… आणखी एक उपेक्षित शिक्षणयोगी!

          ‘पूर्वकाळचे महाप्रबुद्ध ऋषिजन हे अरण्यवास पत्करून विद्यासंपन्न होत आणि विद्यादान करीत. त्यांनी आपल्या देशात अपूर्व ज्ञानभांडारे भरून ठेवली आहेत. ती इतकी तुडुंब आणि ओतप्रोत आहेत की ती नुसती चाळायला सबंध जन्म पुरायचा नाही. त्या ऋषींचे आपण वंशज म्हणवतो. मग विद्याभास अन् विद्यादान करण्याची आपणास का लाज वाटावी? विद्या शिकून तुम्हाला कारकून किंवा अंमलदार व्हावेसे वाटते. शिक्षकाचा व्यवसाय लोक हलका मानतात. पण तसे नाही. प्रजा मूढ आहे, म्हणून सरकारी नोकराचे महत्त्व. विद्याप्रसार जसजसा होत जाईल तसतसे सरकारी नोकरांचे ढोंगसोंग आणि थाटमाट नाहीसा होईल. प्रजा शहाणी आणि  समजूतदार झाली म्हणजे कारकुनीला कोण विचारतो? म्हणून विद्याभिलाषी व्हा. विद्याभ्यास करा. लोकांना सुशिक्षण द्या. सरकार व प्रजा, धनी व चाकर, आईबाप व पुत्र ह्यांच्यामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा, स्वदेशाभिमान आणि स्वधर्माभिमान लोकांच्या मनात उपजावा, असा प्रयत्न करा. हेच आपले ऋषीवंशजांचे कर्तव्य, गुरू दसपट ज्ञानी असेल तर तो एकपट ज्ञान शिष्यास देऊ शकेल. शंभरपट ज्ञानी असेल तर तो शिष्यास दसपट ज्ञान देईल. म्हणून जास्तीत जास्त विद्यासंपन्न व्हा.’

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी एकदा शिक्षकांना केलेल्या उपदेशाचा हा सारांश आहे.  मराठी पत्रकारितेचे आद्य जनक म्हणून बाळशास्त्रींची ओळख आहे. पण त्याच्याही पूर्वीपासून बाळशास्त्रींची वाटचाल ही एखाद्या ऋषिंसारखीच असल्याचं दिसून येईल.

कोकणातील पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) इथं 1812 साली त्यांचा जन्म झाला. एका व्युत्पन्न पुराणिकाचा हा चिरंजीव. अवघ्या 12-13 व्या वर्षांपर्यंत घरातूनच त्यांचं संस्कृत आणि मराठीचं अध्ययन पूर्ण झालं होतं. इंग्रजी शिकण्यासाठी ते  मुंबईत आले. अवघ्या 2/3 वर्षांतच एखाद्या पदवीधर तरुणानं आश्चर्य करावं इतकं इंग्रजी भाषेचं ज्ञान त्यांनी संपादित केलं. शाळकरी विद्यार्थी असतानाच ते गणिताचं अध्यापन करू लागले. ‘नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या सेक्रेटरी पदासाठी त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी अस्खलित इंग्रजीमध्ये अर्ज केला होता. त्या अर्जामध्ये बाळशास्त्रींनी त्यांना संस्कृत, मराठी, इंग्रजी, भूगोल, गुजराती, बंगाली, फार्सी आणि उच्च गणित हे विषय येत असल्याचं नमूद केलं होतं. त्या अर्जानुसार पहिल्यांदा त्यांना डेप्युटी सेक्रेटरी म्हणून आणि नंतर सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आलं होतं. इतक्या लहान वयात एवढा मोठा बहुमान मिळवणारे ते पहिले महाराष्ट्रीयन विद्वान ठरले.

तो काळ ब्रिटिशांच्या प्रशासनाचा होता. तरुण वयातल्या बाळशास्त्रींना सरकारनं अक्कलकोटच्या अल्पवयीन युवराजांचे शिक्षक म्हणून नेमलं. तिथे त्यांनी कानडी भाषा शिकून घेतली. याच सुमारास मुंबईचे पहिले गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचे स्मारक म्हणून त्यांच्या नावे मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेज सुरू झालं. तिथं अध्यापनासाठी मुद्दाम इंग्लंडमधील विद्वान प्राध्यापकांना बोलावण्यात आलं. तिथे बाळशास्त्री पहिले भारतीय प्रोफेसर ठरले. याच दरम्यान दोन वर्षे इंग्लंडला रजेवर गेलेल्या मुख्य प्राध्यापकाच्या जागी त्यांची नियुक्ती झाली. सुमारे दहा वर्षे त्यांनी या महाविद्यालयात अध्यापन केलं. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे पितामह म्हणून ज्यांचा सार्थ उल्लेख केला जातो असे दादाभाई नौरोजी आणि प्रख्यात गणितज्ज्ञ प्रा. केरुनाना छत्रे हे दोघंही बाळशास्त्र्यांचे विद्यार्थी होते. एवढ्यावरूनही शास्त्रांच्या विद्वत्तेची कल्पना येऊ शकते.

त्यानंतर शिक्षण विभागाचे संचालक आणि मुंबई इलाख्यातील मराठी शाळांचे इन्स्पेक्टर म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांची नेमणूक केली. बाळशास्त्र्यांनी त्या काळात मुंबई इलाख्यात शाळा-महाविद्यालये आणि शिक्षणाची अन्य साधने नसतानाही आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळं भारतीय शिक्षणाचा पाया घातला हे म्हणणं वावगं ठरू नये. मुद्रणकला नुकतीच भारतात आली होती. पण अजून विषयवार पाठ्यपुस्तकं तयार होत नव्हती. ते काम बाळशास्त्र्यांनी जवळजवळ एकहाती पूर्ण केलं. इतिहास, भूगोल, व्याकरण, नीतीशास्त्र, छंदशास्त्र, गणित या विषयांमधली  मराठीतली सुरुवातीची पाठ्यपुस्तकं त्यांनी तयार केली. वाङ्मय आणि विज्ञान या दोन्ही विद्याशाखांवर त्यांचं प्रभुत्व होतं. गणित आणि ज्योतिषशास्त्र या विषयातील त्यांचा अधिकारही फार मोठा होता. शून्योपलब्धि (Differentional Calculus) या विषयावर त्यांनी मराठीत पहिलं पुस्तक लिहिलं. भारतीय शिलालेख आणि ताम्रपटांचं संशोधन करून त्यांनी त्यासंबंधी अभ्यासपूर्ण निबंध लिहिले. पण त्यांचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं संशोधन म्हणजे 1767 मध्ये त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ची पाठभेदांसह संपादित पोथी तयार करून ती छापून प्रसिद्ध केली. बहुजनांच्या हातात त्यामुळं छापील स्वरूपात पहिल्यांदा ‘ज्ञानेश्वरी’ आली. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी म्हणजे 1832 मध्ये त्यांनी मराठीतील पहिलं वृत्तपत्र – ‘दर्पण’ सुरू केलं. मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमधून प्रसिद्ध होणारं हे वृत्तपत्रं सुमारे आठ वर्षे सुरू होतं. शिक्षणापासून समाजसुधारणेपर्यंत अनेक विषय बाळशास्त्री यांनी त्यामधून हाताळले. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी (1846) त्यांचं निधन झालं.

एवढ्या अल्पायुष्यात ब्रिटिश राजवट असतानाही त्यांनी ज्ञानाच्या, शिक्षणाच्या क्षेत्रात जे मूलभूत योगदान दिलं आहे त्याचा अभ्यास आज नव्यानं होणं आवश्यक आहे. आपण सर्वच भारतीयांनी बाळशास्त्री जांभेकरांच्या कार्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याची गरज आहे. शिक्षणक्षेत्रातील त्यांचं हे योगदान आता आपले पूर्वज या नात्यानं पत्रकारांनी आणि शिक्षकांनीही सर्व समाजासमोर आणले पाहिजे. त्याची कालसुसंगत उजळणी होत राहिली पाहिजे. त्यातून नव्या कार्याला गती देत राहिलं पाहिजे.

…. पण लक्षात कोण घेतो ?

‘Teaching is a noble profession’ असं म्हटलं जातं.

आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीपासून आजच्या जागतिकीकरणाच्या युगातील शैक्षणिक बाजारपेठेपर्यंतच्या हजारो वर्षांच्या प्रवासात गुरु, आचार्य, अध्यापक, शिक्षक, प्राध्यापक अशा संज्ञा बदलत राहिल्या. पण शिक्षकाचं-गुरुचं स्थान तसंच अढळ राहिलं. बदललं ते शिक्षकाच्या कामाचं स्वरूप. शिकवण्याची पद्धत, शिक्षणाची साधनं. उलट सध्याच्या विभक्त कुटुंबव्यवस्थेमुळं आई-वडिलांनंतर शिक्षक आणि शिक्षण संस्थांनाच विद्यार्थ्यांचं ‘सांस्कृतिक पालकत्व’ स्वीकारावं लागतं. उत्कृष्ट शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना, शाळेला आणि  समाजाला आकार देताना नकळतपणे स्वतःलाही आकार देत असतो. स्वतःलाही घडवत असतो. असे स्वतःसह समोरच्या विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक हीच आपल्या देशाची फार मोठी संपत्ती आहे, हे सर्वांनीच आवर्जून लक्षात घ्यायला हवं.

व्यवसाय आणि क्षेत्र कोणतंही असो, त्यातील शिक्षकाचं-मार्गदर्शकाचं स्थान नेहमीच मोलाचं असतं. हे लक्षात घेऊन राष्ट्रीय गरज म्हणून आपण सर्वांनीच उत्कृष्ट शिक्षक घडवण्यासाठी, जे आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे. समाज घडविण्याची ताकद असणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी साऱ्या समाजानं उभं असायला हवं. ती समाजाची जबाबदारी आहे.

व्रत, व्यवसाय आणि धंदा या स्वरूपात बदलत गेलेल्या शिक्षण क्षेत्राकडं पाहिल्यानंतर तर आज उत्कृष्ट शिक्षक घडवण्याचं आव्हान हे आपल्या देशाचं राष्ट्रीय अभियान व्हायला हवं. ते कसं होऊ शकेल? डी. एड्./बी. एड्.च्या फॅक्टर्‍यांमधून केवळ शिक्षक पदवीधर बाहेर पडून चालणार नाहीत. तिथल्या प्रशिक्षणाचा दर्जा अधिक समाजसन्मुख, राष्ट्रनिष्ठ कसा करता येईल? वेतन आणि अन्य सोयी-सुविधांचा लाभ घेतानाच आपल्या कर्तव्याचे विलक्षण भान जपणारी शिक्षकांची फौजच्या फौज आपल्याला कशी उभारता येईल? सध्याच्या सर्व प्रकारच्या शिक्षकांना नवनव्या प्रशिक्षणांच्या साहाय्यानं कसं अधिक कार्यप्रवण करता येईल? याबाबत खूप गांभीर्यानं आणि कृतीपूर्ण विचार व्हायला हवा. आपलं शासन, शिक्षणसंस्था, विद्यापीठं, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक आणि पालक संघटना यांनी यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करायला हवेत. भारताला महासत्तेच्या दिशेनं नेण्याच्या प्रयत्नांचा हा एक फार मोठा भाग म्हणावा लागेल. त्यादृष्टीने काय काय करावं लागेल? आपण काय करतो किंवा करू शकतो? आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांच्या आठवणी आणि त्यांचं योगदान, बदलत्या काळानुसार शिक्षकांसाठी (सर्व स्तरांवरच्या) अनौपचारिक-औपचारिक प्रशिक्षणाचं स्वरूप बदलण्याची नेमकी गरज, शासन-शिक्षण संस्था-समाज आणि प्रसारमाध्यमांची या संदर्भातील भूमिका अशा विविधांगाने आपण सर्वांनी या प्रश्नाचा विचार करण्याची गरज आहे.

आपल्याकडे एखादी राष्ट्रीय आपत्ती आली की, आपण सर्वजण भेदभाव विसरून ‘भारतीय’ या नात्याने एकत्र येतो आणि त्या आपत्तीशी सामना करतो, त्यावर मात करतो असा इतिहास आहे. गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट शिक्षकांची प्रचंड कमतरता हे आव्हान पेलण्यासाठी आता राष्ट्रीय अभियान झाले तरच आपण शिक्षणव्यवस्थेतील अनेक आपत्तींशी समर्थपणे सामना करू शकू, असं प्रत्यक्षात घडलं तर आपल्या सर्वांनाच फार मोठा दिलासा मिळणार आहे. शिक्षण क्षेत्रातील हे गुणात्मक बदलच देशाला महासत्तेच्या दिशेने घेऊन जाणार आहेत. शिक्षकप्राध्यापकांची आणि सर्वच क्षेत्रातल्या शिक्षणप्रेमींची फौजच्या फौज आता ‘नॉलेज वर्कर’ बनून पुढे यायला हवी. ‘देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी प्रसंगी आचार्यांनी पुढे यायला हवं,’ असं चाणक्यानी नमूद केलं होतं. आता देशाच्या रक्षणाबरोबरच देशाच्या उभारणीचीही जबाबदारी आचार्यांनी, शिक्षकप्राध्यापकांनी घ्यायला हवी.

…. आता सारा देशच जणू एक ‘कुरुक्षेत्र’ बनून रोज नवनवे ‘महाभारत’ अनुभवतो आहे. आपण सर्वजण त्याला ‘गुरुक्षेत्रा’चं रूप देऊया. या  कामासाठी सर्वांनाच अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.

लेखक – डॉ. सागर देशपांडे
ईमेल – swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *