विखारी हत्यांचे असहिष्णु सोहोळे…

          बंगळुरूच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची झालेली हत्या जेवढी मानवतेला काळीमा फासणारी आहे त्यापेक्षा जास्त काळीमा फासणारं वर्तन त्या हत्येनंतर बहुसंख्य भारतीय  समाजाकडून घडलेलं आहे. गौरी यांच्या रक्ताचे डाग सुकण्याआधीच ज्या टोकाच्या विखारी आणि धर्मांध प्रतिक्रिया दोन्ही बाजूंनी उमटल्या आहेत; त्यातून या समाजात सामुदायिक शहाणपण, सहिष्णुता आणि विवेक शिल्लक उरलेला आहे किंवा नाही, असा प्रश्न कुणाही संवेदनशील माणसाला पडावा अशी ही स्थिती आहे.

या हत्येच्या निमित्ताने माध्यमं, समाज माध्यमं आणि त्यावर व्यक्त होणारे कथित बुद्धिमंत बहुसंख्य तसंच राजकीय नेत्यांचं वर्तन हे एकारल्या आणि विखारी कर्कश्शपणाचं उदाहरण आहे. ज्यांना (स्वघोषित) उजवे म्हणून संबोधले जातं त्यांच्यातील अनेकांनी गौरी यांच्या हत्येचं प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे समर्थन केलं; गौरी यांची जात काढली, त्यांचा विवाह कोणत्या धर्माच्या पुरुषाशी झालेला होता आणि तो त्यांनी कसा लपवून ठेवला याचा गौप्यस्फोट करण्यात आला, गौरी यांचा उल्लेख ‘कुत्री’ आणि आणखी बऱ्याच अश्लाघ्य अशा शब्दात करण्यात आला. ही हत्या आणि नंतर हे जे काही घडत होतं किंवा घडवून आणलं होतं, त्यातून एकदा सुसंस्कृत समाजावर पडलेला डाग म्हणून ज्याची लाज वाटायला हवी अशा हत्येचा तो मांडलेला किळसवाणा उत्सव भासत होता. अशा नृशंस हत्येचं समर्थन करणारा आणि कोणतीही चौकशी होण्याआधीच बेजबाबदारपणाची सीमा गाठत त्या हत्येची जबाबदारी परस्पर कुणावर तरी ढकलून देणारा हा बहुसंख्य समाज सामुदायिक शहाणपणा, सहिष्णुता आणि विवेक याबाबतीत अश्मयुगापेक्षाही जास्त अप्रगत, असंस्कृत आणि महत्वाचं म्हणजे अमानवी असल्याचं मन विदीर्ण करणारं चित्र समोर आलेलं आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या विरोधात उभे टाकलेले बहुसंख्य (स्वघोषित) पुरोगामी आणि डावे किमान सुसंस्कृतपणानं व्यक्त झालेले नाहीत हेही स्पष्टपणे सांगायला हवं. हत्येचा गुन्हा नोंदवला जाण्याआधीच ही हत्या करणारे कोण आहेत हे त्यांनी जाहीर करून टाकलं! याचा अर्थ गौरी लंकेश यांची हत्या करणारे कोण आहेत, हे या बहुसंख्यांना माहिती होतं. मग प्रश्न उरतो की, तर मग या लोकांनी लोकांनी गौरी यांना संरक्षण पुरवण्याची संवेदनशीलता का दाखवली नाही? या डाव्या आणि पुरोगामी असलेल्या बहुसंख्य बुद्धिवाद्यांना कोणाची तरी हत्या झाल्यावरच जाग का येते. अशी हत्या झाल्यावर लगेच ते न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरून आरोपी जाहीर करण्याचा आक्रोश मांडतात. पण, ज्यांना त्यांनी आरोपी ठरवलेलं आहे त्यांच्याविरूद्ध कोणतेही पुरावे आजवर असे आरोप करणारांनी दिलेले नाहीत. संकेत आणि तर्क म्हणजे एखाद्याला गुन्हेगार म्हणून सिध्द करण्याचे पुरावे नव्हेत, हे नीट उमजून घेण्याइतकंही भान त्यांना आलेलं नाहीये असाच याचा अर्थ आहे. नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी आणि गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या नंतर नेमकं असंच घडलेलं आहे, हे विसरता येणार नाही.

समाजात झालेल्या अशा सर्वच हत्यांच्या बाबतीत ‘सिलेक्टिव्ह’ राहण्याचा संधीसाधूपणा आपण दाखवतो आहोत हेही लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या कथित पुरोगामी किंवा डाव्याची कथित हिंस्र उजव्यानी केलेली हत्याच केवळ मानवतेला काळीमा फासणारी असते आणि आयुष्यभर सेवाभावाने काम करणाऱ्या कथित उजव्या आणि प्रतिगामी स्वयंसेवकाची डाव्यांकडून झालेल्या हत्या मात्र मानवतेला काळीमा फासणाऱ्या नसतात किंवा त्या हत्या झाल्याने कुणाला दु:ख होत नाही; ही भूमिका संधीसाधुपणाची, दुटप्पीपणाची आहे. एकीकडे ‘ऑल आर इक्वल’ असा घोष करणाऱ्यांनीच ‘..बट ओन्ली वुई आर सेल्फ डिसायडेडली मोअर इक्वल’ असं वागणं कोणत्याही मानवतेत बसणारं नाहीच.

अशा काही घटना घडल्या की, एक मेणबत्ती पेटवून आणि/किंवा समाज माध्यमांवर एखादी (आक्रस्ताळी) प्रतिक्रिया टाकून मोकळं होण्याची वृत्ती बोकाळली आहे; सारासार विवेकाने मुळातून त्याकडे बघण्याची दृष्टी आपण अशा वेळी हरवून बसतो, हे चित्र जास्त चिंताजनक आहे. आज महाराष्ट्र आणि केंद्रात भाजप म्हणजे हिंदुत्ववाद्याचं सरकार आहे पण, नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं; तर केंद्रातही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील मनमोहनसिंग पंतप्रधान असलेलं आणि महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते. पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री तर आर्. आर्. पाटील गृहमंत्री होते. हत्या होताच जी काही प्रारंभिक माहिती मिळाली असणार त्या आधारे पृथ्वीराज चव्हाण यांनी हत्या करणारे कोण असावेत यासंबंधी काही स्फोटक संकेत स्पष्टपणे दिलेले होते. त्या दिशेने तपास का झाला नाही, तसा तपास करून ‘त्यांच्या’ मुसक्या आवळण्याची कामगिरी का बजावली गेली नाही, ‘त्यांच्या’ तशा मुसक्या आवळण्यात कुणी आडकाठी आणली, का ते दिले गेलेले संकेत तपासांती साफ चुकीचे ठरले; या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कधीतरी राज्यकर्त्यांकडून मिळायला हवीत.

कलबुर्गी यांची हत्त्या झाली तेव्हा सिद्धरामय मुख्यमंत्री होते आणि आताही तेच मुख्यमंत्री आहेत. गौरी लंकेश यांचे मारेकरी कोण आहेत ते जाहीर करणाऱ्या राहुल गांधी यांच्याच काँग्रेसचे सिध्दरामय; भाजपचे नाहीत. कलबुर्गी यांच्या हत्येचे मारेकरी अजूनही सापडलेले नाहीत. अगदी दर दिवसाला तपासाचा काटेकोरपणे आढावा घेत ते मारेकरी शोधून काढण्याची तसदी सिद्धरामय यांनी का घेतली नाही, हे कोडं कुणाच डाव्या आणि पुरोगाम्यांना पडत नाही. सिद्धरामय यांच्याही काही व्यवहारांची चौकशी गौरी लंकेश करत असल्याच्या वृत्तांकडे कानाडोळा करत सिध्दरामय यांनी गौरी लंकेश यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला, याचं अप्रस्तुत कौतुक केलं जातंय. डाव्यांचं सरकार राज्यात असतांनाच केरळात रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्या झालेल्या आहेत. याचा अर्थ कट्टरपंथीयांकडून कोणाचीही हत्या होते तेव्हा सरकार कोणत्या पक्षाचं याच्याशी काहीही संबंध नसतो. मात्र अशा हत्या झाल्या की माणुसकीचा गळा घोटला गेल्याच्या आरोपांची राळ उडवण्यात एकजात हे सर्व राजकीय पक्ष स्वत:ला ‘धन्य’ मानण्याचा ढोंगीपणा करण्यात आघाडीवर असतात. अशा हत्यांची पुनरावृत्ती घडली की समाजातीलही अनेकांना खडबडून तात्पुरती जाग येते; मेणबत्त्या पेटवल्या जातात, परस्परांवर एकतर्फी दोषारोपण केलं जातं आणि खरं-खोटं यातील सीमारेषा पुसट करण्याची अहमहमिका दोन्ही बाजूंनी सुरू होते!

आपल्या देशात बाबा-महाराज यांची चलती असून त्यांच्यामार्फत हिंदुत्वाचं संघटन केलं जातंय आणि या बाबा-महाराजांना सरकारचं संरक्षण आहे, असा एक लोकप्रिय आरोप 2014 नंतर कायमच बहरून आलेला आहे. सकृतदर्शनी त्यात तथ्य दिसतंही. पण, ही वस्तुस्थिती नाही हे आपण कधी तरी लक्षात घेणार आहे की नाही? हे बाबा, महाराज, त्यांचे मठ, पंथ काही 2014 नंतर निर्माण झालेले नाहीत. हे सर्व ‘थोर’ महापुरुष आणि त्यांचे अड्डे 25-30 किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष जुने आहेत; ते सुरू झाले तेव्हा देश व बहुसंख्य राज्यांत काँग्रेसची सरकारे होती. हे महापुरुष आणि त्यांचे अड्डे हे जर समाजाला लागलेली विषवल्ली आहे तर ती उखडून फेकण्याचा कणखरपणा तेव्हाच्या सरकारांनी दाखवला नाही; उलट बाबा आणि महाराजांच्या कच्छपी लागण्याची स्पर्धाच काँग्रेस नेत्यांत होती; धीरेंद्र ब्रम्हचारी, चंद्रास्वामी, भोंडशीबाबा ते अलिकडचे युवा राष्ट्रसंत, राष्ट्रसंत यांचं पीक काढणारांत काँग्रेस नेत्यांचाच कायम पुढाकार राहिलेला आहे. या बाबा-महाराजांची बीजं काँग्रेस नेत्यांनीच रोवली आणि त्यांच्या सरकारांचंच कृपाछत्र या बाबा-महाराजांवर होतं कारण त्यांच्या मठ आणि डेऱ्यांनी दिलेल्या ‘मताशीर्वादावर’ काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांचा निवडणुकांत विजय होत होता; हे  मूलभूत वास्तव शहाणपण गहाण न टाकता समाजानं नीट समजून घेतलं पाहिजे. आता हे बहुसंख्य बाबा, महाराज आणि त्यांचे अड्डे-त्यांचे मठ भाजपच्या आश्रयाला गेलेले आहेत, ही अन्य राजकीय पक्षांची खरी पोटदुखी आहे हे ओळखता न येण्याइतपत विवेकी माणूस भाबडा नाही पाहिजे!

जे झालं, ते पुरे झालं. कोणाच्याही होवोत, या अशा हत्या कलंक आहेत. त्याकडे एकांगी विखारी राजकीय विचारातून, हिंस्र जात्यंध व धर्मांध नजरेतून न बघता हे करणारी विषवल्ली मुळापासून उखडून टाकणारा विवेक समाजात निर्माण व्हायला हवा आहे. तरच अशा मानवतेला काळीमा फासणाऱ्या हिंस्रतेवर नियंत्रण मिळवता येईल; अन्यथा विखारी हत्यांचे असहिष्णु सोहोळे असेच होत राहतील.

लेखक : प्रवीण बर्दापूरकर
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *