महाराष्ट्रातील पठारे

सातारा जिल्ह्यातील कास पठाराचे नाव आज बहुतेकांना परिचित आहे. पावसाळा सुरू होताच कासच्या पुष्पोत्सवाचे वेध पर्यटकांना लागतात. इंटरनेट, टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्रे यातून सतत कास कधी फुलणार याचे अंदाज व्यक्त केले जातात. आणि शेवटी सप्टेंबरमध्ये कास जेव्हा फुलांनी बहरते तेव्हा ते पाहायला अलोट गर्दी लोटते. जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून 2012 साली जेव्हा कासची निवड झाली तेव्हा कास प्रकाशात आले. आजही काससारखी अनेक पठारे सह्याद्रीत आहेत. प्रत्येकाचे आपले स्वतंत्र असे वैशिष्ट्य आहे.

या पठारांबाबत सांगण्याआधी सह्याद्रीची थोडीशी माहिती सांगणे गरजेचे आहे. भारताचा डेक्कन प्लाटो म्हणजे दक्खनचे पठार हे लाव्हाचे बनले आहे. या विस्तीर्ण पठाराची कड म्हणजे सह्याद्री. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगा काळ्या पत्थराच्या म्हणजेच बेसाल्टच्या बनल्या आहेत. किल्ल्यांवर भटकंती करणार्‍या मंडळीना बेसाल्ट नक्कीच माहिती असेल. काही

डोंगरमाथ्यावर बेसाल्टचे रूपांतर जांभा नावाच्या लाल दगडात झालेले आढळते. अति पावसात बेसाल्टमधील विद्राव्य घटक निघून जातात. उष्ण कोरड्या हवेमुळे शिल्लक राहिलेला खडक कठीण बनतो. यालाच जांभा म्हणतात. यात लोह, अ‍ॅल्युमिनियमचे प्रमाण जास्ती असते. कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून 800-1200 मीटर उंचीवर जांभ्याचे विस्तीर्ण माळ आढळतात. यांनाच सडे म्हणतात. कोकणातही मोठाले सडे आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची चिंचोळी किनारपट्टी काही अब्ज वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेली होती. तेव्हाच हा जांभा तयार झाला होता. आज समुद्र मागे गेल्याने ही पठारे वर दिसतात. साधारण समुद्रसपाटीपासून 200 मीटर उंचीपर्यंत. नाशिक, अहमदनगर, पुणे, ठाणे जिल्ह्यात बेसॉल्टचीच पठारे आढळतात.

खडकाळ पठारांवर मातीचा अगदी पातळ असतो. त्यामुळे त्यावर मोठे वृक्ष, झुडपे वाढू शकत नाहीत. वर्षाचे 8 महिने पठारे कोरडी ठाक असतात. उन्हाळ्यात दगड ताव्यासारखा तापतो. पण याउलट पावसाळ्यात पठारांवर पाणी साचते. तळी, डबकी तयार होतात. यामुळे शुष्क आणि पाणथळ अशा दोन्ही जागी वाढणारी झाडे पठारांवर दिसतात. पठारावरील हवामान बदलांशी इथल्या वनस्पती आणि प्राणी या दोन्हीचे अनुकूलन झालेले आहे.

शेवाळाचे आणि दगड फुलाचे (lichen) आवरण इथल्या सर्व दगडांवर असते. या वनस्पतींच्या वाढीने खडकांची झीज होऊन माती तयार व्हायला सुरुवात होते. खडकांच्या भेगातून साठलेल्या मातीत मॉस, आणि नेच्यांचे प्रकार वाढतात. यांत पाणी धरून ठेवायची क्षमता असते. दगडांवरही काही ऑर्चिडचे प्रकार वाढतात. पावसाळ्यात पठारांवर अनेक छोट्या वनस्पती, गवते वाढतात. यामध्ये utricularia, drosera सारख्या कीटकभक्षी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. पठारावरील मातीत पुरेशी खनिजे नसली तरीही या वनस्पती कीटक खाऊन आपली गरज भागवतात. पठारावरील पावसाळी डबक्यातून अनेक प्रदेशनिष्ठ- शपवशाळल वनस्पती आढळतात. अपोनोगेटोन सातारेन्सिस (Aponogeton satarensis) ही त्यापैकीच एक. ही प्रजाती फक्त सातारा जिल्ह्यातील पठारावरच आढळते. बाकी जगात ती कुठेही उपलब्ध नाही.

कंदीलपुष्प म्हणजेच सिरोपेजियाच्या काही प्रदेशनिष्ठ प्रजातीही पठारावर दिसतात. यांना खाली मोठा कंद असतो. त्यामुळे पावसाळ्यात त्या अन्न गोळा करतात आणि उरलेले महिने जमिनीखाली स्वस्थ राहतात. सिरोपेजिया जैनी ही प्रजाती कास, चाळकेवाडी, आंबोलीच्या पठारावर दिसते. तर सिरोपेजिया अंजनेरीका ही नाशिकमधील अंजनेरी गडावर दिसते. या दोन्ही प्रजाती अतिशय दुर्मिळ आहेत. जगातून नाहीसे होण्याचा धोका असलेल्या वनस्पतींच्या यादीत, – रेड्लिस्ट मध्ये त्यांचा समावेश झाला आहे.

वनस्पतींप्रमाणेच काही वैशिष्ट्यपूर्ण प्राणीही पठारावर आढळतात. पावसाळी डबक्यात गोड्या पाण्यातील श्रीम्प्स सापडतात. Hemidactylus जातीच्या दुर्मिळ पाळीही इथे सापडतात. खडकाखाली पाली, विंचू, बेडूक आणि कित्येक प्राण्यांना राहायला आणि अंडी घालायला सुरक्षित जागा मिळते. आंबोली पठारावर Xanthophryne tigerinus नावाचा दुर्मिळ बेडूक सापडतो. तो जांभा खडकाच्या भोकातून अंडी घालतो. याखेरीज फुरसे आणि इतर साप, सिसिलिअन ही पाय नसलेली बेडकाची जात, काही मासेही पठारावर राहतात.

पठारावरील वनस्पतींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची फुले. पावसाळ्याच्या शेवटी पठारावर लाखो पिवळी, गुलाबी, निळी, पांढरी, व जांभळी फुले फुलतात. हा रंगोत्सव खरेतर असतो परागीभवन करणार्‍या किटकांसाठी. तर्‍हेतर्‍हेच्या माशा, मधमाशा, भुंगे, फुलपाखरे या फुलांना भेट देतात आणि परागीभवन होऊन बीज निर्मितीला मदत होते .

बराच काळ पठारेही वैराण आहेत असाच समज बहुतेक लोकांचा होता. उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात पठारांना भेट दिली तर मैलोगणती पसरलेली बरड जमीन, खडकच दिसत. हे गैरसमज दूर करायला पठारांचा शास्त्रीय अभ्यास करणे गरजेचे होते. गेले काही वर्ष असा अभ्यास करून संशोधकांनी नवीन प्रजाती, त्याविषयीची माहिती गोळा केली आहे. पण सरकारी नकाशात आजही पठारांची नोंद ‘ “wasteland’ म्हणजे पडीक, नापीक जमीन अशीच आहे. त्यामुळे त्यावर अनेक विनाशकारी प्रकल्प झाले आहेत किंवा होऊ घातले आहेत. कोकणात पठाराचा वापर औद्योगिक वसाहती बांधण्यासाठी केला गेला. कोल्हापूर जिल्ह्यात जांभ्याच्या सड्याखाली मिळणार्‍या bauxite खनिजासाठी मोठ्या प्रमाणात खाणी चालू झाल्या आहेत. सातार्‍यातील पवनचक्क्यांसाठी पठारे वापरली आहेत. कोकणात चिर्‍यांच्या खाणीपायी अनेक सडे नष्ट झाले. पठारांचा असा व्यावसायिक वापर करताना लाखमोलाच्या जैवविविधतेचे नुकसान होत आहे याची जाणीव कुणालाही नाही.

2012 मध्ये बायोम संस्थेने पुढाकार घेऊन पठारे संवर्धन आणि संरक्षण मोहीम चालू केली. सह्याद्रीतील 15 पठारे निवडून त्यांच्या संरक्षणासाठी खास प्रयत्न चालू झाले. या भागात काम करणारे संशोधक आणि संस्था या निमित्ताने जोडले गेले. आणि पठार संवर्धनासाठी एकमेकांना मदत करू लागले. यातून कोल्हापूरच्या पठारावरील खाणींना विरोध करणे शक्य झाले. वनखात्यानेही यासाठी सर्वतोपरी साथ दिली. सातारा जिल्ह्यातील पाठरांसाठी संरक्षण योजना बनवण्याचे कामही चालू आहे.

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पाचगणी पठाराची अवस्था गेल्या 10 वर्षांत अगदी दयनीय झाली होती. इथल्या निसर्गसौंदर्याचे, दुर्मिळ वनस्पतींचे आणि फुलोर्‍याचे वर्णन शास्त्रज्ञांनी 100 वर्षापूर्वी करून ठेवले होते. पण नंतर पहावे तर त्याचे पूर्ण बाजारीकरण झाले होते. त्याचा वापर खेळाचे मैदान म्हणून केला गेला. काही व्यापार्‍यांनी पठारावर अतिक्रमण करून त्यावर दुकाने चालू केली. घोडे आणि घोडागाड्या चालवून पठारावरची माती खणून टाकली. फक्त कड्याच्या टोकाने काही दुर्मिळ वनस्पती कशाबशा तग धरून राहिल्या. पण हे पठार heritage site म्हणून घोषित केले असल्याने पर्यावरणवाद्यांनी इथे बाजार करायला आक्षेप घेतला. 5 वर्षांत खटला चालवून शेवटी कोर्टाने पर्यावरण वाचविण्याच्या बाजूने निकाल दिला. आणि पांचगणी पठाराला लागलेले ग्रहण थोड्या प्रमाणात सुटले. इथली हानी भरून निघायला अजून काही वर्षे जातील.

कास पठाराच्या प्रसिद्धीने लोकांना पठारांबद्दल थोडीशी माहिती झाली. पण कासला या प्रसिद्धीचा फायदा न होता तोटाच होतो आहे. पर्यटक फुले पाहायला फोटो काढायला उत्सुक असतात. पण या उत्साहात किती झाडे पायदळी तुडवली जातात या कडे लक्ष देत नाहीत. पर्यटकांमुळे इथे कचार्‍याची समस्या वाढू लागली आहे. त्याशिवाय गाड्यांमुळे होणारे प्रदूषण, वाढते खाद्यपदार्थांची दुकाने या सगळ्यांचा दुष्परिणाम कासच्या निसर्ग संपदेवर दिसू लागला आहे. प्रदेशनिष्ठ आणि दुर्मिळ प्रजातींची संख्या कमी होऊन तणे वाढू लागली आहेत.

पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनखात्याने इथल्या स्थानिक लोकांबरोबर संयुक्त वनव्यवस्थापन समितीची स्थापना केली. या समितीचे सदस्य पर्यटकांबरोबर वाटाडे म्हणून जातात. वाहनव्यवस्था पाहतात आणि कचरा उचलतात. यातून त्यांना रोजगारही मिळतो. पण पर्यटकांच्या वाढत्या संख्येपुढे ही व्यवस्था अपुरी पडत आहे. फुले तोडणे, झाडे उपटणे, गवतात लोळणे या प्रकारांना आळा घालायला गावातील लोक अपुरे पडत आहेत. यासाठी पर्यटकांनी स्वत:च काळजी घेणे गरजेचे आहे. आपणहून असे गैरप्रकार थांबवणे गरजेचे आहे. वनखात्याचे कायदे असूनही त्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कास पठाराला धोका आहेच. कासची प्रसिद्धी आणि त्यामुळे झालेले दुष्परिणाम बघून इतर पठारांच्या संवर्धनासाठी काम करणर्‍या संस्थांनी फार काळजीपूर्वक पावले उचलली आहेत. नाशिकच्या अंजनेरी पठारावरही पर्यटन चालते. अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान. इथल्या मंदिरात हजारो यात्रेकरू येतात. यात्रेच्या वेळी गडावर वस्ती करतात. तसेच इतर पर्यटकही येतात. काही वैद्य इथल्या वनस्पती गोळा करून विकतात. अंजनेरी वर अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी आहेत. त्यांना होऊ शकणारा धोका लक्षात घेऊन नाशिकच्या जुई पेठे आणि अमित टिल्लू या जोडप्याने अंजनेरी संरक्षण मोहीम चालू केली आहे. 2016 मध्ये वनखात्याच्या मदतीने हे पठार आणि आजूबाजूचा परिसर हा conservation zone – संरक्षित परिसर म्हणून घोषित केले. यामुळे इथे होणार्‍या औषधी वनस्पतींच्या तोडीवर, वणव्यावर तसेच काचर्‍यावर नियंत्रण आणणे शक्य झाले. अंजनेरी गावातील उत्साही तरुणांना सोबत घेऊन एक मंडळ स्थापन केले आहे. यातून स्थानिक जैवविविधता आणि त्याबद्दलचे पारंपरिक ज्ञान प्रकाशात येत आहे. पर्यटकांबरोबर वाटाडे म्हणून गेल्यावर स्थानिक तरुणांना रोजगार मिळतो. येणार्‍या लोकांना योग्य माहिती मिळावी, त्यांनी कचरा करू नये, वनखात्याचे नियम पाळावे यावर या तरुणांचे लक्ष असते. इथले गवत हा गावातल्या गुरांसाठी वर्षभराचा चारा पुरवते. म्हणून वार्षिक यात्रेच्या दिवशी गडावर येणार्‍या भाविकांकडून वणवा लागू नये आणि चारा वाचावा हे यासाठी हे तरुण खास प्रयत्न करतात. पठारांच्या संरक्षणासाठी स्थानिक जनतेची खास मदत गरजेची आहेच. पण त्याचबरोबर सरकारची, प्रशासनाची मदतही लागते. महाराष्ट्र वनविभागामध्ये जैवविविधतेबद्दल आस्था आहे. पण बहुसंख्य पठारे महसूल खात्याच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यावरील विकास हा निसर्गपूरक असावा यासाठी प्रशासनानेच जागरूकता दाखविली पाहिजे. Regional plan बनवताना औद्योगिकीरण, शहरीकरणास चालना देताना त्याने निसर्गाची हानी कशी व किती होईल याचे भान ठेवून ती टाळायचे प्रयत्न केले पाहिजेत. महाराष्ट्राची पठारे हा एक अमूल्य ठेवा आहे. यावरील विविधता जागतिक महत्त्वाची आहे. त्यांच्या कायम स्वरूपी संरक्षणासाठी राज्यशासनाने योग्य ते प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. तरच पुढच्या पिढीला ही निसर्गसुंदर पठारे पहाता येतील.

लेखिका : – डॉ. अपर्णा वाटवे
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *