मृत्युंजय… शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा स्नेहबंध!

‘अनिवार्य नियतीचं गरगर फिरणं, जीवानं हिमालयाएवढ्या महान संयमानं सहन करीत जगायचं असतं. आणि तेही हसत हसत!’ हेच कर्ण सांगतो आहे. जो जो कोणी जीवनात कुठं ना कुठं एकदा तरी पिचला असेल त्यालाच कर्णाच्या जीवनाचं हे मर्म प्रकर्षानं जाणवेल. इतकंच काय पण जो कोणी जीवनात कधीही पिचला नसेल त्यालाही पिचण्यात काय जीवन असतं हे कर्णाकडं पाहिल्यानंतरच कळेल! कर्णाचा अबोला हाच महाभारतातील सर्वात सुंदर असा बोलका नि विलोभनीय संदेश आहे. त्याच्या यातनामय, वंचित आणि उपेक्षित मनाचे कंगोरे हे पांडवांच्या विजयाचे डांगोरेही ठायी ठायी फिके पाडतात! मृत्यूच्या महाद्वारातसुद्धा जीवनाचा एवढा धुंद विजय एकट्या अणि एकट्या कर्णानंच अनुभवला आहे! म्हणूनच त्याच्या या भावकथेचं नावही ‘मृत्युंजय’!

अशा भावविभोर आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनंही अत्यंत थोर असणाऱ्या भाषेतील साहित्यकृती म्हणजे शिवाजीराव सावंत यांची ‘मृत्युंजय’.

1963 मध्ये शिवाजीरावांनी दीर्घ चिंतन, मनन, वाचनानंतर प्रत्यक्ष ‘मृत्युंजय’ ही कादंबरी लिहायला घेतली. त्यावेळी ते सत्यवादी प्रेसशेजारी आणि सी. पी. आर. हॉस्पिटलच्या पिछाडीस असलेल्या पोलिस क्वार्टर्समध्ये थोरले बंधू विश्वासराव यांच्यासोबत दोन खोल्यांच्या बैठ्या चाळीत 12 नंबरच्या खोलीत राहात होते. ते काय लिहित होते हे त्यांचे थोरले बंधू विश्वासरावांखेरीज कुणालाच माहीत नव्हतं.

एके दिवशी शाळा सुटल्यानंतर त्यांचे सहशिक्षक पण वयानं ज्येष्ठ असलेले स्नेही, मित्र आर्. के. कुलकर्णी यांच्याबरोबर ते फिरायला बाहेर पडले.  ऐतिहासिक बिंदू चौकातल्या दत्त कॅफेमधील झणझणीत कोल्हापुरी मिसळ दोघांनी खाल्ली. जाताजाता मनातलं गूज शिवाजीराव आपल्या मित्राला – गदिमांच्या शब्दातील ‘आर्क्यां’ना सांगू लागले….

‘आर्. के. बरेच दिवस एक विषय मनात घर करून बसलाय. एक लिखाण मनात घोळतंय. थोडंफार लिहून झालंय.’

‘कुठला विषय?’

‘महाभारतातला आहे – कर्णाचा.’

‘कर्ण! फार महत्त्वाचा नायक आहे तो. काय लिहिताय? काव्य की नाटक?’

‘नाही. कादंबरी. आपण जरा निवांत बसू या. जे बांधून झालंय ते वाचून दाखवावं म्हणतो.’

आपल्या मित्राची ही काहीतरी वेगळीच साहित्यिक भट्टी जमून येत असल्याचं आर्क्यांना जाणवलं. दोघंही पोलीस वसाहतीतल्या खोलीवर आले आणि शिवाजीरावांनी लिखाणाची फाईल हातात घेऊन वाचायला सुरुवात केली. एखादा परिच्छेद वाचला असेल तोच आर. के. आश्चर्यानं जवळजवळ किंचाळत म्हणाले, ‘पुन्हा पुन्हा तो परिच्छेद वाचा बरं. दुर्योधनाचा अस्सल राजपीळ तुम्ही छान पकडलाय, राजे’ अशी दाद देत त्या दिवसापासून आर्. के. शिवाजीरावांना ‘राजे’ म्हणू लागले. मग शिवाजीरावांना ओळखणारं सगळं गणगोतच त्यांना आदरानं ‘राजे’ म्हणून संबोधू लागलं. त्यानंतर कोल्हापुरातील भाऊसिंगजी रस्त्यावरच्या टाऊन हॉल बागेत आर्. के. आणि शिवाजीरावांची वाचनाची बैठक अधून-मधून आकार घेऊ लागली. त्या निसर्गरम्य वातावरणात पक्षांचा किलबिलाट, वटवाघळांचा फडफडाट सुरू असताना सुरू आणि रायवळ आंब्यांच्या उंच झाडांच्या सावलीत बसून ‘मृत्युंजय’चे आकाराला आलेले मुखडे शिवाजीराव आपल्या मित्रासमोर सहर्षपणे सादर करीत होते. त्या दिवसांमध्ये रमणारे शिवाजीराव आपल्या एका लेखात लिहितात, ‘मृत्युंजय’ची शाई सुकण्याअगोदरचा शब्द न् शब्द आर्. के.नी ऐकला आहे. मला तेच केवढ्यातरी अमाप विश्वासानं ठासून म्हणायचे, ‘राजे, हे पुस्तक धरणार. आपली पैज.’ एका वेगळ्याच भावतंद्रीत आम्ही मग पंचगंगा पुलाचा परिसर जवळ करायचो. सूर्य डुबायला झालेला असायचा. त्याच्या भगव्या, केशरी किरणांसह झगझगत्या गोलाकाराचं प्रतिबिंब पंचगंगेच्या पात्रात उतरलेलं असायचं. ते पाहताना माझ्या तोंडून अस्फुट शब्द निघायचे, ‘ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं…’ आर्.के. कुतूहलानं विचारायचे ‘राजे, कसला विचार करताय?’

‘ताडून बघतोय. हे इथं एवढं अप्रूप दिसतंय, मग साक्षात गंगेकाठी हस्तिनापुरात कसा दिसत असेल सूर्योदय आणि सूर्यप्रयाण? पंत, एकदा तो सगळाच परिसर डोळ्यानं बघायला पाहिजे. मग पुढचं लिखाण आणि लिहून झालेल्यावर हात फिरवायला पाहिजे. पण,…

शिवाजीरावांच्या या ‘पण’मध्ये अनेक प्रश्नचिन्हं सामावलेली होती. आर्. कें. नी ती ताडली.

एवढ्या लांब काही दिवस जायचे म्हणजे प्रवासाचा, राहण्या-जेवणाचा खर्च येणार. एवढासा तुटपुंजा पगार आणि त्या मानानं करावा लागणारा खर्च बराच मोठा होता. हे एवढे पैसे कसे उभे करायचे? हा एक प्रश्न. पण त्याहीपेक्षा मोठी समस्या म्हणजे, नव्यानंच नोकरी लागलेली असताना सरकारी शाळेत एवढी रजा कशी मिळणार?

आर्. के. हे शिक्षणखात्यात वयानं, अनुभवानं, शिवाजीरावांपेक्षा मुरलेले अन् थोरले होते. रजा आणि पैसा दोन्हींची जोडणी करण्याचं या दोघा मित्रांनी ठरवलं. रजेचा प्रश्न प्रशासकीय चातुर्याशिवाय सुटणार नव्हता. दोघंही सिव्हिल सर्जन डॉ. पाथरकरांच्या सरकारी बंगल्यावर पोहोचले. साहित्य, संगीताचे रसिक असलेल्या डॉ. पाथरकरांना या दोघांनी ही ‘ऑपरेशन कुरुक्षेत्र’ मोहीम सत्य स्वरूपात समजावून सांगितली. डॉ. पाथरकरांनी या एका खास साहित्यिक कारणासाठी शिवाजीरावांना आजारी पाडलं. त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्रही दिलं.

आजारपणाच्या खोट्या रजा, खोटी कारणं, खोटी औषधबिलं सादर करून टक्केवारीवर सरकारकडून पैसे उकळण्याचा धंदा हल्ली बऱ्याच सरकारी आस्थापनांमधून दिवसा ढवळ्या ढळढळीतपणे बरकतीमध्ये आलेला आपण पाहतोच. या पार्श्वभूमीवर कोणतीही प्रशासकीय आडकाठी न आणता किंवा खऱ्या कामासाठी खोटी रजा देताना एका पैचीही अपेक्षा न करता डॉ. पाथरकरांनी दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रामुळं शिवाजीराव कुरुक्षेत्री जाऊ शकले. चांगल्या कामासाठी कायद्याची पळवाट वापरणारे अधिकारी मृत्युंजयसारख्या एका विश्वविजयी साहित्यकृतीला कसा हातभार लावू शकतात हे डोळ्यासमोर आणणारं एक झणझणीत अपवादात्मक प्रशासकीय उदाहरण म्हणून याकडं पहावं लागेल.

रजा मंजूर झाली होती. पण खिशात फक्त 50 रु. एवढ्याच गिन्न्या होत्या. (पैशाला शिवाजीराव नेहमी ‘गिन्न्या’ म्हणत.) कुरुक्षेत्रासह उत्तर भारताचा टापू फिरायचा म्हणजे गिन्न्या बऱ्याच लागणार.

रंकाळ्याकाठची भेळ खाता खाता मग आर्. के. आणि शिवाजीरावांमध्ये गिन्न्या जमवण्याच्या  मोहिमेची आखणी सुरू झाली.

प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आणि देव-देश-धर्माशी निष्ठा ठेवून हयातभर जीवनप्रवास करणारे बाबा तथा भालजी पेंढारकर यांना जयप्रभा स्टुडिओत भेटून मोहिमेचा मनसुबा त्यांच्या कानी घालण्याचं ठरलं. बाबांचा आशीर्वाद आणि मिळाली तर मदत घेऊन मग बाकीच्यांना भेटण्याचं निश्चित झालं. अपेक्षेप्रमाणं बाबांनी 125 रुपयांचा चेक देऊन या मोहिमेची भवानी केली आणि अवघ्या 8 दिवसातच 1800 रुपयांचा निधी जमला. त्यावेळी तो या खर्चासाठी पुरणारा होता. दोन  महिन्यांची रजा मंजूर झाली होती. आवश्यक तेवढ्या  सामानासह शिवाजीरावांनी बॅग भरली. जोडीला एक छोटेखानी कॅमेरा घेतला. अंबाबाईचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी ते एस. टी. स्टँडवर आले तर फुलांचा हार घेऊन आर्. के. तिथं हजर. भरल्या गर्दीत त्यांनी आपल्या मित्राच्या गळ्यात हार घालून त्याला शुभेच्छा दिल्या. मृत्युंजय प्रकाशित होण्यापूर्वीचा हा अनोखा सत्कार शिवाजीरावांना अनुभवायला मिळाला. साक्षात देवीनंच आपल्याला शकुनाचा उजवा कौल दिल्याची भावना मनी धरून शिवाजीराव मार्गस्थ झाले.

कोल्हापूरहून ते मुंबईला पोचले. ‘प्रबोधन’कार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मधुकरराव चौधरी यांच्या त्यांनी भेटीगाठी आणि आशीर्वाद घेतले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांनीही दिल्लीत असलेल्या यशवंतराव चव्हाणांना दिल्ली/कुरुक्षेत्रामधील परिचितांची माहिती शिवाजीरावांना देण्याबाबत पत्र लिहिले होते. दिल्लीतील वास्तव्यासाठी आणि मुलाखतींसाठी आवश्यक ती पत्रं मिळाली. मूळचे पुणेकर असलेल्या बंडोपंत सरपोतदार यांच्या दिल्लीतील करोलबागेतील पूना गेस्ट हाऊसमध्ये शिवाजीराव पोचले. ‘रश्मिरथी’ हे कर्णावर प्रसिद्ध खंडकाव्य लिहिणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त महाकवी दिनकरजींची दिल्लीत भेट झाली. प्राचीन ग्रंथांचे अभ्यासक आणि हिंदीतील लेखक दशरथ ओझा, भवानी शंकर द्विवेदी, संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु मंडनमिश्र, भारतीय पुराणवस्तु संशोधन खात्याचे डे. डायरेक्टर एम्. एन्. देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, दिल्लीचे महापौर लाला हंसराज गुप्ता यांच्या झालेल्या भेटी आणि आपल्या लेखनविषयाबाबत त्यांच्याशी झालेल्या चर्चा शिवाजीरावांना खूप उपयोगी पडल्या. ‘हिंदुस्थान समाचार’चे संपादक बापूराव लेले या मूळच्या पुणेकर सद्गृहस्थांनी या कामी त्यांना पुढाकार घेऊन मदत केली.

सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या सांगण्यावरून दिल्लीच्या महापौरांनी कुरुक्षेत्रावरील गीता हायस्कूलचे मुख्याध्यापक विश्वनाथ बाबू भल्ला यांना एक पत्र दिलं होतं. त्यानुसार त्यांनी शिवाजीरावांना महिनाभर आपल्या घरीच प्रेमानं ठेवून घेतलं. शिवाजीरावांना त्यांचा फार मोठा प्रेमळ सहवास लाभला. कुरुक्षेत्रावरील महिन्याभराच्या या मुक्कामात त्यांनी विश्वनाथबाबू आणि  डॉ. बुद्धप्रकाशजींच्या मदतीनं अनेक ठिकाणी भेटी दिल्या, बुजुर्गांच्या मुलाखती घेतल्या. शंकानिरसन करून घेतलं, उपलब्ध संदर्भ तपासून पाहिले, महाभारताबाबत त्या परिसरातील लोककथांची माहिती घेतली.

परत येताना गोकुळ, वृंदावन, मथुरा इथंही त्यांनी भेटी देऊन आवश्यक ती छायाचित्रं काढली. दोन महिन्यांचा हा प्रवास आणि प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर राहून केलेला अभ्यास, त्या अगोदर वर्षानुवर्षे केलेलं वाचन आणि चिंतन, जाणत्या लोकांशी घडलेल्या चर्चा हे सगळं संचित बरोबर घेऊन कोल्हापुरात परतलेले शिवाजीराव कर्णकथेनं अक्षरशः ओथंबलेले होते. विचारांचा अन् ते कागदावर उतरवण्याचा आवेग त्यांना अजिबात स्वस्थ बसू देत नव्हता. ‘कोल्हापूर ते कुरुक्षेत्र’ या नावानं त्यांनी आपल्या मोहिमेचं सचित्र वर्णन लिहिलं आणि ते साप्ताहिक ‘स्वराज्य’मध्ये प्रसिद्ध झालं. पूर्णपणे  लेखनामध्ये गुंतलेल्या शिवाजीरावांची आता रात्रंदिवस  ‘कर्णसमाधी’ लागली होती. त्या मंतरलेल्या वातावरणातच ‘मृत्युंजय’चं दीड हजार पानांचं भरगच्च हस्तलिखित साकार झालं होतं. लक्ष्मीपुरी पोलिस क्वार्टर्समधल्या दोन खोल्यांमध्ये अवघ्या भारतवर्षाला मार्गदर्शक ठरणाऱ्या हजारो वर्षापूर्वीच्या महाभारत नामक एका उत्कट पर्वावरील चिंतन एका मराठमोळ्या लेखकानं त्या पोलिसी वातावरणात राहून लिहून काढलं – प्रतिभेची ही अफाट करामत म्हणावी लागेल. ज्या वयात स्वतः केलेल्या – न केलेल्या कर्तृत्वाचं परिचयपत्रही बहुसंख्य तरुण तरुणींना लिहिता येणार नाही अशा वयात टंकलेखन शिकवणाऱ्या एका शिक्षकानं ज्ञानेश्वरांचा वारसा जाणून, स्वराज्याचं तोरण 16 व्या वर्षीच बांधणाऱ्या साक्षात छत्रपतींचंच नाव आपल्या मात्यापित्यांनी दिलंय याची जाणीव ठेवून, वयाच्या 23 व्या वर्षीच ‘मृत्युंजय’ लिहायला घेतली आणि हातावेगळी केली. हा मराठी अर्वाचीन साहित्यलेखनामधील चमत्कारच म्हणावा लागेल. आर. के. कुलकर्णी यांच्यासह अनेक मित्रांसमोर शिवाजीरावांनी आपल्या या हस्तलिखिताचं वाचन सादर केलं. झपाटलेल्या शिवाजीरावांच्या कर्णकथेनं त्यांच्या मित्रांचा गोतावळाही पुरता झपाटून गेला. कोल्हापुरातले ते मृत्युंजयच्या बांधणीचे दिवस अक्षरशः मंतरलेले होते.

‘मृत्युंजय’चं हस्तलिखित तयार होतं. आता प्रश्न होता तो प्रकाशनाचा. कोल्हापुरातून हा एवढा मोठा ग्रंथ प्रकाशित करण्याची कुणाची तयारी नाही हे लक्षात आल्यावर आर्. के. कुलकर्णी आणि शिवाजीरावांनी 1967 च्या मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणं गाठलं. बरोबर लिखाणाच्या फायली घेतल्या.

‘साप्ताहिक स्वराज्य’मधील लेखनामुळं शिवाजीरावांचा संपादक मो. स. साठे यांच्याशी पत्रपरिचय होता. त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन या दोघांनी या प्रकाशनाची योजना त्यांच्या कानावर घातली. आवश्यक तेवढा कागदी हिशेब त्यांनी केला. 45 वर्षांपूर्वी असलेले दर पाहून त्यांनी तक्ता मांडला आणि ‘मृत्युंजय’च्या प्रकाशनाला कमीत कमी 25 हजार रु. खर्च येईल असं सांगितलं. हा खर्च ऐकून या दोघांची छातीच दडपून गेली. पुढं काय या विचारात शनिवारवाड्याजवळच्या एका उडपी हॉटेलात दोघांनी बैठक मारली. तेवढ्यात आर्. के. ना अचानक त्यांच्या 12 वर्षांपूर्वीच्या ऋणानुबंधाची, ग. दि. माडगूळकर उर्फ अण्णांची आठवण झाली. एका प्लेटमध्ये भजी खाण्याएवढा त्या दोघांचा दोस्ताना होता. नेमक्या अशा अडचणीच्या क्षणी आर. कें. ना अण्णांच्या मैत्रीचा आधार वाटला. शिवाजीरावांसह हस्तलिखित बरोबर घेऊन आर. के. अण्णांच्या पंचवटीत दाखल झाले. बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या मित्राची विचारपूस झाली. आर. कें. नी शिवाजीरावांची आणि त्यांच्या कर्णकथेची ओळख करून दिली. चहा-पाणी झालं. पानासाठी सुपारी कातरत कातरत अण्णांनी त्यांच्या दोस्तीतल्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या अनंतराव कुलकर्णी यांना फोन जोडला. पान खात खातच अण्णांनी अनंतरावांना ‘हे स्थळ स्वीकारावंच’ असं सुचवलं. ‘दोघा कोल्हापूरकरांना आपल्याकडं पाठवून द्यावं’, असं अनंतरावांनी सांगितलं.

आर्. के. आणि शिवाजीराव कॉण्टिनेण्टलमध्ये दाखल झाले. मायन्याचं बोलणं आणि चहापाणी झाल्यावर ती कर्णकथा शिवाजीरावांनी अनंतरावांच्या हाती सोपवली अन् अचानक अनपेक्षितपणे ते बोलून गेले –

‘ही कथा वाचकांना जचली नाही तर पुन्हा लेखणी नाही धरणार हाती.’

अनंतरावांच्या कपाळी पडलेली उभी आठी पाहून मुद्राभ्यासाच्या आधारे शिवाजीरावांनी मनोमन ताडलं की, ‘आता कर्ण पुण्यात दाखल झालाय आणि तो स्थिरावणार हे नक्की.’

त्यांचा निरोप घेऊन त्यांनी आर. के. ना कोल्हापूरची गाडी धरण्यापूर्वी गळ घालून आळंदीला नेलं. ज्ञानेश्वरांच्या समाधीवर माथा टेकून शिवाजीरावांनी आपल्या अब्द अब्द शब्दांना मोकळं करून टाकलं, अबोलपणे.

हस्तलिखिताच्या फायली शिवाजीराव कोल्हापूरहून पाठवत होते अन् भारावलेल्या अनंतरावांची पत्रं त्यांना येत होती. पुस्तकातील रेखाचित्रं मुंबईस्थित प्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल हे साकारणार होते. कोल्हापुरात राहूनही शिवाजीरावांचं छपाईची तयारी, चित्रं या साऱ्यावर बारकाईनं लक्ष होतं. पुस्तकाच्या बाबतीत त्यांची पहिलटकरणीसारखी अवस्था झाली होती. अनंतरावांचा उत्साह त्यांची उमेद वाढवीत होता.

…. आणि 1967 च्या गणेशचतुर्थीला अगदी घरगुती पद्धतीनं अनंतरावांच्या ‘शारदा प्रसाद’ या निवासस्थानी ग. दि. माडगूळकरांच्या ‘रामायणी’ हातानं ‘मृत्युंजय’चं पूजन झालं. भारलेलं वातावरण होतं ते.

कुठंही प्रकाशनाचा गाजावाजा नव्हता की, जाहिरातबाजी नव्हती. गळ घालून आणलेल्या फोटोग्राफर आणि बातमीदारांची गर्दी नव्हती की, थेट संपादकांना, समीक्षकांना हाताशी धरून आपली पुस्तकं गाजवण्याचे ते कृत्रिम ‘समृद्ध’ दिवस नव्हते.

कर्णकथा आता केवळ शिवाजीरावांची राहिली नाही. आता ती समस्त भारतीयांची झाली. एका तरुण भारतीयानं साकारलेली महाभारतावरची ही अनोखी साहित्यकृती उभ्या भारतवर्षाच्या कौतुकाचा विषय बनली. ना तिला तेव्हा प्रसिद्धी माध्यमांचा आधार लाभला ना समीक्षकांच्या चतुर अभिप्रायांची फूटपट्टी.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याही लाखा लाखांच्या सभेच्या बातम्या (फोटो तर दूरच) एका ओळीनंही छापायच्या नाहीत अशी दुर्लक्षून वगळण्याची संपादकीय प्रतिभा आजच्याच वर्तमानपत्रांमधून फुलली आहे असं समजण्याचं कारण नाही, ती त्यावेळीही तेवढीच समृद्ध होती. त्यामुळंच ‘मृत्युंजय’चा कुठंच गाजावाजा झाला नाही. पण वाचकांनीच या कर्णकथेला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आणि गणेशोत्सवातल्या मिरवणुकीप्रमाणं गल्लोगल्ली, घरोघरी मृत्युंजयचं दर्शन होऊ लागलं. तीन हजार प्रतींची पहिली आवृत्ती अवघ्या साडेतीन महिन्यात संपली. वाचकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. लोकप्रियता आणि लोकमान्यतेच्या कसोटीवर ‘मृत्युंजय’नं पहिल्याच डावात कुस्ती जिंकली होती.

‘मृत्युंजय’ प्रकाशित झालेल्या वर्षीच तिला महाराष्ट्र शासनाचा वाङ्मयविषयक पुरस्कार जाहीर झाला. शिवाजीरावांना महाराष्ट्राच्या चहूमुलखातून अभिनंदनाची आणि कौतुकाची पत्रं येत होती. त्यांचे सत्कार होऊ लागले होते. प्रकाशक अथवा लेखकाकडून कोणत्याच प्रकारचा बोलबाला न होता, जाहिरातही प्रसिद्ध न करता वाचकांनीच  उत्स्फूर्तपणे ही कादंबरी अक्षरशः डोक्यावर घेतली, यातच शिवाजीरावांच्या लेखणीचं सामर्थ्य दिसून येतं.

शिवाजीरावांचं लेखन, त्यांचा पत्रव्यवहार, त्यांच्या मुलाखती, त्यांनी वेळोवेळी केलेलं प्रासंगिक लेखन, दिवाळी विशेषांकांमधील लेखन हे सगळं मी स्वतः गेली 15-20 वर्षे अभ्यासतो आहे. शिवाजीरावांच्या निधनानंतर 10 वर्षांपर्यंत या सगळ्या अभ्यासाचे पुरावे हाती आल्यावरच मग मी ‘मृत्युंजयकार’ हे त्यांचं आठवणीवजा चरित्र लिहिलं, ज्यात प्रामुख्यानं त्यांच्या साहित्यकृतींच्या तितक्याच रोमांचक जन्मकथा आहेत.

पण अलिकडंच आणखी एक पुरावा हाती आला. बरोबर 50 वर्षांपूर्वीचा. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील स्नेहसंबंधाचाच हा मोरावळा. शिवाजीराव हे आजऱ्याच्या व्यंकटराव हायस्कूलचे विद्यार्थी. शाळकरी वयात केलेल्या एकांकिकेतील भूमिकेमुळं शिवाजीरावांच्या मनात कर्णकथेचं बीज पक्कं रुजलं होतं.

शिवाजीरावांचं ‘मृत्युंजय’चं हस्तलिखित तयार झालं होतं, या लेखात पूर्वीच याचा उल्लेख आला आहे. अगोदर प्रकाशनाचा खर्च आपणच करावा यासाठी शिवाजीरावांची तयारी सुरू होती. आपल्या शाळेच्या विद्यार्थ्याचा हा सारा पराक्रम पाहून व्यंकटरावच्या शिक्षकांनीही या प्रकाशन खर्चाला हातभार लावायचं ठरवलं. तुटपुंज्या पगारातून किती मदत उभी राहणार? म्हणून या शिक्षकांनीच बाळ कोल्हटकर लिखित ‘दुरितांचे तिमिर जावो’ हे तीन अंकी सामाजिक नाटक सादर करायचं ठरवलं. शिक्षकांनी आणि काही मराठी चित्रपट कलावंतांनी त्यात भूमिका करायच्या असं निश्चित झालं. खुर्चीसाठी 7, 5, 3 आणि 2 रु. असं तिकीट तर महिलांसाठी 1 रु. असे तिकीट दर होते. याबाबत एक जाहीर निवेदन छापून वाटण्यात आलं.

तसंच व्यंकटराव हायस्कूलचे मुख्याध्यापक एस्. व्ही. पाटील यांनी या उपक्रमाला तालुक्यातील इतर शिक्षण संस्थांनीही हातभार लावावा यासाठी पत्रव्यवहार केला. उत्तूर येथील आंतरभारती शिक्षण मंडळाचे संस्थापक, सचिव श्री. अनंतराव आजगावकर (ज्यांना शैक्षणिक योगदानाबद्दलचा ‘फाय फाऊंडेशन’ पुरस्कार मिळाला आहे) यांना पाटील यांनी 29 एप्रिल 1967 रोजी व्यक्तिगत पत्र लिहून या नाट्यप्रयोगाची तिकिटं घेण्याबाबत विनंती केली.

‘मृत्युंजय’ या ख्यातनाम साहित्यकृतीचं यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू आहे. एखाद्या जनप्रिय साहित्यकृतीचा इतिहासही किती रोचक असू शकतो, याचं हे संस्मरणीय उदाहरण!

लेखक : डॉ. सागर देशपांडे
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *