भिलार : ‘इये पुस्तकाचिये नगरी

गजबजाटापासून दूर, ऑक्टोबरच्या उन्हाळ्यात कोवळ्या थंडीचा आस्वाद घेताना आपल्या दिमतीला सुमारे पंधरा हजार पुस्तके सज्ज असतील तर खरेच, अजून काय हवे. हे काय कोण्या एका वाचनवेड्याचे स्वप्न नाही. हे आहे भिलार गाव. पाचगणीपासून 7 किलोमीटर व महाबळेश्‍वर पासून 17 किलोमीटर, सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतारावर एरवी स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले परंतु आता घराघरांमध्ये ‘आम्हा घरी धन… शब्दांचीच रत्ने’ घेऊन सजलेले हे गाव, भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध होत आहे.

निसर्गानेच शांततेचे वरदान दिलेल्या या गावात, रस्त्याच्या दुतर्फा विखुरलेल्या घरांमध्ये मोजकी 25 घरे पुस्तकांसाठी निवडली आहेत. यामध्ये  2 मंदिरे, 1 सार्वजनिक वाचनालय 5-6 राहण्याची सोय असलेली घरे, व उर्वरित राहती घरे आहेत. या घरामध्ये कांदबरी, विज्ञान, क्रीडा, इतिहास, स्त्रीविषयक साहित्य, शिवचरित्रे, आत्मचरित्रे – चरित्रे, संतसाहित्य, ललित गद्यसाहित्य, वैचारिक लेखन, लोकसाहित्य, दिवाळी अंक, वर्तमानपत्रे, साप्ताहिके व बालसाहित्य अशी विभागणी केली आहे. प्रत्येक घरात एक विषय त्यातील सर्व पुस्तके व निवडक प्रसिद्ध पुस्तके सर्व घरांमध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत. वाचताना खिडकीतून डोकावणारा जवळपास सर्वच घरांमध्ये जाणवतो. संतसाहित्य असलेले मंदिर विलक्षण नयनरम्य आहे.

खरे तर पुस्तकांची एवढी विविधता अनपेक्षित होती. ना सं. इनामदारांपासून ते थेट अनिल माधव दवेंपर्यंतव दुर्गा भागवतांपासून मलाला युसुफझाईपर्यंत सर्व प्रकारचे लेखक/ लेखिका या गावामध्ये आहेत. टुमदार घरामधील एक सुंदर खोलीत नीटनेटक्या मांडणीत पुस्तके ठेवली होती. वाचनासाठी साजेसे वातावरण सर्वच घरांमध्ये आढळून आले. वाचकांसाठी सर्व घरे उघडी होती. सीसीटीव्ही अथवा कोणीही माणसाच्या निगराणीची अजून तरी आवश्यकता वाटत नव्हती थंड वातावरण व हव्याहव्याशा वाटणार्‍या शांततेत वाचनाचा अनुभव घेण्यासाठी हे गाव निवडल्या बद्दल महाराष्ट्र शासनाचे खरेच कौतुक !

महाराष्ट्र शासनने या उपक्रमासाठी मेहनत घेतल्याचे उद्घाटन सोहळ्यात दिसून आले. तसेच प्रसारमाध्यमांनी देखील उपक्रम उचलून धरला.  शिक्षणमंत्र्यांनी या प्रकल्पात विशेष लक्ष घातले आहे. ग्रामस्थांचाही तेवढाच मोलाचा वाटा दिसून येतो. परंतु या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी आता केवळ वाचकांच्या पुढाकाराची गरज आहे.

हा प्रकल्प जेवढा स्वप्नातील वाटतो तेवढ्याच वास्तवाच्या खुणा जागोजागी दिसून येतात. गावात प्रवेश करतानाच मुख्य रस्त्याची अवस्था इतकी दयनीय आहे की, चारपाच महिन्यांपूर्वी इथे मुख्यमंत्री इतर मान्यवरांसह प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी येऊन गेली; यावर विश्‍वासच ठेवता येणार नाही.

गावामध्ये एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही ही बाब जरा खटकली. स्थानिकांचा सहभागाचा उत्साह आता ओसरत चाललाय. इथून पुढे पर्यटकांनी या प्रकल्पाला पुरेसा प्रतिसाद दिला नाही तर मात्र प्रत्येक शासनप्रकल्पाच्या नशिबी येणार्‍या

उपेक्षेप्रमाणेच या प्रकल्पाची अवस्था होईल. भारतातील पहिले पुस्तकांचे गाव हे बिरूद मिरवणार्‍या या गावाची प्रतिष्ठा जपण्यासाठी महाराष्ट्राच्या जागरूक नागरिकांनी काही पावले उचलणे गरजेचे आहे.

मराठी पुस्तकांची रेलचेल असलेल्या या गावात एकही इंग्रजी अथवा हिंदी पुस्तक नाही. ही उणीव शासनाने लवकर दूर करावी. तसेच शालेय सहली अथवा महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून येणार्‍या पर्यटकांसाठी राहण्याची व्यवस्था व जेवण्याखाण्याची व्यवस्था यांची माहिती सहजरीत्या उपलब्ध करुन देण्यासाठी एखादी पुस्तिका वा परिपत्रक काढले जाऊ शकते. तसेच पुस्तकांच्या विक्रीसाठी प्रकाशकांनीच रस घेऊन ही सुविधा उपलब्ध करून द्यावी.

ग्रामस्थांना या उपक्रमातून अर्थार्जनाच्या जास्तीत जास्त संधी मिळाल्यास या उपक्रमाला स्थैर्य मिळेल. राजकीय पुढार्‍यांनी या उपक्रमाकडे एक अभिमानाची बाब म्हणून बघितले पाहिजे.

शरद पवारांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तीने सहपरिवार येऊन ‘पहिला वाचक होण्याचा मान’ मिळवला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍यांनी खरे तर इथे आठवडाभर जाऊन राहिले पाहिजे. या सोन्यासारख्या प्रकल्पाचे जर खरेच सोने करायचे असेल तर

महाराष्ट्राच्या वाचनवड्या नागरिकांनी कंबर कसायाला हवी. सोशल मीडियातून जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन तसेच उपक्रमाच्या प्रगतीवर कायम लक्ष ठेवून या उपक्रमास सर्वजण हातभार लावू शकतील. वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी असे प्रकल्प होणे हे खूप आशादायक आहे. त्यामुळे असे प्रकल्प फक्त आरंभशूरांचे ठरू नयेत याची जबाबदारी शासनासकट सर्वांनी घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *