चित्र वाचन

चित्रकलेवरच्या पुस्तकांवरचे वाचन मी सुरू केले तेव्हा दोन-तीन गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे चित्रकार फारशी पुस्तके वाचत नव्हते, चाळतही नव्हते. दुसरे म्हणजे इतर पुस्तकांपेक्षा चित्रकलेचे वाचन सोपे असते. कारण त्याच्यात खूप प्लेट्स् असतात मजकूर कमी असतो. असे असूनही चित्रकारांमध्ये अशा वाचनाबद्दल एक अढी होती. त्या अढीच्या मागची बरीच कारणे होती. एक कारण असे की, पुस्तकात चित्रे पाहिली की त्याचा आपल्यावर परिणाम होतो. अशा पद्धतीचे हे एक चित्रकारांचे मत होते. दुसरे असे की चित्र काढणे हे आपले काम आहे. वाचणे हे काही आपले काम नाही.

याला छेद देणारे काही चित्रकार अर्थातच होते. उदा : प्रभाकर बर्वे स्वतः पळशीकर वाचनाबद्दल खूप आग्रही होते. आणि त्याचबरोबर या प्रकारचे अनेक लोक होते. पण यांची संख्या मर्यादित. अगदी आपले बर्वे, कोलते, सुधाकर यादव असतील. हे चांगले वाचक लेखक होते. पण काहींचे मत हेच की चित्रकाराचे वाचनामध्ये काही काम नाही. उलट बर्वे कविता करायचे, लिहायचे. संभाजी कदम भरपूर लेखन करायचे. ते चिंतनशील होते. मौज सत्यकथांमध्ये त्यांची समीक्षणे आणि लेख प्रसिद्ध होत. शिवाय त्यांना संगीताची आवड होती. तबलाही शिकत. पण ही सारी अपवाद मंडळी सोडली तर सर्वसाधारण जे. जे. च्या चित्रकारांचे मत वाचनाच्या विरुद्ध होते.

याच्या उलट होते बडोदा स्कूल भूपेन कक्कर किंवा जेराम पटेल. अशी चिंतनशील मंडळी राहत तिकडे. त्यामुळे मग वातावरण वाचनाचे होते. शिवाय एम्. ए. चा कोर्स होता. ज्याच्यामुळे अनेकदा चित्रकार समीक्षा शिकत. चित्रकलेच्या इतिहासाचा कोर्स घेत. परिणामी समीक्षक प्रामुख्याने बडोद्यातले येत. तर मुद्दा हा की, जे. जे. आणि बडोदा स्कूलमध्ये वाचन आणि अभ्यास याचा एक फरक होता.

दुसरी गोष्ट अशी की, मला बर्वेंच्या सहवासात चित्रकलेची ओढ तर निर्माण झाली, पण मला एक कळत नव्हते की बर्वेंची मुलगी सोनाली चित्र समोर धरायची आणि म्हणायची हे चांगले आहे, हे चांगले नाही. हे ती कसे काय बोलायची? ही जी नजर असते ती कशी येते. मी पण लहानपणापासून चित्र काढत होतो बघत होतो. भाऊ चित्रकार होता. पण मला तसे अजून मॉडर्न आर्ट कळत नव्हते.

मग मी जहांगीरमध्ये जायला लागलो. तिथे पहिल्या मजल्यावर चित्रकलेची लायब्ररी होती.
एन्‌सीपीएची लायब्ररी होती जिथे दोनशे रुपये भरल्यावर वर्षभर वाचायला मिळे. तिथे मग मी चित्रकलेच्या इतिहासावरची पुस्तके वाचू लागलो. मला कळले एक दिवस की नेहरू प्लॅनेटोरियममधेही लायब्ररी आहे. तळघरात ती लायब्ररी होती. तिथेही काही पुस्तके वाचू लागलो. त्याच्यातून मग सुरुवातीला सोपे चित्रकार उदा : हॉकनी वगैरे उदा : पॉप आर्टसारखी चटकन  समजणारी भिडणारी कला. जास्फर जोन्ससारखे चित्रकार की जे चिंतनशील होते. ज्यांच्याबद्दल थोडेसे वाचले तर अधिक माहित होऊ शकते ते.

त्याच्यानंतर चित्रकलेवरील इजम्सवरची पुस्तके त्यातले एक पुस्तक मी विकतही घेतले. ज्याच्या  मुखपृष्ठावर जास्फर जोन्सचे ब्रशचे चित्र होते. तर  त्यामध्ये एकेका इजम्सवर एकेक लेख केलेला होता. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट पुस्तक होते. अर्नासन वगैरे लेखकांची मोठी कॉफीटेबल पुस्तके होती. त्या काळात त्यांची किंमत दीड हजार, दोन हजार, अडीच हजार इतकी होती. आता मी नोकरी सोडली तेव्हा माझा पगार एकवीसशे होता. म्हणजे दोन-अडीच हजाराचे पुस्तक मला किती महाग वाटत असेल. त्यामुळे अर्थातच मी मोठ्या प्रमाणावर वाचनालयात जाऊन पुस्तके वाचू लागलो.

मराठीत अगदी हाताच्या बोटावर पुस्तके होती. त्यातले कोरा कॅनव्हास माधुरी पुरंदरेंचे पिकासो ते वगैरे वाचून काढले. ‘सक्सेस अ‍ॅण्ड फेल्युअर पिकासो’ हे जॉन बर्जरने लिहिलेले पुस्तक वाचले आणि डोळेच खाडकन उघडले. एखाद्या चित्रकलेच्या कारकीर्दीचा किती प्रकारे विचार करता येतो हे त्याने दाखवून दिले होते. मग ब्रिटिश चित्रकार पॉप आर्टमधले किंवा सुसान सोन्तागसारखी समीक्षक काय लिहितेय उदा : तिने अनेक नव्या पासोलिनीसारख्या चित्रपट दिग्दर्शकांबद्दल लिहिले. गोदार्दबद्दल लिहिले होते तर तिचा तो संग्रहच वेगळा होता.

अगदी अलीकडे मला तिने लिहिलेला हॉवर्ड होजकीनचा कॅटलॉग सापडला. तर त्याच सुमारास ऑस्ट्रेलियन समीक्षक रॉबट ह्युजेसला टाईम मॅगझिनने हायर केले होते. दर अंकात तो अमेरिकेत चालू असलेल्या प्रदर्शनाची समीक्षा लिहायचा. पुन्हा हे अंक आमच्यासाठी महाग होते. पण ते रस्त्यावर पाच रुपयांत मिळत. तर रॉबर्ट ह्यूजेसने जास्फर जोन्सवर लिहिलेला लेख असेल किंवा मोन्द्रीयानसारखा लेख असेल तर त्याच्यामध्ये तो अनेक चित्रकारांची उदाहरणे देत होता. उदा. मोन्द्रीयानच्या लेखात  वर्मीरच्या चित्रातील खिडक्यांचे उदाहरण दिल्याचे मला आठवते. नंतर याचे पुस्तकही आले. ‘नथिंग इफ नॉट क्रिटिकल’ नावाचे. आणि ते पुस्तक कधीही वाचणे हा आनंदाचा ठेवा आहे. जवळपास दोनतीनशे महत्त्वाच्या चित्रकारांवर त्याच्यात टिपणे आहेत. पण टाईम्स मॅगझिनमधले लेख असल्यामुळे ते छोटे आहेत तपशिलाने नाहीत.

नंतर मग आर्ट न्यूज आणि आर्ट फोरम मासिके गवसली. ही दोनही अमेरिकेत यूसीसच्या  लायब्ररीमध्ये पहायला मिळत. त्याच्यात व्हॅनगॉगचा विशेषांक  मिळाला. आर्ट फोरममध्ये छोटी छोटी टिपणे असत. तीही उत्तम असत. आर्ट न्यूजमध्येही खूप मोठे मोठे लेख असत. काही आर्ट न्यूजचे अंक तर मी विकत घेतले. मातीस वरचा एक अंक होता. किंवा काही अ‍ॅबस्ट्रॅक चित्रकारांवरचे लेख होते. वर्षानुवर्षे आर्ट न्यूज आणि आर्ट फोरम अमेरिकन चित्रकारांवर दीर्घ आणि छोटे दोनही प्रकारचे लेख लिहित होते.

एक वेगळे मासिक म्हणजे व्हॅनिटी फेअर याच्यात क्वचित एखाद्या चित्रकारावर लेख यायचा. पण ते सेलिब्रिटी चित्रकार असत. आणि चित्रकारांचे रंगीत फोटो याच्यातच पाहायला मिळायचे. याप्रकारे हळुहळू चित्राचा अभ्यास म्हणजे भरपूर चित्र पाहणे हे माझ्या लक्षात आले. आणि अक्षरशः शेकडो चित्रकारांची हजारो चित्र मी पहात होतो. अमूर्त चित्रकलेची डिक्शनरीही मी विकत घेतली. एर्हेन्ज़्वाइग्चे अ‍ॅबस्ट्रॅक चित्रकलेवरचे पुस्तक घेतले. पॉल कलीचा द्विखंडीय प्रसिद्ध ग्रंथ पाहिला.

नितीन कुलकर्णी आणि महेंद्र दामले हे मित्र काही पुस्तके विकत घेत. त्यामुळे जरी मी पुस्तके विकत घ्यायचो तरी ती मी ताबडतोब विकायचो ती वाचून झाल्यानंतर. या प्रकारे माझ्या वाचनासाठीच्या पैशाची सोय झाली. याच काळात बर्वेंवर ज्याचा प्रभाव असावा अशा कॉलीफिल्ड नावाच्या चित्रकाराचे एक चित्र पहिले ते इतके बर्वेंसारखे होते की, मी ते चित्र रानडे वगैरे सर्वांना दाखवले आणि त्यांनीही दाद दिली.

तर या चित्रकलेतील वाचनप्रवासामुळे एक गोष्ट झाली. ती म्हणजे शेकडो चित्रकारांची हजारो चित्रे पाहून झाली. दुसरे म्हणजे वेगवेगळ्या इजम्सची माहिती झाली. अमुक चित्र कोणत्या इजम्समध्ये पडते, त्याच्यावर कशाचा प्रभाव पडतो हे कळू लागले. शिवाय रंगसंगती, पोत, आकार, रेखाटनाच्या विविध शैली, माणसे रेखाटनाचे विविध प्रकार, निसर्ग रेखाटनाचे विविध प्रकार हे माहिती झाले. मला असे वाटते की वर्गीकरण जर नीट जमले तर अनेक गोष्टी समजून घेता येतात. त्याप्रमाणे मला वर्गीकरण तर जमू लागले.

अनेकदा वेगवेगळ्या पुस्तकात एकच चित्र वेगवेगळ्या प्रकारे छापले जाते. गुगलच्या इमेजमध्ये जाऊन रेड स्टुडिओ हे टाईप केले तर ही गोष्ट लक्षात येईल. रेड स्टुडिओ हे मातीसचे एकच चित्र इतक्या लाल रंगाच्या गडद छापून येते की मला वाटते की मातीसलाही ते चित्र आपले म्हणून ओळखता येणार नाही. तर यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला, तरी छपाईमध्ये चित्र थोडेसे बदलते. हे खरे असले तरीही वाचनामुळे चित्र रसग्रहणाची थोडीशी ताकद वाढली.

त्यात जोडीला वेगवेगळे कॅटलॉग पाहणे उदा.- भारतात आलेल्या ब्रिटिश चित्रकारांचा कॅटलॉग ज्यात हॉकनीची चित्रे होती. जर्मन एक्स्प्रेशनिस्ट कलाकारांचा कॅटलॉग, बौहाऊस स्कूलच्या चित्रकारांचे कॅटलॉग. अशी चित्रे पाहताना लक्षात येते की जे चित्रकार एकत्र वावरत असतात त्यांची चित्रे एकसारखीच दिसतात. कारण त्याच्यामागचा विचार सारखाच असतो. यामुळे पिकासो आणि ब्राक यांच्या एकत्रित चित्रांचे पुस्तक पाहिले तर पिकासोची चित्रे कुठली आणि ब्राकची चित्रे कुठली हे ओळखता येत नाही.

याचाच अर्थ असा की मोठ्या चित्रकारांवर कोणा ना कोणाचा प्रभाव होता त्यातून ते बाहेर पडले, असे असेल तर मग जे. जे. मधील नवशिक्या चित्रकारांनी प्रभावाचा बाऊ करण्यात काय अर्थ होता. असो. पण असे घडले खरे. यामुळे मराठी चित्रकार चित्रकलेच्या वाचनापासून वंचित राहिले आणि प्रयोगशीलता  गमावून बसले.

दुसरीकडे माझ्यासारखा चित्रकला रसग्रहण करणारा माणूस हा आता लिहू लागला होता. स्वाभाविक लिहिताना चित्राचे वर्णन कसे करायचे, पोताचे वर्णन कसे करायचे हे प्रश्न होते. समीक्षा कशी लिहायची? त्यावर एक उपाय असा होता की, चित्रकाराशी बोलणे. चित्रकाराच्या चरित्रात्मक लिहिणे. त्या प्रकारे ‘वृत्तमानस’सारख्या वर्तमानपत्रातून लिहिताना मी वेगवेगळ्या नव्या जुन्या चित्रकारांना भेटू लागलो बोलू लागलो, आणि मग माझ्या लक्षात आले की चित्रकार स्वतःबद्दल बोलायला खूपच उत्सुक असतो. या प्रकारे मी हळुहळू चित्रसमीक्षेच्या प्रांतात शिरलो. चित्र रसग्रहण करू लागलो. मग अगदी प्रीतीश नंदींनी भरवलेल्या प्राणी छळाविरुद्धच्या चित्रप्रदर्शनापासून ते श्रेष्ठा, कोलते यांच्या एकल प्रदर्शनापासून शेकडो प्रदर्शने पहिली. थोडक्यात चित्रकलेच्या वाचनाचा मला लिहिण्यासाठी, वाचनासाठी आणि चित्रकला समजून घेण्यासाठी फायदा झाला हे नक्कीच.

लेखक – शशिकांत सावंत
संपर्क – swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *