आशिया आफ्रिका विकास परिक्षेत्र- BRI ला पर्याय?

नुकतेच सप्टेंबरमध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे भरातभेटीवर येऊन गेले. त्यांच्या या भेटीत बुलेट ट्रेन व तत्सम अनेक विकाससंबंधी प्रकल्प व योजनांबद्दल भारत व जपानमध्ये विविध करार करण्यात आले. याच भेटीत पंतप्रधान मोदी व जपानचे पंतप्रधान अ‍ॅबे यांनी ‘आशिया आफ्रिका विकास परिक्षेत्र’ या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठीच्या संकल्पाचे पुनरुच्चारण केले. तसेच या संबंधी पुढच्या कार्याची दिशा ठरवण्यासाठी पावले टाकण्यात आली.

AAGC (आशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर) म्हणजे आशिया आफ्रिका विकास परिक्षेत्र ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मे 2017 रोजी गुजरातमध्ये सुरू असलेल्या आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकच्या बैठकीत मांडली होती. तसा या कल्पनेचा उगम 2016 मधील शिंझो अ‍ॅबे व पंतप्रधान मोदी यांच्या भेटीदरम्यान झाला. भारत व जपानच्या सहकार्यातून आफ्रिकेमध्ये चांगल्या प्रतीच्या पायाभूत सुविधा, दळणवळण व संपर्काच्या साधनांचा विकास हे याद्वारे साध्य होईल. तसेच याद्वारे दक्षिणपूर्व आशिया व आफ्रिका खंड एकमेकांना जोडले जाऊन एक खुले व मुक्त हिंदी-पॅसिफिक क्षेत्र तयार होण्यास मदत होईल. या प्रकल्पांतर्गत चार मुख्य घटक येतात, ते म्हणजे विकास व सहकार्य प्रकल्प, चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा व संपर्कसाधने, क्षमता व कौशल्य वृद्धी तसेच जनभागीदारी. या प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. ही झाली AAGC ची अगदी थोडक्यात ओळख. अर्थात याहून आणखी बर्‍याच गोष्टी या प्रकल्पात अंतर्भूत आहेत. हा प्रकल्प मुख्यतः सागरी दळणवळणावर अवलंबून आहे.

या प्रकल्पाकडे चीनच्या बेल्ट अँड रॉड इनिशिएटिव्ह ला पर्याय म्हणून पाहिले जात आहे. सुमात्रा व मलेशिया या दोन देशांच्या मधून जाणार्‍या मलाक्काच्या सामुद्रधुनीतून सध्या चिनचा 80टक्क्यांपेक्षा जास्त व्यापार चालतो. जर काही कारणास्तव ही सामुद्रधुनी बंद करण्यात आली तर चीनच्या अर्थव्यवस्थेला याचा खूप मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून BRI चा खटाटोप चीन करत आहे. भारत व जपान दोघेही चीनच्या या प्रकल्पात सहभागी नाही. व या दोन राष्ट्रांनी आता BRI ला तोडीस तोड देणारा AAGC प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे चीनची चिडचीड चालली आहे.

या प्रकल्पाद्वारे भारत व जपान दक्षिणपूर्व व पूर्व आशिया व आफ्रिका यांना विकास व संपर्काच्या मुख्य प्रवाहात आणण्यास यामुळे यशस्वी ठरतील. मोठे मोठे प्रकल्प पार पाडण्यात जपानची असलेली हातोटी व या क्षेत्रातील अनुभव या सर्वात खूप मोलाचा ठरणार आहे. जपान व भारत या दवशातील अनेक देशांच्या विश्‍वासास पात्र आहेत. तसेच चिनसारख्या केवळ एलच बलाढ्य गुंतवणूकदारावर अवलंबून राहण्यापेक्षा भारत व जपानचा प्रस्ताव या देशांसाठी चांगला पर्याय असेल. केवळ पायाभूत सुविधांचा विकास हीच या देशांसाठी जमेची बाजू नाही तर भारत व जपानचा या प्रकल्पामागील हेतू व दृष्टिकोन सुद्धा महत्वाचा आहे. या प्रदेशातील गुंतवणूक ही अनेक देशांना चीनसारखी आक्रमक न वाटता विश्‍वासार्ह वाटते आहे. जपानकडे कुशल तंत्रज्ञान व गुंतवणुकीसाठी भांडवल आहे. याबरोबरच भारताचा मोठा भूभाग व आर्थिक विकासाच्या क्षेत्रात काम केल्याचा अनुभव याला पूरक आहे. तसेच दक्षिणपूर्व आशियातील बहुतांश देशांशी भारताचे अनेक वर्षांपासूनचे सांस्कृतिक संबंध असल्याने या देशांतील भारताच्या चांगल्या प्रतिमेचा प्रकल्पासाठी उपयोग होतो आहे.

आफ्रिकेतील देशांचे आतापर्यंत वसाहतवादामुळे खूप शोषण झाले आहे. वसाहतवाद व साम्राज्यवादाच्या अस्तानंतर सुद्धा आफ्रिकेच्या विकासाकडे म्हणावे तेवढे लक्ष देण्यात आले नाही. जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येणार्‍या चीननेसुद्धा आफ्रिकेच्या विकासाकरिता योग्य धोरण घेतले नाही. परंतु AAGC ने आफ्रिकेबद्दल नवा कार्यक्रम हाती घेतला आहे. आफ्रिकन देशांना AAGC केवळ सहकारी म्हणून पाहत नाही तर समान भागीदार म्हणून दर्जा देतो. या प्रकल्पाच्या दिशादर्शक सूत्रांमध्ये विकास प्रकल्पांसाठी आफ्रिकेतील इतर वैचारिक गटांचा व इतर संस्थांच्या सोबत अभ्यास करणे, व स्थानिक सामाजिक व आर्थिक क्षेत्रात योगदान देणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

या सर्वांमुळे सध्या आशिया आफ्रिका विकास परिक्षेत्र हे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह याला पर्याय व टक्कर देणारे वाटत असले तरी या प्रकल्पाच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. जरी या प्रकल्पात कुठे उल्लेख नसला तरी परराष्ट्र धोरणामध्ये लष्करी ताकदीचे महत्त्व आहे. जपानच्या संविधानानुसार जपानला सैन्य ठेवण्यावर व इतर देशांतील लष्करी सहभागावर काही बंधने आहेत. भारत सुद्धा चीनच्या तुलनेत लष्करीदृष्ट्या मागे पडतो. भारतातील शिक्षण कमी असणार्‍या लोकसंख्येचे प्रमाणदेखील कमी आहे. चीन जेवढा पैसे ओतू शकतो तेवढा भारत व जपान ओतू शकत नाहीत. या सर्व अडचणी असल्या तरी आशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यातून नक्कीच मार्ग काढेल.

लेखक : – – वैभवी घरोटे
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *