वाचनाच्या गोष्टी

सतत वाचन करत राहिल्याने एक प्रकारची निष्क्रियता येते का असा प्रश्न कुणीतरी विचारलाय. याचे उत्तर असे आहे की अलिकडे जे वाचन करतो ते मी लेखनासाठी करतो. त्यामुळे तासन्तास वाचले तरी आपण काही करत नाही अशी भावना येत नाही पण पूर्वी येत असे विशेषतः एखादे पुस्तक सलग वाचत राहावे असे वाटत असे. म्हणजे उदा : सांगायचे तर मी अनेकदा पुस्तक वाचताना कोकण रेल्वेने जात असेल तर बोगदे येतात. आणि वाचन बंद पडल्यामुळे खूप अस्वस्थ व्हायला होते. किंवा चेंबूरला अगदी थोडावेळ गाडी काळोखातून जाते अशावेळी व्यत्यय आल्याची भावना होते. मला वाचनात जराही व्यत्यय चालत नाही याच मुळे मी मोबाईल सायलेंट वर ठेवतोच आणि स्मार्ट फोन वापरणे मी सोडून दिले. याचे कारण स्मार्ट फोनने सतत फोटो घ्यावे किंवा सतत काहीतरी  गुगलमध्ये शोधावे, ई-मेल बघावे असे मोह होत राहतात. किंवा कॉपी पेस्ट करून काही पाठवावे दीर्घ लिहावे हे सगळे स्मार्ट फोनच्या आलेल्या  मोहामुळे पुस्तकाचे वाचन कमी झाले आहे असे कळले तेव्हापासून मी स्मार्ट फोन वापरणे सोडून दिले.

माझी आई सतत मी पुस्तक वाचत आहे हे पाहून अस्वस्थ होत असे. भाऊही अस्वस्थ होत असे घरातल्यांना वाटायचे की हा काहीच करत नाही नुसताच बसून आहे आणि ते खरेही होते विशेषतः पंचवीस ते तीस या काळात काही वर्षे अशी गेली की मी या काळात महाडला होतो अभाविपच्या कामासाठी आणि परत आलो साहजिकच नोकरी मी सहा महिन्यात सोडून दिली त्यामुळे नुसताच घरात बसून पुस्तके वाचतोय ही भावना घरातल्यांच्या मनात चीड उत्पन्न करत होती. त्यावर उपाय म्हणून वाशीतच करता येईल असे मी काम स्वीकारले. हा वाचनाच्या बाबतीत एक गोष्ट नक्की सांगायला हवी की तुम्ही जे काही काम करता ते वाचनाला पूरक हवे. उदा : तेव्हा मी रोज मुंबईला जात असे तर ट्रेनमध्ये एकतास वाचन व्हायचे. नंतर मी पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला ज्याच्यात मला वाचायला पुस्तके विकत घेणे परवडायला लागले.

पुस्तक संग्रहाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी फार कमी पैसे कमावत असे म्हणजे नव्वदच्या दशकात महिन्याला उत्पन्न साधारणपणे सुरुवातीला दीड-दोन हजार रुपये मिळत महानगरला नोकरी करताना नंतर ते चार-पाच इतके वाढले. साहजिकच पाचशे चारशे रुपयाचे पुस्तक घेताना मी विचार करायचो. तरीही strand मधून एखादे नवीन पुस्तक खरेदी करावे अशी माझी इच्छा होती.

एकदा तर मी आठशे रुपयांच्या पुस्तकांचा एक गठ्ठा विकत घेतला होता कारण ही सगळी व्यंगचित्रावरची पुस्तके होती आणि मला व्यंगचित्रकार व्हायचे होते. आणि त्याचा अभ्यासही करायचा होता. वाचन करणे हा एक प्रकारचा पलायन वाद आहे, आणि वाचन करणे ही राजकीय कृती आहे ही दोनही वाक्ये तितकीशी बरोबर नाहीत. पलायनवाद मी म्हणणार नाही पण जेम्स हाडली चेस, अगाथा ख्रिस्ती या सारख्या पुस्तकांचे वाचन निश्चितच पलायनवादी असते. पण ते आवश्यक असते म्हणजे बर्ट्रांड रसेल सारखा माणूसही रोज रहस्यकथा वाचत. रसेल असे म्हणतो की रोज मायकेल इनेस किंवा अगाथा ख्रिस्ती सारख्या एखाद्या कादंबरीकाराची कादंबरी वाचल्याशिवाय माझे मन स्थिर होऊ शकत नाही.

इतकेच नव्हे अ‍ॅरिस्टर कुकने असे वर्णन केले आहे की त्याच्या अमेरिकेच्या पुस्तकात की अमेरिकेच्या दौऱ्यात रसेल त्याला भेटला तर रसेलची गाडी सकाळी स्टेशनवर आल्यावर तो अस्वस्थ होऊन फेऱ्या घालत होता, कारण पुस्तकाची दुकाने बंद होती. आणि पुस्तकाचे दुकान उघडल्यावर ताबडतोब त्याने दोन रहस्यकथा विकत घेतल्या आणि दोन खिशात घातल्या अर्थात ते पॉकेटबुक होते. आणि मग तो थोडासा संतुष्ट झाला.

हवे असलेले पुस्तक मिळाले नाही तर कासावीस व्हायला होते. याचमुळे मी प्रत्येक प्रवासात मी चार ते पाच पुस्तके घेतो. एक गंभीर एक लाईट एक कथांचे म्हणजे एखादी कथा चटकन वाचून झाली पाहिजे. या प्रकारचीही पुस्तके असतात. आता कवितेचे पुस्तक. कारण कविता प्रवासात चटचट वाचून होतात. अलीकडेच मी गोव्याच्या प्रवासात, मी जॉन अपडाईकच्या जवळपास एकशेपाच कथांचा संग्रह असलेला अर्ली स्टोरीज हा हजार सव्वा हजार पानांचा संग्रह घेऊन गेलो, परिणामी त्यातल्या बर्‍याच मोठ्या कथा मी प्रवासात वाचून काढल्या.

पूर्वी वाचनाइतकी मला वाचलेल्या गोष्टीवर लिहिण्याची आवड होती. त्यामुळे सतत स्टेशनरी विकत घ्यायचो आणि चारपाच पेन तयार ठेवायचो कारण रात्री अपरात्री जाग आली तर वाचन करणे किंवा लिहीत बसणे हे दोनच त्यावरचे उपाय आहेत अर्थात ही मोबाईल पूर्वीची गोष्ट आहे. अर्थात मोबाईल आल्यावरही मध्यरात्री तुम्ही कोणालाही फोन करू शकत नाही तशीच मैत्री असल्याशिवाय.

आदर्श संग्राहक कोणता? मला वाटते आदर्श संग्राहक तो की ज्याच्याकडे मोजकीच पुस्तके आहेत आणि ती बऱ्यापैकी त्याने वाचलेली आहेत. आता उदा : माझ्याकडे दहा अकरा हजार पुस्तके आहेत पण मी त्यातली दोन तीन हजार वाचली असतील. या संदर्भात उम्बारटो एकोला जेव्हा विचारण्यात आले होते, ज्याच्याकडे पंचवीस हजार पुस्तकांचा संग्रह होता. ही तुम्ही सगळी वाचली आहेत का? त्याने एक-दोन गमतीदार उत्तरे ठरवली होती की ही सगळी मी या आठवड्यासाठी ठेवलेली आहेत. पण त्याने खरे उत्तर असे दिले की तो म्हणतो ‘असे प्रश्न विचारणाऱ्यांना हा प्रश्न पडत नाही का की पुस्तकाचा संग्रह हे केवळ वाचनासाठी नसतो तर ते लिहिणाऱ्या माणसाचे वर्किंग टूल असते.’

संदर्भ पुस्तके मधेच काहीतरी वाचणे विरंगुळ्यासाठी वाचणे अशा अनेक गोष्टी मला वाटते त्याला अपेक्षित असाव्यात. तर दुसरे म्हणजे चांगला संग्राहक तो की ज्याचे वाचन आणि संग्रह अद्ययावत असतो. उदा : माझे वाचन फार अद्ययावत ठेवण्याचा मी प्रयत्न नाही करत. उदा : सेपियन्स सारखे पुस्तक जे हजारो लाखो लोक वाचतात ते ताबडतोब वाचले पाहिजे असे मला वाटत नाही याचे कारण माझे वाचनाचे त्यात त्या वेळचे विषय असतात. दुसरे मला असे वाटते की वाचकांना हा शब्द आवडणार नाही पण वाचन ही एक आध्यात्मिक गोष्ट आहे म्हणजे ध्यानधारणा सारख्या अध्यात्मिक गोष्टीत असे असते की जसे तुम्हाला त्यात शिरायला वेळ लागतो तसे त्यातून बाहेर यायलाही वेळ लागतो.

एखाद्या वेळी मी दीर्घ कादंबरी किंवा मोठे पुस्तक वाचत असेन तर मी त्याच मूडमध्ये असतो. उदा : अलीकडे मी कार्ल मार्क्सचे स्टेडमन जोन्सने लिहिलेले चरित्र वाचताना मी घर आणि ऑफिसची मिळून सोळा सतरा कार्ल मार्क्स वरची पुस्तके काढली. मग त्यात ‘लेट कार्ल मार्क्स’ असे पुस्तक होते. कार्ल मार्क्स आणि त्याच्या सहकाऱ्यांबद्दल लिहिलेले पुस्तक होते. त्याचे छोटेसे सिंगरने लिहिलेले चरित्र होते. मधेच ते वाचायला लागलो. याप्रकारे मग कार्ल मार्क्सचे निवडक निबंध वाचायचा प्रयत्न केला. अर्थात त्याचे सगळे लेखन मला समजते असे नाही.

रामकृष्ण परमहंस यांच्यावरील एम्ने लिहिलेले तीन खंड वाचले, शिवाय दोन खंडी चरित्र, मग शिष्यांनी लिहिलेली छोटी मोठी पुस्तके वाचली. म्हणजे असे करत मी पूर्ण रामकृष्णमय होऊन गेलो आणि मग सरळ मी कलकत्याला जाऊन रामकृष्णनच्या देवळाला भेट दिली. हे सारे बहुतेक बुद्धिवादी अशा वाचकांना आवडणार नाही पण माझा मुद्दा हा मेडिटेशन, ध्यानधारणेचा नसून वाचन हे ध्यान आहे हा मुद्दा पटवण्याचा आहे. की त्याच्यात जसे चटकन शिरता येत नाही तसे चटकन बाहेरही येता येत नाही. तर वाचनाची विलक्षण तंद्री लागली असा अनुभव मला कठीण पुस्तकांबाबत येतो. म्हणूनच अलीकडचे माझे सगळे वाचन हे तश्या कठीण पुस्तकांचे असते.

वाचनाच्या बाबतीत मला सुरुवातीचा काही काळ असा आला की वाचनाने मला थकवा येत असे. किंवा कंटाळा येत असे. आज असे होत नाही. अर्थात थोडासा कंटाळा आला तर मी दुसरे पुस्तक वाचतो. पण सलग दहा अकरा तास वाचायला मला काहीही प्रॉब्लेम येत नाही. किंबहुना अनेकदा असे पूर्वी व्हायचे. विशेषतः जेव्हा मी ऑफिस वगैरे थाटले नव्हते तेव्हा सकाळी जायचो, हॉटेलात, एक चहा प्यायचो एक दीड तास वाचायचो. परत घरी यायचो वाचत बसायचो परत एखादा चहा प्यायचो मग चार साडेचारला इडली मेंदुवडा सांबार खायचो. आणि परत संध्याकाळपर्यंत चहा पीत वाचत बसायचो असे आठ दहा तास मी वाचत असे. अलीकडे असे फक्त मोठी पुस्तके हातात घेतो तेव्हाच होते. ‘प्रथम  आलो’ या  बंगाली कादंबरीचा 1763 पानाचा अनुवाद वाचताना पाच दिवसांत संपवताना मी रोज अडीचशे तीनशे पाने वाचत होतो. साहजिकच सकाळपासून ते रात्री पर्यंत मी ते पुस्तक वाचत असे. नेमाडे यांच्या ‘हिंदू’चाही काही भाग म्हणजे सलग म्हणजे साडे चारशे पाने मी सात आठ तासात वाचली. ‘गूढयात्री’ सारखे पुस्तक किंवा ‘पर्फुयुम’ सारखे पुस्तक मी एका बैठकीत संपवले आहे. अर्थात इंग्रजी पुस्तके एका बैठकीत संपवायला खूप मोठी बैठक मारावी लागते. मराठी शंभर दीडशे पानाचे पुस्तक सीएस्‌टीपर्यंतच्या प्रवासात वाचून होते. किंवा एक दीड तासात संपते.

लेखक – शशिकांत सावंत
ईमेल – swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *