नैराश्यावर भाष्य करणारा ‘कासव

घेई ओढुनी संपूर्ण विषयातुनी इंद्रिये

जसा कासव तो अंगे तेंव्हा प्रज्ञा स्थिरावली

गीताई

कोण आहेस रे तू? त्रास होतोय का? हे प्रश्‍न जेव्हा जानकी (इरावती हर्षे) मानवेंद्रला (आलोक राजवाडे) विचारते तेव्हा यातील एकाही प्रश्‍नाचे उत्तर मानवेंद्रकडे नसते. प्रतिकूल परिस्थितीत जसं कासव आपले पाय पोटात घेऊन गायब होण्याचा प्रयत्न करत असते तसेच काहीतरी मनुष्याचे होत असावे. आपण कुणाला दिसू नये आणि आपल्या जगण्याला काहीच अर्थ नाही असे विचार बर्‍याचदा डोकावत असतात. पण त्यांना तोंड देताना काही मने हिरमुसून कासव होऊ पाहत असतात. यंदा
च्या 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठी चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळाला. भावे-सुखटणकर यांच्या ‘विचित्र निर्मिती’ या प्रॉडक्शन कंपनीने निर्माण केलेल्या ‘कासव’ या मराठी सिनेमाने अव्वल क्रमांकाचे सुवर्णकमळ पटकावले. नैराश्यावर भाष्य करणारा ‘कासव’ हा सिनेमा ही एक अप्रतिम कलाकृती आहे. कोकणी भाषा, अर्थपूर्ण संवाद, लेहेर समंदर रे’ हे मनाला भिडणारे गीत, उत्कृष्ट चित्रण, अश्‍वत्थाम्याचे ‘दशावतार’ नाटकातील भळभळत्या जखमेवरील भाष्य, कोंकण परिसराचा आणि तेथील संस्कृतीचा चित्रपटाचा विषय पोहचवण्यासाठी केलेला उपयोग या सर्वांनी या चित्रपटाला एक विशेष स्थान प्राप्त करून दिले आहे.

हाताच्या नसा कापून घेऊन आत्महत्या करू पाहणारा मानवेंद्र हॉस्पिटलमधून पळून जातो. रस्त्यावर बेवारस पडलेला हा मुलगा जानकीला सापडतो. त्याला खूप ताप आलेला असतो. ती त्याला घेऊन आपल्या कोकणातल्या घरी जाते. त्याच्यावर इलाज करते. पण पुढे जानकीच्या लक्षात येते की तो शरीराने आजारी नसून मनाने आजारी आहे. ‘कासव’ हा चित्रपट नैराश्याशी सामना करून स्वतःचा मार्ग शोधलेल्या एका व्यक्तीचा त्याच मार्गावर धडपडणार्‍या दुसर्‍या व्यक्तीला देऊ
केलेला मदतीचा हात आहे आणि स्वयंप्रेरणेने त्या नैराश्याच्या पिंजर्‍यात अडकलेल्या व्यक्तीची मुक्तता करण्यासाठीचा प्रयत्न आहे. ऑलिव्ह रिडले टर्टल प्रजातीच्या कासवांच्या रक्षणाचे काम हाती घेऊन कोकणात आलेली जानकी दत्ताभाऊंना (मोहन आगाशे) त्यांच्या कामात मदत करत असते. कासवांच्या दुनियेची बरीच माहिती या चित्रपटात दिली आहे.

छोट्या परशूची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरते. आईवडील नसलेला अनाथ परशू मानवेंद्रला जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देतो. आपल्या कोकणी भाषेत तो जेव्हा मानवेंद्रला आयुष्यात झालेला गोंधळ सोडवण्यासाठी ‘भजी खाऊ वाटली तर भजी खायची, चहा पिऊ वाटला तर चहा प्यायचा. दोन्ही एकत्र केलं तर मात्र ठसका लागतो,’ हा उपदेश देतो तेव्हा कितीही अवघड गोष्ट असली तरी तिची उत्तरे किती सोप्पी असतात याची जाणीव होते. आपल्या कोषातून बाहेर पडून बाहेरच्या जगाचा मनसोक्त आनंद लुटला तर निराशेचा डोंगर आपल्यावरती कोसळत नाही. आपणच आपल्याला निराशेच्या एका अंधार्‍या खोलीत बंद करून घेतलेले असते. समुद्राच्या उसळणार्‍या लाटा, शांत आणि दूरवर पसरलेला समुद्रकिनारा, समुद्रात त्या लाटांवर स्वार होऊन प्रवास करणारे जहाज या निरीक्षणाचा आनंद आपण घ्यायला हवा. अंधार्‍या खोलीत प्रकाश आणि आल्हाददायक वातावरण नाचू द्यावे. यदूची भूमिका साकारणारे किशोर कदम यांनी आपल्या अभिनयातून हलक्याफुलक्या विनोदाची निर्मिती केली आहे. मानसिक असंतुलनाकडे जग कसे पाहत असते याची जाणीव त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत उत्तमरीत्या पोहचवली आहे.

राष्ट्रीय सुवर्ण कमळ पुरस्काराने सन्मानित झालेल्या कासव या चित्रपटात कासव आणि मानसिक स्थिती यांची उत्तम सांगड घातली असून जीवनावर भाष्य केले आहे. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट सहभागी झाला. ‘मुंबई चित्रपट महोत्सव’ (2016), कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (2016), आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव केरळ ’(2016), बेंगलोर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ’(2017), न्यूयॉर्क भारतीय चित्रपट महोत्सव’(2018) मध्ये ‘कासव’ हा चित्रपट सहभागी झाला. डिस्ट्रिब्यूशनमध्ये बर्‍याच अडचणी येत असल्याचे मोहन आगाशे यांनी त्यांच्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले. सध्या मुंबईत फक्त एकाच ठिकाणी हा चित्रपट दाखवला जात आहे. पुण्यात व संपूर्ण महाराष्ट्रात खूप कमी चित्रपटगृहात प्रसारित होत असल्यामुळे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. चित्रपटाच्या विषयाबाबतीत जागरूकता निर्माण करणे हे प्रमुख ध्येय असल्याने गरज निर्माण झाल्यास लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येतील असे त्यांनी सांगितले आहे. आलोक राजवाडे यांना चीनमध्ये झालेल्या ‘ब्रिक्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये उत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान मिळाला आहे.

संपूर्ण आयुष्य समुद्रात जात असले तरी कासवीण अंडी घालण्यासाठी किनार्‍यावर येते. ती अंडी घालून निघून जाते. प्रत्येक अंड्यातून बाहेर येणारे कासवाचे पिल्लू जन्माला येताना एकाकीच या जगात येते. समुद्राकडे जाऊन ते स्वतःच स्वतःचा मार्ग शोधते. निसर्गाने देऊ केलेल्या ह्या रूपकाचा या चित्रपटात अतिशय सुंदर उपयोग केला आहे. आयुष्य कसे जगायचे हे शक्यतो आपल्याच हातात असते. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात असा एक क्षण येत असतो, जिथून पुढे आपले संपूर्ण आयुष्य बदलून जाणार असते. प्रतिकूल परिस्थितून शांतपणे मार्ग काढून आपल्याला हवी तशी अनुकूलता आणणे कदाचित लगेच जमणार नाही. पण प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. येणार्‍या प्रत्येक अडचणीकडे एक संधी म्हणून पाहता येणे ही एक कला आहे.

 

बाग में अफवाह के, मुरझा गए हैं फूल सब।

गुल हुए गायब अरे, फल बनने के लिये॥

प्रेमचन्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *