भारतातली दिवाळी

उत्तर भारत

उत्तर भारतात प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण ह्यांच्या 14 वर्षांनंतर वनवासातून परत येण्याचे निमित्त म्हणून दिवाळी साजरी केली जाते. ज्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परतले त्या दिवशी अमावास्या होती. सर्वत्र मिट्ट काळोख होता. म्हणून लोकांनी घराबाहेर दिवे प्रज्वलित केले आणि फटाके फोडले. रामाचे अयोध्येत परत येणे हे चांगल्याने वाइटावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक मानले जाते. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार आणि आजूबाजूच्या प्रदेशात आजही ह्या परंपरा पाळल्या जातात. उत्तर भारतात दिवाळी साजरी करण्याची सुरुवात दसर्‍यापासून होते. दसर्‍याच्या दिवशी रामायणाची कथा पारंपरिक रामलीलेतून सादर केली जाते.

हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि पंजाबमध्ये दिवाळीच्या रात्री जुगार खेळणे शुभ मानले जाते. उत्तर प्रदेश, दिल्ली भागात घरात दिवे, मेणबत्त्या पेटवल्या जातात, रांगोळ्या काढल्या जातात. रात्री लक्ष्मीपूजन केले जाते. काही घरांमध्ये दुधाच्या पातेल्यात चांदीचे नाणे घालून त्या नाण्याने ते दूध घरभर शिंपडण्याची सुद्धा परंपरा आहे.

पूर्व भारत

पूर्व भारतात पणत्या, दिवे लावणे, घराची सजावट करणे, फटाके फोडणे हे सगळे मूलभूत सोपस्कार सारखेच असतात. पण लोक घराचे दरवाजे संपूर्ण वेळ उघडे ठेवतात. दिवाळीच्या काळात घरात लक्ष्मी येते असे मानण्याची पद्धत आहे. ज्या घरात प्रकाश कमी असतो त्या घरांमध्ये लक्ष्मी येत नाही असे मानले जाते म्हणून येथील घरांमध्ये दिवाळीच्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर दीपप्रज्वलन करतात. पश्‍चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेनंतर सहा दिवसांनी दिवाळी साजरी केली जाते आणि दिवाळी कालीपूजा म्हणून साजरी करतात. दिवाळीच्या दिवसात उंच खांबांवर पणत्या पेटवल्या जातात आणि पूर्वजांच्या आत्म्यांना स्वर्गाचा रस्ता दाखवला जातो. बंगालच्या ग्रामीण भागात आजही ही परंपरा पाळली जाते. बंगालप्रमाणेच ओदिशामध्ये सुद्धा दीपप्रज्वलन करून पूर्वजांना श्रद्धांजली वाहिली जाते.

पश्‍चिम भारत

भारताच्या पश्‍चिम भागात मुख्यत्वे लहानमोठे उद्योग धंदे करणारे लोक राहतात. दिवाळीच्या काही दिवस आधी पश्‍चिम भारतातील बाजार गजबजलेले असतात. गुजरातमध्ये दिवाळीच्या आदल्या दिवशी घराबाहेर रांगोळ्या काढल्या जातात. देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी पावलांची चित्रे काढली जातात. गुजराती लोकांसाठी दिवाळी हेच नववर्ष असते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी नवीन वस्तुखरेदी, दगदागिन्यांची खरेदी, घरे खरेदी किंवा नवीन कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणे शुभ मानले जाते. महाराष्ट्रात सुद्धा कमी अधिक फरकाने सारखीच दिवाळी साजरी केली जाते. घरोघरी खाण्याचे विविध पदार्थ बनवले जातात. चकली, अनेक प्रकारचे लाडू, चिवडा, शंकरपाळे त्याचबरोबर अनारसे, कडबोळी अश्या पदार्थांचा ह्यात समावेश असतो. ह्याला फराळ असे म्हटले जाते. उत्तर भारताप्रमाणेच पश्‍चिम भारतातही 5 दिवस दिवाळी साजरी केली जाते.

दक्षिण भारत

दक्षिण भारतात नरकचतुर्दशी हा दिवाळीचा मुख्य दिवस असतो. सकाळी लवकर उठून, उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. नवीन वस्त्रे परिधान केली जातात. नातेवाइकांच्या गाठीभेटी घेतल्या जातात. हरिकथेचे सांगीतिक सादरीकरण हे आंध्रप्रदेश मधील दिवाळीचे वैशिष्ट्ये आहे. आंध्र प्रदेशमध्ये अशी समजूत आहे की नरकचतुर्दशीच्या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला. म्हणून हा दिवस साजरा केला जातो. कर्नाटकात पहिल्या दिवशी तेल आणि उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. तिथे अशी समजूत आहे की नरकासुराचा वध करून आलेल्या कृष्णाने अंगावरील असुराच्या रक्ताचे शिंतोडे घालवण्यासाठी अभ्यंगस्नान केले होते.

दक्षिण भारतात सुद्धा महिला घरासमोर सुंदर रांगोळी काढतात. माती आणि गायीच्या शेणाने किल्ले बांधले जातात. अशाप्रकारे दक्षिण भारतातील दिवाळी साजरी होते.

लेखक : -शिवानी नार्वेकर
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *