मंगळमोहिमा : इतिहास, वर्तमान आणि भविष्य

मंगळ, पृथ्वीपासूनचा सर्वात जवळचा ग्रह; आणि सर्वात जास्त चर्चेत असलेला सुद्धा. सूर्यापासूनचा चौथा ग्रह, लाल गोळा, त्यावर लोहाचं प्रमाण अधिक आणि चित्रपटांच्या माध्यमातून यावर रंगविण्यात आलेली जीवसृष्टी या सर्वसाधारण गोष्टी आपल्याला माहिती असतात. तसेच मंगळमोहीमांचं  नाव घेतलं की आपल्याला सर्वप्रथम ‘मंगळयान’ आठवतं, आणि ते साहजिकही आहे. पण यात भारताची सुरुवातच उशिराने झाली हे विसरायला नको.

मंगळावर जाण्याची पहिली मोहीम सर्जी कोरोलेव्ह यांच्या नेतृत्वाखाली सोविएत रशियाने आखली आणि 10 ऑक्टोबर 1960 रोजी अवकाशात सोडली, त्याचं नाव होतं ‘मार्स 1 एम’. पण हि मोहीम यशस्वी ठरली नाही. मार्स 1 एम् मंगळापर्यंत पोहोचले पण ते मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवेश करण्यात अयशस्वी ठरले. तरीही मंगळापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्याचा मान मात्र मार्स एम 1 लाच जातो. सोविएत रशियापाठोपाठ अमेरिकेनेसुद्धा मंगळमोहिमांच्या शृंखला अवकाशात सोडल्या होत्या त्यांचं नाव ‘मरिनर’ होय. पण यामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी म्हणता येईल अशी फक्त  मरिनर 9 चं होती. यानांना मंगळापर्यंत पोहोचणे हि काय अवघड गोष्ट नव्हती खरी कसरत तर त्यांना कक्षेमध्ये पोहोचण्यासाठी करावी लागत होती.

मंगळ पृथ्वीच्या जवळपास निम्म्या आकाराचा आहे, त्यामुळे मंगळाची गुरुत्वाकर्षण शक्तीसुद्धा (Gravitational Force) पृथ्वीच्या मानाने निम्मी आहे. याचाच अर्थ असा की यानांना मंगळाच्या कक्षेत स्थिरावण्यासाठी अधिक शक्ती लावावी लागते. जादाच्या शक्तीमुळे जोखिमेचे प्रमाणही वाढते. पण या सर्व गोष्टींवर मात करून मरिनर 9 मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. 1960 साली सुरुवात होऊन ह्या मोहीमा प्रत्यक्षात उतरवायला तब्बल अकरा वर्षे लागली, पण यामुळे जी माहिती मिळाली त्यामुळे एकेकाळी अशक्य वाटणारा मंगळसुद्धा शास्त्रज्ञांच्या कक्षेत आला.

आता फक्त कक्षेपर्यंत न थांबता मंगळाच्या पृष्ठभागावर उतरेल असं यान बनवण्याचा निर्धार शास्त्रज्ञांनी केला. याचाही श्रीगणेशा सोवियत रशियानेच केला. नासाचं मरिनर 9 कक्षेत पोहोचल्यानंतर अवघ्या 15 दिवसांमध्ये ‘मार्स 2 ऑर्बिटर आणि लँडर’ नावाची मोहीम मंगळावर पोहोचली. यामधून एक दुसरं यान मंगळावर उतरण्यासाठी निघालं पण ते अपयशी ठरलं. त्याचे तुकडे होऊन ते मंगळावर पडलं आणि सोवियत रशियाची हि मोहीमसुद्धा अपयशी ठरली. सर्जी कोरोलेव्ह यांच्या मृत्यूमुळे  निर्माण झालेली पोकळी अजूनही भरता आली नव्हती आणि पुढेही ती परत कधी भरता आली नाही. पण मंगळावर मानवाने तयार केलेले पहिले अवशेष पोहोचवण्याचा मान पुन्हा एकदा सोवियत रशियालाच गेला.

अमेरिकेने त्यांच्या यशस्वी मरिनर शृंखलेनंतर व्हायकिंग (viking) मोहीम आखली. दोन यानांची ही मोहीम होती. या दोन्ही मध्ये एक एक ऑर्बिटर आणि एक जमिनीवर उतरणार लँडर होते. ऑर्बिटर कक्षेत राहून मंगळाचे अध्ययन करतं तर लँडर जमिनीवर उतरतं. पुढे 20 जुलै 1976 रोजी व्हायकिंग 1 मंगळावर यशस्वीरीत्या उतरलं आणि मंगळाच्या जमिनीवरून काढलेली पहिलीवहिली छायाचित्रे नासाच्या मुख्यालयात आली. 2010 साली ऑपॉर्च्युनिटी रोव्हरने विक्रम मोडेपर्यंत व्हायकिंग 1 मोहिमेची सर्वात जास्त काळ मंगळावर कार्यरत असणरी मोहीम म्हणून (2303 दिवस) ख्याती होती. व्हायकिंग 1 च्या पाठोपाठ व्हायकिंग 2 मोहिमेला सुद्धा मंगळावर यशस्वीरीत्या उतरण्यात यश आले. या मोहिमांनी सर्व मंगळ मोहिमांचा पाया रचून दिला. मंगळावर यशस्वीरीत्या उतरणारी हि पहिलीच मोहीम असल्यामुळे नासाचे जगभरातून प्रचंड कौतुक झाले.

व्हायकिंगनंतर ची सर्वात महत्त्वाची मोहीम म्हणजे सोजर्नर (Sojourner) होय यातून पाथफाईंडर (Pathfinder) नावाचा एक रोव्हर सर्वप्रथम मंगळावर गेला. लहान मुलांच्या गाडीच्या आकाराचा हा रोव्हर होता, तसेच याला ऊर्जा सोलार पॅनेल्सद्वारे मिळत होती. ही मोहीम फक्त एक आठवडा भर चालेल अशी शास्त्रज्ञांना आशा होती पण हि मोहीम तब्बल 85 दिवस चालली हे विशेष. हे रोव्हर मंगळावर फिरले आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून  माती, हवा आणि भूगर्भीय रचनांची माहिती गोळा केली आणि त्यांची छायाचित्रे सुद्धा पाठवली. नासानंतर जपानच्या अवकाश संशोधन संस्थेने सुद्धा 1998 च्या जुलै महिन्यात मंगळावर नोझोमी (Nozomi) नावाची मोहीम पाठवली. ही मोहीम मंगळापर्यंत पोहोचली पण ऐनवेळी याचा आणि जपानच्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला. त्यामुळे योग्य वेळी याचे इंजिन्स चालू करता आले नाहीत आणि आता त्यामुळे हे यान आता सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा घालते. तसेच जपानचा पहिला कृत्रिम ग्रह बनण्याचा बहुमान सुद्धा या  मोहिमेला जातो.

सोजरनर नंतर मंगळावर गेलेली सर्वात महत्वपूर्ण मोहीमा म्हणजे स्पिरिट आणि ऑपॉर्च्युनिटी होय. या जुळ्या मोहिमा होत्या. अवकाशात या फक्त 27 दिवसांच्या अंतराने सोडण्यात आल्या होत्या. ही दोन्ही यानं एका छोट्या गाडीच्या आकाराची होती आणि यालाही सोजर्नरप्रमाणे सूर्याकडून ऊर्जा मिळत होती. या दोन्ही मोहिमा एकमेकांपासून अगदी विरुद्ध दिशेस उतरल्या. स्पिरिट उतरलं मंगळाच्या ध्रुवाजवळच्या खडकाळ भागात आणि ऑपॉर्च्युनिटी उतरलं मंगळवारच्या सपाट भागावर. सुरुवातीपासूनच ऑपॉर्च्युनिटीपेक्षा स्पिरीटला जास्त अडथळे आले होते. आधीच तो खडकाळ भाग त्यात सारखी वादळ, तरीसुद्धा या यानाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अगदी उत्तम काम केले. मूळ मोहीम फक्त 90 दिवसांची होती, प्रत्यक्षात मात्र ही मोहीम पाच वर्षे आणि तीन महिने  कार्यरत होती. 2009 साली एका मातीच्या जाड थरात हे रोव्हर अडकले आणि तिथून त्याला पुन्हा बाहेर काढणे अशक्य होते. अशा रीतीने 2011 साली स्पिरिट मोहीम पूर्ण झाली आहे अशी घोषणा नासा मार्फत करण्यात आली आणि याला मातीबाहेर काढण्याचे सर्व प्रयत्नसुद्धा थांबविण्यात आले. जरी स्पिरीटचा प्रवास पाच वर्षाचा असला तरी त्याने त्या काळात मंगळावर जवळपास आठ किलोमीटर अंतर पार केले आणि अत्यंत महत्त्वपूर्ण शोध लावले. या उलट ऑपॉर्च्युनिटी मात्र गेली तेरा वर्षे कार्यरत आहे. त्याने मंगळावर जवळपास सोळा किलोमीटर अंतर पार केले असून महत्त्वपूर्ण शोधही लावले आहेत. ऑपॉर्च्युनिटीने लावलेला सर्वात  महत्त्वाचा शोध म्हणज मंगळावर असलेलं पाणी होय. मंगळाच्या मातीखाली हे पाणी अस्तित्वात आहे. हा एक अत्यंत क्रांतिकारी शोध होता. यामुळे मंगळाची उत्क्रांती कशी झाली असेल या विषयी एक पुरावा सापडला.

पृथ्वीच्याभोवती एक चुंबकीय क्षेत्र (Magnetic Field) आहे त्यामुळे सौरवादळे पृथ्वीपर्यंत पोहोचत नाहीत. ती वरच्या वरच बाहेर फेकली जातात.  यामुळेच उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात अरोरा (urora) दिसतात. पण मंगळाला पृथ्वीप्रमाणे चुंबकीय क्षेत्र नाही, त्यामुळे सततच्या सौरवादळांमुळे मंगळावरचं वातारवरण उडून गेलं. तसेच मंगळावर वाहत असलेल्या पाण्याची वाफ झाली. मंगळावर पृथ्वीप्रमाणेच समुद्र आणि नद्या होत्या. पाण्याच्या अपक्षयामुळे मंगळावर दर्या आणि त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. यावरूनच मंगळावर जवळपास 300 ते 400 कोटी वर्षांपूर्वी पाणी वाहत होत असा अंदाज मांडण्यात आला. तसेच मंगळावर पूर्वी जीवसृष्टी अस्तित्वात होती का? यासारख्या प्रश्‍नाच्या उत्तरांसाठी नासाकडून मावेन (Maven) सारख्या मोहीमा पाठवण्यात आल्या आहेत.

यानंतर क्युरिऑसिटी (Curiosity) मोहीम 2012 साली मंगळावर पाठवण्यात आली. आतापर्यंची सर्वात अत्याधुनिक आणि सर्वात मोठी मोहीम म्हणून हिच्याकडे पहिले जाते. गेल्या 6 ऑगस्ट रोजी या मोहिमेला पाच वर्षे पूर्ण झाली. हे रोव्हरसुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त काळ कार्यरत असून आणखी काम करेल अश्या उत्तम स्थितीत आहे. क्युरिऑसिटी मोहिमेतील सर्वात कठीण भाग हाच की रोव्हर जमिनीवर उतरवणे होता. कारण या रोव्हरचं वजनच तब्ब्ल 900 किलो होतं (हे आतापर्यंत मंगळावर उतरलेल्या मोहिमांच्या एकत्र वजनाच्या दुपटीपेक्षा सुद्धा जास्त आहे). यामुळे  शास्त्रज्ञांनी जेट्स्चा वापर करून हे रोव्हर यशस्वी रीत्या मंगळावर ‘गेल क्रेटर’ नावाच्या भागात उतरलं. क्युरिऑसिटीची अजून एक खासियत म्हणजे आधीचं रोव्हर्सप्रमाणे ते सौरऊर्जेवर चालत नाही. क्युरिऑसिटीमध्ये अणुऊर्जा तयार करणारी एक बॅटरी असल्यामुळे याच सूर्यावर असणारं अवलंबत्व संपलं आणि भर वादळामध्येसुद्धा क्युरिऑसिटी सर्वेक्षण करू शकतो. याशिवाय फिनिक्स आणि यांसारख्या अनेक मोहिमा मंगळावर गेल्या आहेत पण या सर्व एकाच भागात सांगणे शक्य नाही.

मंगळयान (MOM- Mars Orbiter Mission) :

          भारत मंगळावर जाणारा चौथा देश आहे. पण पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारा मात्र भारत हा एकमेव देश आहे. 2014 सालच्या सप्टेंबर महिन्यात हे यान यशस्वीरीत्या मंगळाच्या कक्षेत स्थिरावलं, येत्या 24 तारखेला याला 3 वर्षे पूर्ण होतील. हे यान इतके दिवस चालेल अशी कोणाचीही अपेक्षा नव्हती. तरीसुद्धा गेली 3 वर्षे हे यान अगदी उत्तमरीत्या चालू आहे आणि अजूनही टकाटक आहे. फक्त एवढंच नव्हे तर दुसऱ्या ग्रहावर सर्वात स्वस्तात मोहीम पाठवण्याचा  बहुमानही मंगळयानाला मिळतो. मंगळयान बनवण्यात आणि सोडण्यात फक्त 450 कोटी रुपये एवढाच खर्च आला आहे. हा खर्च हॉलिवूडच्या ‘ग्रॅव्हिटी’ चित्रपटाच्या निर्मिती खर्चापेक्षासुद्धा कमी आहे. तसेच मंगळयानामध्ये एकूण पाच उपकरणे आहेत.

1) मिथेन वायूसाठी सेन्सर

2) अत्याधुनिक  कॅमेरा

3) वातावरणाच्या मोजमापाचे यंत्र

4) अवरक्त किरणांसाठी (Infrared Waves) कॅमेरा

5) फोटोमीटर (Photometer)

या वरील खास उपकरण हे मिथेन वायूसाठी आहे. मिथेनला जीवसृष्टीचा बिल्डिंग ब्लॉक (Building Block) म्हणतात. मिथेन हा मंगळावर पूर्वी जीवसृष्टी असण्याचा पुरावा असू शकतो किंवा तो नवीन जीवसृष्टीचा जनक सुद्धा असू शकतो. यासाठीच त्याचा शोध चालू आहे.

मंगळावर माणूस पाठवण्याचा विचार सध्या फार चर्चेत आहे. मंगळावर माणूस पाठवणे शक्य आहे पण सध्याच्या तंत्रानुसार ते फार अवघड आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मंगळ हा चंद्र नाही की ज्यावर थोड्या दिवसांत जाऊन परत येऊ शकू. मंगळापर्यंतच आपल्याला पोहोचायला आपल्या आठ ते दहा महिने लागतात. परत तिथे उतरणं आणि परत येणं याला दोन वर्षे किंवा जास्त कालावधी लागेल. एवढा काळ मानवाला अवकाशात राहण्याची सवय नाही. अवकाशात राहिल्याने मानवाच्या हाडांची झीज होत असते. त्यामुळे दोन वर्षे माणूस अवकाशात राहू शकेल का? हा प्रश्न उद्भवतो.

याला उपाय म्हणून काही जणांनी मानवाला फक्त मंगळावर नेऊन सोडण्याच्या मोहिमांची संकल्पना मांडली आहे. फक्त मंगळावर जाऊन उतरायचं परत येणं नाही. यासारख्या आत्महत्या मोहिमांनाही हजारो लोक तयार होत आहेत. पण ही गोष्ट सुद्धा अवघड आहे कारण, मंगळावरच्या वादळात आणि वातावरणात माणूस राहू शकेल अशी कोणती व्यवस्था सध्या अस्तित्वात नाहीये. काही जण मार्शियन (Martian) चित्रपट पाहून मंगळावर जाण्याच्या कल्पना रंगवतात. जरी कल्पनाच ही शोधांची जननी असली तरी तो काळ अस्तित्वात यायला अजून वेळ आहे. तरीही सध्याच्या तंत्रज्ञानाची प्रगती बघता  मानव 2030 ते 2040 च्या दशकात मंगळावर पोहोचेल अशी आशा आहे.

लेखक : संदेश जोशी
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *