मनाच्या भावविश्वा त घेऊन

संपूर्ण जगासाठी हा अस्थिर असा काळ आहे. जागतिक पातळीवर अशी परिस्थिती उद्भवली आहे की आपण राजकीय व्यवस्थेवर किंवा राजकीय नेतृत्वांवर विश्‍वास ठेवण्यास घाबरत आहोत. इतकेच नव्हे, तर आपल्या शाश्‍वत मूल्यांवर देखील  विश्‍वास ठेवण्यास घाबरत आहोत. मला मिळालेल्या या पारितोषिकामुळे कुठेतरी सद्भावना आणि शांती निर्माण होण्यास मदत मिळेल अशी आशा व्यक्त करतो.’ या भावना आहेत यावर्षीच्या साहित्याचे नोबेल पारितोषिक विजेते जपानी वंशाचे काझुओ इशीगुरो यांच्या. इशीगुरो यांचे साहित्य म्हणजे भावनांचा शक्तिमान प्रवाह. तो वाचकाला

अंतर्मुख करतो. स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधायला लावतो. त्यांना मिळालेला सन्मान या अंतर्मुखतेला अधोरेखित करणारा आहे. इशीगुरो यांचे साहित्य म्हणजे करुण रसाने भरलेला ‘एक प्याला’ आहे तो प्राशन केल्यानंतर वाचक आपसूकच अंतर्मनाच्या एका वेगळ्या जगात डोकावून बघू लागतो. त्या अंतर्मनाचे शब्दचित्रण करणारी प्रतिभा इशीगुरो यांच्यात आहे.‘त्यांच्या साहित्यात स्मृती, वेळ आणि स्वभ्रम अशी सूत्रे आढळतात व त्यांनी त्यांच्या लेखणीतून सुंदर अशा विश्‍वाची निर्मिती केली आहे.’ असे नोबेल पारितोषिक जाहीर करणार्‍या स्वीडिश अ‍ॅकॅडमीने म्हटले आहे.

इशीगुरो  यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1954 ला जपानमधील नागासाकी येथे झाला. सारे येथील शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. शिक्षण झाल्यानंतर ते वर्षभर प्रवासाला निघाले. प्रामुख्याने अमेरिका आणि कॅनडात ते भरपूर फिरले. याच काळात त्यांनी एका नियतकालिकात काही काळ लेखन केले. प्रवास संपल्यानंतर 1974 साली ब्रिटनच्या केंट विद्यापीठात प्रवेश घेतला. 1978 मध्ये इंग्लिश आणि तत्वज्ञान या विषयात पदवी संपादन केली. आणि त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 1980 साली ‘क्रिएटिव्ह रायटिंग’मध्ये इस्ट अँग्लिया विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली, आणि ब्रिटनचे नागरिकत्व मिळवले. यानंतर  त्यांच्या लेखनाची घोडदौड सुरू झाली.

लेखनिक कारकीर्द : इशीगुरो यांनी एकूण आठ पुस्तकांचे लिखाण केले आहे. कादंबरी हा साहित्यप्रकार हाताळताना त्यांनी गीतलेखन केले आणि चित्रपटासाठी देखील लेखन केले. 1982 साली ‘अ पेल व्ह्यू ऑफ हिल्स’ ही त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. आत्महत्या केलेल्या मुलीच्या आईच्या भावविश्‍वात घेऊन जाणारी ही कादंबरी  आहे.‘अन आर्टिस्ट ऑफ द फ्लोटिंग वर्ड’ ही कादंबरी  त्यापाठोपाठ प्रकाशित झाली याही कादंबरीचा विषय दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळातील जपानमधील परिस्थितीचे शब्दचित्रण करणारा  आहे. 1989 साली दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील एका कर्तव्यदक्ष  माणसाच्या आयुष्याचे चित्रण करणारी ‘द रिमेन्स ऑफ द डे’ ही कादंबरी जगभरात गाजली. या कादंबरीला बुकर अ‍ॅवार्ड मिळाले. 1993 साली यावर चित्रपटही प्रकाशित झाला. तो सुद्धा गाजला. त्यानंतर ‘द अनकन्सॉईड’ ही कादंबरी प्रकाशित झाली, परंतु ‘द रिमेन्स ऑफ द डे’च्या तुलनेत तिला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर काही काळ त्यांनी कादंबरीलेखनात विश्रांती घेतली व पुन्हा 2005 ला प्रकाशित झालेली ‘द रिमेन्स ऑफ द डे’ नंतरची उत्तम कलाकृती असलेली ‘नेव्हर लेट मी गो’ ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरली. ह्यूमन क्लोनिंग प्रयोगाचा भाग असलेल्या शाळेच्या वसतिगृहात राहणार्‍या 3 मुलांची ही कथा आहे. त्यानंतर 2015 साली ‘द बरीड जायंट’ ही विज्ञानावर आधारित कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यांच्या बहुतेक कादंबर्‍यांचा समान धागा म्हणजे त्या भूतकाळात घडतात, परंतु कादंबर्‍यांमधील व्यक्तिरेखा मात्र वास्तवातील संघर्षाला सामोर्‍या जातात म्हणून त्या अधिक भावतात. त्यांच्या लिखाणावर दोस्तोवस्की आणि मार्सेल प्रस्त यांच्या लेखनाचा प्रभाव पडलेला आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांनी गीतलेखन केले. ‘ब्रेकफास्ट ऑन द मॉर्निंग ट्राम’ आणि ‘द चेंजिंग लाइट्स् ’ हे अल्बम आले. त्यातली गीते जॅझ संगीत गायक स्टेसी केंट आणि सेक्सोफोनिस्ट जिम टोमलिंसंन यांनी गायली आहेत. सामान्य माणसाच्या आयुष्यात येणारे चढउतार त्यांच्या लेखन कारकिर्दीत येत राहिले.

लेखक : — चैत्राली विसपुते
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *