प्रवासातले वाचन

एका भल्या पहाटे मी भरतपूरला पोहोचलो. भरतपूरच्या दारात बरीचशी मंडळी होती ज्यांच्यामध्ये अर्थातच मोठ्या प्रमाणावर गाईड आणि सायकल रिक्षा होत्या. एका गाईडने विचारले तुम्हाला गाईड हवाय का? ताशी दीडशे रुपये. तीन चार तास तरी घालवणार होते. त्यामुळे एवढे पैसे घालवणे शक्य नव्हते. रिक्षा वाल्यांचेही तेच. मी गाईडला म्हटले, गाईड कशाला लागतो, तर तो म्हणाला पक्षाची कामे करायला. मी त्याला म्हटले मी पीटर रेमंडच्या पुस्तकावर काम केले आहे. पीटर रेमंडचे दक्षिण भारतातील पक्षी हे पुस्तक मी केले असले तरी त्यामुळे अनेक प्रकारच्या पक्षांची माहीती झाली. शिवाय वेगवेगळ्या हंगामात पक्षांचा रंग कसा बदलतो किंवा वेगवेगळ्या तर्‍हेचे पक्षी कसा वेगवेगळा आवाज करतात. याचे वर्णन सुंदर केले आहे. व्ही. एन्. एच्. तर्फे महाजन यांनी केलेल्या या पुस्तकावर मी आणि आरती कुलकर्णी यांनी काम केले. त्यामुळे पक्षी जीवनाविषयी बरीच माहीती झाली. प्रवासात नेहमीच मी पूर्वीपासून अनेक पुस्तके नेतो. त्याच्यात ज्ञानेश्‍वरी किंवा तुकारामांची गाथा किंवा एखादा मोठा कथा संग्रह. आता दिल्लीला विमानाने गेलो तेव्हा जॉन शिवरचा कथासंग्रह सोबत नेला होता. तशी बरीच पुस्तके माझ्यासोबत होती. त्यात हे ओ. हेन्री पुस्तक ते मी विमानतळावर आणि विमानात वाचत होतो. छोट्या छोट्या कथा या प्रवासात वाचणे नेहमीच सोपे जाते. शिवाय मोठी कथा कादंबरी प्रवासात वाचताना तुटक तुटकपणा येतो. तो कथा वाचताना येत नाही. त्यामानाने कविता संग्रह वाचणे हे आणखीन सोपे आणि छान वाटते. मागच्या प्रवासात मी रॉबर्ट फ्रॉस्टच्या कविता वाचत होतो. रॉबर्ट फ्रॉस्ट हा आपल्याला निसर्ग कवी म्हणून माहीत आहे. त्याच्या कितीतरी कविता या एखाद्या छोट्या कथेप्रमाणे आहेत. विशेषतः त्याचा एक काका वेडा होता आणि त्याला पिंजर्‍यात बांधून ठेवत.अंगावरचे कपडे फाडून टाकत. अशा काकाचे वर्णन करणारी ही कविता आहे. ती फारच भिडणारी आहे. जॉन शिवर हा माझा आवडता कथा लेखक त्याच्या कितीतरी कथा मी पुनःपुन्हा वाचल्या आहेत.

एकदा मात्र काय झाले की विमानतळात मी विमानात त्याचे कंट्री हजबंड वाचायला घेतले. प्रत्यक्षात ते विमान कोसळण्यावर आहे. त्यामुळे धाडदिशी मिटून ते मी पिशवीत ठेवले. पण त्याच्या अनेक कथा गाजलेल्या आहेत. कंट्री हजबंड ही कथा विमान अपघातात सापडून परत आलेल्या पण त्याची दखल न घेणार्‍या कुटुंबप्रमुखाची कथा आहे. फ्लेमिंगो ही कथा मी हल्लीच वाचली. त्यात नदी शेजारच्या वेगवेगळ्या घरांच्या स्विमिंगपूलमधून एक माणूस पोहत पोहत जातो. अनेक ठिकाणी पार्टी असते. तिचा आस्वाद घेतो. एक घर त्याला बंद असलेले दिसते. खरेतर ते त्याचेच घर असते. पण त्याला स्मृतिभ्रंश झालेला असतो. अशी कथा आहे. गरिबी आणि समाजाची टीका यांचा धनी झालेल्या माणसाचे विदारक चित्रण या कथेत आहे. जॉन शिवरच्या अनेक कथा या सुंदर भाषा पण आशय मात्र खरवडणारा आहे. खरेतर तो हेमिंग्वे, जे डी सालेंजर अपडाईक यांचा समकालीन. पण तरीही आज जगभरात त्याचे नाव नाही, पण न्यूयॉर्करचे संपादक अनेकदा त्याच्या कथांचा उल्लेख करतात. किंवा अनेक कथा विशेषांकामध्ये त्याच्या एका कथेचा तुकडा देण्यात येतो.

भरतपूर पर्यंतचा प्रवास ट्रेनने झाला. तिथून जयपूरला बसने निघालो. त्यातही वाचत होतो. मिलिंद बोकील यांची ‘एकम’ ही कादंबरी वाचली. खरेतर ती गौरी देशपांडेच्या जीवनावर आहे असे म्हटले जाते. काही साम्य आहेत. पण खरेतर ही कुठल्याही लेखक किंवा लेखिकेची कादंबरी असू शकते. मिलिंद बोकील यांनी निर्मितीची प्रक्रिया कथा कादंबरी लेखन का आणि कशासाठी करायचे हे वाचकाला पडलेले प्रश्‍न सोडवताना दिसतात. त्याच्यातूनही पुढे अनेकदा लेखिकेचे दारूचे व्यसन तिचे मैत्रिणीबरोबरचे मुलाखतकारांबरोबरचे इंटरॅक्शन अशा छोट्या छोट्या संवादातून ही कादंबरी पुढे जाते. सत्तर ऐशी पानांची कादंबरी आहे. खरेतर तिला दीर्घकथा म्हणता येईल. यावर एखादा चांगला सिनेमा आणि नाटकही होऊ शकेल.

दिवाळी अंकाच्या निमित्ताने लेखनाचे जे वाचायचे आहे ते बरेचसे वाचन मी प्रवासात केले. या प्रवासाच्या आधी गोव्याला गेलो. तिथे इंदिरा गांधींवरची दोन्ही पुस्तके वाचत होतो. एक म्हणजे पी सी अलेक्झांडर यांनी लिहीलेले पुस्तक. ते वाचून संपले आणि मी सुस्कारा सोडला. तेव्हा समोरच्या माणसाने विचारले ‘संपले काय पुस्तक? प्रवासात पुस्तक वाचत बसल्याने लोक जरा आदराने पाहतात असेही आहे. एकदा कलकत्याच्या प्रवासात मी खाली बसून वाचत होतो. तेव्हा एकाने बरेच पुठ्ठे वगैरे आणून दिले. बसताना टोचू नयेत म्हणून. एकदा सावंतवाडीला प्रवास संपवताना माणूस आला. त्याने ओळख केली आणि म्हणाला वाचनाची बरीच आवड आहे तुम्हाला, तर अगदी अलीकडे मानखुर्दला एक प्रवासी भेटला. त्याने हातातले पुस्तक दाखवले. ‘नापास मुलांची गोष्ट’ हे पुस्तक अरुण शेवतेंनी संपादित केलेले पुस्तक त्यांनी घेतले होते आणि तो म्हणाला की पँट घ्यायची की पुस्तक तर एकच पँट घेतली आणि पुस्तक घेतले. अरुण शेवतेंना नंतर हा किस्सा मी सांगितला. या प्रकारे प्रवासात वाचन करताना अनेक अनुभव येतात. पूर्वी प्रवासात वाचताना लोक विचारायचे, तुमची परीक्षा आहे का आता केस पांढरे झाल्यावर हा प्रश्‍न कोणीच विचारत नाही. सततच्या वाचनामुळे अर्थात डोळ्यांवर ताण येतोच. पण रेल्वेत वाचायला सर्वात सोपे जाते. कॅथरीन फ्रांकने लिहीलेले इंदिरा गांधीचे बरेचसे चरित्र मी या प्रवासात वाचले. कॅथरीन फ्रांक अत्यंत मोकळेपणाने लिहीते आणि वेगवेगळ्या कालखंडातील बर्‍याच गोष्टींवर त्याने लिहीले आहे. विशेषतः फिरोज गांधी आणि इंदिरा गांधीचे मैत्री आणि संबंध यावर त्यांनी डॉम मोराईस यांनी उत्तम लिहिले आहे. फिरोज गांधी हे खरेतर नेहरूंना कसे अडचणीचे ठरले होते. त्यांचे अकाली निधन झाले नसते तर त्यांनी भारताच्या राजकारणात मोठी कामगिरी बजावली असती यात शंकाच नाही. कारण तेव्हाच ते लोकसभेत लोकप्रिय होते. आणि संसदेच्या सेंट्रल हॉलमधील एका कोपर्‍याला फिरोज कॉर्नर असे म्हणत असत अशी बरीच माहीती पुस्तकातून मिळते. आणखी प्रवासात वाचण्याजोगे म्हणजे अर्थात तुकाराम गाथा. एकत्र गाथेमधले छोटे छोटे अभंग सहज वाचून होतात. आणि मध्ये मध्ये का होईना तुकारामांचे वाचन होत राहते. कारण छोटे मोठे प्रवास नेहमीच होत असतात. नोकरीला होतो त्या काळात वाशी ते सीएस्टी किंवा वाशी ते चर्चगेट असे एक एक तासाचे प्रवास व्हायचे. सुरुवातीला हा प्रवास एक तास दहा मिनिटाचा होता नंतर कमी झाला मानखुर्द बाजूच्या झोपड्या हटवल्यावर. तेव्हा नियमित रोज दोन तास वाचन व्हायचे. आता हा प्रवास आठवड्यातून एखाद्या वेळेस होतो. पी जी वुडहाउसचे पुस्तक मी नेहमी सोबत ठेवतो असे पु.ल देशपांडे यांनी लिहून ठेवले आहे. मी प्रवासात नेहमीच पी.जी. वुडहाउस वाचतो. याचे कारण प्रवासात अनेकदा अकारण ताणताणाव येतो धावपळ होते अशावेळी त्यातून मन काढून घेण्यासाठी वुडहाउस इतका चांगला लेखक नाही.

अलीकडे न्यूयॉर्कर मोठी लेखिका लिलियन रॉस. ही मरण पावली. जवळपास सत्तर वर्षे ती न्यूयॉर्करमध्ये लिहीत होती आणि पाचशेहून अधिक लेख तिने न्यूयॉर्कर मध्ये लिहीले. तिच्या या लेखासंग्रहाचे पुस्तक आता अलिकडेच निघाले आहे. लिलियन रॉस ही न्यूयॉर्करची प्रसिद्ध पत्रकार 99 व्या वर्षी मरण पावली. साधारणपणे पाचशे लेख तिने न्यूयॉर्करमध्ये लिहिले आहेत. न्यूयॉर्कर हे साप्ताहीक जगातील इंग्रजी पत्रकारितेचा एक सर्वोच्च मानबिंदू मानला जातो. 1925 साली सुरू झालेले हे साप्ताहीक आजही जोरात चालू आहे आणि त्यात नियमित रिपोर्ताज, व्यक्तिचित्रे न्यूयॉर्कर शहरातल्या घडामोडींची माहिती. छोटी टिपणे कथा कविता आणि तीस चाळीस व्यंगचित्रे दर अंकात प्रसिद्ध होतात.

जगातील उत्कृष्ट लेखकांचे आणि पत्रकारांचे लेखन मिळवण्याचा न्यूयॉर्करचा नेहमी प्रयत्न असतो. सलमान रश्दीपासून ते मार्क्विसपर्यंत अनेकांनी त्याच्यात रिपोर्ताज लिहीलेले आहेत. भारताच्या निवडणूक कव्हर करण्यासाठी त्यांनी पट्रीक फेसला आमंत्रित केले तर अमिताव घोषसारख्या माणसाला 1996च्या अणुस्फोट चाचणीवर लिहायला सांगितले. न्यूयॉर्कच्या पत्रकारितेची एक विशिष्ट ढासनी आहे. प्रचंड तपशील द्यायचे चित्र डोळ्यासमोर सिनेमाप्रमाणे उभे करायचे. आणि गोष्टी घडल्या तशा सांगायच्या आणि हे सारे झाल्यानंतर त्याच्यावर अनेक प्रकारचे संपादक संस्कार करतात. भाषेचे किंवा प्रवाहीपणा यावा यासाठीचे काही बदल केले जाऊन पुन्हा लेखकाला ती प्रत पाठवण्यात येते. पूर्वी हे काम महीनोन्महीने चालायचे. यासाठी फॅक्ट चेकिंग नावाचा विभाग न्यूयॉर्करमध्ये कसून काम करतो. त्याचे उदाहरण म्हणजे एका लेखकाने तिबेट मधल्या भिंतीचा रंग निळा लिहीला होता. तेव्हा त्यांनी तिबेटमधे फोन करून ती भिंत खरंच कुठल्या रंगाची आहेत. ती चौकशी केली. तर न्यूयॉर्करच्या या पत्रकारितेचा पाया घालायला जी मंडळी होती त्याच्यात पहीला संपादक हेरॉल्ड रॉस नंतरचा विल्यम शॉन आणि लिलियन रॉस सारखे लेखक पत्रकार होते.

लिलियन रॉसचा पहिला लेख गाजला तो म्हणजे हेमिंग्वेवरचा. हेमिंग्वे न्यूयॉर्कला येणार होता तेव्हा तिने विमानतळावर गाठले. विमानतळावरच हेमिंग्वे बारमध्ये प्यायला बसला. त्यानंतर काय काय करायचे याची यादी केली. मुष्टीयुद्ध चालू आहे का कुठे असे विचारल्यावर लिलियन रॉसने एकदोन नावे सांगितली. तेव्हा हेमिंग्वे म्हणाला ही अगदीच फोकनाड मुष्टियोद्धा आहेत. आणि मुली लक्षात ठेव मुष्टियोद्धा न पाहण्यापेक्षा अधिक वाईट असते. याप्रकारे अगदी उ.लं.ची अंडरवेअर घेण्यापासून ते मर्लिन डीट्रीसच्या मैत्रीबद्दल सगळ्या विषयावर हेमिंग्वे जसजसे बोलला तसतसे तिने सगळे तपशीलवार लिहून काढले. हा लेख इतका मोठा होता की त्याचे छोटे पुस्तकच तयार झालेले आहे. असाच भाग तिने चारपाच भागात ‘रेड बॅच ऑफ करेज’ या चित्रपटाच्या शूटिंगवर लिहीला. तिचे हे तपशीलवार चित्रण नंतर फ्लाय ऑन वॉल शैलीचे रिपोर्टिंग मानले जाण्यात आले. म्हणजे भिंतीवरची माशी जशी सारे काही ओब्झर्व करते. तसेच पत्रकाराने भोवताली घडणार्‍या प्रत्येक घटनेचा तपशील देणे या शैलीचे विडंबनही केले जाते. बहुधा न्यूयॉर्करचे लेखक घातलेले कपडे, केसाचा भांग, त्या माणसाचे वर्णन, जाड भुवया, मोठे नाक अमुक तमुक असे करतात बोलण्याची शैली तो पेन्सिलशी चाळा करत असेल तर ते लिहीतात. या सार्‍या शैलीची विडंबनाही झाली आणि या शैलीचे अनुकरणही आता भारतीय पत्रकार मोठ्या प्रमाणावर करत आहेत. तर या शैलीची कर्ती आहे लिलियन रॉस. तसे मैत्री करायला अवघड असलेल्या जे . डी सालेंजरशी तिची मैत्री होते. मुख्य म्हणजे विल्यम शॉनशी तिचे प्रेमाचे संबंध होते. शॉन मरेपर्यंत हे कोणालाच कळले नाही. नंतर मात्र तिने हीअर बट नॉट हीअर हे पुस्तकच लिहीले आणि संबंधाचा बोभाटा जगजाहीर केला. अर्थातच तिने लिहीलेल्या पाचशे लेखांपैकी अनेक न्यूयॉर्कर मधील टिपणे आहेत ही टिपणे सुरुवातीच्या आजही न्यूयॉर्करमध्ये असलेल्या राउंड अबाउट द टाऊन या सदरासाठी आहेत. या सदरामध्ये न्यूयॉर्क मधले कार्यक्रम प्रदर्शने किंवा एखादी विशिष्ट घटना किंवा विशिष्ट व्यक्तींच्या मुलाखती अशा असतात. असे विपुल लेखन लिलियन रॉसने केले. तिच्या लेखनाची जवळजवळ नऊ-दहा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

लेखक : शशिकांत सावंत
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *