो कुठे तर त्याने आतापर्यंत ठरवलेले धोरण व त्याची अंमलबजावणी करताना त्याचा अपेक्षित परिणाम न घडता उलट त्यातून नवनवे प्रश्‍न निर्माण झाले तर. किंवा त्याच्या पुढे निर्माण झालेला पेच नेहमीच्या पद्धतीने सुटणारा नसला तर. समोर नव्याने निर्माण झालेल्या प्रश्‍नाकडे पहाताना व तो सोडवताना आपला अ‍ॅप्रोच किंवा त्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन चुकला आहे का, असे त्याला यावेळी प्रकर्षाने वाटू लागते.

मग तो स्वत:ला पुढचा प्रश्‍न विचारतो, तो असा की, आपण या परिस्थितीकडे पुरेशा तटस्थपणाने पाहात नाहीयोत का? आपल्याला पडलेल्या प्रश्‍नाचे योग्य उत्तर सापडले का बरोबर उत्तर सापडले? अशी द्विधा मनस्थिती जेव्हा त्याच्यापुढे निर्माण होते तेव्हा त्याला या दोन्ही शब्दांमधील सुप्त अर्थच्छटा अधिक प्रकर्षाने स्पष्ट दिसू लागतात!

वास्तविक, व्यावहारिक जीवनात अशा बुद्धिवादी माणसाला यापूर्वीही असे अनेक प्रसंग व प्रश्‍न पडले होते व आधीचे धोरण वापरून त्याने त्या परिस्थितीवर मात करत ते प्रश्‍न यशस्वी रीत्या सोडवलेही होते. जेव्हा तो पुढे आणखी विचार करू लागला की यापूर्वीही आपण काही ठिकाणी यश आणि अपयशही स्वीकारले मग आत्ताच हा गुंता का सुटत नाही? आपला मार्ग जास्त तर्कशुद्ध, व्यवहार्य आणि थेट उत्तरे देणारा होता, असे असतानाही आता तेच धोरण गैरलागू का ठरते आहे?

मग त्याला जाणवते की आता आपले पूर्वीचे धोरण ज्या नव्या संदर्भात आपण वापरतो आहोत तो संदर्भ व ती संबंधित व्यक्तीही तितकीच महत्त्वाची आहे. ज्या संदर्भात हा प्रश्‍न आहे त्यातील व्यक्तीचीही स्वत:ची एक बाजू असू शकते. त्याची स्वत:ची एक भूमिका असते. आणि तीच आपण तटस्थपणे समजावून घेण्यात कमी पडतो आहोत, याचा साक्षात्कार होतो!

एकदा का समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून पडलेल्या प्रश्‍नाकडे पाहाता आले की आपले या पूर्वी अशा प्रश्‍नाकडे बघण्याचे धोरण किती अपुरे आहे याची लख्ख जाणीव होते. मग अशावेळी यापूर्वीचे प्रश्‍न यशस्वीरित्या हाताळायचे आपला अनुभवही इथे उपयोगी ठरत नाही. अधिक विचार केला तर या दोन्हीसाठी असणारे निकष वेगळे आहेत व त्यात तफावत आहे हे त्याला हळुहळू जाणवायला लागते. ती तफावत का निर्माण झाली हा प्रश्‍नही मग आपल्याला सतावू लागतो. तेव्हा जाणवते की या पूर्वी आपण राबवलेले धोरण व त्यामागची आपली प्रवृत्ती ही आताही तितकीच आग्रही व आक्रमकही आहे. समोरची व्यक्ती व प्रश्‍न सोडवताना त्या व्यक्तीला कदाचित हेच खटकत असते. कारण त्याला त्याचे म्हणणे योग्य वाटत असते. दुसरीकडे आपल्याला आपलेच बरोबर आहे अशी खात्री असते. आणि इथेच योग्य व बरोबर या शब्दांच्या अर्थांमधले द्वंद्व सुरू होते!

या दोन्ही शब्दांच्या अर्थांकडे पाहाताना त्यातली नेमकी गफलत कळायला सुरुवात होते. प्रत्येकाला आपण विचार करतो व त्यानुसार वागतो ते योग्य आहे असेच वाटते. या त्याच्या योग्य वाटण्यावर त्याची

मानसिकता किंवा माईर्ंडसेट आणि पुढे त्यावरील त्याची जीवनशैली ठरत असते. आपण करत असणारी गोष्ट योग्यच आहे हा विचार ठाम होत गेल्यानंतर तो पुढे बदलणे अवघड जाते. प्रत्येक दुसर्‍याला आपले वागणे योग्य असल्याची खात्री वाटत असल्याने या दोन स्वतंत्र योग्य वाटणार्‍या व्यक्तींमध्ये मतभेद व संघर्ष निर्माण होतात.

याचा दुसरा अर्थ असा की, एकप्रकारे आपल्याला जे योग्य वाटते ते आपल्यापुरते खरे असते. तसे दुसर्‍याचे खरे हे त्याच्यापुरते. म्हणजे यातूनच प्रत्येकाला त्याचे योग्य वाटणे ही सापेक्षताही आपण आपल्या नकळत स्वीकारत असतो.

याचे कारण या योग्य वाटण्यापलिकडेही बरोबर असणे नावाची दुसरी गोष्ट अस्तित्वात असते याचे भान आपल्याला हळुहळू यायला लागते. यामागचे सूत्रही सापडते. ते म्हणजे प्रत्येक योग्य हे बरोबर असेलच असे नाही. याचे कारण म्हणजे बरोबर असणे हे सांगोपांग किंवा स्वत:चे योग्य वाटणे याच्यापलीकडे जाऊन केलेला विचार असतो व तो विचार करून सत्याच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न असतो. वरती सांगितल्याप्रमाणे बरोबर हे एकच असते, जसे योग्य हे सापेक्ष असू शकते. योग्य ते अनेक असू शकतात.

काही वेळा आपण समोरच्याचे योग्य नाकारून आपलेच योग्य आहे हेच सांगत आलेलो असतो. वाद आणि संघर्षाचे प्रसंग हे अशातूनच सुरू होतात. याचे कारण प्रत्येक योग्य वाटणार्‍या माणसाला त्याचे कितीही चुकीचे असले तरी ते योग्यच वाटते. सत्य हे एकच आहे व तेच बरोबर असते, असे जेव्हा आपण मान्य करतो तेव्हा आपलेच योग्य आहे हे वाटणे हा त्या माणसाचा केवळ आग्रह नसतो तर तो त्याचा भाबडेपणा असतो. तो बरेचदा अज्ञानातून आलेला असतो. असे असतानाही तो स्वत:ला जे योग्य वाटले त्याचे तो या ना त्या सर्व प्रकारे समर्थनही करतो! समोरच्याला ते कितीही लंगडे समर्थन असले तरी ते त्याच्या दृष्टीने योग्यच असते.

याचे कारण म्हणजे या योग्य वाटण्यात त्याचा दुराग्रह, आक्रमकता, अहंभाव  आणि वस्तुस्थितीकडे डोळेझाक करण्याची प्रवृत्ती या सार्‍याच गोष्टी जाणवतात. याकडे जर आपण तटस्थपणे पाहिले तर समोरच्याला हे असे वाटणे अपरिहार्य आहे, त्यामुळे तेही आपण स्वीकारायला हवे. आपल्याला जर बरोबर काय आहे हे कळले असेल, तर सवडीने त्याला ते सांगण्याचा प्रयत्न करता येतो. काही माणसे प्रत्येक प्रश्‍नाचा त्याचे बरोबर उत्तर शोधेपर्यंत प्रयत्न करत असतात. तसा ध्यास घेतात कारण त्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो. आपण जी गोष्ट करतो आहोत ती जास्तीत जास्त बरोबर असावी असाच त्यांचा यामागे आग्रह असतो. तिथेच आपले बरोबर दुसर्‍या योग्यला समजावून सांगणे सर्वात अवघड जाते. कारण समोरचा दुसराही आपले योग्य सोडायला तयार नसतो!

यासाठी आपण आधी आपलेच योग्य आहे, असे वाटण्याचा आग्रह कमी करून त्यात अधिक मोकळेपणा, खेळकरपणा किंवा खेळीमेळीचा दृष्टिकोन निर्माण करता येईल. प्रसंगी आपले बरोबर वाटणेही बाजूला ठेवले पाहिजे. प्रसंगी समोरच्याच्या योग्य वाटण्यालाही मान दिला पाहिजे. त्याला ते योग्य का वाटले असेल हे जरा अधिक व्यापकपणे समजावून घेतले पाहिजे.

मघाशी आपण पाहिले की, आपल्या रोजच्या व्यवहारात योग्य आणि बरोबर या दोन्ही शब्दांचा संघर्ष बरेच वेळा अटळ असतो. नोकरी किंवा व्यवसायात त्यातली व्यावसायिकता जपण्याची गरज काय आहे, हे प्रथम लक्षात घेऊन मगच तसे वागावे लागते. यालाच आपण प्रोफेशनॅलिझम असेही म्हणतो व ते शास्त्र एक असल्याने त्याचे निकष हे बरोबर असतात. असे असले तरीही काही जण मात्र प्रोफेशनॅलिझमचा अर्थ त्यांना योग्य वाटेल असाच लावतात. व्यावसायिकता अंगी बाणवणे म्हणजे व्यवहार पाळणे असा बरोबर अर्थ होतो. कधीकधी समोरच्याला तो अर्थ त्याच्या चुका दाखवल्यावर पटतो. पण जे खरेच बरोबर आहे, ते समोरच्यालाही बरोबर वाटायला लावणे हाच त्यातला अवघड भाग असतो. कारण एकदा चूक दाखवली तरी तीच चूक समोरचा पुन्हा करू शकतो. अशा वेळी पुन्हा गोड शब्दांत बरोबर काय हे समजावून सांगावे लागते.

बरोबर काय आहे, हे सांगणार्‍या माणसाचा थोडा धाक असावा लागतो. कारण अशी माणसेच चांगले नेतृत्वही करू शकतात. ते आपल्या विचारांशी ठाम असतात. समोरच्या माणसाच्या विचारांचा मार्ग थोडासा बदलला असल्याचेही त्यांच्या चटकन लक्षात येते. आपले बरोबर आहे, याची खात्री असणारे माणसे संयमी असतील तर ते अधिक चांगले नेतृत्व करू शकतात. समोरचा माणूस कितीही चुकला तरी तो ती चूक प्रत्येक वेळी मान्य करेलच असे नाही. त्यामुळे शांत मनोवृत्तीने परिस्थितीचे अवलोकन करत गप्प बसणे व नेमकी वेळ येण्याची वाट पाहाणे हेच शहाणपणाचे असते. आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून आई-वडील हे दोघेही त्याच्या सर्व चुका स्वीकारून त्याला प्रसंगी कठोरपणे बोलून बरोबर काय आहे हे सांगतात. आपल्या मुलांबाबत हे ठीक असते, पण समाजात सहकारी, व्यावसायिक बंधू यांच्या बाबतीत मात्र काहीसे तसेच पण प्रसंगी धोरण बदलून वागावे लागते.

आपली वैयक्तिक किंवा घरातील नाती ही नात्यांच्या अधिकारात सांभाळता येतात. पण बाहेरची नाती ही टिकवणे व ती अधिक अर्थपूर्ण करणे हेच सर्वात अवघड काम असते. समोरचा माणूस आपले मैत्रीचे नाते मान्य करतोही, पण खडे बोल सुनावले तर अपमान झाला म्हणून संबंध तोडायलाही निघतो. नात्यांमध्येही असे तणाव येतात. मतभेद झाले म्हणून आम्ही वेगळे झालो असे विभक्त झालेले पतीपत्नीही सांगतात. म्हणजे योग्य आणि बरोबर हे दोन शब्द केवळ मतभेद भांडणे यांच्यापुरते मर्यादित न राहाता ते नाते संबंध तोडण्यासही कारणीभूत ठरतात!

अशा वेळी आपलेच योग्य आहे किंवा आपलेच बरोबर आहे असा आग्रह किती धरायचा? यालाच आपण तर्कटपणा असे म्हणतो. दुसर्‍या भाषेत त्याला हेकेखोरपणाही म्हणतात. अशावेळी एकमेकांमध्ये गैरसमज वाढतात. बुद्धिवादी माणसांमध्येही असेच तात्त्विक मतभेद जास्त होताना दिसतात. आपण करत असणारा तर्क किती ताणायचा हे शेवटी ज्याचे त्याने ठरवायला हवे. ते ताणणे तुटेपर्यंत कधीच ताणायचे नसते. कारण शेवटी योग्य आणि बरोबर यापेक्षाही नाते संबंध जास्त महत्त्वाचे असतात. ते आधी जपायचे असतात. आमच्यात मतभेद असले तरीही आम्ही एकमेकांचा आदर करतो, ही धारणा त्यातून वाढीस लागयला हवी. असा पूर्ण विश्‍वास दुसर्‍यावर असणे, हे ते नाते परिपक्व होण्याचे लक्षण असते. पण ही एक आदर्श अवस्था असते आणि ती प्रत्यक्षात येतेच असेही नाही.

याचे कारण मानवी स्वभाव. अहंभाव किंवा इगो ही गोष्ट वाढत्या वयाबरोबर दुप्पट वेगाने वाढत असते! त्यावर जर नियंत्रण नसेल तर संपलेच. अहंपणातून माणसे कारण नसतानाही दुसर्‍याचा अपमान करतात, घालून पाडून बोलतात. अशा माणसांना बरोबर काय आहे, हे समजावून सांगणे कर्मकठीण असते. अशावेळी ती बरेचदा अनुभवातूनच शिकतात. अन्यथा त्यांना शिकवणारा कुणीतरी भेटावा लागतो. बरोबर असणे म्हणजे वस्तुस्थितीच्या जास्तीत जास्त जवळ असणे, परिस्थितीचे नेमके भान असणे, असाच त्याचा नेमका अर्थ असतो.

आपले बरोबर आहे याची खात्री असणार्‍याला मग इगो असणारा समोर कुणीही असला तरी फारसा फरक पडत नाही. कारण अशा अहंभावी माणसाचे कुठलेच बोलणे तो मनावर घेत नाही, किंवा प्रसंगी त्याचे म्हणणे सप्रमाण खोडून काढतो. पण याचा परिणामही कधी उलटाच होतो आणि आपली चूक दाखवली म्हणून अशा माणसाचा इगो आणखी दुखावला जातो. अशा वेळी अशी इगोइस्ट माणसे आपल्या चुकांचेही समर्थन करतात! यातून आपण बालीश, पोरकट आणि हास्यास्पद ठरत आहोत याचेही त्यांना काही वाटेनासे होते. पण बरोबर आहे हे समजावून घेणारा माणूस केवळ संबंध तुटू नयेत म्हणून अशावेळी गप्प बसणेच स्वीकारतो. शेवटी त्यातच शहाणपणा असतो आणि तोच व्यवहारही. अन्यथा इगो असणारा आणि बरोबर असणारा यात कोणताच फरक रहाणार नाही.

मानवी इतिहासात योग्य आणि बरोबर यांचाच संघर्ष चालू असतो. किंबहुना या संघर्षाचाच इतिहास असतो! पण त्यातून आपण शहाणे होत नाही आणि तो इतिहास पुन्हा पुन्हा तेच तेच दाखवत राहातो. आपण जर एकीकडे स्वत:ला विवेकवादी, आधुनिक, विज्ञाननिष्ठ मानत असू. किंवा आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात फार सर्वज्ञानी झालो आहोत असे समजत असू तर किमान या मूलभूत चुका टाळायला हव्यात. खरे तर त्यासाठी विवेकवादी, ज्ञानी, आधुनिक, विज्ञाननिष्ठ किंवा तंत्रज्ञानाने सुसज्ज असण्याचीही गरज नाही. फक्त शहाणे असायला हवे! ..आणि तेच तर घडत नाही!!

आपले अनेक संत शिकलेले नव्हते, पण त्यांच्यात हे मूलभूत शहाणपण शेवटपर्यंत जिवंत होते. महाराष्ट्रात व मराठीत तर संतांची परंपरा खूप मोठी आहे, हे का घडले तर याचा दुसरा अर्थ असाही होतो की तुम्ही शहाणे व्हा हे पुन:पुन्हा सांगण्याची वेळ या सार्‍यांवर अनेकदा आली! शहाणे करून सोडावे सकळजन हेच सूत्र या सर्वांच्या शिकवणुकीत आहे. तर ज्ञानेश्‍वर त्यांच्या पसायदानात अपेक्षा व्यक्त करतात की, दुरितांचे तिमिर जावो. डोळे असून आंधळ्यासारखे जीवन जगणे आपण सोडत नाही. आजच्या भाषेत बोलायचे तर व्हर्च्युअल किंवा आभासी जगातच जास्त वावरतो!

योग्य आणि बरोबर या शब्दांच्या निमित्ताने मला मराठी भाषेची ताकद किती मोठी आहे याचे पुन्हा एकदा भान आले. त्याच बरोबर ते शब्द वापरताना जपून आणि जबाबदारीने वापरायला हवेत हेही पटले. माहितीचा स्फोट होत असणार्‍या आजच्या काळात तर आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. इंटरनेटवर किंवा रोज वाचत असणार्‍या व्हॉट्स् अ‍ॅप आणि फेसबुकवरील माहितीचा शहानिशा करताना हे दोनही शब्द आपल्याला उपयोगी पडतील. तेथील माहिती ही तुम्ही आम्हीच पूर्वी कधीतरी अपलोड केलेली असते. म्हणूनच ती दिसते. त्यातली प्रत्येक माहिती म्हणजे ज्ञान नाही. किंवा ते आपल्याला योग्य वाटलं तरी बरोबर असेलच असेही नाही. ते समजावे यासाठी हा खटाटोप.

लेखक : – विवेक सबनीस
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *