126 वा गणेशोत्सव कसा असेल?

येणार येणार म्हणता म्हणता अखेर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाचा सोहळा आला, दिमाखात पार पडला आणि आता संपलाही. पुणे शहरातील एक मोठी सांस्कृतिक धामधूम संपली. शहरातील मध्यवस्तीतील अरुंद रस्त्यांवरील रहदारी पुन्हा एकदा रोरावत धावू लागली. या भागातल्या  मोठ्या गणेशमंडळांचे मंडप काढण्याच्या कामास आता आणखी वेग आला आहे. कार्यकर्ते थोडे थंडावले आहेत, सुस्तावले आहेत. आता अगदी पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवापर्यंत मधला मोठा कालखंड मिळणार आहे. आता प्रश्न आहे तो पुण्यातील 126 वा गणेशोत्सव कसा असेल, याचा.

थोडक्यात, आता 126 वा सार्वजनिक गणपती उत्सव पुढच्या वर्षी येणार. याच स्तंभामध्ये मी या उत्सवाच्या व्यवस्थापनातील अडचणी व त्यावरील मार्ग यावर एक स्वतंत्र लेख लिहिला होता. उत्सव संपल्यावर यातील अडचणी व त्यावर मात करण्यासाठी पुढच्या वर्षी कोणती काळजी घेतली जाईल, हा प्रश्न कायम आहे. त्याबाबत कितपत गांभीर्याने विचार केला जात असेल, याची शंका वाटते. कारण महापालिका काय किंवा गणेश मंडळांचे कार्यकर्तेही, पुढच्या वर्षीपर्यंत काय करायचे ते पुढचे पुढे बघू म्हणून निवांत राहातात. कामाची ही पद्धत पहिल्यापासून अशीच चालू आहे. वास्तविक, वर्षभरातील सर्वात मोठ्या व दहा ते बारा दिवस चालणाऱ्या या उत्सवामुळे सर्व शहरच अंतर्बाह्य ढवळून निघते. असे असले तरी या उत्सवाचा आनंद सर्वांना नाही, तरी समाजातील जास्तीत जास्त घटकांना कसा घेता येईल याबाबत कोणतीही जागृती होताना दिसत नाही. कारण याबाबत कोणताही विचारविनिमय या उत्सवानंतर केला जात नाही. किमान ही परिस्थिती आता सव्वाशे वर्षांनंतर तरी बदलायला हवी.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या उत्सवानंतर शहरातील बदललेल्या सर्व बऱ्या वाईट परिस्थितीचे ऑडिट या निमित्ताने तयार केले जाणे आवश्यक आहे. या उत्सवाची आव्हाने दिवसेंदिवस आक्राळ-विक्राळ स्वरूप धारण करू लागली आहेत. त्याचा व्यवस्थित अभ्यास करून त्यावर मार्ग काढण्याचा अ‍ॅक्शन प्लॅन पुढच्या वर्षीच्या गणपती उत्सवापूर्वीच तयार असायला हवा.  अन्यथा, आपण स्मार्ट सिटीकडे जाण्याच्या नुसत्याच गप्पा मारतो आहोत, असे म्हणावे लागेल.

उत्सव संपल्यानंतर एक आठवडाभर तरी त्यावर उलटसुलट बातम्या छापून येतात. यंदा हे प्रमाणही जास्त आहे. उदाहरणार्थ, राजकीय दबावामुळे बेकायदा पद्धतीने मंडप घालून रस्ते अडवणाऱ्या गणपती मंडळांवर पालिका कारवाई करणार नाही अशी एक बातमी नुकतीच वाचण्यात आली. इतकेच नव्हे तर गणपती उत्सवातील गर्दीमुळे झालेल्या चोऱ्या व त्या संबंधांचे गुन्हेही या उत्सवानंतर अजूनही मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. कोणताही सार्वजनिक उत्सव म्हटला की, त्यात चांगल्या व वाईट या दोनही गोष्टी येणारच. असे असले तरी केवळ एवढेच म्हणून ते सोडून देणे योग्य ठरणार नाही. गणपती उत्सवातील बदल व त्याला किमान शिस्त लावायची असेल तर केवळ सरकारी यंत्रणेला दोषी ठरवून चालणार नाही. सर्वांनीच पुढे  येऊन तो अधिकाधिक विधायक व आनंददायी करण्यासाठी झटले पाहिजे. विशेषत: या उत्सवापासून केव्हाच लांब गेलेला जो बुद्धिजीवी व उच्चविद्याविभूषित वर्ग आहे त्याने आता गणपती उत्सवाच्या पसाऱ्याकडे आपली एक सामाजिक जबाबदारी आहे अशा बांधिलकीच्या भूमिकेतून बघितले पाहिजे.

अनंत चतुर्दशीनंतरची नदी :

पुण्यातील यंदाच्या गणेशोत्सवात 4.25 लाख गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्याचे पुणे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. अगदी नेमकेपणाने सांगायचे तर 4,16,202 गणेशमूर्तींचे विसर्जन पुण्यातील मुठा नदी व महापालिकेच्या हौदांमध्ये करण्यात आले. तसेच सुमारे सहाशे किलो निर्माल्यही गोळा करण्यात आले. गणेशोत्सवात नदीकाठी ठीकठिकाणी मिळून 255 जागी गणेशमूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यात 57 विसर्जन घाट, 35 कालवे, 53 विहिरी, 110 लोखंडी टाक्या. एकंदर विसर्जनाशिवाय केवळ दोन हजार 873 जणांनी गणेशमूर्तींचे दान केले. विसर्जन घाटांमध्ये अमृतेश्वर घाट, पुलाची वाडी, नटराज सिनेमाजवळ, पांचाळेश्वर घाट, अष्टभुजा मंदिर, संगम घाट, बंडगार्डन, खंडोजीबाबा चौक, बापू घाट, ठोसर पागा, चिमा उद्यान येरवडा, दत्तवाडी घाट, वारजे घाट, सिद्धेश्वर घाट आणि राजाराम पूल इत्यादींचा समावेश होता.

आता गणपती उत्सवाचा बहर ओसरला असला तरी गणपती विसर्जनाच्या नंतर शहरातील स्वयंसेवी संस्था गप्प न बसता अधिक जोमाने कामास लागल्याचे दिसते. पर्यावरणप्रेमी कै. प्रकाश गोळे यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या जीवित नदी या संस्थेने पुण्यातून वाहणाऱ्या मुठा नदीवर गेली तीन वर्षे विशेष काम केले आहे. आपल्या शहरातून वाहणाऱ्या नदीची दयनीय स्थिती पाहून तिच्यासाठी अनेकांना काहीतरी करावेसे वाटते, पण त्याची सुरुवात कुठून करावी असा प्रश्न पडतो. जीवित नदीतर्फे नदीच्या कामासाठी तिचा काही भाग दत्तक घेऊन त्याची स्वच्छता आणि त्यानिमित्त अभ्यास करण्याचे काम या संस्थेच्या एक संस्थापक असणाऱ्या अदिती देवधर यांनी हाती घेतले आहे.

या वर्षी मे महिन्यापासून 15 जणांचा एक गट सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी भागात दर रविवारी सकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान न चुकता भेटतो. विशेषत: नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवाच्या काळात अदिती देवधर व त्यांच्या गटाने नदीत होणाऱ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबद्दल काळजीपूर्वक अभ्यास केला. त्यांच्या निरीक्षणानुसार मूर्तींसाठी स्वतंत्र हौद असले तरीही तासाला सुमारे 200 मूर्तींचे विसर्जन याठिकाणी केले जाते.

प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या या भागात आषाढी एकादशीला लाखांहून अधिक भाविक भेट देतात. या साऱ्याचा ताण या भागातून वाहणाऱ्या मुठा नदीवर पडतो. तसेच वर्षभरात एरव्हीही सर्व प्रकारचा कचरा टाकण्याचे ठिकाण म्हणूनही नदीचा वापर होतो. काचेच्या बाटल्या, प्लॅस्टिकपासून सर्व प्रकारचा कचरा नदीतून वहात येतो. नदीत कचरा टाकू नये याबाबत कोणताही कायदा नाही, त्यामुळे ही नदी आपली आहे अशी भावनिक जवळीक नदीबाबत वाटत नाही. पण जीवित नदी गटातील कार्यकर्ते हा कचरा तसेच नदीत वाढीस लागणाऱ्या जलपर्णींसारख्या वनस्पती काढून काठावर ठेवतात. महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारीही याबाबत तत्परता दाखवून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाटही लावतात.

मुठा नदीबाबत भावनिक जवळीक निर्माण करण्यासाठी जीवित नदीतर्फे मुलांना नदीसंबंधीच्या गोष्टी आवर्जून सांगितल्या जातात. तसेच वेळोवेळी रिव्हर वॉकमधून जागृतीही केली जाते. विठ्ठलवाडी भागात लोकांनी नदीत कचरा टाकू नये म्हणून दारोदारी फिरून जनजागृती मोहीमही सुरू आहे. नुकत्याच झालेल्या गणपती विसर्जनानंतरची परिस्थिती सांगताना अदिती देवधर म्हणाल्या की, या दिवशी तासाला केवळ 200 मूर्तींचे विसर्जन नदीत होते असे नाही तर यातील अनेक मूर्त्यांचे आकारही मोठ्या म्हणजे काही घरगुती मूर्तींची उंचीही दोन फुटांपर्यंत असते. नदीत म्हणजे वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जित करणे ही आपली परंपरा आहे, त्यामुळे काही जण हौदापेक्षा नदीतच गणेशमूर्तींचे विसर्जन करणे पसंत करतात.

महापालिकेने गणेशमूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या हौदांमध्ये व टँकमध्येही केली आहे. पण दुसऱ्या दिवशी तिथे आल्यावर गढूळ पाण्यातील गणपती मूर्ती पाहून भाविकांना वाईट वाटते. देवधर पुढे म्हणाल्या की, हौद बांधून लोकांनी नदीत मूर्ती विसर्जित करू नये हा महापालिकेचा प्रयत्न व त्यासाठी घेतले जाणारे कष्ट अभिनंदनीय आहेत. पण अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही. या काळात नदीवर येणारा ताण व त्यामुळे होणारे प्रदूषण रोखता येत नाही. ही परिस्थिती केवळ विठ्ठलवाडी भागापुरती मर्यादित नाही तर जिथे जिथे गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन होते त्या सर्वच ठिकाणी हा प्रश्न उग्र बनला आहे. महापालिकेचा काम करणारा कर्मचारी वर्ग या काळात सलग अनेक तास काम करत असतात. या साऱ्या गोष्टी पुढील वर्षी टाळता येतील. किंबहुना, महापालिकेच्या स्वत:च्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सूचनांचा विचार करून त्यानुसार पुढच्या वर्षीचे नियोजन आखता येईल.

विठ्ठलवाडी भागात महापालिकेचे काम करणारे मुकादम हेमंत पवार म्हणाले की, अनंत चतुर्दशीच्या दिवशी विठ्ठलवाडी भागात सर्वात जास्त गर्दी असते. हा भाग विस्तीर्ण असल्यामुळे लांबून येणारेही या ठिकाणी गणपतींच्या मूर्ती विसर्जित करतात. या दिवशी सात ते आठ हजार मूर्तींचे विसर्जन होते. या भागात ठेवलेल्या पाण्याच्या टाक्याही अशावेळी अपुऱ्या पडतात.  टाक्या भरल्यामुळे लोक नदीत गणपती मूर्तींचे विसर्जन करतात. तसेच पाटबंधारे विभागाकडूनही नदीत पाणी सोडल्याने या स्वच्छ पाण्यातच मूर्तींचे विसर्जन करण्याकडे लोकांचा कल असतो. हा अनुभव लक्षात घेता पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशीच्या आधी किमान सहा महिने तरी या बाबतीत नियोजन व पूर्वतयारी केली तर अनेक प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवता येतील.

अदिती देवधर यांच्या कार्याचे कौतुक महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन या संस्थेचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी केले. ते म्हणाले की, गणपती उत्सवात विसर्जनासाठीही भक्ती दाखवणारी डॉल्बी संस्कृती व त्यातील चित्रविचित्र बीभत्स नृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे पाहून वाईट वाटते. यातून हा उत्सव तर झाकोळलेला आहेच. या पार्श्वभूमीवर नदीची स्वच्छता राखण्यासाठी अदिती देवधर व त्यांचे मूठभर कार्यकर्ते यांचे डॉल्बीवर नाचणाऱ्यांशी नेमके नाते काय आहे? गणेशोत्सव व नवरात्र वगळता गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना वर्षभर वेळच वेळ असतो. त्यांच्यासमोर कोणताही विधायक कार्यक्रम नसतो. पोषाखीपणाच्या आजच्या काळात व राजकारण्यांचा त्यातील सहभाग पाहता या कार्यकर्त्यांपुढे ठोस कार्यक्रम ठेवला गेला पाहिजे.

डॉ. कश्यप पुढे म्हणाले की, याची नैतिक जबाबदारी ही शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या बुद्धिजीवी नेतृत्वाने करायला हवी. शिक्षण क्षेत्र या सामाजिक वास्तवाकडे डोळेझाक करते कारण ते केवळ परीक्षार्थी बनले आहे. विद्यार्थ्यांची सर्व शक्तीच उत्तरपत्रिका सोडवण्यात व पोपटपंची करण्यात खर्च होते. आपल्या गणेशोत्सवाकडे पाहून व त्यातील डॉल्बी संस्कृती व नदीची अवस्था पाहून या समाजाशी नाळ जोडणे आवश्यक आहे. आपल्या शैक्षणिक जीवनातील 30 टक्के वेळ जर अशा कामांसाठी दिला, तर गणेश मंडळे, महापौर, नगरसेवक यांच्या सहभागातून समाजातून सर्व घटक एकत्र आणता येतील. एवढेच नव्हे तर अदिती देवधरांच्या नेतृत्वाखाली हेच कार्यकर्ते नदी स्वच्छतेच्या कामातही वर्षभरासाठी जोडले जाऊ शकतील.

125 व्या गणेशोत्सवानंतरची परिस्थिती :

मघाशी म्हटल्याप्रमाणे विसर्जन मिरवणुका संपल्यानंतर पुढचे तीन-चार दिवस पोलीस  ठाण्यांमध्ये तक्रारींचा ओघ चालू होता. इतका कडक बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी आलेल्या लोकांचे मोबाईल पळवले आणि महिलांच्या अंगावरच्या साखळ्याही चोरल्या. सोन्याचे दागिने व मोबाईल संच पळवण्याचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. गर्दीतल्या चोर्‍यांवर आळा बसावा यासाठी साध्या पोषाखातील पोलीस तैनात करण्यात आले होते. सर्वात जास्त चोऱ्या झालेल्या लक्ष्मी रोड, टिळक रोड, केळकर रोड आणि कुमठेकर रोडवर अशा चारही ठिकाणी पोलिसांनी खबरदारी घेतली होती.

उपलब्ध आकडेवारीनुसार, सर्वाधिक मोबाईल चोऱ्या लक्ष्मी रोडवर बेलबाग चौक ते अलका टॉकीज या दरम्यान घडल्या. त्या खालोखाल टिळक रोडवर या चोऱ्या झाल्या. आपल्या मौल्यवान चीजवस्तू जाऊनही अनेकांनी पोलिसात जाऊन तक्रारी करण्याचे टाळले असेही समजते. पोलिसांकडूनही ‘चोऱ्यां’ऐवजी ‘हरवले आहे’ अशा तक्रारी दाखल केल्या जात आहेत, असे काही तक्रारदार सांगताहेत. असे असले तरी ज्यांना वाटले त्यांची रीघ फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात अनंत चतुर्दशीनंतर दोन दिवसांपासून लागली होती. पुढील वर्षी याबाबत आधीच काही कृती कार्यक्रम पोलिसांच्या बाजूने ठरवता येणे शक्य आहे. तसे ठरले पाहिजे.

इतक्या विस्ताराने हा विषय मांडण्याचे कारण म्हणजे विसर्जन मिरवणुकीतील वाढत्या गर्दीवर पोलिसांचे नियंत्रण राहिलेले नाही, तसेच नागरिकही अशा गर्दीत दागिने आणि मौल्यवान वस्तू नीट सांभाळू शकत नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सुदैवाने दाखल झालेल्या तक्रारींमध्ये  महिलांकडून झालेल्या तक्रारी जवळपास नगण्य आहेत. या उत्सवात सहभागी होणारा व मिरवणूक पाहाण्यासाठी येणारा वर्ग हा सर्व थरातील असतो. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले असतानाही अशा प्रकारच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात झाल्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फूटेजमध्ये यातील काहीच कसे आले नाही, हाही एक प्रश्नच आहे.

गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवातील गुन्हेगारीचे प्रमाण पाहिले तरी समजते उत्सवाच्या काळात या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होते. पोलिस बंदोबस्त असतानाही दोन वर्षांपूर्वी दोन गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली होती. त्याला जोडूनच रस्त्यावरील वाहनांच्या तोडफोडीचे प्रकारही घडले होते. गणपती उत्सवाच्या काळात वर्गणी न दिल्याबद्दल व्यापाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत काही कार्यकर्त्यांची मजल गेली होती. आपल्यासमोर असे प्रकार घडत असल्याचे पहात इतर माणसे यात आजही न पडणेच पसंत करतात. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. अशा अनेक बघ्यांनाही यंदाच्या मिरवणुकीत त्यांच्या चीजवस्तू गमवाव्या लागल्या आहेत. तक्रार करून तरी काय उपयोग? आपल्या चोरीस गेलेल्या वस्तू परत मिळण्याची शक्यता कमीच आहे, अशी मानसिकताही वाढत चालल्याचे दिसते आहे. असे असतानाही पोलीस रेकॉर्डनुसार गतवर्षी दोन हजार मोबाईल्स चोरीस गेल्याचे सांगितले जाते. याच्या जोडीला मुलींची छेडछाड यासारखे प्रकार कमी गर्दीच्या ठिकाणी तसेच उपनगरांमध्ये घडत असल्यामुळे या उत्सवास गालबोट लागत आहे. या साऱ्याकडे पोलीस, गणेश मंडळे आणि नागरिक यांनी गांभीर्याने पाहायला हवे.

गेल्या दहा वर्षांमधील गणेश विसर्जन मिरवणुकीचा कालखंड पाहिला तर तो आता सरासरी 28 तासांपर्यंत येऊन पोचला आहे. यंदा 28 तास पाच मिनिटे इतका वेळ लागला. इतक्या प्रदीर्घ काळ चाललेल्या या मिरवणुकीला काही किमान नियम, शिस्त याबाबत काहीच नियंत्रण राहिलेले दिसत नाही. एक प्रकारचा अतिउत्साह वाढत चालला असून त्याची धुंदी वाढत चालली आहे. या धुंदीत आपण काय करतो याचे भानही अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांना राहिलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पोलिसांसमोर झुगारून देत 100 डेसिबल्सपर्यंत ध्वनिपातळी नोंदवली जात असताना त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. मोठ्या श्रद्धेने ही मिरवणूक पाहायला आलेल्या वयोवृद्ध व बालकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. आपल्याला होत असणाऱ्या रक्तदाबाचा त्रास पाहाता अनेकांनी जवळील शासकीय आरोग्य सेवेकडे धाव घेतली. अशा साडेचारशे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची नोंद त्यांच्याकडे झालेली आहे. इथेही आपल्याला त्रास होत असून अशी सुविधा माहीत नसल्याने त्याचा लाभ घेणाऱ्यांची संख्याही मोठी असणार.

वास्तविक गणेशोत्सवाच्या दहा-बारा दिवसांच्या काळात ध्वनिपातळी जास्त नसावी आणि स्पीकरची भिंत नको. तसेच एकेक मंडळापुढे दोनपेक्षा जास्त पथके नकोत या पोलिसांच्या अपेक्षांना हरताळ फासण्यात आला आहे. ध्वनिवर्धकांच्या भिंती, ढोल ताशांचा दणदणाट सहन न झाल्याने मिरवणुकीत पाहायला न आलेल्या पण जवळ रहाणाऱ्या अशा रुग्णांची अवस्था काय झाली असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी. एकीकडे असे कानठळ्या बसवणारे आवाज, तर दुसरीकडे वाढत चाललेली गर्दी यात गुदमरणार्‍यांचे प्रमाण त्यापेक्षा वेगळे आहे. अशा उत्सवी गर्दीतील सुरक्षिततेचे कोणतेही नियम पाळले जाताना दिसत नाहीत. झुंबडबाजी, हुल्लडबाजी व हलकल्लोळ अशा अराजकात गणपतीचे दर्शन घेण्याची कसरत करणाऱ्यांचे हाल कधी संपणार असा प्रश्न पडतो. गर्दी, घुसमट आणि सहन न होणारे आवाज याचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम लगेच दिसत नाहीत. पण ते प्रकृती नाजूक असणाऱ्यांचे सायलेंट किलर असल्याचे वैद्यकशास्त्र सांगते.

गर्दीची घुसमट सहन झाल्याने गुदमरल्यामुळे ऐनवेळी प्राणवायू लावावा लागण्याच्या 33 घटना घडल्या त्या या मिरवणुकीतच. इतकंच नव्हे तर बंदोबस्तासाठी हजर असणाऱ्या काही पोलिसांनाही अशी वैद्यकीय मदत घ्यावी लागली! गर्दी व आवाजाची पातळी यामुळे हा त्रास प्रामुख्याने लक्ष्मी रस्त्यावरील अनेक नागरिकांना झाला. सुरुवातीपासून हजर असणाऱ्या नागरिकांनी सांगितले की, पहिला तासभर फक्त गर्दी व आवाजाचे प्रमाण कमी होते. त्यानंतर मात्र पुढे दिवसभर व सातत्याने चालूच होते. या काळात आवाजाची पातळी ही सतत 75 ते 90 तर कधी ती 100 डेसिबल्स या ऐकण्याच्या व सहन होण्याच्या पातळीपेक्षाही खूप जास्त होती! कानाजवळून इतका मोठा आवाज ऐकणे तर धोक्याची घंटाच आहे!  दरवर्षीप्रमाणे यंदाही रात्री बारा वाजल्यानंतर मिरवणुकीतले स्पीकर्स बंद ठेवण्यात आले होते. पण ढोलपथके व बॅण्डपथके यांचा धडधडाट चालूच होता. बॅण्डपथके ही एकेकाळी सुरेल व सुंदर संगीत ऐकण्यासाठी होती. मिरवणुकीच्या सुरुवातीची प्रतिष्ठेची बॅण्डपथके वगळली तर आता बॅण्डपथकांतही ती मेलडी राहिली नसून त्यांनीही कार्यकर्त्यांनी बेहोष होऊन नाचावे अशा पद्धतीनेच वाजवले जाते. अभिरुची बदलत असल्याचे हे चिन्ह आहे. डीजेवरील दणदणाट हा तर आता सुसंस्कृत माणसाच्या समजशक्तीपलिकडचा झाला आहे. कोणत्या नेत्याची पुण्यतिथी असो वा गणेश विसर्जन किंवा नवरात्र असो डीजेवरील कर्कश्श आवाज आणि अंगविक्षेप करत नाचणे हे आपण पुन्हा एकदा आदिम माणसाच्या काळात गेलो आहोत की काय याची आठवण करून देणारे आहे. विसर्जन मिरवणुकीला काही पावित्र्य असते, हे आपण आता पूर्णपणे विसरायला हवे!

लक्ष्मी रोड वगळता बाकीच्या रस्त्यांवर रात्रभर मिरवणूक ठप्प रहाते आणि पहाटे आरती झाल्यानंतर पुन्हा डीजेच्या तालावर थिरकते हे दृश्य आता गेली काही वर्षे बघण्याची सवय पुणेकरांना लागली आहे. त्यात पुन्हा ध्वनिप्रदूषण नियमात दुरुस्ती केली असली तरीही अजूनही शांतताक्षेत्रे निश्चित केली नाहीत. ध्वनिवर्धकाच्या आवाजाची पातळी रात्री बारानंतरही कमीच असावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, पण त्याचाही फारसा परिणाम जाणवला नाही. मानाचे गणपती वगळता इतर रस्त्यांवर मात्र हा आवाज चालू होता. भीतीपोटी रात्री डीजे लावायचे नाही, असे डीजे चालकांनी ठरवल्यामुळेच काही काळ ती बंद होती इतकेच.

मिरवणुकीत गाणी मोठ्या आवाजात लावल्यावरून पोलीस व गणेश मंडळे यांच्यात होणाऱ्या वादावादीचे प्रमाणही यंदा जास्त असल्याचे जाणवले. विशेषत: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी दुपार झाली तरीही ही मिरवणूक अत्यंत सावकाश चालत होती. त्यामुळे टिळक रोडचा वापर करणाऱ्या अनेकांना त्याचा त्रास झाला. हे चित्रही दरवर्षी असेच असते. त्यात कोणताही बदल होताना दिसत नाही. त्याच त्या डीजे आणि स्पीकरच्या भिंती आणि त्यावर वाजवली जाणारी तीच ती थिल्लर गाणी आणि बेभान होऊन नाचणारी तरुण मंडळी. अनेक गणेश मंडळांमध्ये आपल्यापेक्षा अधिक जोराने गाणी लावण्याची स्पर्धा लागते हे दृश्यही यंदा पाहायला मिळत होते. अशा स्थितीत दुचाकीवरून दुसरे दिवशी कामावर जाणाऱ्या पुणेकरांची तारांबळ हेही एक नित्याचेच बनले होते. याचा परिणाम म्हणजे टिळक रोडला जोडणारे अनेक रस्ते, दांडेकर पूल, म्हात्रे पूल या भागात वाहतुकीची मोठी कोंडी झाली. हे सारेच आता कधी बदलणार असा प्रश्न आहे.

त्यादृष्टीने या वर्षीपासूनच काही पूर्वतयारी करायला हवी. आनंदाची गोष्ट म्हणजे समाजातील काही घटक का होईनात आता आपणहून याबाबत पुढे येत आहेत. कारण सार्वजनिक गणेशोत्सवाचे जे वास्तव चित्र आहे, ते पाहून ही माणसे अस्वस्थ होत आहेत. याबाबतीत जनजागृतीची खरी गरज असल्याचे अधिकाधिक लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. मग ते लोक सामाजिक क्षेत्राशी संबंधित असो, पर्यावरणाशी संबंधित क्षेत्र असो किंवा शैक्षणिक क्षेत्रातील असतील. या उत्सवापासून फटकून राहिलेल्या वर्गानेच आता काही पाऊल उचलण्याची गरज आहे.

‘चाणक्य मंडल’सारख्या संस्थांचे शेकडो विद्यार्थी क्राउड कंट्रोलचे काम दरवर्षी न चुकता करतात. त्यांच्या अनुभवाचा व त्यांच्या सूचनांचा उपयोगही पुढच्या वर्षीच्या गणपती उत्सवातील गर्दीच्या ठिकाणांमधील प्रश्न सोडवण्यासाठी करून घेता येईल. अर्थात, यासाठी गरज आहे ती प्रखर इच्छाशक्तीची!

लेखक : विवेक सबनीस
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *