पेशवे, पर्वती, तळ्यातला गणपती अन् सारसबाग

सारसबागेतील गणपतीच्या मंदिराला श्रीसिद्धिविनायक मंदीर म्हणतात आणि त्यापूर्वी तो भाग तळ्यातला गणपती म्हणून प्रसिद्ध होता. कदाचित हे आजच्या पिढीला माहीत नसेल. लहानपणी आमचे कुटुंब व शेजारी-पाजारी याठिकाणी आवळीभोजनाला जात असू. तेव्हाचे आसपास पसरलेले ते तळेही मला आज स्पष्ट आठवते. ते पेशवेकालात नौकाविहारासाठीच प्रसिद्ध होते. पर्वती ते सारसबाग यांना जोडणारे हे तळे होते, त्यानंतर तिथे पेशवे उद्यान झाले.

सारसबाग आणि श्रीसिद्धीविनायक मंदिरावर लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे सध्या पुण्यातील साजरा होणारा 125 वा गणेशोत्सव! पेशवे यांनी बांधलेले तळ्यातल्या गणपतीचे मंदिर श्री देवदेवेश्वर संस्थानाचे असून या गणपतीचे महात्म्य भाविकांसाठी मोठे आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून आजही असंख्य पुणेकर तिथे येतात. तसंच पुणे शहराच्या वैभवात याच गणपतीने व आसपासच्या  सारसबागेमुळे मोठी भर पडली आहे. सत्तरच्या दशकात तयार केलेल्या नव्या सारसबागेने तळ्यातल्या गणपतीला एक वेगळे सौंदर्य दिले. पण सिद्धिविनायकाच्या मंदिराचे कलात्मक बांधकामही 1977 मध्ये पूर्ण झाले. त्या गोष्टीला यंदा 40 वर्षे पूर्ण होत आहेत!

20 मार्च 1977 रोजी मंदिराच्या नवीन वास्तूचे उद्घाटन पेशवे घराण्याचे वंशज कृष्णराव विश्वनाथराव ऊर्फ रावसाहेब पेशवा यांच्या हस्ते झाले. पेशवा हे स्वत: अतिशय शिकलेले व भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर अभ्यास केलेले हिऱ्यांमधील तज्ज्ञ होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तेव्हाच्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती विठ्ठलराव पागे होते. पुणे शहर, पेशवे, आणि श्रीगणेश यांचे एकमेकांशी खूप जवळचे नाते आहे!  म्हणूनच या सारसबागेस आजही तितकेच महत्त्व आहे. देवदेवेश्‍वर संस्था सारसबागेतल्या सिद्धीविनायक मंदिराची व्यवस्था गेली दीड-दोनशे वर्षे पहात आहेत. हा इतिहासही तितकाच रंजक आहे. गेल्या एका लेखात मी या संस्थानातील शंकराच्या देवालयांबद्दल लिहिले होते. आता पेशवे, पर्वती आणि गणपती यांचा सारसबागेशी असणारा संबंध यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो.

पर्वती आणि सारसबाग: –

उपलब्ध माहितीनुसार सतराव्या शतकातील पहिल्या काही दशकांच्या छत्रपती शिवाजी  महाराजांच्या जन्माआधीच्याही कालखंडापासून याची सुरुवात होते. तेव्हा पुणे हा प्रांत मालोजीराव भोसले यांनी निजामशाहीतून मागून घेतलेल्या जहागिरीचा एक भाग होता. मालोजीराजे यांचे पुत्र शहाजीराजे हे निजामशाहीत व काही काळ आदिलशाहीत मोठ्या हुद्द्यांवर होते. त्यांनी आपली पत्नी जिजाबाईसाहेब व पुत्र बालराजे शिवाजी यांना बालराजांच्या शिक्षणासाठी व आपल्या जहागिरीची व्यवस्था पाहाण्यासाठी पुणे येथे ठेवले होते.

– तेव्हा शिवछत्रपतींच्या या वडिलोपार्जित जहागिरीचाच पर्वती टेकडी हा एक भाग होता. पूर्वी तेथे पर्वती नावाचे एक खेडेही होते असे काही ऐतिहासिक कागदपत्रे सांगतात त्याचीच ही पर्वती देवस्थान टेकडी पूर्वीच्या पुण्यापासून दोन मैल नैर्ऋत्येस मौजे पर्वती या नावाने वसली होती. या पर्वती देवस्थान टेकडीवरच आजच्या पर्वतीवरील देवळे नंतर श्रीमंत पेशवे यांनी बांधली. पण त्यापूर्वी पर्वती देवीचे एक छोटे देऊळ तिथे होते. तसेच पर्वती गावाकरता आणि देवस्थान गावाकरता पाण्याची सोय महाराजांचे कारभारी दादोजी कोंडदेव यांच्यावर सोपवली होती. त्यांनी आंबील ओढ्यामध्ये धरणाची भिंत बांधून पर्वती गाव व देवस्थान यांनी पाण्याची व्यवस्था केली होती. छत्रपती संभाजीराजे यांनीही पुढे पर्वतीच्या विकासाची कामे चालू ठेवली.

– अठराव्या शतकात श्री शाहू छत्रपतींनी त्यांचे निवासस्थान सातारा येथे हालवले आणि त्यांचे पंतप्रधान श्रीमंत पेशवे यांनी पुणे हीच आपली राजधानी केली. याच काळात श्रीमंत पहिले बाजीराव यांनी शनिवार वाडा बांधला आणि पुणे हे पेशव्यांचे कायम वास्तव्याचे ठिकाण व त्या काळातील राजकीय घडामोडींचे मुख्य केंद्र बनले. पुढे जेव्हा इस 1740 मध्ये थोरले बाजीराव यांच्यानंतर श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली, तेव्हा त्यांनी पर्वतीच्या टेकडीवरील मंदिरे आणि सारसबागचे तळे यांची निर्मिती केली. नानासाहेब पेशवे यांनी पुण्यातही अनेक सुंदर रस्ते, बागा आणि तलाव बांधले. पुण्याला एका सुंदर शहराचे रूप त्यांनीच प्रथम दिले!

– पर्वती मंदिराच्या स्थापनेची आख्यायिका नानासाहेब पेशवे यांच्या काळात प्रसिद्ध होती. पर्वती टेकडीच्या नैर्ऋत्येला कळकीच्या बागेपलीकडे जळकीवाडी म्हणून एक भाग होता. तिथे नौलोबा तावरे व त्याची पत्नी साकराऊ हे दोघे राहात होते. साकराऊ हिच्या छातीला विकार झाला होता. तिच्या स्वप्नात आलेल्या एका दिव्य स्त्रीने आपण पर्वतीच्या टेकडीवर निवडुंगात पडलेली आहे असे सांगितले. मला बाहेर काढून पूजा कर व त्याचा अंगारा विकार झालेल्या भागास लाव म्हणजे बरी होशील, असेही सांगितले. तावरे यांनी देवी शोधून तिची पुन:स्थापना केली व पूजा करून त्याचा अंगारा साकराऊ हिला लावायला दिला. ती बरी झाल्यामुळे पर्वतीवरील देवीवरची लोकांची श्रद्धा वाढू लागली. त्या देवीस तेव्हा पर्वताई भवानी असे नाव पडले. तीच पर्वती!

– पुढे साकराऊची हकीकत नानासाहेब पेशवे यांना कळली तेव्हा त्यांनीही हा अंगारा त्यांच्या आई काशीबाईंना त्यांच्या पायांवर आलेल्या आवळू या गळूवर लावायला दिले. त्याही बऱ्या झाल्या! त्यांनी आपला नवस पूर्ण करण्यासाठी पर्वताईचे मंदीर बांधण्याचा आदेश दिला. नानासाहेबांनी आईची इच्छा पूर्ण केली व पर्वताईचे भव्य मंदिर बांधले. तेथील मुख्य देऊळ हे पर्वताईचे असले तरी शिवलिंग, शंकराची मूर्ती व शंकराच्या मांडीवर एकाबाजूला पार्वती तर दुसऱ्या बाजूला बालगणपती यांची प्रतिष्ठापना केली. शंकरालाच येथे श्रीदेवदेवेश्वर असे संबोधले जाऊ लागले. यामूर्तीची स्थापना 23 एप्रिल 1749 मध्ये करण्यात आली.

– एवढेच नाही त्या मूर्ती छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून नानासाहेब पेशवे यांनी मागून घेतल्या असे सांगण्यात आले. आपल्या पूज्य छत्रपतींचे  स्मारक म्हणून पेशव्यांनी या मूर्तीची स्थापना केली असा समज त्यातून रूढ झाला. देवदेवेश्वराच्या गाभाऱ्यात उजवीकडे संगमरवरी पाषाणातील गणपतीची सुंदर मूर्ती आहे. त्या गणपतीस सदरेतील गणपती असे म्हणतात. या देवालयाभावती आठ फूट रुंदीचा दुमजली अष्टकोनी तट असून आत प्रदक्षिणेच्या वाटेवर सूर्य, गणपती, भवानी  व विष्णू या देवतांची चार मंदिरेही बांधण्यात आली आहेत. ही चारही देवळे अनुक्रमे अग्नेय, वायव्य, नैर्ऋत्य आणि ईशान्येस बांधण्यात आली. ते काम मात्र थोरले माधवराव पेशवे यांनी 1766 मध्ये पूर्ण केले. या देवस्थानास शिवपंचायतानाचे स्वरूप देण्यात आले.

– या मंदिराच्या दक्षिणेस श्रीमंत पेशवे वाडा असून तो 1755 मध्ये बांधण्यात आला होता. तिथेच नानासाहेब पेशवे यांचे निधन झाले. या वाड्यात त्यांची समाधी असून सर्व पेशव्यांची रंगीत पूर्णाकृती चित्रे बसवण्यात आली आहेत. याशिवाय आसपास असणाऱ्या विठ्ठल मंदिर, कार्तिकस्वामी मंदीर, विष्णू मंदीर बांधण्यात आली. पर्वतीवरील देवस्थानांचा हा गेल्या तीन ते चार शतकांचा इतिहास आहे. तो कळल्याशिवाय सारसबागेचे महत्त्व समजणार नाही. नानासाहेब पेशवे यांनी केवळ पर्वतीवरील ही मंदिरे बांधली नाहीत, तर तो परिसरही सुशोभित केला. त्यांनीच तेव्हा पर्वतीच्या पायथ्याशी आंबील ओढ्याच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार केला. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी आणि अवती-भवतीच्या बागबगीच्यासाठी करायचा होता.

– या तळ्याचे काम पर्वती मंदीर बांधून झाल्यावर म्हणजे 1750 मध्ये सुरू झाले व ते 1753 पर्यंत चालू होते असे सांगतात. या कामातली दिरंगाई नानासाहेब पेशवे यांना खपली नाही. एकदा त्यांनी स्वत: हत्तीवरून उतरून दगड उचलून तळ्याची भिंत रचण्यास सुरुवात केली. शरमिंधे झालेल्या कामगारांनी मग पुन्हा जोमाने काम सुरू केले आणि ते वेळेत पूर्णही केले! पण हे तळे खोदताना मध्यभागी 25 हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे बेट बागबगीचा करण्यासाठी राखून ठेवण्यात आले होते. याच बेटावर नंतर सुंदर बाग तयार करण्यात आली. त्यास नानासाहेब पेशवे यांनी सारस बाग असे सुदर काव्यात्मक नाव दिले!

– याच बागेत नंतर सवाई माधवराव पेशवे यांनी 1748 मध्ये एक छोटेसे मंदीर बांधून त्यात श्री सिद्धीविनायक गजाननाची स्थापना केली. पुढे 18 व्या, 19 व्या शतकात हीच ठिकाणे पुणेकरांची फिरावयास जाण्याची व देवदर्शनाची ठिकाणे बनली. हेच तळे आणि हाच तो त्यातील तो तळ्यातला गणपती! या देवळातील मूळ मूर्ती 1882 मध्ये काही कारणांमुळे भंगली व नवी मूर्ती नंतर बसवण्यात आली. या तळ्यात पेशवे आणि त्यांचे मुत्सद्दी सल्लागार यांची नौकाविहाराच्या निमित्ताने खलबते चालत. विविध राजकीय विषयांवर चर्चा होत. या चर्चा गुप्त असल्याने त्या कुणीही ऐकू नयेत म्हणून नौकेवरील नावाडीही हबशी असत. त्यांना मराठी किंवा हिंदी येत नसे. या माहितीस दंतकथेपक्षा ऐतिहासिक बखरीचाही आधार असल्याचे सांगण्यात येते. याच तळ्यात पुढे महादजी शिंदे, नाना फडणीस आणि पेशवे यांच्यात अनेक गुप्त खलबते व मसलती झाल्याचा उल्लेख मराठ्यांच्या इतिहासात सापडतो!

– 1818 मध्ये पेशवाईचा अस्त झाला आणि ईस्ट इंडिया कंपनीकडे देवदेवेश्वर पर्वती संस्थानची व्यवस्थाही गेली. कंपनीने हा कारभार पूर्वीच्याच पद्धतीने 1842 पर्यंत चालवला. पण पुढे पुण्यातील प्रतिष्ठित मंडळींना पंच म्हणून नेमून या पंचकमिटीमार्फत देवस्थानाचा कारभार करण्यात येऊ लागला. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 मध्ये श्री देवदेवेश्वर संस्थान सार्वजनिक न्यास म्हणून त्याची अधिकृत नोंदणीही करण्यात आली. स्वातत्र्यपूर्व काळात तत्कालीन मुंबई सरकारने 1861च्या सुमारास तलावातले मधले सारसबागेचे बेट सोडून बाकी जागा पुणे नगरपालिकेकडे सुपूर्त केली. नगरपालिकेला या तलावाची निगा नीट ठेवता येईना तसेच तिथे साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊ लागल्याने हा तलाव बुजवून टाकायचे ठरवले. पुणे शहरातील कचरा पुढे अनेक वर्षे याच तळ्यात ते बुजवण्यासाठी टाकला जाऊ लागला!

– या तळ्याबरोबर पुण्याचा इतिहासही बदलत गेला. कचरा उचलणाऱ्या गाड्यांनी तळ्याच्या उत्तरेकडील भाग पूर्ण भरून टाकला. तो 1950 चाच सुमार होता. याच काळात पुणे नगरपालिकेची महापालिका झाली! पुण्याचा कायापालट याच दशकापासून व्हायला सुरुवात झाली. साठच्या दशकात पुणे महापालिकेचे आयुक्त भुजंगराव कुलकर्णी यांच्या कारकीर्दीत तलावाच्या उरलेल्या दक्षिणेकडील भागात सुंदर उद्यान तयार करण्यात आले! यातून आधुनिक सारसबाग जन्माला आली! श्रीसिद्धीविनायकाच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांच्या गर्दीतही मोठी वाढ व्हायला लागली ती अगदी आजपर्यंत. भक्तांच्या दानातूनच मंदिराचा विकास वेळोवेळी करण्यात आली.

– तळ्यातला गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूळ गणपतीचे मंदिर सवाई माधवराव पेशवे यांनी अगदी लहान आकारात बांधले होते. त्यातील सिद्धीविनायकाची मूर्ती असणारे गर्भागार मात्र खास मराठा शैलीतील बांधकामानुसार पक्क्या दगडांचे व चिरेबंदी होते. तसेच या गर्भागारावरील छोटा कळसाचा भाग यामुळे ते मंदीर लांबूनही डोळ्यात भरत असे. मूळ देवळाचा हा सर्वच भाग 1930 पर्यंत शाबूत स्थितीत होता. त्यानंतर मात्र त्यातील काही भाग हळुहळू पडायला सुरुवात झाली. या देवळात जायला पश्चिमेकडून पर्वतीला जाण्याची पायवाट होती. त्यामुळे पर्वतीवरील देवदेवेश्वराचे दर्शन घेणारे भाविक येताना तळ्यातल्या गणपतीलाही वंदन करत. याशिवाय देवळात जायला मंदिराच्या पूर्वेकडूनही एक मातीची कच्ची पायवाट होती.

– पुढच्या सरकारी नोंदींनुसार 1936-37 या कालखंडात पुण्यातील त्यावेळचे जिल्हा विभागीय न्यायमूर्ती रावबहाद्दूर कोंडो महादेव कुमठेकर यांनी या मंदिरास संगमरवरी पायऱ्या केल्या होत्या. तसेच मंदिराच्या पुढे पत्र्याचा सभामंडपही उभारला होता. तो मंडप पुढे 1969 पर्यंत टिकून राहिला. याच काळात पुणे महापालिकेच्या आयुक्त भुजंगराव कुलकर्णी यांनी सारस बागेचा कायापालट करण्याच्या कामास सुरुवात केली. सारसबागेभोवतीच्या तळ्याचे उद्यानात रूपांतर झाल्याने या उद्यानाला लागून असणारे दोन्ही बाजूंचे रस्ते सुधारून ते पक्के डांबराचे करण्यात आले. त्यामुळे गणपतीच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांना ते अधिक सोपे वाटू लागले आणि आता तळ्यातल्या गणपतीचे सारस बागेचा गणपती या नावाने तो ओळखला जाऊ लागला!

– एकीकडे सारसबागेचा कायापालट झाला तर दुसरीकडे मंदिरापुढे असणाऱ्या सभामंडपाची जागाही अपुरी पडू लागली. तो सभामंडपही 32 वर्षे जुना झाला होता. भक्तांची वाढती वरदळ पाहाता मंदिराच्या बेटाभोवती सुरक्षा भिंत बांधण्याची निकड देवदेवेश्वर संस्थेच्या विश्वस्तांना वाटू लागली. यातूनच मुख्य मंदिराच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले. या विश्वस्तांमध्ये पेशवे यांचे सरदार असणाऱ्या मुजुमदार घराण्याचे आबासाहेब मुजूमदार, सरदार बापूसाहेब विंचूरकर, दादासाहेब नातू, पेशवे घराण्याचे वंशज विनायकराव पेशवा बीएम्‌सी कॉलेजचे उपप्राचार्य भाऊसाहेब पटवर्धन यांनी त्यांच्या कारकीर्दीत मोठे निर्णय घेतले.

– या विश्वस्तांनी मंदिराची केवळ जुजबी दुरुस्ती न करता सर्वच मंदिर नवे भव्य आणि सुंदर असे कलात्मक बांधण्याचे ठरवले. यासाठी येणारा खर्च भागवण्यासाठी बँकेतून कर्ज काढण्याची तयारीही दाखवली. पण ती वेळ आली नाही, कारण पुण्यातल्या तसेच दूरदूरच्या गणेशभक्तांनी यासाठी पहिल्यापासूनच भरघोस अर्थसहाय्य केले. मंदिराचा परिसर, मुख्य मंदीर, कंपाऊंड वॉल, कमान व इतर इमारती याची संपूर्ण योजना स्थापत्यकार उ. म. आपटे यांच्याकडून तयार करून घेण्याचे ठरवले. बहुधा याच आपट्यांनी तेव्हा बालगंधर्व रंगमंदिराचा आराखडाही तयार केला होता. सारसबाग मंदिराचे सर्वच काम टेंडर मागवून रीतसरपणे सुरू करण्यात आले. त्याआधी नवीन सभामंडपाचे आराखडेही पुणे महापालिकेकडून मंजूर करून घेण्यात आले.

– ज्यावेळी तळ्यातल्या गणपतीचे सारसबागेत रूपांतर करण्यास पुणे महापालिकेची मदत झाली, तशी सिद्धीविनायकाच्या मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार करण्यासही पुणे महापालिकेने सहकार्य केल्याचे विश्वस्तांनी सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. बांधण्यात येणाऱ्या नव्या वास्तूच्या शानदार कोनशिला समारंभास पुण्याचे त्यावेळचे महापौर वि. भा. पाटील यांनी मान्य केले. त्यानुसार  3 डिसेंबर 1969 मध्ये हा समारंभ वाजत गाजत पार पडला. त्याच दिवशी संध्याकाळी विनायकराव पेशवा यांच्या हस्ते भूमीपूजनही करण्यात आले. पुणे  महापालिकेमुळे सारस बाग परिसरालाच एक नवे वैभव प्राप्त झाले असल्याचे सरदार आबासाहेब मुजुमदार यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले. ते म्हणाले होते की, पुणे महापालिकेने सारसबागेतील दलदलीचा भाग भरून तिथे सुंदर बाग केल्याने ते पुण्यातील जनतेचे विश्रामस्थान व बाहेरील जनतेचे आकर्षण बनले आहे. यानंतर मात्र सारस बाग आणि गणपती मंदिराकडे येणाऱ्या भक्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. त्यातून देवस्थानचे उत्पन्नही बऱ्यापैकी वाढू लागले.

– स्थापत्यकार उ. म. आपटे यांनी या मंदिरात भारतीय संस्कृतीशी सुसंगत असणारे शिल्प वापरले. ते म्हणाले की, यातील कमानींमध्ये धनुष्यबाण व नाग या आपल्या संस्कृतीच्या प्रतीकांचा उपयोग केला आहे. तसेच मुख्य मंदीर हे राजस्थानच्या गुलाबी रंगाच्या दगडाने बांधणे अधिक योग्य वाटले. यावर संगमरवरी दगडांचे नक्षीकामही करण्यात आले आहे. हे मंदीर पुण्याच्या सौंदर्यात भर घालणारे ठरेल. या मंदिराचे शिखर 36 फूट उंच आहे. तसेच मंदिरात खांब, छप्पर, कमानी या सर्वांना आतून पोलादी गर्डर्स वापरले आहेत.

– वयाच्या शंभराव्या वर्षात प्रवेश करणारे व सध्या औरंगाबाद येथे स्थायिक झालेले पुणे महापालिका माजी आयुक्त भुजंगराव कुलकर्णी यांच्या सारसबाग बांधण्यासंबंधीच्या आठवणी ऐकण्यासारख्या आहेत. ते म्हणतात की, ही बाग तयार करण्यापूर्वी तेथील तळ्यात 80/90 झोपड्या होत्या. त्यांच्या जनावरांचा उपसर्ग मंदिरास होत असे. मंदिराचे विश्वस्त आबासाहेब मुजुमदार यांच्या विनंतीवरून मंदिराच्या खर्चातून याचा बंदोबस्त ताप्तुरत कंपाऊंड घालण्यात आले. तसेच कुलकर्णींनी तेव्हाचे मनपा सिटी इंजिनियर बोड यांच्यासह त्यांच्या मनातील सारसबागेची संकल्पना मुजुमदारांना समजावून सांगितली. त्यांनीही याबाबत सहकार्य देण्याचे मान्य केले. त्यानुसार आधी तळ्याच्या बाजूस सुशोभित दागडी भिंत. पायऱ्या व प्रवेशद्वार तयार झाले. मंदिराच्या मुख्य टेकडीभोवती एक खंदक बांधून काढण्यात आला. त्यावर पूर्व व पश्चिम बाजूंना सुशोभित भिंत, पायऱ्या आणि प्रवेशद्वार तयार करण्यात आले. हे दोन्ही पूल व त्याचे कठडे मनपाकडे पडून असणाऱ्या भंगारातून निवडून घेतलेल्या साहित्यातून बांधण्यात आले. तेथील झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसनही करण्यात आले.

– कुलकर्णी पुढे म्हणतात की, नंतर मनपाच्या स्वत:च्या यंत्रसामुग्रीने तळ्याचे सपाटीकरण करण्यात आले. पाण्याच्या निचऱ्यासाठी मोठमोठे नाले बांधून व्यवस्था करण्यात आली. तसेच महापालिकेच्या प्रत्येक उद्यानातील एकेक सेवक सारसबागेतील हिरवळ आणि फुलझाडे लावण्यासाठी नियुक्त करण्यात आला. तसेच त्यावेळी तळ्याच्या काठावर खडकांच्या उतरणीला रांगा करून घेतल्या. त्यातून हळुहळू सारसबाग साकार होत गेली. प्रवेशद्वार व पायऱ्यांच्या खाली गंगा-यमुनेची शिल्पे शेजारच्या अभिनव कला विद्यायलाने वेरूळच्या लेण्यातील पारंपरिक संकेत सांभाळून तयार केली. एकात्म प्रकल्प म्हणून सारसबागेची संकल्पना ही मनपाच्या किंवा त्यातील कोणत्याही समितीपुढे मान्यतेसाठी गेली नाही; पण ते सारे काम प्रकट व सर्वांच्या मूक संमतीनेच झाले. विशेष म्हणजे फ्रान्स मुलामुलींच्या गटाने पायऱ्या बांधण्यासाठी तिथे श्रमदान केले; तर एका जपानी शिष्टमंडळाने ही बाग जगातल्या उत्कृष्ट स्थळांपैकी एक अशी कौतुकाची थापही दिली. याकाळात सारसबागेचे सौंदर्य व भव्यता वाढवण्यासाठी ज्येष्ठ उद्योजक शंतनुराव किर्लोस्करांनीही आर्थिक मदतीबाबत तयारी दर्शवली होती.

– कुलकर्णी म्हणतात की, सारसबागेच्या 30 एकरातील मोठ्या सौंदर्यपूर्ण कामाबद्दल पुण्यातील अनेकजण आजही माझी आवर्जून आठवण काढतात. मुळात अनेक अनामिकांच्या कल्पना तिथे प्रत्यक्षात उतरल्या आहेत. याशिवाय आपल्या कारकीर्दीत झालेल्या पुण्यातील अनेक कामांबाबत पुणेकरांनी त्यांची तोंडभर प्रशंसा केली. अत्यंत लोकप्रिय आयुक्त असणाऱ्या कुलकर्णींनी जेव्हा पुणे सोडले तेव्हा त्यांच्यावर पुण्यातील अनेक दैनिकांनी कौतुक करणारे अग्रलेख लिहिले होते!

भुजंगराव कुलकर्णी यांची बदली होऊनही आता जवळपास पन्नास वर्षे होत आहेत. त्यानंतर सारस बागेमुळे पुण्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली. घरी आलेल्या पाहुण्यांना सारस बाग व सिद्धीविनायकाचे दर्शन घडवणे हा एक आवडता कार्यक्रमच बनला होता!

कुलकर्णी यांच्यानंतर मात्र बराच काळ  महापलिकेकडून सारस बागेसाठी फारसे काही वेगळे केले नाही. तरीही काही अतिउत्साही नगरसेवकांनी नव्या शकली लढवल्या! मंदिराचे एक माजी मुख्य विश्वस्त आणि संस्कृत ग्रंथांचे आभ्यासक वसंतराव नूलकर म्हणाले की, सारस बागेतील सिद्धीविनायकाच्या मंदिराला थेट जोडण्यासाठी महापालिकेतर्फेकाही वर्षांपूर्वी एक प्रस्ताव आला होता. सणस ग्राऊंडकडील बाजूने असणाऱ्या रस्त्यावरून थेट मंदिरापर्यंत सहा फूट रुंदीचा एक पूल बांधण्याची महापालिकेचे इच्छा होती. तेव्हा नूलकर यांच्यासह बापूसाहेब जोशी आणि मनोहरपंत बाठे हेही विश्वस्त होते. त्यांनी याबाबत सांगोपांग चर्चा करून एकमताने या प्रस्ताव शक्य नसल्याचे महापालिकेस कळवले.

यागमागचे कारण असे हाते की, त्यामुळे थेट दारातून मंदिरापर्यंत जाणाऱ्या पुलाचा त्रास जास्त होईल, तसेच देवाच्या अंगावर दागिने असतात त्याच्या सुरक्षिततेचाही मोठा प्रश्न निर्माण होईल. या पुलामुळे रस्त्यावरील भिकारी थेट मंदिरापर्यंत पोचू शकले तर बाहेरील भेळ व अन्य खाद्य पदार्थ विकणारे या पुलावर पदार्थ विकू शकतील. यातून एकंदर मंदिर तसेच सारस बागेच्या स्वच्छतेचा प्रश्न बिकट होईल. हा पूल झाला असता तर बाहेरील जाहिरातींची होर्डिंग्ज पुलावरही बसवली गेली असती आणि या बागेचे सौंदर्य बिघडले असते. त्यामुळे नूलकर आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता असेच म्हणावे लागेल.

आज सारस बागेकडे पाहिल्यावर पेशवे कालातील पुण्याच्या गतवैभवाची वर्णने वाचल्याचे आठवते. नानासाहेब पेशवे यांनी पुण्याचा तेव्हा कायापालटच केला होता. इतिहासकारांच्या शब्दात सांगायचे तर नानासाहेब पेशवे यांनी पुण्यावर पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम केले होते! पुण्याचे खेडेगाव हे स्वरूप बदलून अवघ्या वीस वर्षांच्या कालावधीत त्याचे अत्यंत आकर्षक शहरात रूपांतर केले होते! शहरात अनेक पेठा नव्याने वसवल्या. कात्रज येथे मोठा जलाशय करून तेथून थेट शनिवारवाड्यापर्यंत आठ  किलोमीटर लांबीची दगडी नळ योजना बांधून काढली. हौद बांधून शहरातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर केले. पर्वती टेकडी व पुण्याच्या परिसरात प्रचंड वृक्षारोपण करून पायथ्याशी तळे खोदले. एकूण पुण्याच्या विस्ताराला व आजच्या चहूबाजूंनी विस्तारलेल्या पुण्याला मूळ नवी दिशा देण्यातील त्यांचा द्रष्टेपणा आपण आजही विसरू शकत नाही!

लेखक – विवेक सबनीस
ईमेल – swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *