कॅनडातील न्यू डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुखपदी शीख व्यक्ती

मानवी इतिहासांचे अवलोकन केल्यास असे दिसून येते की, लोकं स्थलांतर करत असतात. हे स्थलांतर कधी विद्या मिळवण्यासाठी असते तर कधी व्यापारउदिमासाठी. आधुनिक काळात, खास करून जागतिकीकरणानंतर तर यात कमालीची वाढ झाली आहे. भांडवल, कामगार, तंत्रज्ञानाचा मुक्त वावर हाच खरा जागतिकीकरणाचा मूळ आशय आहे. आज भारतीय समाज जगभर विखुरला आहे. त्यातही अमेरिका व कॅनडा या दोन देशांत मोठ्या प्रमाणात भारतीय आहेत. ताज्या बातमीनुसार अमेरिकेत आरोग्य मंत्री या महत्त्वाच्या पदासाठी या दोन भारतीय वंशाच्या व्यक्तींमध्ये चुरस आहे. या पदासाठी एका बाजूला श्रीमती सीमा वर्मा आहेत तर दुसर्‍या बाजूला बॉबी जिंदाल आहेत. एक दोन दिवसांत याबद्दलचा निर्णय जाहीर होईलच. कोणाचीही नेमणूक झाली तरी या पदावर अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशात भारतीय वंशाची व्यक्ती नेमली जाणार आहे ही वस्तुस्थिती उरतेच.

असा प्रकार आता कॅनडातही घडला आहे. भारतातून कॅनडात स्थलांतरित झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे. एका अंदाजानुसार कॅनडाच्या एकूण लोकसंख्येपैकी शीख समाज 1.5 टक्का आहे. हा समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सक्रिय आहे. यात राजकीय क्षेत्रसुद्धा आले. कॅनडातील राजकीय पक्षांच्या क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर असलेला विरोधी पक्ष म्हणजे ‘न्यू डेमोक्रॅटिक पार्टी’. या पक्षाच्या नेतेपदी अलिकडेच जगमीतसिंग या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे. सध्या

जगमीतसिंग ओंटोरियो या प्रांताच्या विधानसभेत आमदार म्हणून आहेत. ते अजून तेथील राष्ट्रीय लोकसभेत खासदार म्हणून आलेले नाहीत. याचा अर्थ असा की, ते पंतप्रधान ट्रूडो यांना संसदेतील प्रश्‍नोत्तराच्या तासाला सळो की पळो करून सोडू शकणार नाहीत.

पाशात्त्य परंपरेनुसार आजचा विरोधी पक्षाचा नेता हा उद्याचा देशाचा नेता असतो. इंग्लंडमध्ये तर विरोधी पक्ष नेत्याला ‘प्राईम मिनिस्टर इन वेटिंग’ असेच म्हणण्याची प्रथा आहे. याचा अर्थ असा की, उद्या जर कॅनडाच्या पंतप्रधानपदी जगमीत सिंग निवडले गेले तर याचे आश्‍चर्य वाटून घ्यायला नको. कॅनडात राष्ट्रीय पातळीवर तीन पक्ष महत्त्वाचे असतात. आजचा राज्यकर्ता पक्ष म्हणजे मध्यममार्गी लिबरल पक्ष, त्यानंतर कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष व तिसर्‍या क्रमांकावर असलेला जगमीतसिंग यांचा पक्ष. आज जगमीतसिंग यांच्याकडे तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या पक्षाचे नेतृत्त्व आले आहे.

जगमीतसिंग (जन्म ः 1979) हा नेता अगदीच तरुण आहे. पण राजकीय क्षेत्रात तो एक चाणाक्ष नेता समजला जातो. कॅनडातील प्रमुख विरोधी पक्ष न्यू डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतेपदाची निवडणूक अलिकडेच म्हणजे एक ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. यात जगमीतसिंग यांना 53.6 टक्के मतं मिळाली. कॅनडात पुढच्या निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये होणार आहेत. जगमीतसिंग यांनी कार्यकर्त्यांना त्या निवडणुकांसाठी तयारी करण्याचे आवाहन केले आहे. ते कॅनडात फौजदारी वकिली करतात.

आज कॅनडाच्या राजकीय क्षेत्रात शीख समाजाचे मोठे योगदान आहे. विद्यमान पंतप्रधान ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात चार शीख मंत्री आहेत. यातील एकहरजीतसिंग सज्जान संरक्षणमंत्रीसारख्या संवेदनशील पदावर आहे. 2015 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत वीस खासदार भारतीय वंशाचे निवडून आले होते ज्यात 18 खासदार शीख होते.

कॅनडाची राजकीय रचना भारतासारखी आहेत. तेथे चार प्रांत आहेत. यातील एक प्रांत म्हणजे ओंटोरिओ. या प्रांताच्या विधानसभेत जगमीतसिंग यांनी 2016 साली ठराव मांडला होता की ‘1984 साली दिल्लीत झालेली शीखविरोधी दंगल हा वंशसंहार होता’ असे मान्य केले जावे. त्यांच्या अशा भूमिकांमुळे भारत सरकारने जगमीतसिंग यांना 2013 साली व्हिसा नाकारला होता. आज ते कॅनडातील एका महत्त्वाच्या पक्षाचे प्रमुख म्हणून निवडले गेले आहेत.

जगमीतसिंग यांचे कॅनडातील जीवन फार मजेशीर आहे. त्यांचे वडील जगतरामसिंग हे पंजाबातील बर्नाला जिल्ह्यातील ठीक्रीवाल गावातून कॅनडाला स्थलांतरित झाले होते तर आई लुधियानाजवळच्या एका खेड्यातील आहे. जगमीतसिंग यांचे बालपण ओंटोेरिओ प्रांतात गेले. ते आजही याच प्रांतात राहतात. जगमीतसिंगला कॅनडातील शाळेत वंशवादी टोमण्यांचा सामना करावा लागला. स्वरक्षणार्थ त्यांनी वेगवेगळ्या मार्शल आर्टसचे प्रशिक्षण घेतले. त्यांना अनेकवेळा पोलिसांनी हटकले होते. या अनुभवांचा त्यांचा मनावर खोल परिणाम झाला व त्यांच्या लक्षात आले की, या प्रकारच्या वंशवादी मानसिकतेचा सामना केला पाहिजे. प्रत्येक समाजघटकाला त्यांच्या वैशिष्ट्यांसह जगण्याचा हक्क आहे अशी त्यांची भूमिका आहे. म्हणूनच ते शीख समाजाची ओळख असलेला फेटा नेहमी वापरतात. यांच्या मते प्रत्येक समाजघटकाने आपापल्या वैशिष्ट्यांचा अभिमान बाळगला पाहिजे. ते अजूनही अविवाहित आहेत.

या व अशा मुद्द्यांबाबत जगमीतसिंग यांची आग्रही मतं आहेत. त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेली प्रवाशांवरील बंधनं मान्य नाहीत. शिवाय त्यांच्या दिल्लीत 1984 साली झालेल्या शीखविरोधी दंगलीबद्दलही तीव्र भावना आहेत.

एक पक्षप्रमुख म्हणून जगमीतसिंग यांच्यासमोर मोठी आव्हानं आहेत. पक्षप्रमुखपदी निवडून येणे सोपे असते. पण खरी आव्हानं नंतर समोर येतात. जगमीतसिंग यांना पक्षाला नवसंजीवनी द्यावी लागेल. 2015 साली कॅनडात झालेल्या लोकसभा निवडणुकीत जगमीतसिंग यांच्या पक्षाचे लोकसभेतील संख्याबळ 59 ने कमी झाले होते. कॅनडाच्या लोकसभेत एकूण 338 खासदार असतात. त्यापैकी जगमीतसिंग यांच्या पक्षाचे विद्यमान लोकसभेत फक्त 44 खासदार आहेत. याच पक्षाचे 2011 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत 103 खासदार निवडून आले होते. पक्षाला ही शक्ती पुन्हा मिळवून देणे हे जगमीतसिंग यांच्यासमोर आव्हान आहे.

हे सर्व लक्षात घेतल्यावर त्यांच्या आर्थिक व सामाजिक विचारांचा मागोवा घेणे गरजेचे आहे. त्यांचा पक्ष ज्याला ढोबळ मानाने डावा पक्ष म्हणता येईल असा आहे. त्यांच्या मते श्रीमंत लोकांवर करामध्ये ज्या विविध सवलती दिल्या आहेत त्याची गरज नाही. या सवलती काढून त्याद्वारे जे उत्पन्न येईल त्यात गरीबांसाठी अधिकाधिक योजना राबवता येतील. त्यांच्या कॅनडात कमीत कमी पगार एका तासाला पंधरा डॉलर एवढा दिला जावा. सामाजिक प्रश्‍नांबाबतीत ते एल्जीबीटीक्यू समाजाला पाठिंबा देतात. यात समलिंगी विवाहसुद्धा आले. त्यांच्या मते या समाजाला विविध कौशल्य शिकवली पाहिजेत जेणे करून हा समाज इतरांबरोबर मिसळायला लागेल. यामुळे त्यांच्याविषयी असलेले गैरसमज कमी होतील. कॅनडा काय किंवा अमेरिका काय, या पुढारलेल्या देशांतही तृतीयपंथीय किंवा समलिंगी व्यक्तींबद्दल अढी असते.

कॅनडासारख्या देशात पर्यावरण या विषयाला फार महत्त्व असते व प्रत्येक महत्त्वाच्या पक्षाला पर्यावरणविषयक धोरण जाहीर करावे लागते. त्यांच्या मते कॅनडातील कार्बनचे प्रमाणात व्यवस्थित व्यवस्थापन करून कमी केले पाहिजे. यासाठी सरकारने वेगवेगळ्या सवलती दिल्या पाहिजे. ज्या कंपन्या कमीतकमी कार्बन वातावरणात सोडतात त्यांचे जाहीर कौतुक केले पाहिजे व त्यांना आर्थिक प्रोत्साहन दिले पाहिजे.

कॅनडातील क्वेबेक प्रांतात अलगतावादी चळवळ असते. हा प्रांत फे्रंच भाषिक असून तेथे गेली अनेक वर्षे अलगतावादी चळवळ जोरात आहे. तेथील फे्ंरच भाषिक समाजाला इंग्लिश भाषिक कॅनडातून फुटून निघावे असे वाटत असते. हे जरी अजून शक्य झालेले नसले तरी भविष्यात होणारच नाही असे ठामपणे म्हणता येणार नाही.

आपल्यासमोर स्पेनमध्ये कॅटलान प्रांतात नुकत्याच झालेल्या सार्वमताचे उदाहरण आहे. असाच प्रकार कॅनडातील क्वेबेक प्रांताबद्दलही होऊ शकतो. पण तोपर्यंत हा प्रांत कॅनडाच्या केंद्र सरकारातील सत्ता हस्तगत करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. हा प्रांत ज्या पक्षाला साथ देईल तो पक्ष सत्तेत येतो, असा कॅनडाचा आजवरचा इतिहास आहे.

क्वेबेक प्रांतातून कॅनडाच्या लोकसभेत एकूण 75 खासदार निवडून जातात. 2011 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत न्यू डेमोक्रॅटिक पक्षाने यातील 59 जागा जिंकल्या होत्या. मात्र 2015 साली राजकीय हवा फिरली व यातील अनेक जागा आजच्या सत्तारूढ लिबरल पक्षाने जिंकल्या. आता 2019 सालच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे.

आधुनिक कॅनडाच्या राजकारणात जगमीतसिंग यांच्या पक्षाने कधीही राष्ट्रीय पातळीवर सत्ता संपादन केलेली नाही. जर जगमीतसिंग हा चमत्कार 2019 साली होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत करू शकले तर ते कदाचित कॅनडाचे पंतप्रधानसुद्धा होऊ शकतील. पाश्‍चात्त्य देशांच्या इतिहासात हा वेगळाच क्षण असेल. हे कदाचित 2019 साली होणार नाही. मात्र आज ना उद्या कॅनडात ते होईल याबद्दल खात्री आहे.

लेखक : – – अविनाश कोल्हे
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *